Wednesday, September 10, 2008

गणेशोत्सवाचे उद्दीष्ट आणि मंडळे

गण म्हणजे जमाव, संख्या, समुदाय, मेळा, समूह, शब्दकोशात पाहिले तर "गण' या शब्दाचे एकवीस प्रकारचे निरनिराळे अर्थ सापडतात. पण गणेश किंवा गणपती ही संकल्पना ज्या गणाशी रूढार्थाने संबंधित आहे ती "सकळ जनांचा ईश्वर किंवा अधिपती' या अर्थाने आहे. आज केवळ महाराष्ट्रातील दहा कोटी नव्हे तर त्याखेरीज पंचखंडांत विखुरलेल्या लक्षावधी मराठी माणसांच्या घराघरांत परवा गणरायाचे आगमन होत आहे. गणेश बुद्धीचा अधिष्ठाता म्हणूनच हिंदू धर्मात तब्बल 33 कोटी देव असले तरी गणेशाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या रुपाने सर्वत्र गणेशाचे आगमन होते, तेव्हा उत्साह ओसंडून वाहू लागतो, त्या उत्साहाला वयाचे बंधन नसते, लक्ष्मीचे परिमाण नसते आणि धर्माची मर्यादा नसते. साक्षात्‌ परमेश्वराचेच आगमन होणार म्हटल्यावर घरातल्या प्रत्येकजण अत्यंत आनंदात, उत्साहाता आपला खारीचा वाटा उचलत असतो. गणपतीच्या पूजेची तयारी, वस्त्रालंकारांची मांडणी, पुष्परचना व सजावट यामध्ये अहोरात्र खर्चा घातले जातात आणि आतुरतेने गणेशाच्या आगमनाची सर्वजण वाट पाहू लागतात. ती ओढ विलक्षण असते. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस पुण्या-मुंबईबरोबर सर्वत्र साजरा होणारा गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव बनले आहे. पण लंडनपासून नैरोबीपर्यंत आणि टोरांटो-सॅनहोजेपासून सिडनीपर्यंतच्या बृहन्ममहाराष्ट्र मंडळात ते ज्या उत्साहाने साजरे केले जातात, त्यावरूनही गणेशाचे विश्वव्यापकत्व समजू शकते. श्रीलंकेपासून इंडोनेशियापर्यंत शेकडो वर्षांच्या प्राचीन मंदिरांमध्येही गणेशाची विविध रूपे आढळतात. किंबहुना हे केवळ विशिष्ट भागाचे, धर्माचे, समाजाचे दैवत नसून उपखंडाबाहेरील "गणा' च्या अधिपत्याचे दीर्घकाळापासूनचे प्रतीक आहे, हेही त्यावरून स्पष्ट होते. पुण्या-मुंबईतील गणेशोत्सावात रस्त्यांना पुराचे स्वरुप येते. त्यात विशिष्ट धर्माची माणसे नसतात, तर भारत ज्या सर्वधर्मसमभावाचा, धर्मनिरपेक्षतेचा आदर राखतो त्याची साक्षच हा समुदाय देत असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व भेदभाव बाजूला ठेऊन एकत्र येणारा असा समुदाय हे साठ वर्षे अभंग राहिलेल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचेच प्रतीक आहे. अशा गणांचा हा अधिपती. दैवतांमध्येही बुद्धिदाता, विघ्नहर्ता म्हणून गणेशाचे स्थानमाहात्म्य आहे.
मंगलमूर्ती घरी आल्यावर त्याचे कौतुक घरातील प्रत्येकजण आपल्यापरीने करत असतो. गणपतीचे डोळे कसे सुंदर आहेत, हात कसे गोजिरवाणे आहेत आणि पूजा झाल्यावर मूर्तीस कसे विलक्षण तेज प्राप्त झाले आहे, याची सुरस कहाणी प्रत्येकजण ऐकवत असतो. पुढचे दीड-पाच-सात-दहा दिवस घराच्या चार भिंतींनाही जिवंतपणा येतो. तळहातावरच्या फोडाप्रमाणे त्या मंगलमूर्तीची "काळजी' प्रत्येकजण घेत असतो. विसर्जनापर्यंतचे दिवस वाऱ्याच्या मंद सुखद झुळुकेप्रमाणे निघून जातात. विसर्जनास मंडळी निघाली, की मात्र नकळत अश्रू ओघळू लागतात. जवळच्या विहीर-तलाव वा समुद्रकिनाऱ्यावर मूर्ती पाण्यात बुडवताना मग डोळ्यांच्याही कडा अश्रूंनी हळूच ओलसर होतात. गळा दाटून येतो. जड पावलांनी मंडळी घरी परततात. ती "पुनरागमना'च्या खात्रीनेच!
मातीतून तयार होणारी आणि पुन्हा मातीतच सामावणारी ती एक साधी मूर्ती जणू माणसाच्या क्षणभंगुर जीवनाचेच प्रतीक. मातीची दर्पोक्ती सार्थ ठरविणारी. भक्ती आणि प्रेमाचा विलक्षण संगम तिथे झालेला असतो. म्हणून मूर्तिपूजा योग्य की अयोग्य, परमेश्वर आहे की नाही हे वाद इथे गौण आहेत. माणसाच्या मनातला आंतरअग्नी फुलविण्याचे सामर्थ्य गणेशोत्सवात असल्याने तो सर्वव्यापी झाला आहे. धर्म, जात, वर्ण, पंथ आणि देशाच्या सीमा त्याने केव्हाच ओलांडल्या आहेत. माणसाच्या अस्तित्वाचा हा उत्सव आहे. त्याच्या सामाजिकतेचे आधुनिक रूप आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा हा सामाजिक आशय ओळखला व त्याला सार्वजनिक रूप दिले. जे कौटुंबिक मन आपल्या घरच्या गणपतीसाठी तन-मन-धन अर्पण करते, त्यास जर व्यापक स्वरूप दिले, तर जनमानसात आवश्यक असलेली एकी साधता येईल, हा त्यामागचा हेतू होता. एकातून अनेकापर्यंत पोहोचणारा उत्सवाचा हा आशय लोकमान्यांतल्या तत्त्वज्ञाने अचूक ओळखला. लोकमान्यांसमोर होते स्वातंत्र्यलढ्याचे उद्दिष्ट. ते काम अर्थातच सोपे नव्हते. त्या काळी संपर्काची साधनेसुद्धा अत्यंत मर्यादित होती. लोकांमधील संवाद दृढ करण्यास गणेशोत्सव मदत करू लागला.
छत्रपती शिवाजी आणि श्रीगणेश ही दोनच श्रद्धेय स्थाने समर्थ आहेत, हे ओळखून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव यांची परंपरा सुरू केली. पुढे अर्धशतकाच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आणि आपले धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र उदयाला आले. त्यानंतरही गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने, वाढत्या कलेने साजरा होत आहे.
आज इतक्या वर्षानंतरसुध्दा गणेशोत्सवाचे हे रूप बऱ्याच प्रमाणात अबाधित आहे, परंतु त्याच्या प्रकटीकरणात मात्र आता मुलभूत फरक पडलेला आहे. स्वातंत्र्य मिळवूनही ते लोकांमध्ये रुजवण्यास आपण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळेच निर्माण झालेला दहशतवाद हे त्या रोगट सामाजिकतेचेच रूप आहे. या आनंदोत्सवास आता भीतीचे व असुरक्षिततेचे गालबोट आहे. आजूबाजूच्या अत्यंत विमनस्क व दोलायमान परिस्थितीत गणेशाची मूर्ती हे आशा, आकांक्षा व अपेक्षांचे प्रतीक बनले आहे. अनंतु चतुर्दशीच्या दिवशी करोडोंच्या संख्येने जमणारा प्रवाह तेच दर्शवितो. खरे तर त्यास वारीचेच स्वरूप येते. आपल्या देशातील बहुसंख्य चाकरमान्यांचे, कष्टकरी जनतेचं आकर्षण असलेली महानगरी मुंबई आणि त्याच मुंबईतील अनंत चतुर्दशीची उत्स्फूर्त वारी यातच खोल अर्थ दडलेला आहे. कोणताही आनंद हा सामुहिकतेच्या पातळीवर गेला, आणि त्यास तात्त्विक अधिष्ठान नसेल, तर त्यास मर्यादा पडतात व अपप्रवृत्ती डोकावू लागतात. गणेशोत्सवाचे सध्या तेच झाले आहे. संपत्तीच्या हिडीस प्रदर्शनाबरोबरच जुगार, दारू, धिंगाणा या प्रवृत्तींनी त्यात प्रवेश केला आहे. भक्तीगीते, भजन, किर्तनाची जागा आता डी.जे. हिंग्लीश गाण्यांनी घेतली आहे. स्टेजवरुन अर्धनग्न मुली गणरायाच्या साक्षीने अश्लिल हावभाव करीत ऑर्केस्ट्रामधून नाचक आहेत. याचा अर्थ "उत्सव' वाईट आहे, असे नव्हे, परंतु तो भरकटला आहे एवढे मात्र खरे. वास्तविक उत्सवाच्या माध्यमाद्वारेच त्याला आळा घालता येऊ शकेल. पण अपवाद वगळता सगळीकडे उन्मादच आढळतो. मात्र आजही काही ठिकाणी उत्सवाद्वारे सामाजिक उद्दिष्ट जपणारी अनेक मंडळे कार्यरत आहेत.
ओंकाराचे नादब्रह्म माणसाच्या हृदयस्पंदनांना, पृथ्वीच्या वेगाला आणि विश्वाच्या आत्मगतीला सुरांचे कोंदणे देते. म्हणूनच तर्कातून तर्काच्या पलीकडे जाण्याची मानवी जाणिवेची क्षमता त्यास विज्ञानाचे अधिष्ठान देते. तो निर्माणकर्ता आहे, तो असा. त्याचे आधुनिक काळातील मूर्त रूप म्हणजे "संगणक'.त्याचे एकूण स्वरूपच श्रीगणेशाचे स्वरूप सांगते, हा योगायोग नसावा! म्हणूनच गणपती मनाचेच रूप आहे. त्यास आकार नाही, व्याख्येत बसविण्याइतके निश्चित स्वरूप नाही. तरी प्रचंड सामर्थ्य, वेग आणि अतिसूक्ष्मापासून महाकायतेपर्यंत असणारी मनाची अनंत जाणीव मूर्त करणारे असे हे गणेशाचे स्वरूप.
व्यासांनी सांगितलेले महाभारत गणेशाने लिहून काढले, असे मानले जाते. यातील ऐतिहासिकता-अनैतिहासिकता हा मुद्दा बाजूला ठेवला तरी पाटीवर "गमभन' गिरवण्यास सुरुवात करणाऱ्या बालवाडीतील मुलापासून परम संगणक बनविणाऱ्या तंत्रज्ञ-वैज्ञानिकांपर्यंत सर्व पातळ्यांवर बुद्धीचा संबंध जेथे जेथे येतो, तेथे-तेथे गणेशाला श्रद्धेय स्थान आहे, हे अमान्य करता येत नाही. त्या गणेशास व माणसाच्या अस्तित्वासाठी लो. टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवास प्रणाम!

No comments: