Saturday, May 22, 2010

गृहिणींमध्ये जागृती घडवायलाच हवी!

"जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उध्दारी' अशी एक फार जुनी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी आहे अशी व्यक्ती म्हणजेच अर्थातच स्त्री या जगाच्या उध्दारास कारणीभूत ठरू शकते.

मुलाच्या जन्मापासून म्हणजेच लहानपणापासून ती त्या मुलावर चांगले संस्कार करीत असते. मुलांना चांगले वळण लागावे म्हणून ती अतिशय झटत असते. पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रिया अर्थार्जनासाठी क्वचितच घराबाहेर पडत असत, तेव्हा त्यांना आपल्या घराकडे व मुलांकडे लक्ष द्यायला भरपूर वेळ मिळत असे. त्या वेळेचा फायदा घेऊन त्या आपल्या जबाबदाऱ्याही अत्यंत उत्तम रीतीने पार पाडत असत. पण काळ बदलला. परिस्थिती बदलली. स्त्री सुध्दा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अर्थार्जन करू लागली. आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनात कमावत्या स्त्रीला आपल्या घराकडे, नवऱ्याकडे, मुलांकडे लक्ष द्यायला फारच कमी वेळ मिळतो. ही वस्तुस्थिती आहे.तसेच बदलत्या काळानुसार स्त्रीची मानसिकताही बरीच बदलली आहे. संसाराच्या या रामरगाड्यात तर काही जणींना आपल्या या मुलभूत जबाबदारीचाच विसर पडल्यासारखे झाले आहे. मग घरावर संस्कार करणाऱ्या स्त्रीचे मनच अशांत व अस्थिर असेल तर त्या घरावर संस्कार तरी कोण करणार आणि त्या घराचा विकास तरी कसा होणार?