Monday, January 10, 2011

काँग्रेसचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे अक्षरश: वाटोळे !

केद्र व राज्य सरकारातील मंत्री-मुख्यमंत्र्यांचे घोटाळे उघडयावर आल्याने दिल्लीत झालेले काँग्रेसचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे अक्षरश: 'वाटोळे' झाले. 125 वर्षांपूर्वी सर ह्यूम यांनी स्थापन केलेला राष्ट्रीय काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष. या पक्षाला नामदार गोखले यांनी भारतीयांना आपला वाटेल असा केला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक काँग्रेसचे अध्यक्ष असताना पाकिस्तानचे निर्माते बॅरिस्टर महंमद अली जिना त्यांचे सेव्रेच्टरी होते. पुढे महात्मा गांधी यांनी काँग्रेसचा स्वातंत्र्य लढयात पुरेपूर वापर करून लोकशाहीचे स्वप्न साकार केले. मात्र त्यानंतरच्या गेल्या 60 वर्षातील काँग्रेसचा सत्ता व्यवहार मात्र भ्रष्टाचाराने पूरता बरबटला आहे. देशातला कुठलाच राजकीय पक्ष याला अपवाद नाही. पण या सर्व व्यवहाराला मूळात काँग्रेसच जबाबदार आहे. ज्या सामाजिक, राजकीय तत्त्वांना डोळयासमोर ठेवून 125 वर्षापूर्वी काँग्रेसची स्थापना केली त्या काँग्रेसमध्ये आता काहीच 'राम' ऊरलेले नाही. त्यामुळे त्या झालेल्या महाधिवेशनाच्या काळात भ्रष्टाचाराचा कळस गाठलेल्या काँग्रेस नेत्यांना तोंड लपवून फिरावे लागत होते. गेल्या 4-5 महिन्यांपासून काँग्रेस कोणत्यानाकोणत्या कारणाने वादग्रस्त ठरते आहे. झेंडा मार्च च्या निमित्ताने नागपूरात 2 महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पैशाचे प्रदर्शन केले. हायकमांडपर्यंत कसे आणि किती पैसा पुरवावा लागतो त्याचे वृत्तवाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण घडवले. त्यातच दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्स, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि आदर्श घोटाळयातून काँग्रेस नेत्यांचे बिंग फुटले. म्हणूनच संपूर्ण महाअधिवेशनाच्या काळात सोनिया, राहुल आणि पंतप्रधान मनमोहन सिंह हेच काय ते बोलताना दिसले. अशातच विकिलिक्सने एकेका प्रकरणाचा गौप्यस्फोट केला. विकिलिक्स मधून जाहिर होत असलेल्या माहितीची सत्यता कोणीही पडताळून न पाहता जो-तो आपापल्या परीने 'अकलेचे तारे' तोडताना दिसले. विकिलिक्सने अमेरिकन राजदूत रोमर यांची साक्ष काढत काँग्रेसचे महासचिव राहुल गांधीनी 'भारतासाठी लश्कर-ए-तैयबापेक्षा हिंदू दहशतवाद भयंकर आणि अधिक धोक्याचा आहे', असे म्हटल्याचे जाहीर केले. या 'हिंदू दहशतवादा' च्या मुद्यावर भाजप-शिवसेना नेत्यांनी थयथयाट केला. नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांच्यासह शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही राहुल विरोधात चांगलेच तोंडसुख घेतले. राहुलला बालिश ठरवले. परंतू काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी देशाच्या राजकारणात ते राजकारणी म्हणून अननुभवी असले आणि त्यांच्या मर्यादाही अनेक असल्या, तरी सध्याच्या बुजुर्गांच्या काँग्रेसमध्ये त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळामधील ज्येष्ठ नेत्यांमध्येही सहानुभूती आहे. स्वत:ला कायम चर्चेत ठेवण्यासाठी जी चतुराई लागते, ती राहुल यांच्यापाशी निश्चित आहे आणि वेळोवेळी त्यांची ती स्टंटबाजी सुरू असते. मुंबईच्या उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करून शिवसेनेला वाकुल्या दाखवण्यापासून दलिताच्या घरामध्ये जेवण घेण्यापर्यंत, रोजंदारीवरील मजुरांसमवेत डोक्यावर भार वाहण्यापासून कलावतीचे दु:ख नाट्यमय शैलीत संसदेत मांडण्यापर्यंत राहुल बऱ्याच गोष्टी सतत करीत असतात आणि चर्चेत राहात असतात. मुळात हिंदू दहशतवाद ही सीमेपलीकडून खतपाणी मिळालेल्या आणि आपला देश पोखरून राहिलेल्या दहशतवादाची चुकीच्या मार्गाने उमटलेली प्रतिक्रिया आहे. दहशतवादास आटोक्यात आणण्यात काँग्रेसच्याच सरकारला आजवर आलेले अपयश हेच त्याचे मुख्य कारण आहे. या देशात प्रतिक्रियात्मक दहशतवाद मुळामध्ये का रुजला, त्याला कोण जबाबदार आहे या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. पण गेल्या 20-25 वर्षातील दहशतवाद पाहिला असता राहुल नेमके काय बोलला, त्याचे प्रत्यय येते. 1980 ते 86 दरम्यान, पंजाबात खलिस्तानवाद्यांनी दहशतवाद माजवला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. ही हत्या करणारे शिख पंथीय होते. गेली 30 वर्षे आसाम उल्फाच्या हिंसाचाराने धुमसत आहे.भारतातल्या 230 जिल्ह्यांत हिंसाचार, घातपात, अपहरण घडवून आणणारे नक्षलवादी आणि त्यांचे नेतेही हिंदूच आहेत. राजीव गांधी यांची हत्या करणारे तमिळवादी हे देखील हिंदूच होते. मालेगांव, अजमेर, ठाणे येथील बॉम्बस्फोटाशी संबंधित अटक केलेले संशयित आरोपी असीमानंद, साध्वी प्रज्ञादेवी, कर्नल पुरोहित, सनातन संस्थेचे साधक आदि सर्वजण हिंदूच आहेत, मग राहूल गांधीनीं जरी असे म्हटले असेल तरी त्यात गैर काय? पण राहुलच्या 'या' व्यक्तव्यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याने सफाई दिली नाही. कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श प्रकरण, 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा, जमिनी घोटाळे, इंधन दरवाढ आणि अवेळी झालेल्या पावसामुळे गगनाला भिडलेली महागाई, या नानातऱ्हेच्या समस्या आणि विविध घोटाळयात अडकलेल्या काँग्रेसी नेत्यांची आणि काँग्रेस पक्षाची पुरती बदनामी झाली आहे. अशातच विकिलिक्स आणि नीरा राडिया यांनी त्यामध्ये चांगलीच भर घातली. बिहार-उत्तर प्रदेशात काँग्रेस कधी नाही तेवढी अडचणीत सापडली. भ्रष्टाचारात सापडलेले मंत्री,मुख्यमंत्री यांना फक्त पदावरून दूर सारण्याशिवाय काँग्रेसने काहीच ठोस पावले उचलली नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळे सत्याचे प्रयोग करणाऱ्या महात्मा गांधी यांची काँग्रेस आता शिल्लक राहिलेली नाही. काँग्रेसच्या कार्यालयांमधून गांधीजींचा फोटो भिंतीवर टांगलेला दिसतो, त्यांची तत्त्वं मात्र कोणीही पाळताना दिसत नाही. त्यामुळे आपल्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळण्यातच महाअधिवेशनाचा वेळ निघून गेला. कुठलेही आत्मचिंतन नाही, की विचारमंथन नाही, महाघोटाळेबाज काँग्रेसचे शतकोत्तर रौप्यमहोत्सव घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई आणि बदनामीमुळे अक्षरश: फ्लॉप ठरले. याचा परिणाम पुढील निवडणूकीत काँग्रेसला भोगावा लागेल!

No comments: