Sunday, September 14, 2008

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !

"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !' म्हणत लाखो मुंबईकरांनी आणि इतर सर्व ठिकाणच्या भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. बॉम्बस्फोटांपासून मोर्चे-आंदोलनांपर्यंत कायदा-सुव्यवस्थेतील गलथानाबद्दल वेळोवेळी पोलिसांवर आणि खुद्द गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर खापर फोडले गेले आहे. मात्र दिल्लीत बॉम्बस्फोट मालिका घडल्यानंतरही मुंबईसह महाराष्ट्रात हेच पोलीस आणि दस्तुरखुद्द "आबा' यांची यंदाचा गणेशोत्सव सुरळीतपणे पार पडल्याबद्दल पाठही थोपटायला हवी. तसे न करणे हे कृतघ्नपणा ठरेल. मुंबईत पोलिसांचेही बळ अपुरे असल्याचा त्यांचा बचाव एरवी फारसा पटण्यासारखा नसला किंवा एकविसाव्या शतकातही सामान्य माणसाला कुणाचे तरी हात ओले केल्याखेरीज कामच होत नसल्याचा अनुभव घ्यावा लागत असला, तरी गणेशोत्सवाच्या दोन आठवड्यांत पोलीस जे अथक परिश्रम घेतात, ते कोणत्याही स्वरूपाच्या "लाभा'साठी नव्हे, तर श्रींच्या कृपेने हे सामाजिक कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या कर्तव्यभावनेतूनच ते अहोरात्र राबतात. सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनीही हे भान ठेवायला हवे आणि त्याची योग्य ती पावती द्यायला हवी. आज सकाळी गुलालाने माखलेल्या रस्त्यांवरून आपापल्या कामावर जाणाऱ्यांना बहुधा 10 दिवसांनंतर प्रथमच मोकळा श्वास घेता येईल, एवढा अफाट गर्दीचा पूर पुऱ्या मुंबईतील रस्त्यांवर गेले दहा दिवस लोटला होता. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यांवर येऊनही वर्षानुवर्षे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडतो, हेही कौतुकास्पदच. खुद्द भाविक या प्रशंसेस पात्र ठरतातच, पण यंदाही हा उत्सव कोणतेही गालबोट न लागता पार पडला, याचे श्रेय कायदा-सुव्यवस्था राखणारे पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते यांना द्यायला हवे. यादी करायची तर बस-रेल्वे आदी वाहतुक यंत्रणेपासून अनेकांचा समावेश त्यात करता येईल. मुद्दा हा की, लाखोंच्या संख्येत माणसे एकत्र येतात, ते ठिकाण एखाद्या निवडणूक-सभेचे असो अथवा तीर्थक्षेत्र, तिथे खुट्ट झाले तरी चेंगराचेंगरी होऊ शकते आणि अनेकांचे जीव घेणारी दुर्घटना घडू शकते. कुतुबमिनारपासून कुंभमेळ्यापर्यंत अशी अनेक उदाहरणे त्यासाठी देता येतील. मुंबईतील लालबागचा राजा किंवा पुण्यातील फुले मंडई, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने उत्सवाच्या काळात प्रत्यक्ष तिथे जाणाऱ्यांना, असा क्षण केव्हाही येऊ शकतो, याची जाणीवही असते. किंबहुना महाभारतातील युद्धात कौरवांनी रचलेल्या चक्रव्यूहाची आठवण व्हावी, असे अरुंद गल्ली-बोळ आणि पाईप-दोरखंडांमधल्या रांगांतून पुढे सरकताना अनेकदा गुरमरून टाकणारा अनुभवही आलेला असतो. त्यातून तासनतास तिष्ठत-सरकत, दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर मोकळा श्वास घ्यायला मिळतो, तो क्षण पुनर्जन्मासारखाच भासतो. आज गणरायाला निरोप दिल्यानंतरचा दिवस लाखो भाविकांना, नोकरदारांना आणि पोलीस, स्वयंसेवी कार्यकर्त्यांना त्यापेक्षा वेगळी अनुभूती देणारा नसेल. याच दहा दिवसांत आणि एरवीही जरा कुठे वाहतुकीची कोंडी झाली, चोरी-मारी झाली तर पोलिसांच्या नावाने समाज बोटे मोडतो आणि मीडियाही टीकेचे आसूड उडवीत त्यात आपले हात धुऊन घेतो. गणेशोत्सवासारखे कसोटीचे दिवस निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर मात्र याच पोलिसांची आठवणही सहसा कुणाला राहात नाही.
पाकिटमारांपासून अफवा पिकवणाऱ्या समाजकंटक आणि दहशतवाद्यांपर्यंत सर्वच "संकटां'ना तोंड देत उत्सव पार पाडणे हे मंडळांच्या कार्यकर्त्यांच्याही आवाक्यापलीकडे जाऊ लागले आहे. लालबागचा राजा गिरणगावातील अगदी मध्यवर्ती भागात असतो. त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असून ती दिवसेंदिवस वाढतच आहे. पण त्यामुळे या परिसरातील रहिवासी, विविध संस्था-आस्थापनांचे कर्मचारी आणि व्यावसायिक यांना जी गैरसोय सहन करावी लागते, तिचीही दखल वेळीच घ्यायला हवी. हे फक्त लालबाग किंवा पुण्याच्या कसबा-शुक्रवार पेठेतीलच चित्र आहे, असे नाही. पण उत्सवाच्या वाढत्या प्रमाणामुळे गैरव्यवस्था वाढू लागली तर दैनंदिन व्यवहारांना खीळ बसेल आणि बेदिली माजेल. भाविकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करताना आणि दहा दिवसांत दोनशे चाळीस तासांहून अधिक काळ अखंड ध्वनिक्षेपण यंत्रणा वापरताना मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घशांचे तीनतेरा वाजतात, पिण्याच्या पाण्यापासून रुग्णांपचारापर्यंत हरतऱ्हेच्या सुविधा पुरविताना कार्यकर्त्यांचे रक्त आटते, हे खरे. तरीही गाव-गाडा चालू राहण्यासाठी परिसरातील इतरांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, अशा व्यवस्थेची खबरदारी घ्यायलाच हवी. अमुक गणपती नवसाला पावतो, या श्रद्धेपोटी असेल किंवा निव्वळ विरंगुळा म्हणून असेल, कारणे काहीही असली तरी उत्सवांचे स्वरूप काही वर्षांत बदलले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रस्त्यांना येणाऱ्या गर्दीचे पूर, बकालपणा, अनारोग्य हेही दरवर्षी वाढतच आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे, हे आव्हान बनले असून याचा विचार गांभीर्याने करायलाच हवा.

No comments: