Wednesday, September 10, 2008

गांधीगिरीने काय होणार...5000 दया नायक पाहिजेत

बन्गळूर, अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाले. यापूर्वी मुंबईतही झाले. अतिरेक्यांनी संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. भारतात कोठेही, केव्हाही अतिरेक्यांच्या मर्जीनुसार बॉम्बस्फोट मालिका घडवल्या जाताहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात अतिरेकी पोहचले आहेत. सर्वत्र दहशत माजवली जात आहे. निष्पाप लोकांचा जीव घेताहेत. परंतु आपले राजकारणी मात्र मस्तवालपणे आपल्याच मस्तीत जगताहेत. देशाची फिकीर त्यांना अजिबात दिसत नाही. रोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोट होतो, जिवंत बॉम्ब सापडतो. "आज ......... शहरात भीषण बॉम्बस्फोट झाले. यामध्ये ......... लोक मृत्युमुखी पडले तर ......... जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.' अशाप्रकारे बातम्या रोजच प्रसिद्ध होताहेत. या घटनेनंतरच्या प्रतिक्रियासुद्धा ठरलेल्या असतात... 1) पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 2) राष्ट्रपती व गृहमंत्र्यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. 3) विविध नेत्यांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. 4) देशातील प्रमुख शहरांमध्ये "रेड अलर्ट' चा इशारा व नाकाबंदी, तपासणी सुरू. बॉम्बस्फोटानंतर 8-10 तासांनी... 5) गृहमंत्र्यांनी सांगितले की, बॉम्बस्फोटाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडले आहेत. लवकरच आम्ही अतिरेक्यांना अटक करू. या स्फोटात विदेशी शक्तीचा हात आहे. 6) तोपर्यंत विदेशातून शोक संदेश येण्यास सुरुवात होते. मग गृहमंत्री गर्जना करतात, अतिरेक्यांसमोर गुडघे टेकणार नाही, अतिरेक्यांना सजा ठोठावणारच (अफजल गुरू, अबू सालेम सारखी) किंवा अतिरेक्यांना आम्ही शोधून काढूच. (कशाला, तर नंतर सोडून देण्यासाठी) अशाप्रकारे जनतेला भुलविले जाते. 7) बॉम्बस्फोट कॉंग्रेस राजवटीत झालेला असेल तर भाजपा म्हणेल, "हे केंद्राचे अपयश आहे, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा.' आणि जर त्या राज्यात भाजपाची सत्ता असेल तर कॉंग्रेसवाले म्हणतील, "राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आमच्या सुचनांची योग्य अंमलबजावणी न केल्यानेच ही दुर्घटना घडली.' 8) त्यानंतर सोनिया गांधी, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते घटनास्थळी भेटी देतात. फोटो काढतात, जखमींना मदतीचे आश्वासन देतात, पुन्हा काहीतरी वार्ताहर परिषदेत घोषणा करतात, श्रद्धांजली वाहतात, पण पुढे काय? 9) पोलिसही "रेड ऍलर्ट' घोषित केल्यावर दोन दिवस कडक तपासणी करतात. तिसऱ्या दिवशी मेलेल्यांच्या अंत्ययात्रा संपतात, श्रद्धांजली कार्यक्रम होतात. पुन्हा ये रे माझ्या मागल्या... पुढच्या बॉम्बस्फोटापर्यंत...
इतके सगळे रोज घडत असूनही आम्ही मात्र स्वत:ला "गांधीवादी' म्हणत टेंभा मिरवित असतो. आतंकवादाच्या कॅन्सरने संपूर्ण देशाला पोखरून काढलेले असताना आम्ही मात्र गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे स्वस्थ बसलो आहोत. मात्र आतातरी सावध पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. (तसे पाहिले तर ती वेळ केव्हाच आली आहे.) शरीराचा एखादा अवयव खराब झाला तर तो काढून टाकला जातो. त्यासाठी ऑपरेशन करावे लागते. याप्रमाणेच कडक कारवाई केली नाही तर आपण आतंकवाद्यांशी लढूच शकत नाही. लाचार कायदे, वेळकाढू न्यायालये, कायम सत्य-अहिंसेचे धडे शिकवणारे थकलेले निधर्मीवादी, भ्रष्ट पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी असल्यावर आपण अतिरेक्यांशी कसा सामना करणार? यासाठी आता कमीत कमी 5 हजार "दया नायक' सारख्या पोलीस अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे जो देशभक्त आणि ईमानदार आहे परंतु "भारतीय सिस्टम'मुळे तो मजबूर असून काहीच करू शकत नाही. भारत देशाशी एकनिष्ठ राहून मनापासून प्रेम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुपचूप आपली एक यंत्रणा विकसित करून अतिरेक्यांना शोधून काढून त्यांचा जागच्या जागी "एन्काऊंटर' केला पाहिजे. जर आम्ही गिलानी, अफजल, मसूद, उमर सारख्या अतिरेक्यांना पकडले नसते तर आम्हाला त्यांना जावई म्हणून ठेवावे लागले नसते. कंधारसारखे प्रकरणही घडले नसते. कोणी सांगू शकेल का, "अब्दुल करीम तेलगी, अफजल, अबू सालेम इत्यादींना आम्ही आजही जिवंत कशासाठी ठेवले आहे? का त्यांना गोळ्या घालून ठार मारू नये? त्यांच्यासारखे कुख्यात अपराधी सुधारण्याची तिळमात्र शक्यता आहे का?'
आतंकवाद देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचला आहे. तो ठेचून काढण्याऐवजी राज्यकर्ते त्यांचे वोट बॅंकेसाठी पोषणच करीत आहेत, भ्रष्टाचाराने देशाचे पार वाटोळे होत आहे. या देशात पेन्शन घेणाऱ्या देशभक्त सैनिकांकडून, स्मशानातील लाकडांसाठी, रूग्णालयातील औषधांमध्ये, अपंगांच्या सायकल, गरीबांचा गहू, देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या शस्त्रांमध्ये, शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार होतो आहे. दलाली, लाच घेतली जाते. देशभक्ती, त्याग, शासन या सगळ्या गोष्टी पुस्तकातच राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण अतिरेक्यांशी कसे लढणार? या सडलेल्या अधिकाऱ्यांच्या जोरावर! का या "सिस्टम'च्या जोरावर जे एका चिरकूट पाकिटमाराला 10 वर्षे तुरुंगात डांबते परंतु वीजचोरी करून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बड्या उद्योगपतीला मात्र सलाम ठोकते.
नाही, आतातरी हे सगळे संपवायला हवे. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 5000 दया नायक पाहिजेत. जे अतिरेक्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना कोणताही गाजावाजा न करता शोधून काढतील आणि तेथेच गोळ्या घालून ठार मारतील. हे काम आजही काही ईमानदार पोलीस अधिकारी करू शकतात. असे म्हटले जाते की, "असा कोणताही अपराध घडत नाही जो पोलिसांना माहित नाही' आणि हे बऱ्याच अंशी खरे आहे. फक्त अतिरेक्यांनाच नव्हे तर त्याचे पाठीराखे, हितचिंतक, नातेवाईक, संपूर्ण परिवार नेस्तनाबूत व्हायला हवे, सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे, तरच ते शक्य आहे.
इकडे आमचा संजूबाबा नावाचा महान व्यक्ती घरात विना परवाना शस्त्रे ठेवून लोकांना "गांधीगिरी' शिकवत आहे. या मूर्खाच्या "गांधीगिरीला' लोकांनी चांगलेच स्वीकारले. पण प्रत्यक्षात काय घडते आहे? वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या सुंदर पोरींना पोलीस हवालदार फुले देऊन "बायांनो लायसन्स काढा' अशी आळवणी करताहेत. 18 वर्षाखालील मुलांकडून शे-दोनशे रुपये घेऊन सोडले जात आहे. काय, मुर्खपणाचा हा कळसच गाठला. अशा प्रकारांनी कसल्या सुधारणा होणार? या "भडवेगिरी'पेक्षा अर्जुनाची "गांडीवगिरी' दाखवायला हवी. नियम तोडणाऱ्याची फक्त एकदा गाडी जप्त करून बघा. चौकात मोटर सायकलची हवा काढून त्या इरसाल कार्ट्याच्या बापाला बोलावून घ्या, बघा कसे सुधारतात ते. पण नाही, लाच खाऊन "गांधीगिरी' करायची, मग कशा सुधारणा होणार? फक्त पोकळ घोषणा करण्यात आम्ही धन्यता मानतो. "भारत विश्वाचा गुरू आहे... भारताने जगाला अहिंसेचा धडा शिकवला... इत्यादी.' परंतु या महान देशात कधी कोणाला शाळा-कॉलेजमध्ये कमीत कमी सैनिकी शिक्षण देण्याचे जरूरीचे वाटले नाही. (लैंगिक शिक्षण मात्र जोरात सुरू आहे.) जेव्हा संपूर्ण "सिस्टम' सडलेली असेल तर कोण काय करणार? अशावेळी केपीएस गिल, रिबेरोसारखे हिम्मतवान अधिकारीच देशाला वाचवू शकतात. अतिरेक्यांशी "मरा किंवा मारा' अशी लढाई व्हायला हवी. अतिरेकी हल्ले करून, बॉम्बस्फोटांद्वारे आम्हाला मारत आहेतच आता आम्ही त्यांना कधी मारणार? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. त्यासाठीच या देशाला अशा "दया नायकांची' नितांत आवश्यकता आहे.

No comments: