Wednesday, September 10, 2008

तर पुढाऱ्यांवर हल्ले करा ...

छत्रपती शिवाजीराजे हे जगातील अलौकिक राजे होते. सरंजामशाहीत परस्त्रीला माता मानणारा आणि परधर्माचे कुराण डोक्याला लावणारा आमचा "श्रीमंत योगी' महान राजा! त्या जाणता राजाशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. छत्रपतींचे भव्यदिव्य स्मारक प्रत्यक्षात अवतरले तर महाराष्ट्राची मान संपूर्ण जगात उंचावेल. मुंबईच्या देखण्या क्वीन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनारपट्टीवर महाराजांचा पुतळा होतो आहे ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांविषयी प्रत्येक मराठी माणसाला नितांत अभिमान आहे. तसाच तो कुमार केतकरांनाही आहे हे त्यांच्या लेखावरुन लक्षात येते. कारण एरव्ही कॉंग्रेस सरकारचे गोडवे गाणाऱ्या केतकरांनी सरकारच्या निर्णयाविरोधात असे लिहिले नसते. पण त्यांनी हा उपरोधिक लेख लिहिला तो तथाकथित राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन टाकण्याकरिता. पुतळ्याचा अनादर व्हावा असे त्यांनी काहीच लिहिलेले नाही. परंतू गुडघ्यात अक्कल असलेल्या आणि प्रसिद्धीसाठी हपापलेल्या राजकारण्यांच्या बगलबच्यांनी कोणताही विचार न करता केतकरांच्या घरावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा निषेधच करावा लागेल. शिवरायांच्या प्रेमापोटी लोकशाही मार्गाने तुम्हाला निषेध नोंदविता आला असता. स्वत:चे लेख पाठवून, संपादकांना पत्र पाठवून, इतर वृत्तपत्रांमधून आपली मते प्रकट करुन केतकरांचा निषेध करणे व त्यांचे मत खोडून काढणे शक्य होते. लोकशाहीचा चौथ स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांचे विचारस्वातंत्र्य अबाधित रहायला हवे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जावी. मुद्‌दयाला मुद्‌दयाऐवजी गुद्‌याने प्रहार करण्याचा अतिशय वाईट पायंडा पडत असून तो रोखायला हवा.
शिवरायांचा इतिहास विसरून चालणार नाही. नव्या पिढीसाठी तोच एक आदर्श आहे जर शिवरायांनाच विसरलो तर नव्या पिढीला आदर्श काय देणार? तळहातावर प्राण ठेवून राजांनी शत्रूशी सामना केला. गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लावण्यास बंदी केली. बलात्कार करणाऱ्याचे हातपाय तोडले. अप्सरेसारख्या परस्त्रीमध्ये त्यांनी माता बघितली. रयतेचा राजा म्हणून नावलौकिक मिळवला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दिव्य स्मारक अथांग सागरात व्हायलाच पाहिजे. या स्मारकासाठी 100 कोटीच नव्हे तर कितीही खर्च झाला तरी हरकत नाही. परंतू या पैशाची तरतूद मात्र सरकारी तिजोरीतून नव्हे तर धनदांडग्यांचे पेठारे फोडून करायला हवी. महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेवर छापा टाकून पैसा लुटला. या सरकारने निदान स्वत:च्या गब्बर झालेल्या मंत्र्यांकडून, शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून, मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांकडून, शासनातील भ्रष्टाचाराने गब्बर झालेल्या अधिकाऱ्यांकडून हा पैसा वसूल करायला हवा. मुंबईत येऊन मराठी माणसाच्या जीवावर उठलेल्या धनिकांचे पेठारे उघडायला लावा, सत्ताधारी, बिल्डर, व्यावसायिक, अंबानी, अमिताभ, शाहरूख सारख्या पैशाने माजलेल्या नट-नट्यांकडून पैसे घ्या. कुणी किती पैसा दिला ते जाहिर करा आणि कोणी मागूनही पैसे देत नसल्यास त्या धेंडाचीही नावे जाहिर करा. मग हिंमत असेल, मी तर म्हणेन "मर्द असाल आणि खरोखरच मनापासून शिवप्रेमी असाल तर निधी नाकारणाऱ्या धेंडांच्या, शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांच्या घरांवर हल्ला करून दाखवा. त्यांच्याकडून स्मारकासाठी निधी मिळवून दाखवा.' पण नाही, तेव्हा मात्र यांचे शिवप्रेम जागृत होत नाही. ज्याला राजकीय वजन नाही, जेथे पहारा नसतो अशा कचेऱ्यांमध्ये व घरांमध्ये जाऊन बुद्धीजीवी वर्गावर हल्ला केला जातो, काळे फासले जाते, प्रसंगी मारहाण केली जाते. ते शक्य नसल्यास मग महिलांना पुढे करुन "बांगड्यांचा आहेर' पाठवला जातो. "शिवाजी महाराजांचे समुद्रात स्मारक उभारता, मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्मारक चैत्यभूमीजवळ समुद्रात उभारा' अशी मागणी रिप.नेते रामदास आठवले यांनी परवा केली आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक बनणार म्हटल्यावर यांच्या पोटात शूळ उभे राहिले. फक्त विरोधासाठी विरोध, किंवा महाराजांचे स्मारक बांधताय मग आमच्या बाबासाहेबांचेही बांधा म्हणणाऱ्या आठवलेंवर तुमच्यात हिंमत असेल हल्ला करुन दाखवा. आहे कां हिम्मत? मला डॉ. बाबासाहेबांबद्दल आदर आहे पण फक्त त्यांच्या नावाने आम्ही राजकारणच करायचे कां? लो. टिळक, आगरकर, महात्मा गांधी आदी स्वातंत्र्य लढ्यासाठी प्राणांची आहुती देणारे आपले कोणीच नाहीत कां? परंतू त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही. पण स्वार्थासाठी त्यांच्या नावांचा वापर करणाऱ्यांना त्यांचे महत्त्व कळणार नाही. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरुद्ध इंटरनेटवरुन अश्लिल मजकूर प्रसृत करणाऱ्या हरयाणामधील गुडगावच्या राहूल कृष्णकुमार वैद्य या 28 वर्षीय आयटी तंत्रज्ञाला पुणे पोलिसांनी अटक केली. कशासाठी? तर म्हणे सोनिया गांधीना खूष करण्यासाठी! परंतू गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदूंच्या दैवतांची विटंबना करणाऱ्या एफ.एम.हुसेन यांच्या विरोधात 1250 हून अधिक तक्रारी नोंदविलेल्या असताना, त्यांच्यावर उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात केसेस दाखल असतानाही तो विक्षिप्त माणूस मात्र आपल्या पोलिसांना सापडत नाही. याच्या उलट दुसरे उदाहरण द्यायचे तर अमेरिकेत स्वातंत्र्यदेवतेचा (लिबर्टी) जो पुतळा आहे तो पुतळा संगित सुरु केल्यावर तालावर नाचायला लागतो, अशी एक फिलिप्स कंपनीची जाहिरात आहे. त्याबद्दल अद्याप कोणीही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. परंतू हिच घटना आपल्याकडे घडलीच, स्वातंत्र्यदेवता किंवा एखाद्या पुतळ्याने नृत्य करताना दाखवले तर आपली नेतेमंडळी आकाश-पाताळ एक करतील. देशभर हिंसाचार माजेल. पुतळ्याची किंवा देवताची विटंबना केली म्हणून कित्येक वेळा राज्यात हिंसाचार, दंगली घडल्या आहेत. त्यामुळे आहे त्या पुतळ्यांना संरक्षण पुरविणे, त्यांची देखभाल करणे गरजेचे आहे. उभ्या महाराष्ट्रात 350हून अधिक किल्ले आहेत. पण हे सारे दुर्लक्षित, उद्‌ध्वस्त आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची डागडुजी कोण करणार?
समुद्रात भव्यदिव्य स्मारक उभारलेच पाहिजे. त्यासाठी धनिकांची तिजोरी खाली करा. आणि त्यासाठी सरकारनेच कठोर पावले उचलायला हवी. स्वयंसेवी, शिवप्रेमी संस्थाही या कार्यात मोठ्या हिरीरीने भाग घेतील. पण हे करीत असताना राज्यातील ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल? अण्णा हजारेंनी "पाणी अडवा व पाणी जिरवा' ही चळवळ सुरु केली. आज पारनेर तालुका आणि राळेगण सिद्धी हिरवेगार झाले आहे. अशाप्रकारे अण्णाहजारेंना 100 कोटी दिले तर ते 100 गावे सुजलाम-सुफलाम्‌ करतील. लहान-मोठे प्रकल्प करता येतील. कोकणात/घाटावर छोटी धरणे बांधता येतील, वीज, रस्ते, पाणी, झाडे लावून जोपासता येतील. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. टेलिफोन, वीजेची बिले न भरल्याने पोलीस ठाण्याचे, सरकारी कार्यालयांचे कनेक्शन कापण्यात येते, दरोडेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांकडे गाडी आहे परंतू पेट्रोलसाठी पैसे नाहीत, महाराष्ट्र सरकारवर 1 लाख 20 हजार कोटींचे कर्ज आहे. शहरात मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. मराठी शाळा दुरुस्तीसाठी पैसा नाही, शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नाही, महागाईचा वणवा पेटलेला आहे, गॅस महागला. पण त्याची चिंता कोणालाच नाही.
मुंबईत अत्याधुनिक आणि डोळे दिपवणारे महाराजांचे स्मारक असायलाच हवे. पण त्याचबरोबर महाराजांच्या या रयतेवर अन्याय, अत्याचार होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायला हवी आणि महाराजांच्या नावाने किंवा त्यांच्या विरोधात मुद्दामहून राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांचे कोतळे फाडण्याचीही तयारी हवी. हिच शिवरायांना खरी श्रद्धांजली ठरेल!

No comments: