Wednesday, September 10, 2008

मराठा समाजाची अवस्था

"मराठा' समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. स्वराज्यात भाषा कोणती असावी यावरील चर्चांना उत आले आहे. पालिकेत मराठी भाषा सक्तीची केली असता विरोधक तुटून पडताहेत. मुंबईत मराठी भाषेत पाट्या लटकवाव्या यावरून राजकारण सुरू आहे तर मुंबईचे मराठीपण पुसले जात असताना या मुंबईच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसने कृपाशंकर सिंग यांची नेमणूक करून हिंदी भाषिकांना डोक्यावर घेऊन नाचताना मराठी भाषिकांना मात्र तोंडघशी पाडल्याचे दिसते. "मराठा' आणि "मराठी' च्या राजकारणात राज्यातील नेतेमंडळींनी योग्य व ठोस भूमिका न घेतल्याने मराठी माणूस मुंबईतून केव्हाच हद्दपार झाला. उरलासुरला मराठी माणूसही संपेल की काय अशी अवस्था संपूर्ण मुंबईत निर्माण झालेली आहे.
ज्ञानेश्वरांनी 700 वर्षोंपूर्वी अमृतातेही पैजा जिंके अशी मराठीची विजय पताका फडकवली. त्यानंतर अनेक परकीय आक्रमणे होवूनही ही भाषा आणि हा समाज टिकला आहे. त्यामुळे तो आणखी हजार वर्षे टिकेल यात शंका नाही. मात्र , मराठी माणूस म्हटला की , फेटे , नऊवारी साड्‌या , तुतारी , लेझीम , तमाशा इतकेच जर कोणी डोळ्यापुढे ठेवले तर हा समाज संपल्यासारखा वाटेल. मराठी माणूसही बदलत्या काळानुसार आपले रूप , पेहराव , भाषा आणि विचार हे सारे काही बदलत आहे. मराठी समाजाला स्वीकारायचे तर या बदलत्या स्वरूपातच स्वीकारायला हवे. म्हणूनच मंगळागौरी सजल्या नाहीत , तमाशाचे फड रंगले नाहीत किंवा पुरण पोळ्या शिजल्या नाहीत. मराठी समाज संपला असे मानण्याचे काहीच कारण नाही. पायाला ठेच लागली तर आई गं असा उच्चार ज्याच्या तोंडून आभावितपणे निघतो असा एक माणूस हयात असेपर्यंत मराठी समाज टिकलेलाच आहे.
मराठी समाज म्हणजे नक्की काय ? महाराष्ठ्रात राहणारा तो मराठी माणूस का ? मराठी बोलणारा तो मराठी माणूस का ? काही वर्षांपूर्वी श्वास चित्रपटाला राष्ठ्रपतींचे सुवर्णकमळ मिळाले आणि एका समाजात आनंदाची लाट उसळली. हा समाज मराठी भाषिकांचा होता. अभिजीत सावंत इंडियन आयडॉलच्या अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा खर्च करून एसएमएसचा धडाका लावणारे आणि तो विजेता ठरल्यावर नोबेल पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करणारे मराठी भाषिकच होते. विंदांना ज्ञानपीठ मिळाला तेव्हा या समाजाला अतीव आनंद झाला. सचिन तेंडुलकरच्या 15 हजार धावा पूर्ण झाल्या तेव्हा हाच मराठी भाषिक आनंदातिशयाने वेडा झाला. प्रतिभा पाटील राष्ठ्रपती झाल्या तो त्यांच्या आनंदाचा परमोच्चबिंदू होता. 21 वर्षांपूर्वी स्मिता पाटीलचं अकाली निधन झालं तेव्हा हा समाज सुन्न झाला. मराठी माणूस समाज म्हणून वावरतो तो केवळ अशा आनंदाच्या आणि दु:खाच्या प्रसंगीच. एरवी हा समाज दुभंगलेला आणि शेकडो तुकडे झालेल्या काचेसारखा असतो. त्याला सांधणं आणि एकोप्याने वागायला लावणं ही गोष्ठ खूप कठीण किंवा अशक्यच. मराठी माणूस समाज म्हणून एकोप्याने राहत नाही , हा आरोप गेली अनेक वर्षं याच समाजातील राजकीय , सांस्कृतिक आणि सामाजिक नेते करत आले आहेत. तरीही हा समाज एक काही होत नाही.
आपापल्या भूमिकांवर ठाम असलेली माणसे एकत्र येऊ शकत नाहीत आणि अनेकदा त्यांच्यात विचारांची आणि त्यामुळे व्यक्तींची दुही आढळते. मराठी समाजात बौद्धिक कुवत अधिक असल्याने जो इतरांशी फटकून वागतो आणि तो ते करताना स्वकियांच्या बाबतीतही फारसा भेदभाव करत नाही. त्यामुळेच अनेकदा असे चित्र दिसते की , नोकरीत वा अन्यत्र अन्य समाजात त्या एका माणसाचा शिरकाव झाला की तो आपल्याच भाऊबंदांना तिथे आणतो. दुर्दैवाने मराठी माणसाच्या बाबतीत असे घडत नाही. अर्थात समाज म्हणून मराठी माणूस एकत्र आल्याचीही उदाहरणे आहेत. गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पक्षांतर्गत मतभेद आणि फुटाफूट यामुळे शिवसेना विकलांग अवस्थेत होती आणि या पक्षाची मुंबईतील सत्ता जाणार हे जणू अटळ होते. पण मुंबई कोणाची , हा सवाल ऐरणीवर आला आणि वातावरण बघता बघता पालटले. मराठी माणसाची एकजूट पुन्हा एकदा दिसून आली. याचे एक कारण आपली एकजूट कॉलनीपासून-ऑफिसपर्यंत आणि रेल्वे प्लॅटफॉर्मपासून-मॉलपर्यंत दाखवून देण्याची मराठी समाजाची मानसिक गरज. चित्रपट , संगीत , नाटक , क्रिकेट या आणि अशा अनेक कलांमध्ये मराठी माणूस पारंगत आहे. त्याचे हे प्रभुत्व वारंवार सिद्ध होत आले. शिवाय सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांच्या क्षेत्रातही मराठी नेत्यांनी देशाला नेतृत्त्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज , पेशवे , स्वातंत्र्य समरातील झाशीची राणी , तात्या टोपे हे योद्धे आणि राज्यकर्त्यांनी इतिहास घडविला शिवाय लोकमान्य टिळकांनी भारतीय असंतोषाचा पाया रचला. त्याच वेळी आगरकर , चिपळूणकर , नामदार गोखले आदिंनी समाजसुधारणाचा नवा मंत्र दिला. महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , धोंडो केशव कर्वे , प्रभुतिंनी समाज प्रबोधनाचा वसा घेतला या आणि अशा अनेक सुपुत्रांनी मराठी समाजाला अभिमानास्पद चेहरा मिळवून दिला. सचिन तेंडुलकर , सुनील गावस्कर , माधुरी दीक्षित , आशुतोष गोवारीकर यांनी आधुनिक महाराष्ठ्राची ओळख घडवली तर दिनेश केसकर यांच्या सारख्यांनी महाराष्ठ्राची ध्वजा सातासमुद्रापार नेली.
आता मराठा समाजाने काय करायला हवे , हे सांगण्याची गरज नाही. कारण या समाजात प्रचंड टॅलेंट आहे पण पुरेशी संधी नाही. लहानशी संधी मिळाली तरी त्याचे सोने करण्याची त्यासाठी अपार कष्ठ करण्याची तयारी आहे. पण मोठी गरज आहे ती मानसिकता बदलण्याची. पुढे गेलेल्यांनी आपण आता मूळ प्रवाहापासून वेगळे झाले आहोत आणि आपल्या भाईबंदांना आहे तिथेच राहू घावे , ही मानसिकता सोडली पाहिजे. तसेच, प्रगती केलेल्या , चांगले उत्पन्न् मिळवणा-या आपल्या भाऊबंदांच्या मागे उभे राहून त्यांच्या प्रगतीला जमेल तेवढा हातभार लावावा आणि अहंगंड सोडून आपली प्रगती करून घ्यावी , ही मानसिकता मागे असणारांनी बाळगणे आवश्यक आहे. खोटी प्रतिष्टा आणि स्वभावातील ताठरपणा सोडून प्रगत लोकांकडे अधिक डोळसपणे पाहिले तर मराठा समाज आहे त्या स्थितीतून लवकर बाहेर पडेल. आपल्या समाजाच्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालून जरा त्यांना सरळ करण्याची गरज आहे , आपण स्वत:च वैफल्यग्रस्त होऊन भरकटत जाण्याची नव्हे , हे आजची पिढी जितके लवकर ओळखेल तितके फायघाचे ठरणार आहे.
भलेही काही मराठा तरूण आयटी ,, सरकारी नोक-यांतील उच्च पदांवर असतील पण त्यांच्यापेक्षा कैकपटीने अधिक तरूण अंधारात चाचपडत आहेत हे नक्की. पश्चिम महाराष्ठ्रातील मराठा तरूण शेती वा अन्य संलंग्न व्यवसायात आहेत. त्यांचे काही भाऊबंद ज्यांची शेतीत मदतीसाठी गरज नाही ते शिकून मुंबई , पुणे येथे नोकरीत आहेत.कोकण आणि मराठवाड्‌यातील बहुतेक मराठा तरूण बीएड, डीएड करून ओपनची जागा निघाली तर शेती विकून वाट्टेल तेवढे पैसे देण्याची तयारी दाखवित आहेत. ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंत गावोगाव शाळा , कॉलेजांमध्ये मराठवाड्‌यातील तरुण आवर्जून आढळतात हे यामुळेच. ज्यांना हेही शक्य नाही आणि घरी परिस्थिती बिकट आहे ते मोठ्‌या शहरांमध्ये बहुसंख्येने हॉटेलमध्ये नोकरी करण्यात मग्न आहेत. शेती सोडावी तर चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही आणि गावात अथवा आजूबाजूला कमी प्रतिष्टा असलेली नोकरी करवत नाही. कारण सामाजिक प्रतिष्टा आड येते , असा विचार असतो. अडचणीच्या प्रसंगी आपल्या समाजाचे मदत करण्यासाठी कोणी वेळेवर पुढे येत नाही पण नाव ठेवण्यासाठी निमंत्रण देण्याची मुळीच गरज नाही , अशी स्थिती आहे. मराठा समाजातील बहुतेक घरी थोड्‌याफार फरकाने हेच वातावरण आहे. ही मराठा समाजाची दुर्दशा आपल्याच नेतेमंडळींनी करुन ठेवली आहे. आजचा तरुण शिकलेला आहे. या तरुण वर्गानेच आता ठाम विचार करून फक्त मराठा-मराठा करण्याऐवजी आपल्या समाजाचा पर्यायाने स्वत:चा आणि नंतर गावाचा, शहराचा विकास कसा होईल त्यासाठी कोणाला डोक्यावर उचलून धरायचे हे ठरवावे, अन्यथा समाजाची अधोगती होतच राहिल.

No comments: