Tuesday, March 16, 2010

"गुढीपाडवा' मांगल्याचा, संकल्प करण्याचा!

ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाचा वाढदिवस, नववर्ष हा गुढीपाडव्याला साजरा करण्यात येतो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील पहिला सण मानला जातो. हिंदू संस्कृतीत या दिवसाला फार मोठे महत्त्व आहे. इतिहासातील अनेक दाखले यासाठी पुराव्यादाखल देता येतील. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य करून त्यांच्यात जीव भरला आणि शत्रूचा पाडाव केला. म्हणजेच मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, निर्जीव, दुर्बल झालेल्या समाजामध्ये नवचैतन्य, स्वाभिमान, अस्मिता जागृत करून त्यांनी शत्रूला नामोहरण केले. आणखी एका गोष्टीत असे म्हटले आहे की, शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेला मुक्त केले. या विजयाप्रित्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला सुरूवात झाली. ज्यांनी विजय मिळवता. तो "शालिवाहन' आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते "शक' असे दोघांचाही अंतर्भाव यामध्ये करण्यात आला. प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या दुष्ट राक्षसांचा पराभव केला. त्या प्रभू रामचंद्रांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेला अयोध्येत प्रवेश केला. त्या दिवशी जनतेने प्रभू रामचंद्र आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दारोदारी गुढी-तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला. ही परंपरा तेव्हापासून सुरू आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावी. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. बांबूच्या काठीला स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे किंवा भगवे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर तांबे किंवा स्टिलचा तांब्या लटकवून तयार केलेली गुढी दारासमोर उभी करावी. हल्ली शहरांमधील उत्तुंग इमारतीत रहाणाऱ्यांनी घरासमोरील बाल्कनीत सर्वांना दिसेल अशी बांधावी. या पवित्र गुढीची पुजा करावी. नेवैद्य म्हणून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यामध्ये जिरे, मिरी, हिंग, सैधव व ओवा इत्यादी घालून हे मिश्रण चांगले वाटून घरातील आणि शेजाऱ्यांना थोडे-थोडे वाटावे. त्यानंतरच गोड-धोड खावे. त्यानंतर या मुहूर्ताच्या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा. नववर्षाचा हा पहिला दिवस गुढी आकाशात उभारून दिमाखाने साजरा करावा...
प्रथम दिवस हा नववर्षाचा

पावित्र्याचा मंगलतेचा

संकल्पचि करू भावभक्तीने

सत्कर्माचि नित करण्याचा

जे जे वाईट हातून घडले

विसरून जाऊ ते ते सारे

येथून पुढती अखंडतेने

मनी रंगवू उच्च मनोरे

बंधुत्वाचा येथून पुढती

दीप पेटवू आपुलकीने

...गुढीपाडवा या सणाचे महत्व कवी म. पा. भावे यांनी आपल्या कवितेत सुरेखरित्या शब्दबद्ध केले आहे. भारतीय संस्कृतीत या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू संस्कृती हा मोठा अमूल्य ठेवा आहे. यामागे फार मोठी प्राचीन परंपरा आहे. ब्रह्मदेवाने स्थापन केलेल्या या सृष्टीच्या निर्मितीचा दिवस आनंदात साजरा व्हायला हवा. याच सुमारास निसर्गसृष्टीसुद्धा जुन्या, अनावश्यक गोष्टींचा त्याग करून नव्या गोष्टींचे उदार मनाने स्वागत करते. कोवळ्या पालवीचे मनोहर रूप धारण करते. यातूनच आपण बोध घ्यायला हवा.

जुने हेवे-दावे सोडून खुल्या मनाने नव्याचा स्वीकार केल्यास आपल्या आयुष्यातही नव्या आशा, आकांक्षाचे धुमारे फुटतील. श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव न केल्यास जीवनाला नवी दिशा प्राप्त होईल. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मागील वर्षी जी काही चांगली किंवा वाईट कामे केली त्याचे स्मरण करून वाईट विचार, भावनांचा त्याग करायचा आणि नववर्षाच्या निमित्ताने नवा संकल्प करून नव्याने सुरूवात करायची. अशा या पावित्र्याच्या, मांगल्याच्या आणि सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंत आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपणही दिमाखात साजरा करू या! आकाशात विजयपताकांची गुढीची रांगच रांग दिसू द्या! सातासमुद्रापार पोहोचलेल्या आपल्या सर्व हिंदू बांधवांनी मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाच्या आणि शिवरायांच्या भगव्या झेड्यांची ही पवित्र गुढी आकाशात उभारून नववर्षानिमित्त चांगला संकल्प करू या! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!