Monday, January 17, 2011

कोंडदेवांचा पुतळा आणि जेम्स लेनवर आगपाखड करण्यात काय अर्थ आहे?

शिवरायांचा खरा इतिहास लोकांना सांगण्याचे प्रयत्न काही लोकांकडून केले जात आहेत, परंतु बरेचदा त्यातील अतिरंजीतपणामुळे सर्व सामान्यांच्या पचनी तो पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत योग्य त्या पुराव्यासह, समस्त इतिहास संशोधकांच्या मान्यतेसह शिवरायांचा वस्तुनिष्ठ इतिहास लोकांसमोर आणण्याचे काम व्हायला हवे.

पुण्याच्या लाल महालातील कोंडदेव यांचा पुतळा हटवून त्या ठिकाणी राजे शहाजी यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे.

शहाजीराजे यांच्या पुतळयाचे आम्ही स्वागत करतो, परंतु शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्यामागे जे कुटील राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राची शान शरमेने खाली घालायला लावणारे आहे. संभाजी ब्रिगेड, काँग्रेस-राष्ष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपा आदी राजकीय संघटनांची भूमिका कोणतीही असो, परंतू या निमित्ताने पून्हा एकदा शिवाजी महाराजांच्या कपाळालाच नव्हे तर संपूर्ण मराठी माणसाच्या श्रध्देला कलंक लागला आहे. शिवरायांच्या जन्मतिथीचा घोळ अद्यापही सुरूच आहे.

इंग्रज काळात स्वातंत्र्य लढयासाठी, जनजागृतीसाठी त्यावेळी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक 'शिवजयंती' हा उत्सव सुरू केला. मात्र आज कागदोपत्री पुरावे सापडल्यानंतरही महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या दोन-दोन जयंत्या साज-या होतात. हे मराठी माणसांच्या करंटेपणाचे लक्षण नाही का? दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी यांच्यावरून नेहमी काही ना काही वाद उकरून काढण्यात येतो. मागे जेम्स लेनच्या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला. या वादाला नक्की कारणीभूत कोण? याचा शोध सर्वप्रथम लावला पाहिजे. जेम्स लेनने भारतात, महाराष्ट्रात येऊन शिवरायांबद्दलची माहिती घेतली. त्याला ही माहिती कोणी दिली? शिवरायांचा चुकीचा इतिहास सर्वप्रथम कोणी लिहिला? खरा इतिहास का लिहिला गेला नाही? शिवचरित्राचे खरे शत्रू कोण? याचा शोध कोणालाही घेता आला नाही, हे आमचे दुर्दैवं म्हणायचे, दुसरे काय? पण नुसते संताप व्यक्त करून उपयोगाचे नाही. शिवरायांची बदनामी करणारे लेखन करणारी ही 'अवलाद' कोणाची? त्यांचे 'बाप' कोण? त्यांनी हे धाडस केलेच कसे? याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. आज जर शिवराय हयात असते तर स्वत:च्या स्वार्थासाठी, प्रसिध्दीसाठी शिवरायांच्या नावे कुटील राजकारण करणा-यांचा त्यांनी कडेलोटच केला असता, पण महाराष्ट्राचे दुर्दैव असे की या महाराष्ट्रातील लोकच वारंवार शिवरायांच्या विरोधात काही ना काही कुरघोड्या करताना दिसतात, याचा गैरफायदा फिरंग्यांनी घेतला तर दोष कोणाला द्यायचा?

2007 साली जेम्स लेनचे वादग्रस्त पुस्तक बाजारात आले. त्याला पुस्तक लिहिण्यासाठी माहिती कोणी दिली? शिवाय या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पुस्तकावर बंदी घातली होती. ही बंदी सर्वोच्च न्यायालयात जुलै 2010 मध्ये उठविण्यात आली. जेम्स लेनच्या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने लादलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविली आणि महाराष्ट्रात रान माजले. ठिकठिकाणी लेनच्या पुतळयाचे दहन केले गेले, कुठे त्याला फाशी दिली तर कुठे चपलांनी बदडण्यात आले. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता, तेव्हा इतका गदारोळ झाला नव्हता, कदाचित सर्वोच्च न्यायालयात ही बंदी वैध ठरेल, असे लोकांना वाटले असावे, परंतु आता सर्वोच्च न्यायालयानेही ही बंदी अवैध ठरविल्यामुळे राज्यात असंतोष निर्माण झाला आहे. या सगळया गोंधळात एक प्रश्न अनुत्तरीतच राहतो आणि तो म्हणजे एवढा राज्यव्यापी असंतोष हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले आणि बाजारात आले तेव्हा का निर्माण झाला नव्हता? त्यावेळी फक्त संभाजी बिग्रेडने आपल्या पध्दतीने निषेध नोंदवित भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रावर हल्लाबोल केला होता. तेव्हा लेन विरोधात पेटून उठलेले बाकी सगळे राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते का गप्प होते? जेम्स लेनचे पुतळे तेव्हा जाळले गेले असते किंवा त्याला तेव्हा प्रतिकात्मक फाशी दिली असती तर ते समजून घेता आले असते. आता सर्वोच्च न्यायालयाने या पुस्तकावरील बंदी हटवली म्हणून लेनला झोडपणे म्हणजे वडयाचे तेल वांग्यावर काढण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. शिवरायांचा खरा इतिहास लोकांना सांगण्याचे प्रयत्न काही लोकांकडून केले जात आहेत, परंतु बरेचदा त्यातील अतिरंजीतपणामुळे सर्व सामान्यांच्या पचनी तो पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत योग्य त्या पुराव्यासह, समस्त इतिहास संशोधकांच्या मान्यतेसह शिवरायांचा वस्तुनिष्ठ इतिहास लोकांसमोर आणण्याचे काम व्हायला हवे.

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते ही बाब ज्याप्रमाणे सज्जड पुराव्यानिशी समोर आणण्यात आली आणि सरकारला शालेय पाठयपुस्तकातील इतिहास बदलणे भाग पडले, त्याचप्रमाणे शिवरायांचा समग्र इतिहास तितक्याच सज्जड पुराव्यानिशी नव्याने लिहिला गेला पाहिजे. पुन्हा एखादा जेम्स लेन इथे आला तर त्याची पावले भांडारकरकडे न वळता हा खराखुरा इतिहास सांगणा-याकडे वळतील याची तजबिज व्हायला हवी.

लेनने त्याला पुरविलेल्या माहितीच्या आधारे पुस्तक लिहिले, ही बाब स्पष्ट आहे. शिवाजी महाराज औरंगजेब यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध होते, अशी माहिती त्याला पुरविण्यात आली असती तर त्याने तसे लिहिले असते. आपल्याला हवी असलेली माहिती मिळण्याचे विश्वसनीय स्थान म्हणून त्याने भांडारकर प्राच्य विद्या संशोधन केंद्राची निवड केली होती आणि त्याच्या समोर दुसरा पर्यायदेखील नव्हता. आज शिवप्रेमाने भारीत होऊन लेनला फाशी द्यायला निघालेल्या लोकांनी हे लक्षात घ्यालला हवे की शिवरायांच्या इतिहासाचा कुणाला अभ्यास करायचा असेल तर त्यांचा विश्वसनीय आणि खराखुरा इतिहास अशा अभ्यासकांसमोर मांडण्याची पर्यायी व्यवस्था इथे उभी राहू शकलेली नाही. शिवरायांचा इतिहास 'हा' नसून हा आहे, हे म्हणणाऱ्यांनी त्यांचा खरा इतिहास लिहून त्यावर समाजमान्यतेची, इतिहास संशोधकांच्या मान्यतेची, सरकार मान्यतेची मोहोर उमटवायला हवी होती, दुर्दैवाने आजही ते काम झालेले नाही.

भूतकाळात ज्या चुका झाल्या त्या किमान आता तरी सुधारायला हव्यात. हातात तलवार घेऊन लढाईच्या मैदानावर मोठा इतिहास घडविता येईल, परंतु तो प्रेरणादायी इतिहास आहे त्या स्वरूपात, त्याला विकृत किंवा पक्षपाती स्वरूप न येता पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायचा असेल तर दुसऱ्या हातात तेवढयाच ताकदीची लेखणी असणे गरजेचे आहे. तलवारीवर मूठ आवळणाऱ्या मराठयांनी लेखणीची ही ताकद कधीच ओळखली नाही, अगदी आजही ओळखलेली नाही. ही ताकद ज्यांनी ओळखली त्यांनी चार भिंतीच्या आत बसून इतिहास घडविला. आता त्यांच्या नावाने बोंबा मारण्यात काही अर्थ नाही. हे तर शेजा-याला मूल झाले म्हणून आपली छाती बडवून घेण्यासारखे आहे.

आता तलवारीच्या किंवा मनगटाच्या ताकदीपेक्षा अधिक ताकद लेखणीची आहे आणि ती ताकददेखील आता अधिक व्यापक झाली आहे. लेखणीच्या सोबतीला कॅमेरा आला आहे, इंटरनेटच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करण्याचे विशालकाय भांडार उघडे झाले आहे. पूर्वी लेखणीवर जशी एका विशिष्ट समाजाची सत्ता होती, तो प्रकार आता राहिलेला नाही. आता लेखणी हाती धरेल त्याची ताकद आहे, परंतु दुर्दैव हेच आहे ही अजूनही बहुजन समाजातील लोकांना लेखणी हातात धरण्यापेक्षा दंडाची बेडके फुगवून दाखविण्यात अधिक स्वारस्य आहे. याचा फायदा काही चाणाक्ष लोक नेहमीच उचलत आले आहेत. वेळ पाहून आपली भूमिका ठरवायची आणि तापत्या तव्यावर आपलीच पोळी शेकून घ्यायची, ही कूटनीती अनेकांना चांगली जमते. त्यांच्या या कूटबुध्दीमुळेच स्वत:मध्ये कुठलीही ताकद नसताना अनेक ताकदवरांना आपल्या दारासमोर रांगा लावून उभे करण्यात त्यांनी यश मिळविले आहे.

आज बेंबीच्या देठापासून लेनचा निषेध करणा-या अनेक राजकीय पक्षांच्या, संघटनांच्या नेतृत्त्वाकडे पाहिले तर हे सहज लक्षात येईल की त्या सगळयांचीच ताकद मनगटापेक्षा मेंदूत, वाणीत आणि लेखणीत सामावलेली आहे. तेच लोक 'मारो-काटो-जलावो' च्या आरोळया ठोकणा-या बहुजन समाजातील भडक माथ्याच्या तरुणांना अधिक भडकावून मैदानात उतरवितात आणि पुढचा तमाशा आपल्या घरात बसून शांतपणे पाहतात. गेल्या शेकडो वर्षांपासून हेच होत आले आहे आणि आताही त्यात फारसा फरक पडलेला नाही. किमान आतातरी बहुजन समाजातील लोकांनी, विशेषत: तरुणांनी जागे व्हायला हवे, कुणाच्या तरी हातातली तलवार होण्यापेक्षा स्वत:च्या हातात तलवार घ्यावी, कुणीतरी लिहिलेल्या इतिहासातील एखादे पान होण्यापेक्षा स्वत: आपला इतिहास घडवावा आणि लिहावा आणि हे काम केवळ मनगटाच्या ताकदीवर होणारे नाही. आधुनिक काळात मनगटाच्या ताकदीला तसाही काही अर्थ उरलेला नाही. ताकद चालते ती लेखणीची, वाणीची! नेमक्या याच प्रांतात बहुजन समाज शेकडो वर्षांपासून मागास राहिला, परिणामी आज हा आमचा इतिहास नाही असा कंठशोष करण्यापलीकडे त्यांच्याजवळ पर्याय उरला नाही. जेम्स लेनवर आगपाखड करण्यात काय अर्थ आहे? त्याचे 'बाप' कोण ते शोधा, लेनच्या माध्यमातून आपल्या विकृतीला जन्म देणा-यांना जाब विचारा आणि त्याचवेळी हेदेखील लक्षात असू द्या की या विकृत बापांची पिलावळ केवळ आपल्या चुकांमुळेच पिढयानपिढया पैदा होत राहिली. चूक त्यांचीही नाही, त्यांनी आपल्या स्वभावानुसार काय करायचे ते केले, चूक तुमचीच आहे, सत्ता, ताकद आणि संख्याबळ असूनही तुम्ही त्यांना मोठे होऊ दिले. त्यांचे हे मोठे होणे त्यांच्या मोठेपणातून नाही तर तुमच्या कमजोरीतून जन्माला आले आहे. तुमची ही कमजोरी आजही कायम आहे. तुम्ही दहा लोकांशी लढू शकता, परंतु हजारोंच्या मनातला अंगार चेतवणारी वाणी आणि लेखणीची ताकद तुमच्याजवळ नाही. अशा परिस्थितीत कुणाचे तरी पुतळे जाळून आपला राग शांत करण्यापलीकडे दुसरा पर्याय तरी कुठे शिल्लक आहे? यामुळे आज महाराष्ट्रातील तमाम राजकीय संघटना आणि मराठयांच्या संघटनांमध्ये हाणामा-या सुरू आहेत. पुढे भविष्यात काय होईल, कोणास ठाऊक? पून्हा पुतळा उभारला जाईल किंवा जेम्स लेनही कालांतराने विस्मरणात जाईल. पण शिवाजी महाराजांच्या बदनामीने मराठी माणसाच्या काळजात घुसलेला 'हा' बाण तसाच अडकलेला राहिल. उभा महाराष्ट्र शिवरायांना आपले आराध्य दैवत मानतो. त्या दैवताचा असा उघडयावर मांडलेला बाजार थांबायला हवा, अन्यथा इतिहास आपल्याला कदापिही क्षमा करणार नाही. पण स्वत:च्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी आपल्या आया-बहिणींना बाजारात बसवणा-या राजकीय पुढा-यांना आणि त्यांच्या 'पिलावली' ला हे कोण आणि कसे सांगणार?

1 comment:

साधक said...

एकतर्फी लेख. माणसाने कितीही त्रयस्थपणे लिखाण केले तरी स्वाजाती च्या हिताचेच लेखन त्याच्याकडून होते. तोडफोड वाल्यांपेक्षा नक्कीच चांगली पद्धत.