Thursday, January 27, 2011

फितूर यंत्रणा, राजकारण व गुन्हेगारी यांच्यातील साटयालोटयामुळेच सोनवणेंचा बळी!

काल देश प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना नाशिकचे कर्तव्यदक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांची अंत्ययात्रा निघाली होती. जणू या देशाच्या लोकशाही व्यवस्थेचीच अंत्ययात्रा निघाली होती. पेट्रोल माफियांच्या काळया कारवायांची माहिती मिळताच धडाडीने तपासासाठी गेलेल्या या अधिकाऱ्याला भेसळ करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाने सर्वांदेखत जिवंत जाळले. या देशात सत्याने वागणाऱ्याची जर ही अशी गत होणार असेल तर सत्यमेव जयते हे आपले राष्ठ्रीय बोधवाक्य काढून टाकणेच योग्य ठरेल. मनमाडजवळ रॉकेल आणि पेट्रोल भेसळ करर्णाया टोळीने भरदिवसा, भरचौकात, भरगर्दीत नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळले आणि प्रजासत्ताकदिनाच्या पर्ाश्वभूमीवर महाराष्ठ्रात आता गुंडाराज सुरू झाले, असा बेधडक संदेश दिला. पाहता-पाहता महाराष्ठ्राचा बिहार झाला. भेसळखोरांवर कारवाई करण्यास गेलेल्या एका कार्यक्षम अधिर्कायावर स्वत:चा मृत्यू स्वत:च पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. महाराष्ठ्राने शरमेने खाली मान घालावी, अशी ही घटना आहे. राज्यात ठिकठिकाणी टोळयांचे राज्य कसे सुरू आहे, याचा हा एक धडधडीत पुरावाही आहे. आता हल्लेखोरांवर कठोर कारवाईची भाषा होईल, मोक्का लावण्याचा निर्धार होईल; पण कायदा व सुव्यवस्थेची जायची ती अब्रू गेलीच.
उत्तर महाराष्ठ्रातील एक कर्तबगार अधिकारी म्हणून सोनवणे यांचा लौकिक होता. अतिशय कठीण परिस्थितीत झगडत आणि स्वत:ला घडवत ते या पदापर्यंत पोहोचले होते. पोलिस बंदोबस्त न घेता सोनवणे छापा टाकण्यासाठी गेले होते. एरवी भेसळखोर पळून जायचे, झटापटीचा प्रयत्न करायचे; पण या वेळी त्यांनी थेट अधिर्कायाचाच बळी घेतला. सोनवणे यांचा मृत्यू म्हणजे एक घटना नव्हे, तर कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी, समांतर व्यवस्था किती मुजोर, किती हैवान झाली आहे, याचे हे एक विदारक चित्र आहे. ते बदलायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या यंत्रणांना लागलेली कीड थांबवावी लागेल. वर्षानुवर्षे चालर्णाया या टोळयांना अभय कोण देते? खाकी वर्दीचा धाक का राहिलेला नाही, समाजामनही इतके पांगळे का झाले आहे, राजकारणाचे गुन्हेगारीकरण का होते आहे अशा अनेक प्रश्नांना भिडावे लागेल. त्यासाठी एका प्रचंड अशा प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज असावी लागते. हवेत फिरवल्या जार्णाया दंडुक्याला आता कोणी घाबरत नाही. कारण दंडुका पकडणारी मनगटे एक तर कमजोर होत आहेत किंवा कमजोर केली तर जात आहेत. पोपट शिंदे नावाचा गुंड कोणी पोसला, येथूनच कारवाईला सुरवात झाली पाहिजे. तसे न झाल्यास कोणीतरी एक पोपट सापडेलही; पण 'पोपटांनी भरलेले झाड' आणि 'पोपट पाळणारे मालक' तसेच राहतील.
मनमाडजवळ पेट्रोल-रॉकेल भेसळ होतेय, ही काही नवी गोष्ठ नाही. भेसळपट्टा म्हणून ओळखला जाणारा हा भाग धुळे, जळगाव, नाशिक आणि परराज्यांतील काही महत्त्वाच्या शहरांना जोडून घेतो. भेसळीसाठी कुख्यात बनलेल्या या प्रदेशात कारवाई करण्याचे धाडस कोणत्याही सरकारने केले नाही. याच प्रदेशात मोठया प्रमाणात तयार झालेल्या वाळूमाफियांचेही कायदा काही वाकडे करू शकला नाही. मनमाडजवळ, इगतपुरी घाटात, कसारा परिसरात वर्षानुवर्षे तेलभेसळ होते. जगजाहीर असणारी ही गोष्ठ शासकीय यंत्रणेला मात्र दिसत नाही. उत्तर प्रदेशमधील पेट्रोल माफियांविरुध्द आवाज उठवणारा इंडियन ऑईलचा कर्तबगार अधिकारी मंजुनाथ षण्मुगमची हीच गत झाली, झारखंडमध्ये सुवर्ण चतुष्कोण महामार्गाच्या कामातील भ्रष्ठाचार उघड करणाऱ्या सत्येंद्र दुबेलाही असेच निर्घृणपणे ठार मारले गेले आणि आता यशवंत सोनावणेंसारख्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासारख्या उच्च पदावरील सरकारी अधिकाऱ्यालाच जिवंत जाळण्यास माफिया धजावले, हे कशाचे निदर्शक आहे? या देशात राज्य कोणाचे चालते आहे? सत्यावर विश्वास ठेवून चालणारा देशातील प्रत्येक नागरिक या दुर्दैवी घटनेने आज प्रक्षुब्ध झालेला आहे. जेथे सोनावणेंची हत्या झाली, त्या मनमाड तेल डेपोच्या परिसरात पेट्रोल आणि रॉकेलची राजरोस भेसळ होती हे पोलीस यंत्रणेला ठाऊक नव्हते असे नव्हे. सोनावणेंची हत्या होताच जनप्रक्षोभ उसळल्याचे पाहून काही तासांत भेसळ माफिया पोपट शिंदे याला गजाआड केले गेले, मग या पोपटाच्या अशा उचापती सुरू आहेत हे ठाऊक असूनही एवढी वर्षे पोलीस यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष का करीत होती, प्रशासन गप्प का होते, राजकारणी कारवाईस का धजावत नव्हते हे प्रश्न आता उपस्थित होतात. आठ-नऊ वर्षांपूर्वी तेलभेसळीच्या वादातूनच नाशिकमध्ये एका पोलिस शिपायाला गोळया घालून ठार करण्यात आले होते. अशी काही घटना घडली की यंत्रणा हलते. पुन्हा भेसळराज सुरू होते. मनमाडजवळ तेच घडायचे. डेपोतून पेट्रोल-रॉकेल घेऊन बाहेर पडलेली वाहने विशिष्ठ जागेवर थांबतात. भेसळ भरून घेतात आणि तीच वाटायला निघून जातात. हा सगळा प्रकार घडवणारे दादा लोक पैशाच्या आणि मनगटाच्या जोरावर प्रशासकीय व राजकीय सत्ता स्वत:ला हव्या तशा झुकवतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अधूनमधून प्रयत्न होतात; पण पुराव्याअभावी कोणत्याच दादाला शिक्षा झाल्याचे ऐकीवात नाही. असाच एक दादा म्हणजे पोपट शिंदे. सोनवणे प्रकरणात व मनमाड भागातील तेलभेसळींचा तोच माफिया आहे. त्यानेच सोनवणे यांच्यावर पेट्रोल टाकले होते. त्याचे धाडस पाहता एकूण भेसळ प्रकरण आणि त्याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहे, याची कल्पना येते.
वाळू, दगड, खाणी, पाणी, तेल अशा अनेक क्षेत्रांत टोळीराज सुरू आहे. काही वर्षांपूर्वी बिहारमध्येच मंजूनाथ नावाच्या एका अभियंत्याची एका माफिया टोळीने हत्या केली होती. या हत्याकांडात काही जणांना शिक्षा झाली खरी, पण सूत्रधार तसेच राहिले. भारतीय प्रजासत्ताक अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पातळयांवर संवेदनशील प्रयत्नांची आवश्यकता असताना कर्तव्य बजावर्णाया अधिर्कायाचाच भेसळखोर प्रवृत्तींनी बळी घेतला आहे. सोनवणे यांच्या हत्येमुळे कमजोर व्यवस्थेचे, फितूर यंत्रणेचे आणि राजकारण व गुन्हेगारी यांच्यातील साटयालोटयाचे सर्व संदर्भ उघडे होणार आहेत. त्यातून बोध घेऊन आणि पडेल ती किंमत चुकवून स्वच्छता मोहीम राबवायला सुरवात केली पाहिजे.
  पोलिसांना हप्तेबाजी केली, भ्रष्ठ अधिकाऱ्यांना मलिदा पुरवीत राहिले, राजकीय पक्षांना निवडणुकीवेळी आर्थिक आधार दिला की आपले कोणीही वाकडे करू शकत नाही अशी गुर्मी निर्माण झालेले असे माफिया आज प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक प्रांतात बोकाळत चालले आहेत. उत्तर प्रदेश असो, बिहार असो, महाराष्ठ्र असो वा गोवा असो, प्रत्येक राज्यात अशा संघटित टोळया निर्माण झालेल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीेचे आणि राजकीय संरक्षककवच मिळालेले माफिया कायद्याला जुमानत नाहीत. दहशतीच्या बळावर, लाचलुचपतीच्या बळावर त्यांनी जणू समांतर काळी व्यवस्था उभी केलेली आहे. या टोळया राजकारण्यांनी पोसल्या आहेत, पोलिसांनी त्यांची खातिरदारी चालवली आहे आणि जो कोणी अशा विषयांत आवाज उठवील त्याला संपवण्यासाठी, त्याचा आवाज कायमचा बंद पाडण्यासाठी हे लोक संघटितपणे पुढे सरसावत आहेत. एखाद्याचे अत्यंत निर्घृणपणे प्राण घेण्याइतपत असे गुंडपुंड निर्ढावलेले आहेत. ज्या महाराष्ठ्रात पेट्रोल माफियाने हे भीषण कृत्य केले, तेथे वाळू माफियांचा प्रश्नही ऐरणीवर आहे. या वाळू माफियांविषयी लिहिणाऱ्या पत्रकारांवर प्राणघातक हल्ले झाले, विरोध करणाऱ्या नागरिकांना धडा शिकवला गेला. अशी गैरकृत्ये अगदी डोळयांदेखत दिवसाढवळया घडत असतानासुध्द त्याकडे प्रशासनाचा कानाडोळा चालतो आणि नागरिकांनीसुध्द स्वत:चा जीव प्यारा असेल तर त्याकडे लक्ष न देता निमूट निघून जावे अशी नवी संस्कृती निर्माण होत चालली आहे. वाळू माफियांपासून माज्र्ञोच्ट माफियांपर्यंत अनेक तऱ्हेचे मस्तवाल वळू आज सर्वत्र माजले आहेत. पोलीसच जेथे हप्ते खावून विकले जातात, तेथे कारवाईची अपेक्षा तरी कोणाकडून आणि कशी करायची? आपण सारे मूकपणे हे अध:पतन पाहात बसणार आहोत का, हाच खरा प्रश्न आहे.

1 comment:

vijay sampat dongardive said...

this is a nice artical on curupt currant situation of law and order in our state so good think about the auther and iagree with him