Friday, June 25, 2010

जाहिरातीच्या युद्धात सर्वसामान्य बेजार!

निवडणुकीत उभा राहिलेला उमेदवार असो कि एखादी नवीन उत्पादक कंपनी असो, ते स्वत:ची प्रसिद्धी इतकी तिखटमीठ लावून करतात की सर्वसामान्य माणूस नेमके काय करावे या विवंचनेत पडतो. निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराची जाहिरातबाजी फळाला येवून तो आमदार वा खासदार बनतो. पेट्या-खोके देऊन मंत्री बनतो. अशा या जाहिरात युगाला आपण काय म्हणावे? प्रसिद्धी दिल्याशिवाय आता कुठलाच उद्योगधंदा तग धरू शकणार नाही असे म्हणायचे का? कोणत्याही शहरात किंवा रस्त्यावरून फेरफटका मारला तरी विविध प्रकारच्या जाहिराती, राजकारण्यांचे मोठ मोठाले बॅनर, विविध कंपन्यांच्या उत्तान व श्रृंगारीक होर्डींग्ज नजरेस पडतात. कितीही नाही म्हटले तरी आपली नजर त्या जाहिरातींवर खिळून राहतेच. उत्पादनाशी काडीचाही संबंध नसलेल्या उत्तान आणि अश्लिल मॉडेल वापरून जाहिरातीचे मोठे होर्डिंग कशासाठी लावतात? मागे काही संस्कृती रक्षकांनी असल्या उत्तान आणि अश्लिल जाहिराती काढून टाका म्हणून मागणी केली होती. परंतु सरकार दरबारी जाहिरात कंपनीवाल्यांचे वजन असल्याने त्यांचे कोणीही काहीही वाकडे करू शकले नाही. आज अशा जाहिराती सर्वत्र दिमाखात दर्शन देत उभ्या आहेत.

आजचे एकविसावे शतक जाहिरातबाजीचे आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. जिथे पहावे तिथे उत्पादनांच्या जाहिरातीच दिसतात. मोठ-मोठ्या इमारती कार्यालयांच्या भिंती आणि रस्ते भडक रंगात रंगविलेले दिसतात. दूरचित्रवाहिन्यांवरूनही जाहिरातींचा प्रचंड मारा विविध कंपन्यांकडून सातत्याने सुरू असल्याने ग्राहक राजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. आपल्या मालाला उघड प्रसिध्दी दिल्याने ग्राहक आकर्षित होऊन आपल्या उत्पादनाचा खप वाढेल आणि प्रचंड फायदा होईल असे कंपन्यांचे समीकरण असते. अनेकदा एखाद्या उत्पादनाची किंवा चित्रपटाची अफाट जाहिरात केली जाते. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांचा मोठा अपेक्षाभंग होतो. एखाद्या पदार्थाची हॉटेलवाले खमंग जाहिरात करतात. प्रत्यक्षात मात्र हॉटेलात जावून ते पदार्थ खाल्याशिवाय कळत नाही. परंतु या हॉटेलात गेल्याने हॉटेलवाल्यांचा मात्र फायदाच होतो. सर्वत्र जाहिरातींचाच जमाना असल्याने कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ग्राहकांना लुबाडण्याचे सारे प्रयत्न उत्पादक करीत असतात. जाहिरातीच्या या प्रचंड स्पर्धेमुळे वृत्तवाहिन्यांना त्याचा आयताच लाभ होतो. आज टिव्ही माध्यमाच्या विविध वाहिन्यांवरून निरनिराळ्या उत्पादनाच्या जाहिराती पाहून ग्राहकांनी काय घ्यावे काय नाही असा प्रश्न पडतो. सौंदर्यप्रसाधने, साबण, वॉशिंग पावडर, टुथपेस्ट आणि कफ सिरप सारख्या औषध कंपन्यांनी जाहिरातींद्वारे ग्राहकांना आकर्षित केले आहे. बॅंका, सिमेंट कंपन्या, आयुर्विमा आणि चित्रपट या सर्वच क्षेत्रांनी आज विविध वाहिन्यांवरून आपल्या खपासाठी, प्रसिध्दीसाठी नुसता धडाका लावला आहे. आताचे जाहिरातीचे युग आहे हे ठिक आहे परंतु या जाहिरातींना सुध्दा काही नियम, कायदेकानुन आहेत की नाहीत? ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी किती खोटे बोलायचे, किती प्रकारची आमिषे त्याला दाखवायची? याचा तरी विचार करायला हवा. याच्यावर कोणीतरी अंकुश ठेवायलाच हवा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रचंड अशी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. थांबला तो संपला असे म्हणत बाजारपेठेत नव्या फॅशनच्या व नवनविन मॉडेलच्या वस्तू उत्पादने येत आहेत. ज्यांच्या हाती पैसा आणि संपत्ती आहे त्यांना वस्तू खरेदी करणे म्हणजे काहीच वाटत नाही. नव श्रीमंतांची, धनदांडग्यांची ही खरेदी सर्वसामान्यांना परवडणारी नाही. बेसुमार वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे. कंपन्या जाहिरातीच्या या भडक व रंगीबेरंगी जाहिराती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात आणि हे पैसे ते ग्राहकांकडूनच वसूल करतात. म्हणूनच या कंपन्यांनी जाहिरात करून कितीही आपले उत्पादन चांगले असल्याचा आव आणला तरी सर्वसामान्यांना मात्र आपले मेटाकुटीचे जीवन जगताना नाकिनऊ आले आहे. कारण जाहिरातीचा खर्च भरून काढण्यासाठी उत्पादनाची किंमत वाढविल्याने जाहिरातीच्या युद्धात सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे.

प्रेम भावनांचा खेळ!

प्रेम तसा भावनांचा खेळ! या खेळात प्रत्येकजण सहभागी होतो. आणि खेळ म्हटलं की हार-जीत आलीच. ती स्वीकारण्याची तयारी मात्र हवी. प्रेमाच्या या संवेदनशील भूमिकेत तुमचा अभिनय हा वाखणण्याजोगा असावा. प्रेम या शब्दाला लाजवेल अशी भूमिका तुमच्याकडून पार पाडली जावू नये. अर्थात हार पत्करण्याची वेळ आली तरी तुम्ही त्या जिंकणाऱ्याच्या वाट्यात तितकेच सहभागी असता. परंतु अशी हार पत्करण्याची त्यागी भावना प्रत्येकातचं असते असं नाही. मानवी जीवनात जन्मापासून तर अन्तापर्यंत एक निर्भेळ भावना जीवंत असते, ती म्हणजे कुणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं, आपलं दु:ख, यातना, वेदना आपण ज्याच्यासमोर मनमोकळेपणाने सांगू शकू अशी एकतरी व्यकनती आपल्याजवळ असावी. ही आंतरिक भावना प्रत्येकाच्या मनात सदैव असते. आपणही कुणावर तर प्रेम करावं ही भावना सुध्दा त्याचवेळी जन्म घेत असते. मग प्रत्येकाच्या जीवनात ही सुगंधी प्रेमाची दरवळ निर्माण होतेच, असं नसते. परंतु प्रत्येक जीव या आशेसह जीवन जगत असतो. हे मात्र खरे.
अशा असंख्य अशा, आकांक्षांसह चालताना त्या आशेची पूर्तता होईल याचाही भरवशा नसतो. कारण मानवी जीवनात नियतीनं ठरवून दिलेलनया रस्त्यावरून जाताना प्रत्येकाला एकदा तरी ठेच लागलेली असतेच. म्हणूनच नियतीचं जे घडवलंय त्याचा स्वीकार करून जीवन जगण्याचंा प्रयत्न करावा.
खरं तर प्रेमाची व्यात्पी ही फक्त प्रियकर व प्रेयसी या दोघांपुरतीच मर्यादीत नसून ती एक वैश्विक संकल्पना आहे. पण आम्ही आई-वडिल, भाऊ, बहिण, या नात्यांपेक्षा या नात्याला अधिक जवळ केलंय. वीस वर्ष आईच्या कुशीत विसावणाऱ्या या पाखराला उडण्याचं सामर्थ्य निर्माण झाल्यावर ते कधी भरकटत ते त्यालाही त्याचं कळत नसावं. ते वयंच तसं नसतं तर मनानं घेतलेली भरारी असते ती. हे नातं खुप सुंदर असतं. पण ते सुंदररितीने जगताही यायला हवं. कारण या वयात भरकटत जाणारी विचलीत मनांची अवस्था जिणं मुश्किल करते. प्रेमात तुम्ही नेहमीच विजयी व्हालच असं नाही. तुम्हाला हारही पत्करावी लागेल. कारण जीवनाच्या या खडतर प्रवासात तुमच अवस्था समुद्रप्रवासात असणाऱ्या दिशाहीन जहाजासारखी असते. हे जहाजाला दीशा देण्याचं महत्वाचं काम तुम्हाला पार पाडायचं असतं. अन्यथा दिशाहीन होण्याची भिती अधिक असेल. प्रेम करणं हे पाप नाही. पण यात जबरदस्ती, आसक्ती असू नये. हे दोन मनाचं मिलन आहे. अशा या प्रेमाची पवित्रता प्रत्येकाने जपावी.नाहीतर जीवन हे जगणं खरच मुश्किल होवून जाईल. आज प्रत्येकाचे जीवन जगण्याचे संदर्भ बदलले असले तरी प्रेमाचं पावित्र्य जिथं जोपासल जातं तिथं जीवन हे सुखानं जगणं अगदी सोपं होवून जातं.

Wednesday, June 23, 2010

ग्लॅमरचं भूत ऊतरणार कसे?

मुलींनी घट्ट व तोकडे कपडे घालू नये, अशी मागणी एकीकडे होत असते तर त्याचवेळी अनेक पालक स्वत:च मुलीला जीन्स, आखूड टॉप वगैरे कपडे पुरवून तिला ‘स्मार्टङ्क लुक देत असतात. एकीकडे मुलींसाठी ड्रेस कोड हवा, अशी मागणी काही संस्था - पक्ष करत असतात आणि दुसरीकडे शाळकरी मुलीही रेकॉर्ड डान्सच्या नावाखाली तंग कपडे घालून अचकट विचकट हावभावाची नृत्ये करतात. एकीकडे तरुणींनी आरोग्य जपायलाच हवे, असा विचार मांडला जात असतो आणि त्याचवेळी नवतरुणी ‘वाईन आणि बीअरङ्क च्या बाटल्या रीचवित असतात, रात्री-अपरात्री फिरत असतात, नको त्या अवस्थेत धिंगाणा घालतात, असा विरोधाभास का? तरुणींनी सर्व नीतिसंकेत उधळून लावले तरी समजू शकते; पण पालकही त्याला मूक संमती का देत आहेत? आजच्या तरुणींची फॅशन ही पुरुषी कामवासना उत्तेजित करण्यासाठी पूरक आहे, हे पालकांनाही समजत असते. तरीही ते स्वत:च्या मुलीकडे कानाडोळा का करतात? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे... आणि ते म्हणजे आजच्या तरुणींप्रमाणेच पालकांनाही ग्लॅमरसचं वेड लागलेलं आहे.

आजच्या तीव्र स्पर्धेच्या जगात आपल्या मुलीने टिकून रहायचे असेल तर ती ग्लॅमरस, मॉड दिसायला हवी असं पालकच म्हणायला लागले आहेत. या पालकांच्या डोळ्यात अजंन घालतील अशा काही घटना घडल्या आहेत. तरीही सर्वजण या मोहजालात फसतात. प्रीती जैन या नवोदित मॉडेलने ग्लॅमरच्या नादात शरीराचा सौदा कसा करावा लागतो हे जाहीर केले. नफिसा जोसेफ या भारतसुंदरी किताब मिळविलेल्या मॉडेलनी ग्लॅमर दुनियेत वैफल्य आल्याने आत्महत्या केलीे. या सगळ्या घटना घडत असताना त्याचवेळीस अमिषा पटेलने वडिलांवर फिर्याद दाखल केली! तरी बरं तिच्या वडिलांनीच पैसे खर्च करुन तिचं करियर घडवलं होतं. त्यानंतरही अनेकदा ग्लॅमरच्या नादापायी अनेक मुलींना फसवण्यात आले. तरीही आमचे डोळे उघडत नाही याला काय म्हणावे? गल्लीबोळात चालणारे सिनेसंगीतांवर आधारलेल्या नाचांचे क्लास काय सांगतात? आपली मुलगी जे करु पाहते ते अनैतिक आहे असं जर वडिलांना वाटत असेल आणि आईला वाटत नसेल व दोन्ही बाजू परस्परांना आपलं म्हणणं पटवून देऊ शकत नसतील तर अशा शोकांतिका होत राहतील; पण त्याबद्दल जर समुपदेशकाचा आधार घेतला असता तर मुलींनी त्याचे गांभीर्य कळून तिचे मत बदलले असते, सावधपणे काम करायचं आश्वासन दिले असते. या पलीकडे त्या मुलीने ते करायचं ठरविलं तर जीव घेऊन आणि देऊन काही साध्य करता येईल का?
पालकांची यात कोंडी नक्कीच होते. त्यावर जुने आणि नवे यातील बंधनं असतात. प्रतिष्ठेचा काच असतो. त्यातून बाहेर पडणे शक्य नसते. अजून मुलांच्या वागण्याच्या परिणामाचे खापर पालकांच्या माथी मारलेच जाते. मध्यमवर्गीय पालक तसा फारसा खंबीर नसतो. त्याला त्याच समाजात रहायचे असते. एका विशिष्ट स्तरावरचा समाज बदललेला असला तरी कुटुंबीयांचे शेरे, टीका सहन कराव्या लागतील. याची खरी वा काल्पनिक दहशत मनावर असते. एका मॉडेल आणि नवोदित अभिनेत्रीनं आपल्यावर बलात्कार झाला आणि पिळवणूक झाल्याचा आरोप केला. या क्षेत्रात गेलेल्या मुलींना अनेकदा अशा बाबींना तोंड द्यावे लागते. हे इतर ऑफिसेसमध्ये होत असते, असे म्हणून त्याकडे कानाडोळा करण्यागत नसते. इथं मुली असुरक्षित असतात नोकरीप्रमाणे त्यांच्याभोवती संस्थेचे सुरक्षाकवचही नसते, कामाची खात्री नसते. पैसा, प्रसिद्धी इत्यादी सर्वच बाबतीत त्या इतरांवर अवलंबून असतात. हे असंच असते आणि ते मान्य करुन चालावे असे म्हणणारेही आहेत. हे प्रकार होण्याजोगे वातावरण आणि मोकळेपणा तिथे असतो जो इतरत्र असतोच असे नाही. अनेकदा मुलींनाही त्याचा मोह पडतो. पुढे जाण्याचा सोपा मार्ग वाटतो; पण तो तसा असेलच याची हमी नसते. मग प्रेमभंग, वचनभंग असले प्रकार होतात आणि भावनेच्या भरात मुली यातून सुटका म्हणजे मृत्यू जवळ करतात. त्यांचे मानसिक स्वास्थ्य नीट रहावे, यासाठी व्यावसायिक पातळीवर काहीही उपलब्ध नसते. अनेकदा इथे जंगलराज असते. ‘बळी तो कानपिळीङ्क या बाबी भावनेच्या भरात होतात. त्यामुळे त्यांना योग्य क्षणी आधार मिळाला तर ती मंडळी सावरु शकतात असे मानसतज्ज्ञ म्हणतात. ग्लॅमरचं अवास्तव वेड आज सर्वत्र आजाराप्रमाणे पसरत आहे. जगण्याची qझग त्यातूनच मिळेल, या भाबड्या कल्पनेने तरुण त्यांच्याकडे ओढले जातात आणि हळवे जीव अपयशाला घाबरुन, निराश होऊन, अकाली जीवन संपवतात, कुटुंबातील प्रेम आधार हा अटींवर नसेल तर काही जीव सावरतील, तरुणाईचा जोष आणि पालकांची द्विधा मन:स्थितीतील कुतरओढ यातून हे भीषण अपराध होताना दिसताहेत.
अगदी स्पष्ट बोलायचे झाले तर अशा घटनांंसाठी पालक स्वत: पहिले जबाबदार आहेत. विशेषत: मध्यमवर्गीय पालकांची जी सध्याची मानसिक अवस्था आहे. ती सर्व पालकही त्याला पूरक ठरतात. पालकांचे वय, अनुभव, समाज निरीक्षण, क्षमता व भलेबुरे ठरविण्याची दृष्टी या गोष्टी जमेस धरल्या तर त्यांनी ग्लॅमरस रुपाचा विराध करायला हवा; पण हल्ली मध्यमवर्गीय पालकांना उच्च वर्गीय, श्रीमंताचे आकर्षण वाटते. उच्च वर्गीयांप्रमाणेच आपणही युरोपीय संस्कृती स्वीकारावी, असे सुप्त आकर्षण त्यांच्या मनात असते.
गाड्या, मोबाईल, इंटरनेट, परदेश प्रवास, अशा सुखसंपन्नतेने जीवनात qझग चढावी असे वाटत असते. सर्व श्रीमंती तर प्रत्यक्षात उतरविता येत नाही; पण निदान मुलींनी मॉड व्हावं, इग्लिश भाषेसह आधुनिक जीवनशैली स्वीकारावी, याला ते होकार देतात. घरातल्या मुलानं व मुलीनं नेटवर तासंतास चॅqटग केले qकवा मुलीने फिगर मेंटेन केली तर ती स्मार्ट झाली आहे असा ते अर्थ लावतात. हा फार मोठा सामाजिक घात आहे. समाजावर अंकुश ठेवणारा मध्यवर्गीय असा बेताल बनतोय. जोवर मध्यमवर्गीय पालक नवतरुण वर्गावर नियंत्रण ठेवत नाही तोवर प्रीती जैन qकवा नफिसासारखी प्रकरणे पाहात रहावी लागतील. पूर्वी अशी प्रकरणे युरोपादी देशात व्हायची, त्यातून होणाèया हत्याआत्महत्या, त्यातले छुपे संबंध यालाही ग्लॅमर प्राप्त व्हायचे आता तसला प्रकार आपल्या मध्यमवर्गात व्हायला लागला आहे. ग्लॅमरचे भूत आमच्याही मानगुटीवर बसलंय हे ग्लॅमरचं भूत उतरणार कसे?

अपयशातून मिळणारं यश अधिक समाधानकारक

अपयश ही यशाची पहिली पायरी होय. अपयश म्हणजे आपल्यातील उणिवा ओळखण्यासाठी आलेली संधी; त्याचप्रमाणे आपल्या चुका सुधारण्याची संधी असते. परीक्षेत अपयश आल्याने अथवा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने अनेक विद्याथ्र्यांमध्ये नैराश्य निर्माण होते. काहीवेळा या नैराश्येच्या पोटी विद्यार्थी आत्तहत्याही करतात. आजकाल अशा प्रकारच्या घटना होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामागची कारणे आणि उपाय या संबंधी विचार होणे आवश्यक आहे.
अपयश आल्यानंतर सारं काही व्यर्थच आहे असा नकारात्मक विचार नैराश्यमागील प्रमुख कारण असलं तरी अशा नकारात्मक विचार वाढीस अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आज आपल्याकडे परीक्षांना अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. यामागे पालकांची मानसिकता महत्वाची असते. कारण यांच्या मत आपल्या मुलाने केवळ परीक्षा निव्वळ पास होणे एवढेच यांच्यासाठी महत्वाचे नसते तर त्याने अधिकाधिक गुण मिळवणं महत्वाचं असतं. त्यांनी ही मानसिकता जपणं गैर नाही. कारण आज उत्तम गुण म्हणजे उत्तम नोकरी, व्यवसाय, मग पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा असे एक समीकरणच तयार झाले आहे. त्यातच पाल्याच्या क्षमतेचा, कुवतीच्या विचार मात्र पालकांकडून केला जात नाही. उलट अनेक खासगी क्लासेस, टेस्ट सिरीज, पुस्तके यांचा भडीमार केला जातो. त्यामुळे त्याची होणारी शारीरिक मानसिक ओढाताण याकडे फारसे लक्ष न देता परीक्षेत उत्तम गुण मिळविणे आवश्यक आहे हेच त्यांच्या मनावर बिंबवले जाते.
पालक नेहमीच आपल्या पाल्याला हे वर्ष तुझ्यासाठी किती महत्वाचे आहे हे कायम मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात पालक आपली समाजात प्रतिष्ठा जपण्यासाठी हे सारं करत असले तरी शेवटी पाल्याचं यश हे त्याच्या सुखी आयुष्याची तिजोरी असते. ती भरण्याचाच पालकांकडून प्रयत्न होत असतो. पण ती भरताना आपण कोणता मार्ग अवलंबतोय याचाही विचार करणं गरजेचं आहे. बèयाचवेळा मार्ग चुकतात आणि मग यशाऐवजी अपयश पदरात पडतं. हे अपयश पचवणं पालकांना सहज शक्य नसतं आणि मग मुलांमध्ये नैराश्य येतं. यासाठी सामाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कारण पाल्यास पालकांची, समाजाची भिती असते. ही भिती काढून पालक व पाल्य यांच्यातील संबंध अधिक मोकळे होणे, गरजेचे आहे.
शैक्षणिक यश अपयश आणि जीवनातील यश अपयश यामध्ये फरक आहे. तुमचे अपयशच तुम्हाला यशाचा मार्ग दाखवेल. कारण अपयश म्हणजे आपल्यातील कमतरता ओळखण्यासाठी आलेली संधी. अपयशातून मिळालेल्या यशानं ज्यांच्या पायाजवळ लोळण घेतलंय अशा अनेक व्यक्ती आपल्याकडे होवून गेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करणारे एडमंड हिलरी. परंतु या शिखरावर चढताना अनेकवेळा अपयश आलेल्या एडमंड हिलरी यांनी हिमालयाच्या शिखराला उद्देशून म्हटले होते, तू माझा पराभव केलास, मी पुन्हा येईन व तुझ्यावर विजय मिळवेने. आणि अपयशातून मिळालेले हे यश अधिक समाधानकारक होते.

Tuesday, June 22, 2010

आजची आधुनिकता आणि ग्लॅमर

सध्या सगळीकडे आधुनिक बनण्याची लाट आली आहे. उद्योग व्यवसायापासून ते बालवाडीपर्यंत, पाककलेपासून ते वास्तुनिर्मितीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता शिरली आह े. आधुनिकता नेहमीच स्वीकारार्ह असते, असायला हवी. पण जुनं सोडून नव्याचा अवलंब करणे योग्य नाही. नव्याचा स्विकार करणे गैर नाही. पण त्याचं अंधानुकर होतंय. त्यामुळे त्याचे परिणामही भोगावे लागत आहेत. कारण आधुनिकतेच्या ध्यासापायी आपण काय करतो आहोत याचं भान या तरूणांना राहिलेलंच नाही. भारतीय परंपरा, संस्कृती विचारमूल्ये यां सगळ्यापासून आजचा समाज दुरावतोय. अर्थात या आधुनिकतेचे आघात आपल्या परंपरेवर, संस्कृतीवर होताना दिसत आहेत.
ही आधुनिकता कितपत योग्य की अयोग्य हे ठरवायचं नाही. आज संपूर्ण जग ग्लमरस स्वीकारतेय. आणि म्हणून आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्यामुलीने टिकून राहायचे असेल तर ती ग्लॅमरस दिसायला हवी असं पालकांचेच एक मत तयार झालंय. पण ग्लॅमरसच्या दुनियेत नुसताच वरवरचा झगमगाट आहे आत सगळाच अंधार. याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. प्रीती जैन या मॉडेलनने ग्लॅमरच्या नादात शरीराचा सौदा कसा करावा लागतो हे जाहीर केले. नफिसा जोसेच या भारतसुंदरी किताब मिळविलेल्या मॉडेलनी ग्लॅमर दुनियेत वैफल्य आल्याने आत्महत्या केल्याचेही उघडकीस आले आहे. या उदाहरणांनी तुम्ही आजचं ग्लॅमर कितपत स्वीकारायचं याचा विचार करायला हवा. अर्थात आजकाल लहान मुले-मुलीही ज्या प्रकारच्या गाण्यांवर अचकट विचकट अंगविक्षेप करत नाचत असतात आणि त्यांच्या वयाला न शोभणाऱ्या भावनांचा अविष्कार करत असतात. नको त्या भावना दर्शविताना ते सारे विकृत वाटते. बुगी वूगी या कार्यक्रमाचा होस्ट बेहेल याच्याकडूनही अनेकदा लहान मुलांनी वयाला शोभेल असेच नृत्य करावे अशा अनेकदा सुचना दिल्या आहेत. पण तरीही चार वर्षाची मुलगी दिल धक धक करने लगा या गाण्यावरच नृत्य करताना दिसते. अर्थात याचा दोष आजच्या पालकांनाच द्यावा लागेल. अर्थात पालकांच्या उत्तेजनाने ही मुलं वागतात यात वादच नाही. आईवडिलांनी मुलांच्या कलेला जाणायला हवंय. पण ते मर्यादा पाळून. पण बऱ्याचदा आपली मुलगी जे करू पाहते ते अनैतिक आहे असं जर वडिलांना वाटत असेल आणि आईला वाटत नसेल तर , एका विशिष्ट स्तरावरचा समाज बदललेला असला तरी कुटुंबीयांचे शेरे, टीका सहन करावे लागतात.