Thursday, June 23, 2011

भ्रष्टाचार, बलात्कार आणि पोलिस

राज्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. कायदा- सुव्यवस्था पाळायला कोणी तयार नाही. दररोज नवनवीन प्रकरणे उघडकीस येताहेत. अगदी तलाठ्यापासून तर पुढार्‍यांपर्यंत देशाची लूट खुलेआम चालू आहे. खून, दरोडे, हाणामा-या, चो-या आणि बलात्कारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कधीकधी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून ‘आदर्श’सारखे भ्रष्टाचाराचे उत्तुंग इमले बांधले जातात. यामध्ये पध्दतशीर साखळीच कार्यरत आहे. एकमेकांचे लागेबांधे असल्यामुळे भ्रष्टाचार उघड होणे व करणे कठीण जाते. एखादे प्रकरण उघडकीस येते तेव्हा त्यातील चेहरे पाहिले की ते अगदी सालस मुखवट्याखाली हिंडत होते, हेही लक्षात येते. प्रशासनात नवीन आलेला अधिकारी लगेचच दिमतीला चारचाकी आलिशान वाहन ठेवतो, बंगला बांधतो. तीच तर्‍हा राजकारण्यांची आणि पोलिसांची. नव्याने नगरसेवक झालेल्या व्यक्तीचाही अगदी काही दिवसातच नूर पालटतो. भ्रष्टाचाराचे पुरावे हाती लागणे सोप नसते, त्यामुळे भ्रष्टाचारी समाजात खुलेआम वावरतात.

एखादेवेळी प्रकरण उघड व्हायची वेळ आलीच तर नाचक्की टाळण्यासाठी एकमेकांवर खापर फोडले जाते. जनतेच्या सार्वजनिक पैशांचा दुुरुपयोग करणार्‍या या भ्रष्ट वर्गाची मानसिकता दिवसेंदिवस पुरेपूर निर्ढावली आहे. सरकारी कचेर्‍यांमधील महत्त्वाची कागदपत्रे पळविण्यापर्यंत मजल गाठली जाते. फायली व कागदपत्रे बेपत्ता केली जातात. पोलीस ठाण्यातील बंदोबस्तातील कागदपत्रांनाही पाय फुटतात. ‘आदर्श’ प्रकरणात या प्रकारचे नवे ‘आदर्श’ नोंदले गेले आहेत. धुळे महानगरपालिकेत ‘इससे भी जादा’ पराक्रम संबंधितांनी घडवला आहे. चक्क रेकॉर्ड विभागालाच आग लावली गेली. मागे मुंबईतील म्हाडाच्या एसआरए कार्यालयातही आग लागली की लावली होती. कोट्यवधी रुपयांची हेराफेरी करुन पुरावे नष्ट करण्यासाठी आता भ्रष्टाचारी कुठल्या थराला जाताहेत ते या घटनेवरून दिसते. पोलीस, सरकारी नोकर आणि राजकीय पेशातील पांढरपेशे यांच्यात होत असलेल्या तडजोडींमुळे भ्रष्टाचाराला ऊत आलाय. त्याला रोखणारी कुठलीही सक्षम यंत्रणा सध्यातरी अस्तित्वात नाही. 


एकीकडे भ्रष्टाचाराने कळस गाठला असताना दुसरीकडे कायदा- सुव्यवस्था धाब्यावर बसवल्याचे दिसते. रोज खून, दरोडे, हाणामा-या, चो-या आणि बलात्कारांचे प्रकार घडत आहेत. कल्याण स्थानकाजवळ चार दिवसांपूर्वी पहाटे घडलेली सामूहिक बलात्काराची घटना रेल्वे स्थानकांच्या परिसरातील असुरक्षिततेचे विदारक दर्शन घडवणारी आहे. कल्याण हे गजबजलेले आणि बकाल स्टेशन आहे. स्टेशनबाहेर रात्रभर पोलिसांच्या साक्षीने अनैतिक व्यवहार सुरू असतात. पहाटेपर्यंत गर्दुल्ले, वेश्या आणि तृतीयपंथीयांची जत्रा भरलेली असते. पोलिसांची जलद कृती दलाची एक व्हॅन स्टेशनबाहेर तैनात असते. परंतु, तेथे चकाटय़ा पिटत बसलेल्या पोलिसांची स्टेशन परिसरावर जरब दिसत नाही. त्यामुळेच हाकेच्या अंतरावर बलात्कारासारखी घटना घडते आणि त्यांना त्याचा पत्ताही लागत नाही. घटना घडल्यानंतर कल्याण रेल्वे पोलिस आणि महात्मा फुले पोलिस ठाणे यांनी नेहमीप्रमाणे हद्दीवरून वाद घातला. अशाच प्रकारच्या गंभीर घटना गेल्या काही दिवसांत लोकलमध्ये, लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये आणि स्थानकांवर घडल्या आहेत. कामायनी एक्सप्रेसमध्ये महिलांच्या डब्यात झालेली वृद्धेची हत्या, चर्चगेट स्थानकात थांबलेल्या लोकलच्या डब्यात आढळलेला नालासोपा-यातील महिलेचा मृतदेह, दादर-परळदरम्यान एका हमालाने महिलेचा खून करून टाकलेला मृतदेह, सँडहर्स्ट रोड स्टेशनवर सुटकेसमध्ये आणून टाकलेला महिलेचा मृतदेह, कळवा कारशेडमध्ये लोकलच्या डब्यात सापडलेला तरुणीचा मृतदेह, लोकलमध्ये एकाने केलेली आत्महत्या या दोन महिन्यांतील घटना रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील आहेत.


गेल्या काही आठवडय़ांतील घटना पाहता मुंबईतील रेल्वे स्थानके ही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी आणि गुन्हे करण्यासाठी सुरक्षित ठिकाणे बनली आहेत की काय, असे वाटण्याजोग्या घटना सतत घडत आहेत. कधी स्थानकावर किंवा ट्रेनमध्ये बॅगांमध्ये मृतदेह आढळतात, कधी ट्रेनच्या डब्यात फास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसते, कधी दारात लटकून प्रवास करणा-यांवर बाहेरून जीवघेणा हल्ला केला जातो, तर कधी गजबजलेल्या स्थानकाच्या परिसरात सामूहिक बलात्कार घडतो. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेविषयी खूप चर्चा झाली, अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या, परंतु सुरक्षाव्यवस्थेमध्ये काहीही सुधारणा झाली नाही. छत्रपती शिवाजी टर्मिनस सारख्या महत्त्वाच्या स्थानकावर बसवलेल्या मेटल डिटेक्टरांचाही नीट वापर होत नाही आणि त्याकडे कोणी लक्ष देत नाही. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीन मार्गावर मिळून शंभराहून अधिक स्थानके आहेत. तेथील सुरक्षाव्यवस्थेची स्थिती पाहिली तर लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासाठी पोषक वातावरणच दिसते. दहशतवादी कारवाया किंवा मोठय़ा घातपातांची धास्ती सोडा- प्रवाशांना किमान सुरक्षित वाटण्यासारखी स्थिती नाही. 


परवा लग्नाचे आमिष दाखवून एका महिला पोलिस प्रशिक्षणार्थीबरोबर शरीरसंबंध ठेवल्याच्या आरोपावरून उत्तरेश्‍वर मुंडे या पोलिस हवालदाराला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे.  यापूर्वी कोल्हापूरच्या प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या बलात्कारामुळे पोलिस दलात महिला पोलिस कर्मचा-यांना दिल्या जाणा-या वागणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला. महिला कॉन्स्टेबल म्हणजे बिनकामाच्या, अशी मानसिकता काही अधिका-यांची आहे. त्याचा परिणाम म्हणूनच महिलांचे शोषण करण्याचे धाडस अधिकारी किंवा कर्मचारी करतात. अनेक महिला पोलिसांना हे निमूटपणे सहन करावे लागते. त्यासाठी पोलिस दलाची स्वच्छता मोहीम घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे. गुन्ह्यांचा आलेख वाढत चालला असताना पोलिसांना मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचेच दिसते. त्यामुळे पन्नास-शंभर रुपयांपासून कोट्यवधी रुपयांची खाबूगिरी सर्रास चालू आहे. भ्रष्ट अधिकारी, पोलिस आणि राजकारण्यांना आळा घालण्यासाठी केलेले कायदेसुद्धा प्रभावी न ठरतील याची काळजी घेऊनच तयार होत असतात, याबद्दल जनतेच्या मनात बिलकुल शंका नाही.

No comments: