Wednesday, September 10, 2008

महिला प्रगतीपथावर तर पुरुषांमध्ये स्वैराचार

सध्याचा काळ हा अतिशय वेगवान आहे. वाहनांचा वेग, टेक्नॉलॉजीचा वेग, सायबरचे वाढते प्रमाण, दूरसंचार क्षेत्रातील क्रांती, टेलिकम्युनिकेशन आणि अणुक्षेेत्रातील भव्य शोध, मिडीयाला आलेला वेग याबरोबरच हे शतक संगणकाचे व आयटीचे शतक म्हणून ओळखले जाते या शतकात सर्वच क्षेत्रात वेगवान घडामोडी घडत असताना जगभरातच तंत्रज्ञानाने आघाडी घेतली असून प्रत्येक ठिकाणी महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसते. कोणताही विभाग असो, क्षेत्र असो, बैठे काम असू द्या किंवा मेहनतीचे काम असू द्या, प्रत्येक क्षेत्रात महिलांनीच आघाडी घेतल्याचे दिसते.
मागील 8-10 वर्षांतील भारताचे आणि जागतिक अहवाल पाहिले असता, देशभरातील शाळा-कॉलेज, एसएससी, एचएससी बोर्डाचे रिझल्ट पाहिले असता प्रत्येक क्षेत्रात मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसते. 19 वे शतक हे संपूर्ण जगभर प्रचंड अलथापालथीचे गेले. रशिया आणि फ्रान्स या देशात रक्ताचे पाट वाहिले गेले. भारतात स्वतंत्रता चळवळ तर अमेरिकेत निग्रोंनी रणशिंग फुंकले. या सर्वांमध्येही महिलांचा सहभाग होता. झाशीच्या राणीपासून ते गोल्डा मायर (इस्त्रायल) अनेक बहादूर युवतींनी आपली नावे समररणांत प्रत्यक्ष बहादूरी गाजवून इतिहासात अजरामर केली. तर सध्याच्या 20 व्या शतकात फ्लॉरेन्स नाइटिंगेलसारख्या युवतीने नर्सिंग क्षेत्रातून आपल्या सेवेचा संपूर्ण जगाला परिचय देऊन नर्सिंग क्षेत्राला मानाचे स्थान मिळवून दिले. मदर तेरेसा सारख्या जगविख्यात महिला झाल्या. त्याचबरोबर मागील 10 ते 15 वर्षांत महिला वर्गाने जोरदार मुसंडी मारत प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापन केले आहे.
भारतात रमाबाई रानडे, शाहू महाराज, आगरकर, म. जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर आणि सावित्रीबाई फुलेंसारख्यांनी स्त्री-शिक्षणाचे बिज 19 व्या शतकात पेरले. त्याची आज गोमटी फळे आली आहेत. भारतात 30,000 हून अधिक असलेल्या महाविद्यालयांमधून आज शिक्षण घेणाऱ्या युवतींचे प्रमाण तीन कोटींहून जास्त आहे. विद्यापीठांच्या निकालावर नुसती नजर टाकली तरी हे लक्षात येते की युवतींचे हे यश ग्रामीण विभागात 60 टक्के आहे. तर शहरी विभागात ते जवळजवळ 100 टक्के इतके आहे. प्रचंड हाल, अपेष्टा, अजूनही घरी होणारा अपमान, दारू पिऊन घरी येणारे निर्लज्ज नवरे, भाऊ, बाप आणि पत्नीला मारहाण करणारे नराधम पती, चौका-चौकातून होणारी मवाली पोरांची टिंगलटवाळी या सर्वांना तोंड देत हा प्रवास सुरूच आहे. स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे असे मानून तिचा सेक्स-सिंबॉल म्हणून वापर करणाऱ्या शहरी भागातही युवती आपले गुण-कष्ट-कौशल्य व काम करण्याची वृत्ती, मेहनत व प्रचंड बुद्धिमत्ता यामुळे पुरुषांपेक्षा कित्येक पटीने पुढे गेली आहे.
शाळा-कॉलेजचे वार्षिक रिझल्टस्‌ पाहिल्यास महाराष्ट्रातील सर्वच बोर्डात दरवर्षी पहिले येण्यात तर मुलींनी कहर केला आहे. त्यामुळे या शिकलेल्या मुलींना ताबडतोब नोकऱ्याही मिळतात. याचा अर्थ असा नाही की युवक मेहनत घेत नाहीत, करीअर करीत नाहीत. पण सध्याचे वास्तव चित्र पाहिले असता तरुण मंडळी चित्रपट बघणे, सिगारेट ओढणे, नाक्यावर उभे रहाणे, टवाळकी करणे, टी.व्ही. बघणे, दारूच्या पार्ट्यांमध्ये व्यस्त असतात. नोकरी मिळाली तरी वेळेवर जात नाही. दांड्या मारण्याचे प्रमाण जास्त असते, उद्धटपणे वागतात. त्यामुळे प्रत्येकजण मुलांपेक्षा मुलींना प्राधान्य देतात. याचाच विपरीत परिणाम झाला असून आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी कब्जा केला आहे. टेलिकम्युनिकेशन, आयटी, बीपीओ सेंटर्स, कॉल सेंटर्स, पत्रकारिता, रेडिओ, विमान कंपन्यांमधून नोकरीच्या जागा जेव्हा भरल्या जातात तेव्हा 100 पैकी 80 जागा या युवती पटकावतात. देशाच्या राष्ट्रपती महिला, कॉंग्रेसच्या अध्यक्षा महिला, मुुंबईच्या महापौर महिल्या अशी बरीच मोठी यादी तयार होईल. सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये महिला आघाडीवर आहेत. शिक्षण क्षेत्रातही युवतींनी बाजी मारल्याचे दिसते. कॉल सेंटर, सर्व्हिस सेंटर, बीपीओ, शिक्षण, संगणक या क्षेत्रात युवतींना मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तर क्लार्क, शिपाई, प्यून, ड्रायव्हर या नोकऱ्या मिळवण्यातही युवतींचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर दुकानांमधून सर्व्हिसेस, हॉटेल, बार, पेट्रोल पंप, बस कंडक्टर, पायलट, नर्स, हवाई सुंदरी, रेल्वेपासून ते थेट टॅक्सी ड्रायव्हरपर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतल्याने पुरुषांना नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे. आता तर रिक्षा ड्रायव्हर म्हणून 40 महिला येत्या महिनाभरात रस्त्यावर उतरणार आहेत. मग पुरुषांनी करायचे काय?
दिवस असो की रात्र महिला नोकरी-धंद्याच्या निमित्ताने फिरतात. त्यांना ने-आण करण्यासाठी कंपनीने गाड्यांची सोय केलेली असली तरी याच गाड्यांचे ड्रायव्हर रात्री-अपरात्री बेसावध महिलांवर अत्याचार करीत आहेत. परवा पुण्यातील आयबीएम कॉल सेंटरच्या एका 22 वर्षीय तरुणीवर तुकाई टेकडीवर 10 ते 11 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.
मुंबईतही असे प्रकार अधूनमधून घडत असतात. स्वैराचार वाढला आहे. बेकार तरुण वाममार्गाला लागत आहेत. चोऱ्या, दरोडे, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महिलांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या मिळत असताना तरुण वर्ग मात्र वाममार्गाकडे वळत आहे. हे कोठेतरी रोखायलाच हवे, अन्यथा सर्वत्र हा:हाकार माजेल.

No comments: