Friday, July 2, 2010

पालक नव्हे, मित्र बना..!

मुलं डोळ्यांदेखत केव्हा मोठी होतात, हे पालकांना कळतच नाही. बोट धरून नाजूक पाऊल पुढे टाकून चालणं शिकणारी मुले पालकांची उंची गाठतात आणि त्यांची म्हातारपणाची काठी होत असतात. मुलांना "मोठ्ठ' करण्यासाठी पालक विविध भूमिकांमधून झिजत असतात. वयाचे टप्पे ओलांडणाऱ्या मुलांशी सुसंंवाद साधताना पालकांना कसरत करावी लागत असते. पालक नव्हे तर मित्र म्हणून त्यांना वयात आलेल्या मुलांशी सुसंवाद साधावा लागत असतो.
परंतु, काही कुटुंबातील पालक मुलांशी सुसंवाद साधण्यात अपयशी ठरत असतात. "मित्र' म्हणून भूमिका त्यांना वठवता येत नाही. आपली मुले कितीही मोठी झाली तरी ती लहानच आहे, असे त्यांना वाटते. "गप्प बस, तुला काय कळतं त्यातलं', असे म्हणून कळत्या वयात मुलांना सारखं ऐकवत असतात.
मुलांनी धोक्याचं वय ओलांडलं, अर्थात वयाची 16 वर्ष पूर्ण केल्यानंतर पालकांनी "पालक' म्हणून नव्हे तर एक "मित्र' म्हणून मुलांशी सुसंवाद साधणं आवश्यक झाले आहे. किशोरावस्थेत पदार्पण करणारी मुले लहरी असतात. या स्थितीत त्यांच्या इच्छेनुसार घ्यावं लागतं. त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाल्यास ते हिरमुसतात. वेळ प्रसंगी केव्हा काय करतील याचा भरवसा नसतो. अलिकडच्या काळात मानसोपचारतज्ज्ञंाकडे येणाऱ्या पालकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पालकांविषयी नव्हे तर पाल्यांच्याच समस्या अधिक आहेत. तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलांमुलींमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या वयात मुलांना पुरुषत्वाची तर मुलींना स्त्रित्वाची जाणीव होत असते. याच अवस्थेतून पालकही गेलेले असतात. परंतु आपल्या मुलांना ते समजून घेत नाहीत.
तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या मुलांमध्ये अमुलाग्र बदल होत असतात. त्याच्यात असे काही बदल होतात की, त्याने त्यांचे पालक थक्क होत असतात. मुलांना बालपणी न आवडणाऱ्या गोष्टी त्यांना किशोरावस्थेत आवडत असतात. मुले- मुलींशी तर मुली- मुलांशी मैत्री करतात. मुले अधिक वेळ घराबाहेर घालवतात. पालकांच्या सांगण्याकडे त्यांचे मुळीच लक्ष नसते. पालकांनी मुलीला "तो मुलगा कोण?', या विचारलेल्या प्रश्नाला... "तो माझा चांगला मित्र आहे आणि बाकी काही नाही.' असे साचेबद्ध ठरलेलं उत्तर मुली देत असतात.
या स्थितीत पालकांनी आणखी काही सुनावले म्हणजे ती आणखी बिथरते. कॉलेजमधून घरी यायला मुद्दाम उशीर...चौकशीअंती समजतं, ते प्रेमप्रकरण..! तर, मुलांच्या बाबतीतही "सेम टू सेम' अस्संच! परंतु थोडं वेगळं.., म्हणजे लपून सिगारेटी? फुंकणं... अभ्यासाच्या वेळी मित्रासोबत रिकामं भटकणं... वैगेरे वैगेरे. अशा परिस्थितीत काय करावं? त्यांच्याशी कसं सांगावं? असे यक्ष प्रश्न पालकांसमोर उभे ठाकतात. आपल्याच मुलांना समजावण्यासाठी पालक "समन्वयक' शोधतात. काही वेळेस तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच मानसोपचारतज्ज्ञांचा आश्रय घ्यावा लागत असतो. तेव्हा त्यांना आपल्याच मुलांना समजून घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा फिज पेड करावी लागत असते. याला आपण काय म्हणावे?
"कारट्याने वा कारटीने समाजात आमचे नाक कापले', असे पालक "नाक' सलामत असतानाही म्हणत असतात. परंतु आपली मुले कोणत्या मानसिकतेतून जात आहेत. याचा विचार करणारे पालक फार कमी आहेत.
आपल्याविषयी मुलांमध्ये विश्र्वास निर्माण केला पाहिजे. तेव्हा मुले पालकांशी बिनधास्त संवाद साधतात. मनातील विचार कळवितात. नाहीतर याकाळात मुले आपल्या पालकांपेक्षा आपल्या मित्रांकडे भावना व्यक्त करत असतात. मुलांचा विश्र्वास संपादन करून "तुला अमुकच व्हावं लागेल' असे म्हणण्या पेक्षा "तुला काय व्हायचं आहे?' असे विचारून त्याच्या मनातील इच्छा जाणून घ्यावी.
त्याच्या करियरच्या बाबतीत पालकांनी कोणतीही तडजोड करू नये. राहिला त्यांचा प्रेमात पडण्याचा प्रश्न. तर वयात येण्याइतकीच प्रेमात पडणं, ही नैसर्गिक गोष्ट आहे. हे आधी समजून घ्यावं. त्याचं प्रेम किती खोलवर रूजलेलं आहे, हे आधी ओळखले पाहिजे. आपल्या पाल्यांवरील विश्र्वास कधीही कमी होऊ देऊ नका. त्यांच्यातील नातं खरोखरीच मित्रत्वाचं आहे का याचाही अंदाज आधी घेतला पाहिजे.
परंतु पालक येथेच चुकतात. खरी परिस्थिती जाणून न घेता. मुलांना चारचौघात सुनावत असतात. त्याचे अनिष्ठ परिणाम मुलांच्या मानसिक विचारसरणीवर होतात. त्यामुळे भविष्यात मोठी किंमत मोजाण्याआधीच आपल्या पाल्याशी पालकांनी मित्रत्त्वाचे संबंध जोपासणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात देशाला मिळाले भ्रष्ट नेते!

सध्याच्या संयुक्त पुरोगामी आघाडीत खूनाचे, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते आता केंद्रात स्थानापन्न झालेत. आरोप असलेल्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात येत आहे. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना देशाला अर्पण केली. या घटनेला 63 वर्षे झाली आहेत. या घटनेमुळे देश आतापर्यंत एकसंघ राहिला असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही. मात्र आता या खंडप्राय देशाच्या एकात्मतेला तडे देण्याचे काम आजच्या नेत्यांकडूनच सुरू आहेत. धर्म, जात, पंथ, भाषा, जन्मस्थानावरून वाद निर्माण केला जातोय. यातूनच देशाच्या घटनेला आव्हान देण्याचा प्रयत्नही काही पुढाऱ्यांकडूनच केला जातोय. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय नेतृत्व कमकुवत झाले तेव्हा तेव्हा या शक्तींनी तोंड वर काढले. आज हाच धोका भारताला आहे. एक काळ असा होता की, देशभक्तीने झपाटलेले अनेक नेते होते. मात्र देशभक्त म्हणून आज कोणत्या नेत्याकडे बोट दाखवावं हा एक प्रश्नच समोर असतो. एकूण आजची राजकीय स्थिती यावर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी या स्थितीबद्दल अत्यंत विदारक सत्य लिहून ठेवले आहे. इलेक्शन्स अँड देअर करप्शन्स, इनजस्टीस अँड दी टिरनी ऑफ वेल्थ अँड इनइफीशियन्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन विल मेक ए हेल ऑफ लाईफ ऍज सून ऍज फ्रिडम इज गिव्हन टू अस... होप लाईज ओन्ली इन युनिव्हर्सियल एज्युकेशनबाय विच राईट कन्डक्ट, फिअर ऑफ गॉड अँड लव्ह विल बी डेव्हलप अमंग दी सिटीझन्स फ्रॉम चाईल्डहूड....अदरवाईज इट विल मिन दी ग्राईंडिंग इनजस्टीस अँड टिरनी ऑफ वेल्थ. राजगोपालाचारी यांनी हे विधान स्वातत्र्यांच्या 25 वर्षाअगोदर केले होते. कारागृहात असताना त्यांनी ही नोंद रोजनिशीमध्ये लिहून ठेवली होती. 90 वर्षानंतर हे विदारक सत्य आपल्या देशाच्या राजकीय पक्षांच्या व त्यांच्या निवडणुकीचे भयावह रूप दर्शवते. ज्या तऱ्हेने आज राजकीय पुढारी वागत आहेत त्याच्यावरून वाटत नाही की, देशाची लोकशाही त्यांच्या हातात सुरक्षित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी स्वातंत्र्य सेनानी, देशभक्त पाहिले आहेत. ज्यांच्या कर्तृत्वाने हिमालयानेही नतमस्तक व्हावे. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळी देशाचे नेतृत्व कुणी करावे हा प्रश्न उपस्थित झालाच नाही. किंवा या देशाची घटना कोणी लिहावी हा विचारही करावा लागला नाही. कारण पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे नेतृत्व आपल्याकडे होते. स्वातंत्र्यानंतर 1964 पर्यंत पंडित नेहरू यांचे जगमान्य नेतृत्व देशाला लाभले. नेहरूंच्या मृत्यूनंतर देशाला लालबहादूर शास्त्री यांच्या रूपाने एक खंबीर नेतृत्व मिळाले. दुर्दैवाने ते फार काळ लाभले नाही. त्यानंतर इंदिरा गांधी हे नाव समोर आले. मात्र त्यांच्या विरोधात विविध समाजवादी नेतेमंडळी होती. मात्र बांगलादेशाच्या युध्दापर्यंत इंदिरा गांधी यांचे नेतृत्वही देशमान्य झाले नव्हते. ते बांगला देशाच्या युध्दात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर इंदिरा गांधी यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले. 1970 च्या गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्दयावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले. त्याचवेळी बिहारमध्ये इंदिरा गांधी यांना विरोध झाला. पंजाब व बिहारचा वादामुळे इंदिराजींना आपले प्राण गमवावे लागले. धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकवणं हे खुर्ची मिळविण्याचं राजकारण ठरलं. त्यानंतर आलेले राजीव गांधी यांचा राजकारणात प्रवेश झाला परंतु विश्वासघात होवून ज्या वेगाने आले त्याच वेगाने त्यांची बदनामी झाली. 1989 मध्ये व्ही.पी.सिंग पंतप्रधान झाले. आणि उत्तरप्रदेश व बिहारमध्ये यादवांचे प्रस्थ वाढले. ही सर्व मंडळी केवळ सत्तेसाठी व पैसा जमविण्यासाठी एकत्र आली. सत्ता मिळविण्यासाठी जाती धर्माचा उपयोग करायचा व सत्ता टिकविण्यासाठी पैसा ओतायचा, हा राजकारणात टिकून राहाण्याचा एक नवा सिध्दांत मांडला गेला. आजही देशापुढे सशक्त नेतृत्व उभे न राहिल्याने हा प्रश्न भेडसावत आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला मर्यादा असून त्यांना पंतप्रधानपदामध्ये रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी यात किती तथ्य आहे हे त्यांच्या आजच्या राजकारणातल्या ढवळाढवळीवरून दिसतंच आहे. त्यामुळे आज एकच नमूद करावंस वाटतं की, भारतीय जनता देशाला जाती पंथापेक्षा जास्त प्राधान्य देणार की, जाती पंथाला देशापेक्षा उंच जागेवर ठेवणार हे जनतेने ठरवायचे आहे. जनतेने हेे ठरवलेच असले तरी देशाचे सत्ताधारी हे गुंडधारी आहेत. त्यामुळे ते जनतेच्या सुखापेक्षा स्वत:च्या सुखाचा विचार करणारे हे नेते स्वहिताचाच विचार करणारे आहेत.

रस्त्यांमुळेच भारताचा विकास खुटंला!

भारत आजही दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत राष्ट्रांमध्ये का गणला जातो? केवळ नैसर्गिक साधनसंपत्ती जवळ असल्याने राष्ट्राची उन्नत्ती साधता येत नाही. तर ती साधण्यासाठी तेथील रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. आपल्याकडे आज रस्त्यांची जी दयनीय परिस्थिती आहे तीच परिस्थिती भारताच्या आर्थिकतेबाबत करता येईल. अमेरिका हे राष्ट्र सर्वच बाबतीत संपन्न आहे. का? तर तेथील रस्ते चांगले आहेत. म्हणजेच दळणवळणाच्या सुविधा चांगल्या आहेत. म्हणून ते राष्ट्र संपन्न आहे.
मुंबईतील, महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील रस्त्यांचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की देशाची प्रगती ही या खड्‌ड्यांमध्ये अडकली आहे. रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठी होणारी आर्थिक तुट कोणाच्याच लक्षात येत नाही असे नाही पण महाराष्ट्रातील जनतेला आता खड्ड्यातून प्रवास करताना लागणारा झटका अनुभवण्याची सवयच झाली आहे. तसं पाहिलं तर रस्ता हा फार महत्वाचा घटक नसला तरी अशाच अनेक बाबींचे महत्व दुर्लक्षित झाल्याने त्याचा एकत्रित परिणाम हा या राष्ट्रावर होतोय. राष्ट्राला विकासाकडे नेणाऱ्या सत्ताधारी मंडळींची दृष्टी सूक्ष्म असावी लागते. आतापर्यंत या सत्ताधाऱ्यांना हे खड्डे कसे दिसले नाहीत? की, दिसुनही आंधळ्याचं सोंग घेतलं जातंय. ही अशी सोंग करण्यापेक्षा राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलले असते तर आतापर्यंत आपले राष्ट्र विकसित देशांमध्ये गणले गेले असते. विकसित राष्ट्रांनी आपला पाया मजबुत केला. त्या राज्यकर्त्यांनी हेच सर्वोच्च ध्येय समोर ठेवले. म्हणूनच विपरित परिस्थितीवर मात करून त्यांंनी देशाचा विकास साधला. मात्र आज आम्हाला येथील रस्ते म्हणजे क्षुल्लक बाब वाटते. स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतरदेखील आम्ही काहीच शिकलो नाही. स्वप्न पाहिली, परंतु ती कशी साकारायची याचं ज्ञान नाही. ही स्वप्न साकार करणारे निघुन गेले. पण जे घडवू शकतात त्यांनाच आम्ही ओळखू शकलो नाही.

चीन सारखा मागासलेला देश प्रगतीपथावर पोहोचू शकतो, मग आम्ही का नाही? हा साधा विचार केला तर आपली चुक आपल्या लक्षात येईल. आज चीन सर्वच बाबतीत आपल्या पुढे आहे. का? तर त्यांनी आधी आपला पाया मजबुत केला. रस्ते, वीज आणि पाणी यासारख्या पायाभूत सुविधांचे जाळे देशभर निर्माण केले. मनुष्यबळाचा योग्य उपयोग करीत विकास साधला. अर्थात हे सारं काही अगदी सहज साध्य झाले नाही. पण आज अमेरिकेसारख्या देशाला आव्हान देणारा देश म्हणून चीनकडे पाहिले जाते. आम्ही रस्ते, वीज, पाणी या अभावी आमचा पायाच डळमळीत ठेवला. तोच मजबुत केला नाही आणि आम्ही आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न रंगवतोय. आमचे रस्ते हेच खरे आमचे दारिद्रय आहे. विजेचा तुटवडा आणि पाणी म्हणाल तर देशातील अर्ध्या अधिक जनतेची तहानही भागवू शकत नाही. पण तरीही आम्ही मुंबईचे शांघाय, कोकणचा कॅलिफोर्निया आणि देशाचे सिंगापुर करण्याची स्वप्न जनतेला दाखवतोय. कसले सिंगापुर आणि कसले शांघाय? अशी वल्गना करणाऱ्यांनी सिंगापुर हा सिंगापुर का आणि कसा झाला याचा थोडा अभ्यास करावा, म्हणजे मग डोळे उघडतील. पण तोपर्यंत जगाने अधिकाधिक प्रगती केलेली असेल. आपला देश सिंगापुर होईल तेव्हा अमेरिका, चीन या राष्ट्रांनी मंगळावर राज्य केलेले असेल. आपला देश संपन्न होता, या देशात सोन्याचा धूर निघत होता. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी या सूत्रांचे पालन होत असे. पण आज उत्तम नोकरी असली तरी सारं काही कनिष्ठच. जेथे नोकरी करायची त्या कारखान्यातुनच काळा धूर नाहीसा झाला तर सोन्याचा धुर निघणार कुठून. शेतकऱ्याची सरकारला गरज आहे पण त्याच्या सुखसोयींकडे मात्र सरकार दुर्लक्ष करते. जोपर्यंत सरकारची साथ शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत देशाचा विकास साधणं कठीण आहे. देश चालतो तो कराद्वारे मिळणाऱ्या पैशातून. शेतकरी-उद्योजक देशाचे पोशिंदे आहेत. पण त्याचा विचार सरकार किती करतोय. केवळ भरमसाठ कर लादून त्यांच्या माना त्यात अडकवून सरकार गप्प बसलंय. देशातील मोठमोठे उद्योजक आपापल्या परीने देशातील जनतेच्या सुख सुविधांचा विचार करत असले तरी आधी आपली तिजोरी कशी भरेल याकडेच त्यांचेही लक्ष लागलेले असते. म्हणूनच शेतकरी हा तुमच्या स्वप्नांचा आधारस्तंभ आहे, हे स्तंभ जोपर्यंत मजबुतीने उभे होत नाही तोपर्यंत भारताचे स्वप्न साकार होणार नाही. मुंबईचे शांघाय आणि देशाचे सिंगापुर, कॅलिफोर्निया करण्याची स्वप्न बाजुला ठेवा, शांत, स्वच्छ आणि सुखकर मुंबई मुंबईकरांना कशी अनुभवता येईल यावर लक्ष केंद्रीत करून मग राज्यातील गावांचा आणि त्यापाठोपाठ संपूर्ण देशाचा विकास साधायला हवा. त्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना गांभिर्याने प्रयत्न करायला हवेत. परंतू ते मात्र स्वत:च्या तुंबड्या भरण्यात मग्न आहेत. त्यांना जाब विचारणार कोण?

रिमिक्स! चा धांगडधिंगा

भोर भये पनघट पे...मोहे नटखट श्याम सताये....हे सत्यम शिवम्‌ सुंदरम्‌ या चित्रपटातील झीनत अमान वर चित्रीत केलेलं गीत. त्या गाण्यातल्या आवाजातलं, नृत्यातलं आणि नायिकेच्या कुरूपतेतलं सौंदर्यही पहाताना एक वेगळंच सुख मिळत होतं. पण या गीताचं केलेलं रिमिक्स, त्या गाण्यावर नृत्य करणारी इशा कोपीकर आणि एकूणच चित्रीकरण पहाताना या आधुनिकतेला आम्ही स्विकारायचं की नाही? हा प्रश्न मनात निर्माण होतो.

आज रिमिक्सने घातलेला धुमाकूळ श्रवणीयही नाही की पहाण्याजोगाही नाही. अनेक नामवंत गायकांच्या मते रिमिक्स गाणं हे आम्हाला आव्हान असतं. ते आम्हाला स्विकारणं भाग आहे. पण पुढे त्या गाण्यावर होणाऱ्या चित्रीकरणाला आम्ही जबाबदार नसतो. पण तरिही जुन्या गाण्यांच रिमिक्स नेमकं कशासाठी केलं जातय हेच समजत नाही. बदलत्या काळाबरोबर या क्षेत्रातील तंत्र,यंत्र सारं काही बदललं. पण ही अशी गाणी पाहिली की याला आधुनिकता म्हणायचं का? जी कला इतरांसमोर पहाताना मान खाली घालावी लागते. एवढंच काय पण या गाण्यांवर ताल धरून शाळा-महाविद्यालयांमध्ये नाचणारी मुलं-मुली पाहिली की त्यांच अजबच वाटतं. नृत्य ही एक कला आहे. पण याचा बाजार मांडल्यासारखं वाटतं. बुगी-वुगी सारख्या नृत्याच्या कार्यक्रमात अनेक लहान मोठ्या मुला मुलींना सहभागी होता येतं. मात्र या वयाला शोभेल अशा गाण्यांवर नृत्य करणारी मुलं इथे अभावानेच पहायला मिळतात.

अर्थात दिलबर.... दिलबर...हां...दिलबर...दिलबर...होश ना खबर है...कैसा असर है... तुमसे मिलने के बाद दिलबर...या गाण्यावर तर शेफाली मन लावून, पुरेसे लटके झटके देत गाण्यावर नृत्य करत होती. नृत्य कसलं ते शरीराच्या इतरांना आकर्षक करण्याच्या चमत्कारिक हालचाली करत होती. तिला आणि तिच्या वयाला न शोभेल अशाच काहीशा या हालचाली आहेत. शेफालीचं वय होतं नऊ वर्षे आणि तिचं नृत्य होतं पंचवीस वर्षाच्या तरुणीला शोभणारं आणि विशेष म्हणजे तिच्या या नृत्याला तिच्या घरच्यांंनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली. नृत्य ही एक सौंदर्यपूर्ण कला आहे यात शंका नाही पण शेफाली ज्या काही शारीरिक हालचाली, उत्तेजक असे तिच्या वयाला न शोभणारे हावभाव करत होती, ते किती योग्य होतं? आणि तिच्या घरच्यांनी अशा गोष्टींना प्रोत्साहन द्यावं, हे किती योग्य? अर्थात या साऱ्या गोष्टींच भान प्रत्येक मुलांच्या पालकांनी ठेवणं गरजेचं आहे. एवढंच काय पण बुगु वुगी मेकर जावेद जाफरी यानेही इथे सहभागी होणाऱ्यांनी आपल्या वयाला शोभेल अशीच गाणी नृत्यासाठी निवडावी. तसेच आपल्या पालकांच्या संमत्तीशिवाय गाणं निवडू नये असेही सुचित केले होते.

आजकाल मोठ्यांच्या नृत्याची नकल करून शाबासकी मिळवायची, विविध स्पर्धात्मक कायर्र्क्रमात भाग घेऊन टॅलेन्ट सिद्ध करायचं फॅड चालवणे शिवाय रिमिक्सच्याा नावाखाली जो काही अश्लील हंगामा चाललाय, त्याची बीजं छोट्यांच्या मनात रुजू घातलीयत आणि आईवडील कौतुकाचं खतपाणी घालून या विषारी वृक्षाला जगवताहेत, असं काहीसं चित्र आज दिसतंय. रिमिक्सच्या नावावरही आज अनेक रिमिक्स गर्ल निर्माण झाल्यात. केवळ प्रसिध्दी आणि पैशाच्या हव्यासापायी पुढे येवून अशा अश्लिल चित्रीकरणास तयार होतात. पण यांच्या मातांनाही यांच्या या कलेचा अभिमानच असतो.

कोणतंही गाजलेलं गाणं घ्यायचं, त्यातल्या मूळ संगीताला हटवून धांगडधिंगा करणाऱ्या संगीताची जोड द्यायची, काहीही करायला तयार असलेल्या दोन-चार नव्या मुली घ्यायच्या आणि छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालायचा हा नवा ट्रेन्ड आहे. रिमिक्सचा हा हंगामा एखाद्या सत्‌प्रवृत्तीच्या माणसाची वृत्तीही चाळवेल आणि चळेल असाच असतो. हा तमाशा आपल्या घरातल्या मुला-मुलींच्या नजरेला पडतोच. त्यांचं वय लहान असल्यानं त्यांच्यावर अश्लील दृश्यापेक्षा ठेका धरायला लावणारं संगीत, त्या मॉडेलची केशभूषा, वेषभूषा हे सगळं ठसतं. अशा नृत्याचा समोरच्यांच्या मनावर काय परिणाम होतो हे कळण्याची समज, भावनिक कुवत त्यांच्यात नसते त्यामुळे तसेच लटके-झटके देऊन नृत्य करण्याचा प्रयत्न केला जातो. खरंतर इथंच सावध राहिलं पाहिजे.

मुला-मुलींना अशा नृत्याचं अनुकरण करण्यापासून रोखणं हे आपलच काम आहे. अशी चॅनल त्यांना बघू न देणं, चुकून पाहिलीच तर त्यांना अनुकरणापासून परावृत्त करायचं सोडून अगदी तीे शेफालीसारखी किंवा इशा कोप्पीकर सारखी नाचते ना! म्हणून कोैतुक करणं, हे हल्लीच्या मातांना अधिक आवडतं. मुलांच्या कलेला प्रोत्साहन द्या, कलेच्या नावाखाली होणाऱ्या अश्लितेला प्रोत्साहन देवू नका..

परवाच एका चॅनलवर दिल्लीच्या एका "बझार'मध्ये छोट्या छोट्या मुलांचा वापर ब्लू फिल्मस्‌च्या विक्रीसाठी केला जात असल्याचं दाखवलं. पेपरविक्रीच्या बहाण्यानं या मुलांना बसवलं जातं. अंगावरच्या कपड्यातून या सीडी लपवलेल्या असतात. माहितगार किंवा शोधक बी. एफ्‌. है क्या, असं विचारल्यावर मुलं या सीडी काढून देतात किंवा बाहेर फिरत असणाऱ्या मुलांकडूनही या सीडी खपवल्या जातात.

किती भयंकर आहे हे सगळं! ज्या वयात गोष्टी ऐकायच्या, खेळ खेळायचे, पुढच्या सगळ्या आयुष्याचा पाया भक्कम करायचा त्याच नकळत्या वयात तरुण वयातल्या भावनांची आवर्तनं उठू लागली आहेत. त्यांना तारुण्यातल्या सगळ्याच गोष्टींची जाणीव करून देणाऱ्या वाटा उपलब्ध करून दिल्या जाताहेत. छोट्यांच्या कोमल भावनांच्या जगातही आता "रिमिक्स' घुसलंय ते असं. भावनांची घातक सरमिसळ होतेय.

आपण कुठे कुठे पुरे पडणार आहोत असा प्रश्न सुजाण पालकांसमोर आ वासून उभा आहे. मला वाटतं, निदान आपल्या घरातल्यापुरती आपण या गुंत्याची उकल करायला लागूया. वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो, असं म्हणतात. मुलांच्या कोमल भावनांच्या जगात तारुण्याचं... वासनेचं "रिमिक्स' आताच घुसू नये म्हणून त्यांच्या मनाची मुळं साफसूफ करायला लागूया. नको ती बांडगुळं वेळीच कापून काढूया. एकदा मनाची योग्य मशागत झाली की, निरोगी बीजं रुजायला वेळ कुठे लागतो?