Saturday, February 12, 2011

घोटाळयांच्या दुनियेत भारत नंबर-1

घोटाळयांच्या दुनियेत भारत नंबर-1, 
घपला 767 लाख कोटी रुपयांचा!!
देशभरात विविध घोटाळे होतात. या घोटाळयांमध्ये भारताने यावर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. जगभरात 516  लाख कोटी इतका काळा पैसा आहे. त्यापैकी तब्बल 308 लाख कोटी इतका पैसा केवळ भारतीयांचा आहे. अशातच भारत स्वतंत्र झाल्यापासुनचा रेकॉर्ड तपासला असता सुमारे 767 लाख कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास येते. हा पैसा जर सार्थकी लागला असता तर देशभरातील प्रत्येक भारतीय व्यक्तिला आपण 60हजार रुपये देऊ शकलो असतो. इतकेच नव्हे तर या पैशातून प्रत्येकी 60 हजार कोटींच्या कर्ज माफीच्या एक दोन नव्हे तर तब्बल 125 योजनांची घोषणा करता आली असती. या रकमेतून प्रत्येक भारतीयाला दरमहा 5000 रुपये देऊ शकलो असतो. परंतू या प्रकरणी कोणीही दखल घेत नाही. पैशाने गब्बर झालेले नेते आणि सावकार पैशाच्या बिछान्यावर झोपतात आणि गरीब मात्र धोंडयाचा आधार घेऊन कशीबशी उघडयावरच रात्र काढतो. अशी दयनीय अवस्था भारताची आहे. याला जबाबदार जितके नेते मंडळी, प्रशासन ठरते, त्याहून अधिक येथील नागरिकांना दोष द्यायला हवा. कारण तेच निवडणुकीच्या माध्यमातून या देशाचे भवितव्य चोरांच्या हातात देतात!

घपला 767 लाख कोटी रुपयांचा
  • जगभरातील काळा पैसा- 516 लाख कोटी
  • भारतीयांचा काळा पैसा- 308 लाख कोटी
  • भारतीयांचे स्विस बँकेत- 100 लाख कोटी
  • अन्य 60 देशांमधील विदेशी बँकेत- 158 लाख कोटी
  • भारतातील बँकेतील पैसा- 50 लाख कोटी
  • भारतातील आर्थिक घोटाळे- 80 लाख कोटी
  • धनिकांकडून कर बुडवेगिरी-21 लाख कोटी
  • बांधकाम व्यावसायिकांकडील काळा पैसा- 50 लाख कोटी
देशभरातील विविध घोटाळे!
  • 1948- जीप घोटाळा, 80 लाख रुपये
  • 1951- सायकल आयात घोटाळा
  • 1956- बनारस हिंदू विद्यापीठ शैक्षणिक घोटाळा, 50 लाख रुपये
  • 1957- मुंदरा घोटाळा, 1 कोटी 25 लाख
  • 1960- तेजा लोन घोटाळा, 22 कोटी
  • 1963- किरॉन घोटाळा
  • 1965- ओरीसा मुख्यमंत्री बिजू पटनायक-कलिंगा टयूब्ज प्रकरण
  • 1971- नागरवाला घोटाळा
  • 1974-इंदिरा गांधी- मारूती घोटाळा
  • 1976- इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा 2.2 कोटी ऑईल कॉन्ट्रॅक्ट घोटाळा
  • 1980-  बोफोर्स घोटाळा, 64 कोटी
  • 1981- सीमेंट घोटाळा- ए.आर. अंतुले, 950 कोटी
  • 1987- जर्मन सब मरीन घोटाळा, 20 कोटी
  • 1989- वी.पी.सिंग यांचा मुलगा अजेया सिंग खाते प्रकरण
  • 1989- ऑईल घोटाळा
  • 1989- बराक मिसाईल घोटाळा
  • 1989- पामोलीन तेल घोटाळा
  • 1990- विमान खरेदी घोटाळा, दोन हजार कोटी
  • 1992- हर्षद मेहताचा शेअर घोटाळा 5 हजार कोटी रुपये
  • 1994 - साखर निर्यात घोटाळा 650 कोटी रुपये
  • 1995 चे घोटाळे
  • प्रेफ्रेशनल अलॉटमेंट घोटाळा 5 हजार कोटी रुपये
  • योगोत्सव दिनार घोटाळा 400 कोटी रुपये
  • मेघालय जंगल घोटाळा
  • 1996 चे घोटाळे
  • खत आयात घोटाळा, 1300 कोटी रुपये
  • युरिया घोटाळा, 133 कोटी रुपये
  • बिहार चारा घोटाळा, 950 कोटी रुपये
  • 1997 चे घोटाळे
  • सुखराम यांचा टेलिकॉम घोटाळा, 1500 कोटी रुपये
  • एसएनसी लवलिन पावडर प्रोजेक्ट घोटाळा, 374 कोटी रुपये
  • बिहारचा भुखंड घोटाळा, 400 कोटी रुपये
  • सी. आर. भंसाळी शेअर घोटाळा 1200 कोटी
  • 1998- साग वृक्षारोपण घोटाळा, 8000 कोटी
  • 2001 चे घोटाळे
  • यूटीआय घोटाळा, 4800 कोटी रुपये
  • दिनेश दालमिया शेअर घोटाळा, 595 कोटी रुपये
  • केतन पारेख शेअर घोटाळा, 1250 कोटी
  • 2002- संजय अग्रवाल होम ट्रेड घोटाळा, 600 कोटी रुपये
  • 2003- तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा, 172 कोटी रुपये
  • 2005 चे घोटाळे
  • आयपीओ-डिमॅट घोटाळा, 146 कोटी रुपये
  • बिहार पूर मदत घोटाळा, 17 कोटी रुपये
  • स्कॉर्पिन पाणबुडी घोटाळा, 18,978 कोटी रुपये
  • 2006 चे घोटाळे
  • पंजाब शहर केंद्र प्रकल्प घोटाळा, 1500 कोटी रुपये
  • ताज कॉरिडोअर घोटाळा, 175 कोटी रुपये
  • 2008 चे घोटाळे
  • पुण्याचे अब्जाधिश हसन अली खान कर चुकवेगिरी 50 हजार कोटी रुपये
  • सत्यम घोटाळा, 10,000 कोटी रुपये
  • लष्कर रेशन चोरी घोटाळा, 5000 कोटी रुपये
  • स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र घोटाळा, 95 कोटी रुपये
  • 2008 नुसार स्वीस बँकेतील काळा पैसा, 71,00,000 कोटी रुपये
  • 2009 चे घोटाळे
  • झारखंड मेडिकल साहित्य घोटाळा 130 कोटी रुपये
  • भात निर्यात घोटाळा, 2500 कोटी रुपये
  • ओरिसा खाण घोटाळा, 7000 कोटी रुपये
  • मधु कोडा खाण घोटाळा, 4000 कोटी रुपये
  • 2010 चे घोटाळे
  • आईपीएल घोटाळा
  • कॉमनवेल्थ घोटाळा, 70 हजार कोटी
  • 2जी स्पेक्ट्रम घोटाळा, 1.76 लाख कोटी
  • शिधावाटप घोटाळा, 2 लाख कोटी
जगातील तिसरी महाशक्ती होण्याच्या मार्गावर असलेल्या भारतात सध्या आर्थिक घोटाळयांचा बोलबाला झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचारांनी देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वातावरण ढवळून गेले आहे. 2 जी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ, आदर्श सोसायटी यामुळे काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. लाच, भ्रष्टाचार, राजकारण, काळा पैसा यामुळे जागतिक स्तरावर भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताचा क्रमांक फार वर लागतो. भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर येतात त्यावेळी त्यांना पहिल्या पानावर प्रसिध्दी मिळते. त्यामुळे भारताची प्रतिमा तर मलिन होते पण देशातील करोडो नागरिक गरिबीच्या दरीत ढकलले जातात. भारतात भ्रष्टाचार, घोटाळे, गैरव्यवहार हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झाले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर भ्रष्टाचारी नेत्यांना आणि सरकारी बाबूंना पैसा चरण्यासाठी आयते कुरणच मिळाले. भारतातील घोटाळयांच्या रकमेची बेरीज केली तर आतापर्यंत 767,00,000,00,00,000 कोटी म्हणजे 767 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे.


दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा, मुंबईतील आदर्श सोसायटीच्या इमारतीचा घोटाळा यावरून देशभरात राजकीय भूकंपाचे धक्के सुरू असतानाच दूरसंचार मंत्रालयातील 2-जी स्पेक्ट्रम वाटपातून झालेला 1.76 लाख कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस येताच केंद्रासह महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. या विविध घोटाळयांनी देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वातावरण पार ढवळून निघाले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतातील घोटाळे आणि स्विस बॅकेतील रकमेची बेरीच केली. तर ती 767,25,042,7000000 म्हणजे सुमारे 768 लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहचली आहे.  स्वातंत्र्योत्तर काळातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा म्हणूनच 2-जी स्पेक्ट्रम घोटाळयाची नोंद झाली. त्या पाठोपाठ उत्तरप्रदेशात 2 लाख कोटींचा शिधावाटप घोटाळा झाल्याचे उजेडात येत आहे. हा शिधावाटप घोटाळा फक्त उत्तर प्रदेश पुरता मर्यादित नसून तो सर्व देशभरात पसरलेला आहे. महाराष्ट्रातही अनेक  ठिकाणी शिधावाटप घोटाळयाची छोटी-छोटी प्रकरणे उजेडात येतात. मात्र ते आकडे काही लाखात असल्याने फारसा बोलबाला झालेला दिसत नाही या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास शिधावाटप घोटाळा देशात पहिला क्रमांक पटकाविल. देशात आज बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची व्याप्ती आणि हीडिस स्वरूप पाहिले तर प्राणाचे बलिदान देऊन, घरावर तुळशीपत्र ठेवून, स्वत:च्या संसाराची राखरांगोळी करून आणि रक्ताचे सिंचन करून भारतीय स्वातंत्र्याची बाग फुलविली त्या हुतात्म्यांच्या, देशाच्या भाग्यविधात्यांच्या स्वप्नांच्या ठिक-या करण्यासाठी भ्रष्टाचा-यांनी अवतार घेतला आहे काय? असा प्रश्न पडतो. 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा हा देशातील काही पहिला घोटाळा नाही आणि तो शेवटचाही नाही. स्वातंत्र्योत्तर काळात आर्थिक घोटाळे झाले; परंतु त्यांची व्याप्ती आणि स्वरूप मर्यादित होते. विशेषत: सन 1991 पासून देशात खासगीकरण, उदारी करण आणि जागतिकीकरणा (खाउजा)चे वारे वाहू लागले तेव्हापासून देशात 308 लाख कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले आहेत. देशातील राजकीय नेते, नोकरशहा आणि उद्योगपतींनी स्वीस बँकेत  100 लाख कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत तर 1948 पासून बडया कंपन्यांनी आणि धनिकांनी 21 लाख कोटी रुपयांच्या करांची बुडवेगिरी केली आहे. सत्ताधारी, राजकीय नेते, नोकरशहा, उद्योगपती यांच्या संगनमताने ही लाचखोरी, भ्रष्टाचार आणि करबुडवेगिरी झाली आहे. देशाचा महसूल बुडविणे हा देशद्रोहच ठरतो.

अवैध पैसा म्हणजेच काळा पैसा. काळा पैसा म्हणजे ज्यावर कर भरला नाही असा किंवा ज्या पैशासाठी कायद्याच्या चौकटीतील बंधनांचे पालन केले गेले नाही, असा पैसा हा काळा पैसा मानला जातो.

एका संमेलनाच्या उद्धाटन प्रसंगीच्या भाषणात उच्च न्यायालयाच्या निष्णात न्यायमूताअंनी म्हटले होते, की काळया पैशाची गणना करणे म्हणजे आकाशातील ताऱ्यांची मोजदाद करणे होय. काळा पैसा किती आहे, याचा अंदाज घेणे कठीणच नसून अशक्यही आहे. बहुदा एखादाच करदाता असा असेल, की ज्याच्याकडे काळा पैसा नाही, म्हणजेच अगदी धारिष्टयाने सांगावयाचे झाल्यास सर्वच करदात्यांच्या जवळ काळा पैसा हा असू शकतोच. कमी किंवा जास्त प्रमाणात तो असतो हे मान्य करावे लागेल. करदाते नसणाऱ्यांच्याही जवळ असा पैसा असू शकतो; पण ते करक्षेत्रात येत नसल्याने त्यांची मोजदाद होत नाही; पण तरीही ते काळा पैसा धारक या संज्ञेत येऊ शकतात.

या बाबतच्या काही सर्वेक्षणात असे मानले गेले, की जगात एकंदर 516 लाख कोटी काळा पैसा आहे. यामध्ये भारतीयांचा एकंदर काळा पैसा 308 लाख कोटी म्हणजेच निम्म्यापेक्षाही जास्त आहे. हा पैसा विविध ठिकाणी असून, स्विस बँकेतील रक्कम ही 100 लाख कोटी आहे. अन्य विविध 60 देशातील बँका व कंपन्यांमध्ये 158 लाख कोटी असून भारतातील विविध स्वरूपातील हा पैसा 50 लाख कोटी एवढा आहे. हा एकंदर  308 लाख कोटी रुपयांचा घपला आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व वैयत्तिच्क स्वरूपात परिणाम होतो.

आजचा भारताचा वृध्दिदर हा 8 टक्क्यांच्या आसपास आहे. तो अनेक वेळा कमी-जास्त झालेला आहे. आपण काळा पैसा भारतात आणल्यास आपला वृध्दिदर हा 20 टक्के पर्यंत वाढेल, एवढा समृध्द झाल्यास सरकारला जनतेवर कोणतेच कर लावावे लागणार नाही. कर नसल्यामुळे आपोआपच काळा पैसा संपुष्टात येईल. पच्त्तच् जोर लावून हा काळा पैसा वापरात आला तर निश्चितच भारताचे माजी राष्ट्रपती माननीय ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे भारत लवकरच जगाचे नेतृत्त्व करू शकेल.

मोठया रकमेच्या नोटा हे काळया पैशाचे वसतिस्थान असते, असेही आता मानले गेले आहे. म्हणूनच अनेक प्रगत देशांनी आपल्या देशातील मोठया रकमांच्या नोटाच बंद केल्या आहेत. भारतातही 1000 व 500 या रकमांच्या नोटा बंद कराव्यात असे अनेक समित्यांनी राज्यकर्त्यांना सांगितले आहे. मोठया नोटा काळा पैसा धारण करण्याचे एक सहज सोपे साधन मानले जाते. हिरे, मोती व सोन्यापेक्षाही काळा पैसा सहज लपविता येतो. काही देशांनी एकत्र येऊन युरो नावाचे सर्व देशांना मान्य असे चलन काढले आहे. या युरोचीसुध्द चलनातील नोट ही 500 एवढया रकमेचीच आहे. अमेरिकेतही 100 डॉलर हीच सर्वात मोठी नोट असून, हाय डिजीट नोट्स पच्त्तच् विशिष्ट कारणासाठीच आहेत. परिणामत: मोठे व्यवहार चेकच्या माध्यमानेच करणे भाग पडते व चेकचा व्यवहार बँकेशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. काळा पैसा अशाप्रकारे प्रतिबंधित करता येतो. यासाठी अन्य अनेक उपायांशिवाय कमी रकमांच्या नोटा हा प्रभावी उपाय आज मान्यता पावत आहे.

इंग्रजांच्या राजवटीत एवढा भ्रष्टाचार, लाचखोरी आणि करबुडवेगिरी झाली नाही. इंग्रजांनी भारताची लूट केली हे खरे परंतु या लुटीतून इंग्रजी राज्यकर्ते व नोकरशहांनी आपली घरे पैशांनी भरली नाहीत तर इंग्लंडचा विकास केला. आज भारतीयच भारताची लूट करीत आहेत. आणि हा लुटीचा पैसा विदेशातील बँकांमध्ये ठेवत आहेत. हेच मोठे संकट देशावर आहे. मागील 20 वर्षांपासून नेते, नोकरशहा आणि उद्योगपतीं ची सांपत्तिक स्थिती प्रचंड प्रमाणात सुधारली असताना त्याच भारतात 10 लाख शेतक-यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. देशातील 80 कोटी लोकांचे रोजचे उत्पन्न 20 रु. आहे. 40 टक्के लोक दारिद्रयरेषेखाली आहेत, 34 टक्के लोक निरक्षर आहेत.आदिवासी क्षेत्रात कुपोषण आणि उपासमारीचे थैमान आहे. 5 कोटी तरुण बेरोजगार आहेत. तर 40 कोटी लोकांना राहण्यासाठी पक्के घर नाही. 10 कोटी लोक फुटपाथवर  जीवन जगतात. एवढे सारे भीषण प्रश्न देशासमोर असताना नेत्यांच्या संवेदना मात्र पार गोठून गेलेल्या आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी अलाहाबाद येथील स्वत:च्या मालकीचा प्रासादासारखा भव्य आणि आलिशान 'आनंदभवन' बंगला राष्ट्राला अर्पण केला. देशबांधव दारिद्रयात जगतात, त्यांना अंगभर वस्र नसताना मी कसा अंगभर कपडे वापरू म्हणून 'पंचा' वापरणारे महात्मा गांधी यांचा आदर्श कुठे गेला? किती नेहरू , किती गांधी आज देशात उरले आहेत? त्यांच्या तत्त्वज्ञानाचे, त्यांच्या राष्ट्रीय चारित्र्याच्या आदर्शाचे काय झाले, याचे चिंतन करायलाही आज नेत्यांना सवड मिळत नाही. आज सर्वच राजकीय पक्षांत कमीअधिक प्रमाणात भ्रष्ट नेत्यांचा भरणा आहे. कोणी कोणाला आदर्शाचे पाठ द्यायचे हा प्रश्न आहे. कोणी दरोडेखोर आहेत, कोणी भुरटे चोर आहेत तर कोणी खिसेकापू आहेत. त्यांनी केलेल्या लुटीचे स्वरूप वेगवेगळे असले तरी संदर्भ सारखाच असतो, तो म्हणजे स्वार्थ! केवळ सरकार आणि राजकीय नेत्यांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा भ्रष्टाचार निर्मूलनासाठी समाजानेही कृतिशील झाले पाहिजे. तरच देशाला भ्रष्टाचार, लाचखोरी व बुडवेगिरीतून मुक्ती मिळेल. अन्यथा भ्रष्टाचाराच्या विरोधात कितीही वांझोटया गप्पा मारल्या तरी त्यातून काहिही निष्पन्न होणार नाही.

जर हा पैसा वसूल केला तर  या पैशातून काय साध्य करता येईल!
  • प्रत्येक भारतीय नागरिकाला दरमहा 5000 रुपये देता येतील.
  • हा पैसा इतका आहे की प्रत्येक भारतीयाला आपण 56 हजार रुपये देऊ शकतो. 
  • दारिद्रय रेषेखालील 40 कोटी भारतीयांना 1 लाख 82 हजार रुपये देऊ शकतो.
  • देशात 14 कोटी 60 लाख घरे बांधता आली असती. प्रत्येक घरासाठी 5 लाख रुपये खर्च आला असता.
  • या पैशातून 14 लाख 60 हजार किमीचा दुतर्फा महामार्ग बांधता आला असता. यामुळे देशातील 97 टक्के भागात महामार्गाचे जाळे पसरले असते.
  • देशातील 50 प्रमुख नद्यांची 121 वर्षांसाठी सफाई करता आली असती. यातील प्रत्येक नदीसाठी 1200 कोटी रुपयांचा खर्च आला असता.
  • 2 कोटी 40 लाख प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारू शकलो असतो. त्याचे प्रमाण प्रत्येक खेडयासाठी 3 असे असते. एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 30 लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे.
  • भारतात 24 लाख दहा हजार केंद्रीय विद्यालये उभारू शकलो असतो. यासाठी प्रत्येकी 3 कोटी दोन हजार रुपयांचा निधी आवश्यक होता. यात पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करता आले असते.
  • या पैशातून 2 हजार 703 कोळशावर चालणारे उर्जा प्रकल्प उभारता आले असते. यातील प्रत्येक उर्जा प्रकल्पातून 600 मेगावॅट वीज निर्मिती झाली असती. या प्रत्येक प्रकल्पाचा खर्च 2700 कोटी रुपये आला असता.
  • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसारख्या 90 योजना अवलंबता आल्या असत्या. यातील प्रत्येक योजनेसाठी 81 हजार 111 कोटींचा निधी खर्च करता आला असता.
  • कर्जमाफीच्या 121 योजनांची घोषणा करता आली असती. प्रत्येक योजनेसाठी 60 हजार कोटींचा निधी वापरता आला असता.
  • 60 कोटी 80 लाख नागरिकांना 60 कोटी 80 लाख नॅनो कार देऊ शकतो. भारताच्या ढोबळ देशांतर्गत उत्पन्नात 27 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सध्या आपला जीडीपी 53 लाख कोटी आहे.
  • देशातील 6 लाख खेडयांमध्ये 12 लाख सीएफएल बल्बचा पुरवठा करता आला असता. त्यामुळे गरीबांची घरे उजळली असती.
काही महत्त्वाचे घोटाळे 

जीप खरेदी घोटाळा (1948)
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेला पहिला घोटाळा म्हणून या घोटाळयाचा उल्लेख करता येईल. स्वातंत्र्यनंतर भ्रष्टाचाराचा ग्राफ या बिंदूपासून सुरू होतो. ब्रिटनचे तत्कालीन उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन यांनी राजशिष्टाचाराला हरताळ फासत एका परदेशी कंपनीशी 80 लाख रुपयांचा करार केला होता. यावेळी लष्करासाठी जीपची खरेदी करण्यात आली होती. मेनन यांनी नेहरुंच्या मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर हे प्रकरण 1955 मध्ये बंद करण्यात आले होते.

सायकल आयात (1951)
सायकल आयात करण्याचा कोटा दिल्याबद्दल तत्कालिन वाणिज्य आणि उद्योग सचिव एस. ए. वेंकटरामण यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

बीएचयू फंड (1956)
50 लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी बनारस हिंदू विद्यापीठाच्या अधिकाऱ्याला दोषी ठरविण्यात आले होते. शैक्षणिक संस्थाचा हा भारतातील पहिला भ्रष्टाचार म्हणता येईल.

मुंदरा घोटाळा (1957)
एलआयसीच्या शेअरमध्ये घोटाळा झाल्याचे पहिल्यांदा प्रसार माध्यमांनी बाहेर काढले होते. कोलकत्ता येथील मारवाडी उद्योगपती हरिदास मुंदरा यांच्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी एलआयसीच्या पैशाचा वापर करण्यात आला होता. या संदर्भात तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी आणि त्यांचे मुख्य सचिव यांच्यात गोपनिय पत्र व्यवहार झाला होता. फिरोज गांधी यांनी या संदर्भात संसदेत प्रश्न विचारला होता. त्यानंतर मुंदरा याला अटक झाली होती. या प्रकरणी कृष्णमाचारी यांना राजीनामा द्यावा लागला होता.
1 कोटी 25 लाखांच्या या घोटाळयाप्रकरणी मुंदरा याला 22 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

तेजा लोन ( 1960)
शिपिंगमध्ये मोठे उद्योगपती जयंत धर्मा तेज यांनी जयंती शिपिंग कंपनी उभारण्यासाठी 22 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तेजा यांनी हा सर्व पैसा आपल्या खात्यात जमा करून भारतातून पलायन केले.

किरॉन घोटाळा (1963)
आपल्या पदाचा गैरवापर करून मुलगा आणि नातेवाईकांना फायदा करून देणारे भारतातील पहिले मुख्यमंत्री म्हणून प्रताप सिंग किरॉन यांचे नाव सांगता येईल. किरॉन हे पंजाबचे मुख्यमंत्री होते. या घोटाळयात दोषी आढळल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

बिजू पटनायक यांची गच्छंती (1965)
ओरिसाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांनी आपल्या कलिगा टयूब या कंपनीला सरकारचे कंत्राट दिल्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

मारुती घोटाळा (1974)
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव पहिल्या मारुती घोटाळयात पुढे आले होते.  इंदिरा गांधी यांनी प्रवासी कार तयार करण्यासाठी त्यांचा मुलगा संजय गांधी यांना या कंपनीचा परवाना दिला होता, असा आरोप लावण्यात आला.

सोळंकींचा पर्दाफाश ( 1992)
परराष्ट्र मंत्री माधवसिंह सोळंकी यांनी सर््वीत्झलँडच्या पराराष्ट्र मंत्र्यांना पत्र पाठवून सांगितले की, बोफोर्स प्रकरणाची चौकसी थांबवा. हे प्रकरण इंडिया टुडेने बाहेर काढल्यावर सोळंकी यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Tuesday, February 8, 2011

ऊर्जा प्रकल्पाची महाराष्ट्राला आज खरी गरज!

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने गर्जना करणा-या हिंदूत्त्ववादी संघटनांनी जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करावा आणि जाणता-अजाणता लालभाईंच्या हातात हात घालून रस्त्यावर उतरावे, हा दैवदुर्विलास म्हणायचा की नतद्रष्टपणा हे सांगणे कठीण आहे.
सावरकर कट्टर विज्ञानवादी होते आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या समर्थ राष्ट्रात त्यांना असे अनेक प्रकल्प हवे होते. कम्युनिस्ट देशांमध्ये अणुप्रकल्पांना ऊर्जा व्यवस्थापनात महत्त्वाचे स्थान आहे. पण इथल्या कॉम्रेड्स्ना जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी नव-साम्राज्यवादाचा हात दिसतो. अशातच नितीन गडकरी स्वत:ला कट्टर विकासवादी म्हणवितात. पक्षबाजी, धर्मवाद, जातपात, प्रांतवाद, अतिरेकी अस्मितावाद या सर्व गोष्टी विकासाच्या शत्रू आहेत, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे भाजप या प्रकरणात राजकीय मतभेद आणणार नाही, असे वाटले होते. परंतु  भाजपसुध्द नतद्रष्ट कॉम्रेड्स, भरकटलेले समाजवादी, स्वयं-शहाणे पर्यावरणवादी आणि कोकणाला दारिद्रयात ठेवू पाहणारे शिवसैनिक यांच्याबरोबर रस्त्यावर उतरणार आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी तुतारी फूंकली आहे आणि सुभाष देसाई यांनी सुध्द   या प्रकल्पाला अरबी समुद्रात बुडवून टाकण्याची घोषणा केली आहे. परंतु युती एखादा प्रकल्प अरबी समुद्रात बुडविते, तेव्हा तो प्रकल्प संजीवनी प्राप्त करून बाहेर येतो, असा एन्रॉनपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे सेना-भाजप युतीच्या या धमकीला राज्य वा केंद्र प्रशासन तसेच फ्रेंच कंपनी 'अरेवा' आणि भारतीय कंपनी  'एनपीसीआयएल'  हेसुध्द भीक घालणार नाहीत.
स्थानिक कोकणवासीयांच्या डोळयात धूळ फेकून त्यांना जाणूनबुजून ऊर्जांधळे करण्याचे प्रयत्न जोरात चालू आहेत. तरीही जैतापुर येथे जवळ-जवळ 10,000 मेगावॉटचा अणु-उर्जा प्रकल्प फ्रान्सच्या अरेवा कंपनीच्या सहयोगातून उभारला जात आहे. हा प्रकल्प जाहिर झाल्यापासून अनेक दृष्टिकोनातून ह्याला विरोध होत आहे. ग्रामस्थांचा विरोध आम्ही समजू शकतो. कारण, त्यांच्या शेत जमिनी आणि घरं-दारं सुध्द ह्या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार आहेत. आणि भारत सरकारचे आज पर्यंतचा पुनर्वसनाचा इतिहास बघता, त्यांनी चिंतित होणे स्वाभाविक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होईल, म्हणून जे विरोध करत आहेत, त्यांचा विरोध देखील बऱ्याच प्रमाणात स्विकारू शकतो. कारण, उद्योगक्षेत्रात पर्यावरणाला किती महत्व दिलं जातं, ह्यासाठी उल्हास नदी, चंद्रपूर जवळील औष्णिक विद्युत केंद्र, वापी शहर, इ. ची परिस्थिती बघूनच लक्षात येतं.पण, ती केवळ अणु-उर्जा आहे, म्हणून विरोध करणाऱ्यांचे आम्हाला नवल वाटते.
अणु-उर्जे बद्दल बोलायचं झालं तर, दर वेळेला न्युक्लियर अपघातांची भिती दाखवतात. असे विध्वंसक आणि दीर्घकालीन परिणाम असलेले आज पर्यंत दोनच अपघात झाले आहेत. एक म्हणजे अमेरिकेतील थ्री माईल आयलन्ड आणि दुसरं रशियातील चर्नोबिल. त्याला सुध्द आता 30 वर्षं उलटून गेली आहेत. त्यापैकी केवळ चर्नोबिल मधे भयंकर स्तराची जैविक हानी झाली. अनेक लोकांना किरणोत्सर्गाची बाधा झाली. शिवाय, एका अखंड शहराचं पुनर्वसन करावं लागलं. थ्री-माईल आयलंड मधे तर जैविक हानी शून्य होती आणि किरणोत्सर्गामुळे कुणालाही बाधा झाली नाही. पण केवळ ह्या दोन घटना पकडून अणु-उर्जेला विरोध करणे कितपत योग्य आहे? इतर क्षेत्रातही अपघात होतात. रस्त्यावरील गाडयांच्या खाली येऊन किंवा गाडयांचे अपघात होऊन आजवर लाखो लोकांनी आपला जीव गमवला आहे. मग, आपण गाडया वापरणे बंद केले का? नाही. डहाणू क्षेत्रात रिलायन्सचा एक औष्णिक उर्जा प्रकल्प आहे. त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या चिकूच्या पिकांवर ह्या औष्णिक प्रकल्पाचा विपरीत परिणाम झाला. जर त्या शेतकऱ्यांना ह्यातून वाचवण्यासाठी आर्थिक तरतूद करायची झाली, तर रिलायन्स गाशा गुंडाळेल.  कोकणाचा निसर्ग नाश पावेल, आंब्याचा मोहोर जळेल, पाण्याचे तापमान वाढून मासे मरतील, भूकंप होतील, जमीन निकृष्ट होईल येथपासून ते जन्माला येणारी संतती नपुंसक असेल, असे काहीही अंगात आल्याप्रमाणे बरळले जात आहे. अंगात येणे, भूतबाधा होणे, साक्षात देवीने कायाप्रवेश करून भविष्यकथन करणे, मांत्रिकाने सापाचे विष उतरविणे अशा गोष्टींवर कोकणात प्रचंड श्रध्द आहे. कोकणच्या मागासलेपणाचे तेही एक कारण आहे. पश्चिम महाराष्ट्रात उद्योगधंदे वाढण्याचे आणि निदान काही भागात समृध्दी येण्याचे मुख्य कारण तेथील लोकांनी विकासोन्मुख दृष्टी स्वीकारली हे आहे. आपल्या दारिद्रयाची, तथाकथित साधेपणाची आणि मागासलेपणाची बिरूदे लावून त्या गोष्टींचाच अभिमान बाळगणाऱ्या कोकणची उपेक्षा कोकणवासीयांनी स्वत:च करून घेतली आहे. कोकणवासियांनी आता जागे व्हायला हवे. उघडया डोळयांनी जगात काय चालले आहे त्याकडे पाहिले पाहिजे. कोकणचा विकास होण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. राजकारण्यांच्या भूलथापांना बळी न पडता वस्तूस्थिती लक्षात घेतली पाहिजे.  जैतापूर प्रकल्पामुळे निसर्गनाश होणार असेल तर ज्या फ्रान्समधून हे तंत्रज्ञान येत आहे, तो अवघा देशच एव्हाना नष्ट व्हावयास हवा होता! कारण फ्रान्समधली जवळजवळ 80 टक्के वीज अणुऊर्जा प्रकल्पातून येते. अशा अणु प्रकल्पांमुळे संतती नपुंसक होणार असेल तर एव्हाना फ्रान्समध्ये सामाजिक-कौटुंबिक हाहाकार माजायला हवा होता. इतर कोणत्याही विजेपेक्षा अणुऊर्जा तुलनेने स्वस्त असते. म्हणूनच फ्रान्सने त्या तंत्रज्ञानावर आधारलेले प्रकल्प उभे केले. महाराष्ट्रात व आपल्या देशात ऊर्जेचा किती तुटवडा आहे, हे आपण अनुभवतो आहोत. कोकण बचाव समितीने कोळशापासून ऊर्जानिर्मितीलाही पाठिंबा दिलेला नाही व देऊ शकणार नाही. कारण कोळशापासून वीजनिर्मिती करताना प्रदूषण जास्त होते. ज्यांना ते प्रदूषण पाहायचे असेल त्यांनी मराठवाडयातील गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात जाऊन पहावे. घरात चुलीवर स्वयंपाक होत असेल तर होणारा धूर आणि गॅस वा विजेवर चालणारी शेगडी यामुळे येणारा अनुभव यातील फरक कोकणवासीयांना न कळण्याएवढे असंमजस ते नाहीत.
विरोधकांमध्ये, नक्की कशाला विरोध आहे, याबाबतही एकवाक्यता नाही. कॉम्रेड मंडळींचा भारत-अमेरिका अणुकराराला विरोध आहे. फ्रान्सबरोबरच्या करारालाही काही मंडळींचा विरोध आहे. त्यांचे आक्षेप आहेत ते 'अरेवा' या कंपनीबद्दलचे. वस्तुत: जगात अशी एकही बहुराष्ट्रीय कंपनी नाही; मग ती खासगी क्षेत्रातली असो वा त्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातली, की जी वादग्रस्त नाही. खुद्द भारतातही या दोन्ही क्षेत्रात सध्या काय चालू आहे ते आपण पाहात आहोत. त्यामुळे 'अरेवा' कंपनीबरोबरच्या कराराचे वाद असले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. कुणीही असे म्हटलेले नाही की 'अरेवा' कंपनीकडे योग्य विज्ञान-तंत्रज्ञान नाही. त्याचबरोबर ज्यांचा अणुऊर्जेलाच विरोध आहे, त्यांनी ऊर्जानिर्मितीसाठी तितकाच स्वस्त वा प्रदूषणमुक्त दुसरा पर्याय अजून सांगितलेला नाही. पर्यावरणवाद्यांमध्येही चार-पाच गट आहेत. एका गटाचा अणुउर्जेलाच विरोध आहे. हा गट आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा सर्व प्रकल्पांना विरोध करीत असतो. त्यांच्या दृष्टीकोनातून अणुऊर्जा हाच विश्वाला धोका आहे. परंतु या मंडळींनीही आपली उर्जेची गरज भागवायचे पर्याय सांगितलेले नाहीत. ते ज्याला पर्याय म्हणतात- म्हणजे सौर, जल, वायु- त्यातून गरजेएवढी ऊर्जानिर्मिती शक्य नाही. आणखी एक गट आहे जो म्हणतो आपली जीवनशैली ऐहिक- चंगळवादी झाली आहे. ती बदलली तर उर्जेची अशी गरज भासणार नाही. परंतु लोकांच्या गळी उतरविणे आता ते अशक्य आहे. शिवाय जगाला जीवनशैली शिकविणारे हे सर्वजण स्वत: मात्र अस्सल ऐहिक आयुष्य बऱ्यापैकी सुस्थितीत जगत असतात. उध्दव ठाकरे असोत वा नितीन गडकरी, कोकण मागासलेला राहिल्याने त्यांचे काहीही बिघडत नाही. आणखी एक गट आहे तो पारंपरिक काँग्रेसविरोधकांचा. हाच करार वाजपेयी सरकारने केला असता आणि युती सरकारने हा प्रकल्प कोकणात आणला असता तर भलीमोठी ऊर्जाक्रांती घडवून आणल्याचा पवित्रा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला असता. मुख्य एक गट अर्थातच ज्यांची जमीन प्रकल्पासाठी घेतली जाणार त्यांच्या आक्षेपांचा आहे. आपल्या देशात प्रकल्पग्रस्तांना याबाबत न्याय मिळत नाही, हे खरे आहे. तेव्हा मुद्दा आहे तो फक्त त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला देण्याचा आणि त्यांच्या पुनर्वसनाचा. पर्यावरण, सामाजिक न्याय आणि विकास या तीनही गोष्टींमध्ये संतुलन साधून प्रगती साधण्यासाठी कोकणातील जनतेने सहकार्य करायलाच हवे. परंतू याचे भान आंदोलकांना नाही. आणि राडा संस्कृतीत वाढलेल्यांना कोकण वा महाराष्ट्र, कुणालाच विकासाशी काहीही देणेघेणे नाही! प्रत्येक तंत्रज्ञानाचे काही फायदे आणि तोटे असतात. त्यातील केवळ तोटयांचा बाऊ करून त्या तंत्रज्ञानाची अवहेलना आणि विरोध करणे चुकीचं आहे. जर आपल्याला देशातील वीज टंचाई दूर करायची असेल, तर वीज निर्मितीचे अनेक मार्ग अवलंबावे लागतील. अणु-उर्जा हा त्यातील एक मार्ग आहे. औष्णिक उर्जेच्या तुलनेत हा स्रोत खरोखर खूपच कमी प्रदूषण करणारा आहे. आणि शिवाय ह्याचा वातावरणातील ग्लोबल वॉमिर्ंग वर परिणाम होत नाही. त्यामुळे मुबलक प्रमाणात वीज निर्मिती होण्यासाठी अणुउर्जेची आवश्यकता आपल्याला आहेच परंतू  याचा सारासार विचार करायला कोणाचीही मानसिक तयारी दिसत नाही. प्रकल्पग्रस्तांना जो पर्यंत पूर्णपणे न्याय मिळत नाही, मोबदला मिळत नाही, त्यांचे पुर्नवसन होत नाही तो पर्यंत त्यांनी विरोध करणे समजण्यासाखे आहे. मात्र संपूर्ण पार्श्वभूमीचा सारासार विचार केल्यास, कोकणात नवनवीन प्रकल्प, उद्योगधंदे आल्यास कोकणातील तरुणांना रोजगार मिळेल. आज राज्यात 10 ते 14 तास वीज भारनियमन सुरू आहे. भविष्यात विजेचा आणखी तुटवणा जाणवणार आहे. म्हणूनच ऊर्जा प्रकल्पाची महाराष्ट्राला आज खरी गरज आहे. असा प्रकारे उद्योगधंदे वाढले तरच खरे अर्थ्यांने सर्वांना रोजगारही मिळेल आणि पर्यायाने विकासाची गंगा राज्यात वाहू शकते. पण याचा विचार कोणीही करीत नाही.

Saturday, February 5, 2011

शिक्षक की कंत्राटी कामगार?

हमाली करणारा मजूरही रोज शंभर-दीडशे रुपये श्रमाने मिळवतो. पण, शिक्षण सेवकाला मात्र रोज शंभर ते दीडशे रुपये मिळतात. त्यातही अध्यापक (डी. एड.) महाविद्यालयात कार्यानुभव विषय शिकवणाऱ्या शिक्षकाला दरमहा फक्त 180 रुपये म्हणजे दररोज सहा रुपये मानधन देणाऱ्या या सरकारच्या शिक्षण विषयक आस्थेची आणि चिंतेची किव करायला हवी.
महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे, त्यासाठी उपाययोजना केली जाईल, अशा घोषणा हे सरकार उठसूट करत असते. पण, प्रत्यक्षात मात्र राज्यात प्राथमिक शिक्षणाची प्रचंड हेळसांड शैक्षणिक सुविधांपासून ते शिक्षकांच्या उपेक्षेपर्यंत सुरूच आहे. जिल्हा परिषदा, नगरपालिका-महापालिकांची प्राथमिक शिक्षण मंडळे, अनुदानित खाजगी शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात पहिली तीन वर्षे 'शिक्षण सेवक' म्हणून सेवाभावाने नोकरी करावी, असा निर्णय 2000 मध्ये राज्य सरकारने घेतला. प्राथमिक शिक्षकांना 3 हजार, माध्यमिक शिक्षकांना 4 हजार आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना 5 हजार रुपये याप्रमाणे मासिक मानधनावर राबवून घ्यायचा सरकारचा हा अफलातून निर्णय, शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात अनिष्ट पायंडा पाडणारा ठरला. या नव्या नियमानुसार महाराष्ट्रात थोडे थोडके नव्हे साठ हजार कंत्राटी म्हणजेच शिक्षण सेवक एवढया अल्प मानधनात गेली तीन-चार वर्षे सेवा करीत आहेत.आणि प्राथमिक शिक्षणाचा दर्जा घसरल्याची कबुली देणाऱ्या राज्य सरकारने 'शिक्षण सेवकाच्या' गोंडस नावाखाली गेली तीन वर्षे अल्प मानधनात राबणाऱ्या साठ हजार शिक्षकांच्या होरपळीची मात्र, या सरकारला जाणीवही नाही, ही बाब अतिशय संतापजनक आहे.
प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचा विस्तार, सहा ते चौदा वयोगटातल्या सर्व पात्र मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क कायद्याने बहाल करायचा केंद्राचा निर्णय या पार्श्वभूमीवर शिक्षकांना रोजगार हमी कामावरच्या मजुरासारखे राबवून घ्यायची शरम सरकारला वाटत नाही. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेनुसार, रोजगार हमीच्या कामावर मजुराला रोज 100 रुपये मिळतात. श्रमाचे आणि बुध्दिमत्तेचे काम समानच आहे, असा राज्य सरकारचा खाक्या असल्यानेच शिक्षकांची अवस्था कंत्राटी कामगारासारखी झाली. शहरी आणि ग्रामीण भागात मिस्त्री-अभियंत्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांनाही रोज 200 रुपयांची मजुरी मिळते. शेतीच्या हंगामात 200 रुपये मजुरीनेही शेतमजूर मिळत नाहीत. द्राक्षाच्या मळयात काम करणाऱ्या शेतमजुरांना रोज 300 रुपयांची मजुरी द्यावी लागते, ऊस तोडणी कामगार रोज 400 रुपयांच्या आसपास मजुरी मिळवतो. पण, शिक्षणासाठी खस्ता खाऊन, पैसे खर्च करुन, डी. एड., बी. एड. झालेल्या शिक्षकांना मात्र हे सरकार मजुरांपेक्षाही कमी मजुरीत वर्षानुवर्षे राबवून घेत आहे. तीन वर्षे पूर्ण झाल्यावर या शिक्षण सेवकांना कायम नोकरीत सामावून घेतले जाईल, त्यांना कायद्यानुसार पूर्ण वेतन दिले जाईल, अशी ग्वाही सरकारने दिली होती. प्रत्यक्षात मात्र त्या निर्णयाची कार्यवाही मात्र झालेली नाही. खाजगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांत काम करणाऱ्या हजारो शिक्षकांची व्यथा तर यापेक्षाही अधिक गंभीर आहे. या शिक्षकांना पुरेसे मानधनही वेळेवर मिळत नाही. कधीकाळी आपल्या शाळेला मान्यता मिळेल, अनुदान मिळेल अशा आशेवर या शाळेत काम करणारे शिक्षक घरचे खाऊन विद्यादानाचे काम करतात, त्या शिक्षकांच्या त्यागाची जाणीवही सरकारला नाही. सरकारी प्राथमिक शाळांतील शिक्षकच नीट काम करत नाहीत, विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत, अभ्यास करत नाहीत, असे काही अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिक्षणाच्या घसरलेल्या दर्जाचे खापर शिक्षकांच्या डोक्यावर फोडून सरकार आपली जबाबदारी झटकून टाकण्यात तरबेज झाले आहे. पण, ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा घसरायला आणखी अनेक कारणे आहेत, हे मात्र मान्य करायला सरकार तयार नाही. देशाची भावी पिढी शिक्षक घडवतात. आई नंतर मुलांवर संस्कार घडवतात ते शिक्षकच! अशा शिक्षकांचीच अशी अवहेलना, फरफट आणि होरपळ वर्षानुवर्षे होते हे महात्मा फुले, छ. राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा जयघोष करणाऱ्या पुरोगामी सरकारला शोभादायक नाही. शिक्षकांना कंत्राटी राबवून घ्यायचा हा पायंडा शिक्षण क्षेत्राला कलंक लावणारा असल्यामुळे तो तातडीने बंद करुन, शिक्षण सेवकांना कायम करायला हवे आणि यापुढच्या काळात शिक्षण सेवक अशा गोंडस नावाखाली शिक्षकांना मजुरासारखे राबवून घ्यायचा उद्योगही मोडीत काढायला हवा. खाजगी शाळांत काम करणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना तर काही संस्थाचालक तीन वर्षे पूर्ण व्हायच्या आधीच नोकरीतून कमी करतात. अधिक वेतनाची शिक्षकाची नोकरी मिळायचा त्यांचा हक्क हिरावून घेतला जातो. एकाच शाळेत कायम शिक्षकांना दरमहा पंधरा-वीस हजारांपेक्षा अधिक पगार आणि तीच शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षण सेवकाला मात्र कंत्राटी कामगाराइतके तुटपुंजे मानधन, ही वेतनाची विषमता सरकारने निर्माण केली. 3 हजार रुपयांच्या अल्प वेतनात शिक्षक आपल्या संसाराचा गाडा कसा चालवू शकेल, याचा साधा विचारही शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या कागदोपत्री योजना आखणाऱ्या सरकारला करायला वेळ नाही. तीन वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षण सेवकांना कायम करायला या सरकारला वेळ मिळत नाही. जे संस्थाचालक काही शिक्षण सेवकांना तीन वर्षे पूर्ण व्हायच्या आधीच नोकरीतून कमी करतात, त्यांच्यावर या सरकारचे काहीही नियंत्रण नाही. परिणामी खाजगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांमुळे शिक्षणाचा धंदा झाला आणि आता शिक्षण सेवकांचीही अशी होरपळ सुरू झाल्यामुळे, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाचे अधिक वाटोळे होत असले तरी, त्याची चिंता मायबाप सरकारला नाही. ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांना पुरेशा वर्ग खोल्या नाहीत, पुरेसे शिक्षक नाहीत. विज्ञान प्रयोगशाळा नाहीत. ग्रंथालये नाहीत. पटांगणे नाहीत. शिपाई नाहीत. एवढेच नव्हे तर डोंगराळ भागातल्या काही प्राथमिक शाळांना छप्परही नाही. काही प्राथमिक शाळा चावडी, मंदिरे आणि झाडाखालीही भरवल्या जातात. अशा अशैक्षणिक वातावरणात शिक्षणाचा दर्जा उंचावणार कसा? मुला-मुलींना मोफत पाठयपुस्तके आणि दुपारचे भोजन दिल्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारत नाही. त्यासाठी जीव ओतून शिकवणाऱ्या शिक्षकांची गरज असते. पण, कंत्राटी शिक्षण सेवकच अर्धपोटी असेल तर तो विद्यार्थ्यांना काय शिकवणार? आणि त्याला आपल्या भवितव्याचीच चिंता नेहमीचीच असल्यास त्याचे विद्यार्थ्यांना शिकवण्यात लक्ष तरी कसे लागणार? भारत हा शेतीप्रधान देश असल्याचा येळकोट करायचा, शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकण्यासाठी शिक्षणाची गंगा त्याच्या दारापर्यंत आम्ही नेऊ, अशी भाषणबाजी करायची आणि प्रत्यक्षात मात्र शिक्षणाचा असा बोजवारा उडवायचा हे कुठपर्यंत चालणार?

Wednesday, February 2, 2011

घरकाम करणा-या असंघटित कामगारांचा वाली कोण?

मढ येथील एका घरी काम करणा-या 43 वर्षांच्या कुंदा शिंदे या महिलेवर दागिने चोरीचाआळ घेतला गेला आणि मालवणी पोलिस स्टेशनच्या मुनीर शेख या पोलिस निरीक्षकाने कुठलीही चौकशी न करता तिला आणि तिच्या 17 वर्षांच्या मुलीला अटक केली. दोघींना रात्रभर कोठडीत डांबून गुन्हा कबुल करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. या मानसिक धक्क्यातून न सावरलेल्या कुंदा शिंदे हिने कोठडीतच गळफास लावून घेतला. एका महिला कॉन्स्टेबलने हे बघितल्यामुळे कुंदा शिंदेला लगेच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. या घटनेला पुरते पंधरा दिवसही उलटले नाहीत तोच कुंदा शिंदेने जगाचा निरोप घेतला.
तिने आत्महत्येचे पाऊल उचलले याचे कारण आपली पूर्ण अप्रतिष्टा झाली आहे, ही गोष्ट तिला सहन झाली नसावी. पण घरकाम करणाऱ्या बायका, नोकर, रखवालदार अशा लोकांना आत्मप्रतिष्टा नसते, अशीच समाजातील धनदांडग्या, प्रतिष्टितांची समजूत आहे. त्यामुळे लहानशा चुकीसाठीही त्यांची मानहानी करणे, प्रसंगी मारहाण करणे इथवर अनेकांची मजल जाते. घरातल्या वस्तू गहाळ झाल्यावर सरसकट घरातल्या नोकरांना जबाबदार धरण्याचे प्रकार वाढले आहेत. अलीकडे ठाण्यातील एका राजकीय नेत्याच्या घरी चोरी झाल्यावर त्या घरातल्या मोलकरणीवरच आळ घालून तिला पोलिसांच्या ताब्यात दिले गेले. कालांतराने चोरी भलत्याच कुणीतरी केली असून ती महिला निष्पाप असल्याचे सिध्द झाले. अशावेळी त्या महिलेची तिच्यावर आळ घेणाऱ्यांनी माफी मागितल्याचे किंवा झालेल्या नाहक त्रासाबद्दल तिला भरपाई दिल्याचे ऐकिवात नाही. बऱ्याच उच्च मध्यमवर्गीय घरात अल्पवयीन मुली पूर्णवेळ घरकामासाठी ठेवलेल्या असतात. खेडयापाडयातून आलेल्या या गरिबांच्या मुली सुशिक्षित आणि सुप्रतिष्टितांच्या घरी अक्षरश: वेठबिगारासारख्या राबत असतात. शहरातले कामगारांचे रोजगार गेल्यावर त्यांच्या स्त्रिया मोठया प्रमाणावर घरकामासाठी बाहेर पडत आहेत. त्यांच्या वस्तीच्या जवळच उभ्या राहणाऱ्या मोठमोठया टॉवर्समध्ये त्यांना रोजगार मिळतोही, पण त्यांच्या श्रमाला प्रतिष्टा मात्र मिळत नाही. घरकाम करणाऱ्या लाखो महिला या असंघटित कामगारांच्या गटातच मोडतात. या असंघटितांचा वाली कोणीही नसतो. वरचा वर्ग त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण न होऊ देता केवळ त्यांची सेवा घेतो आणि गरज संपताच त्यांना दूर लोटता येण्याचा आपला मार्ग शाबूत ठेवतो. उपद्रवमूल्य शून्य असणाऱ्या या असंघटित सेवेकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याची पोलिसांचीच नव्हे तर कुणाचीच इच्छा नसते. आपले जगणे कवडीमोलाचे आहे हा अनुभव पदोपदी घेत ही माणसे जगण्याची धडपड करत राहतात, कारण प्रतिष्टितांच्या लेखी त्यांच्या मरणालाही किंमत नसते.