Wednesday, September 10, 2008

बधीर समाजात जागृती कशी होणार?

संपूर्ण देशात सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातच पशूलाही लाजवेल असे भयानक कृत्य माणसाच्या हातून वारंवार घडते आहे. नांदेड येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर दरोडेखोरांनी हल्ला चढवून तिचे दागिने तर लुटलेच शिवाय तिला मारहाण करीत फासावर लटकवून ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी दरोडेखोरांनी हा अघोरी मार्ग अवलंबला. नांदेडच्या ग्रामीण भागातील ही घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील काठोडा येथील दरोड्याची घटना कोठेवाडीप्रमाणेच राज्यभर गाजली. दरोडेखोरांनी विरोध करणाऱ्या एकाला ठार मारले तर अल्पवयीन मुली व महिलांना जबर मारहाण करुन त्यांच्यावर माणूसकीला काळिमा फासणारे अत्याचार केले. ही घृणास्पद आणि संतापजनक घटना घडल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी काठोड्याला धावती भेट देऊन पोलिसांना दरोडेखोर दिसताक्षणी गोळ्या घाला असे फर्मान सोडले होते. त्यातील एकही गोळी कुठे सुटलेली दिसत नाही. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडेखोरांचे राज्यभरात थैमान सुरुच आहे. परवा ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत परभणी शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर परभणी-पाथरी मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या दत्तात्रय कदम यांच्या आखाड्यावर दरोडेखोरांनी हल्ला चढवून कुंडलिक वाकळे, मुलगा त्र्यंबक, जावई मारोतराव गुहाडे, कुंडलिक यांची वयोवृद्ध सासु अनुसया व 4 मुलांना बळजबरीने एका खोलीत डांबले. आणि एकाच घरातील घरधनीण, तरुण विवाहीत मुलगी व सून अशा तिघांचीही अमानुषपणे विटंबना केली.
पाच दरोडेखोरांनी तिन्ही सवाष्ण महिलांवर त्या करुण आक्रोश करीत असताना बळजबरीने बलात्कार केला. यापैकी एका महिलेस तर या पाचही दरोडेखोरांच्या अत्याचाराला बळी पडावे लागले. हा घृणास्पद आणि लांछनास्पद प्रकार जवळजवळ दोन तास म्हणजे पहाटे तीनपर्यंत चालला. त्यांच्या या कृत्यावरुन ते विकृत आहेत हे सिद्ध होतेच शिवाय अंगावर काटा आणणारे असे कृत्य करताना त्यांना कायद्याची भिती अजिबात वाटलेली नाही. माणूसकीचा गळा घोटताना त्या दरोडेखोरांना काहीही वाटलेले नाही.
एकीकडे राज्यातील अशा घटनांमध्ये वाढ होत असतानाच दुसरीकडे मुंबईसारख्या महानगरातही एका महिलेला महिलेनेच जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. रस्त्यात चालताना धक्का लागल्याचे किरकोळ निमित्त होऊन हा प्रकार घडला, घाटकोपर (पश्चिम) येथील भटवाडी परिसरात शेजारी-शेजारी रहाणाऱ्या अनिता दत्ताराम शिवगण या 35 वर्षीय महिलेच्या शेजारी राहणाऱ्या आशा दिपक गायकवाड या 35 वर्षीय महिलेला चालत जात असताना धक्का लागला. त्यामुळे चिडलेल्या आशाने घरातून चाकू आणून अनिताच्या डोक्यावर वार केला. भररस्त्यात एका तरुणीने दुसरीवर चाकूने हल्ला केला. ते कमी पडले म्हणून की काय तिने घरातून रॉकेलचा डबा आणून त्या तरुणीला अक्षरश: पेटवून दिले. यात अनिता 90 टक्के भाजली असून ती अखेरच्या घटका मोजत आहे. क्षुल्लक कारणावरून महिलाही किती हिंस्त्र बनू शकते याचेच हे एक उदाहरण आहे. हिंदी चित्रपटांना लाजवेल अशी ही क्रूर घटना आहे. येथेही कायद्याचे भय दिसत नाही. शिवाय घाटकोपर सारख्या गजबजलेल्या भागात दिवसाउजेडी घडूनही एकानेही ही घटना रोखण्याचा प्रयत्न केला नाही की धाडस दाखवले नाही. हे त्या महिलेचे दुर्दैव. संवेदनहीन झालेल्या समाजाचे आणखी वेगळे चित्र काय असू शकते. देशाला सभ्यतेची शिकवण देणाऱ्या महाराष्ट्रात कायद्याचा धाक कुणाला उरलेला नाही हेच या घटना दाखवून देताता. स्त्रियांवर अत्याचार ही वाढती विकृती आहे. तिचे तात्काळ परिपत्य केलेच पाहिजे. बऱ्याचदा प्रतिष्ठा अभंग ठेवण्यासाठी दुर्दैवी भगिनींना स्वत:चे ओठ शिवून घ्यावे लागतात; मात्र त्यामुळे पोलिसांना जबाबदारीतून सुटता येणार नाही. तीन वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील गावकऱ्यांनी स्त्रियांवर हात टाकणाऱ्या दरोडेखोरांना चेचून मारून आत्मरक्षण केले. त्याचे अनुकरण व्हावे असे पोलिसांना वाटते कां?
आज समाजातील प्रत्येकजण डोळे असूनही आंधळ्याप्रमाणे वर्तन करतो आहे. दिवसाच्या रहाटगाड्यात माणसाने स्वत:ला इतके जुंपून घेतले आहे की, माणसामाणसातील संवाद हरवत चालला आहे. केवळ आपल्यापुरते पहायचे आणि बाजूला व्हायचे या वृत्तीने समाजाची दिवसेंदिवस अधोगतीच होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ज्या पातळीवरुन गांभीर्याने विचार करायला हवा त्या राजकीय व्यवस्थेने टोकाचा हीनपणा गाठला आहे. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध दाद मागणेदेखील मुश्किल झाले आहे. अपघातात किंवा दुर्घटनेत एखाद्याला मदत करताना देखील विचार करावा लागतो आहे. अशा स्थितीमुळे संपूर्ण समाज व्यवस्थेवरच मरगळ आली आहे. मुंबई, काठोडा, परभणी, बीड, नांदेडमधील झालेल्या दुर्दैवी परंतु माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांनी आमचेच नव्हेतर साऱ्या महाराष्ट्राचे डोळे पाणावले आहेत! पण बधीर झालेल्या समाजाला कोण समजवणार? झोपलेल्याला उठवू शकतो पण झोपेचे सोंग घेतलेल्या समाजाला कसे काय जागवणार? या साऱ्या गंभीर घटनांकडे कितपत गांभीर्याने पाहिले जाईल याची शंकाच आहे. शेवटी प्रशासन, राजकारणी हे त्या बधीर झालेल्या समाजाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून अशा प्रकरणात पुढाकार घेऊन हालचाली झाल्या नाहीत तरी त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही.

No comments: