Friday, June 10, 2011

उपोषणाने नक्की काय साधणार!

मुंबईत नुकतेच एका रेशनिंग अधिका-याला लाच प्रकरणी महिलेने भर रस्त्यात चपलेने मारझोड केली. सर्वच राजकीय पक्ष, प्रशासकीय अधिका-यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. आज या घटनेने दाखवून दिले आहे की, एक दिवस या भ्रष्टाचाराचा कळस होईल, संतप्त जनता रस्त्यावर उतरेल आणि या सगळ्यांना सळो की पळो करून सोडेल. पण हा दिवस कधी येणार? जनता जागी होईपर्यंत देश मात्र पूर्ण लुटलेला असेल! याचा विचार करण्याची वेळ आली आहे.


उपोषणासारख्या आत्मक्लेशाच्या मार्गाने निषेध नोंदवण्याची परंपरा भारतात पूर्वापार चालत आली आहे. वनवासी श्रीरामाला माघारी बोलावण्यासाठी सार्‍या विनवण्या करूनही तो ऐकत नाही असे पाहून भरताने प्राणांतिक उपोषणाची भीती घातली होती, असे वाल्मिकी रामायणात नमूद केलेले आहे. याच उपोषणाच्या हत्यारानिशी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना गदगदा हलवले. आज एकविसाव्या शतकातून वाटचाल करतानाही उपोषणाचे हे हत्यार तितकेच प्रभावी आहे आणि सरकार नावाची बलाढ्य यंत्रणा त्याला थरथर कापते, हे गेल्या काही दिवसांतील घटनांनी सिद्ध केले आहे. अण्णा हजारेंच्या ९६ तासांच्या उपोषणाने केंद्र सरकारला नमवले आणि बाबा रामदेव यांनी तेच हत्यार उगारताच त्याचे परिणाम जाणून असलेल्या सरकारने दंडेलशाहीचे दर्शन घडवत रामलीला मैदानामध्ये रावणलीलेचे दर्शन घडवले. आता पुन्हा बाबा रामदेव उपोषणाला बसले आहेत आणि अण्णा हजारेंनीही येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाची घोषणा काल केली आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, अगदी तालुकास्तरावरदेखील भ्रष्टाचाराविरुद्ध लाक्षणिक उपोषणांचे सत्र सुरू आहे. या सगळ्या मंथनातून या देशातील भ्रष्टाचाराच्या महाराक्षसाचा निःपात जरी संभवत नसला, तरी एक व्यापक जनजागृती, एक सकारात्मक वातावरण निश्‍चितच निर्माण झालेले आहे. भ्रष्टाचार मिटवण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून त्याकडे पाहायला हरकत नसावी. 


समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन पुकारले. सारा देश अण्णांच्या पाठीमागे एकसंघ उभा राहिला. आता योगगुरू रामदेव बाबांनीही विदेशातील देशी काळा पैसा परत आणावा, ती राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावी यासाठी रामलीला मैदानावर फाईव्ह स्टार उपोषण आरंभिले होते. सरकारने बाबांचे आंदोलन चिरडून टाकले. अण्णांच्या आंदोलनात असलेला उत्स्फूर्त लोकसहभाग रामदेव बाबांच्या आंदोलनात दिसला नाही. बाबांच्या मागण्याही देशहिताच्याच होत्या. असे असूनही सर्वसामान्य जनता बाबांमागे धावून का आली नाही? बाबांचे आंदोलन चिरडल्यानंतरही जो जनक्षोभ उसळायला हवा होता तो का निर्माण झाला नाही? हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्‍न उभे ठाकले आहेत.

अण्णांचे ते आंदोलन ऐतिहासिक होते. जनतेच्या पाठिंब्यामुळेच ते ऐतिहासिक होऊ शकले, याचीही जाणीव ठेवायला हवी. अण्णा अणि बाबांच्या आंदोलनामुळे राजकीय पक्ष मात्र उघडे-नागडे झाले आहेत. अण्णा म्हणा की बाबा त्यांच्या आंदोलनाचे विषय हे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावरचेच आहेत. काळ्या पैशांचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत येतो, पुढे मात्र काहीच होत नाही. मुळात सर्वच पक्ष यात बरबटलेले असल्याने मुळापर्यंत जाण्याची इच्छाशक्ती कुणाकडेच नाही. त्यामुळेच अण्णा किंवा बाबा रामदेवसारख्यांना या विषयांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ येते.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आत्मक्लेष म्हणून उपोषणाचा मार्ग निवडला होता. गांधीजींच्या उपोषणात ताकद होती म्हणून सारा देश त्यांच्या मागे एकवटत होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेकांनी उपोषणाचे हत्यार उपसून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. उपोषणाच्या हत्याराचे आता एवढे सामान्यीकरण झाले आहे की, कोणत्याही जिल्ह्यात जिल्हाधिकारी कचेरीबाहेर दररोज कोणाचे ना कोणाचे उपोषण सुरूच असते. उपोषण करणार्‍यांच्या मागण्या त्यांच्या परीने भलेही न्याय्य असतील, पण त्यामुळे उपोषणाच्या गांभीर्याला कुठेतरी ठेच पोहोचते आहे, असे वाटते.


उठसूट होणार्‍या उपोषणांमुळे जनसामान्यांची उपोषणाच्या हत्याराप्रती असलेली संवेदनशीलता कमी तर होत नाही ना? याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.

उपोषणाचे हत्यार खूप प्रभावी असले तरी त्याचा उपयोग करणारी व्यक्ती कोण आहे हे पाहूनच सामान्य जनता प्रभावित होत असते. अण्णांच्या मागे देश एकवटला ते चित्र रामदेव बाबांच्या बाबतीत का दिसले नाही? याचेही विश्‍लेषण झाले पाहिजे. यासाठी अर्थातच दोघांच्या आंदोलनाची तुलना होऊ लागली आहे. अण्णा किंवा रामदेव बाबांनी ज्या मुद्यांवर उपोषणाचे अस्त्र उपसले ते मुद्दे राजकीय नसले तरी राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर वर्षानुवर्षांपासून आहेत. असे असूनही बाबांना जे जमले ते आमच्या राजकीय पक्षांना का जमले नाही? हा देखील महत्त्वाचा प्रश्‍न आहेच. राजकीय पक्ष विषेशतः विरोधी पक्षांच्या विश्‍वासार्हतेला यामुळे तडा निश्‍चित गेला आहे. लोकपाल विधेयकाचा प्रवास खूप दीर्घ आहे. अनेक राजकीय पक्षांनी यासाठी आंदोलने केली आहेत. पण प्रबळ राजकीय इच्छाशक्तीअभावी लोकपाल विधेयक रखडले आहे. लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधानांनाही घ्यावे व हे विधेयक त्वरित मंजूर व्हावे यासाठी अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारले. राजधानीतील जंतरमंतरवर त्यांनी उपोषण सुरू केले होते. अण्णांचे आंदोलन सुरू होताच सार्‍या देशातून त्यांना पाठिंबा मिळाला. अण्णा हजारे कोण आहेत हे माहीत नसणारेही आंदोलनात सहभागी झाले, कारण अण्णांच्या मागण्या रास्त होत्या. सत्यासाठी जीवाची बाजी लावणारा अण्णांचा विचार सामान्यांना प्रामाणिक वाटला. त्यामुळेच सारा देश त्यांच्या मागे उभा ठाकला. आजच्या तरुणाईबद्दल अनेक आक्षेप घेतले जातात. आजच्या तरुण पिढीला सामाजिक भान उरलेले नाही हाही एक आक्षेप आहे. पण अण्णांच्या आंदोलनात तरुणांचा मोठा सहभाग होता. दुसरा स्वातंत्र्यलढा म्हणून अण्णांच्या आंदोलनाकडे पाहिले गेले. दुसरा गांधी हे बिरुदही त्यांना चिकटवले गेले. सोशल नेटवर्किंग साईटस्‌वरही इंडिया अगेन्स्ट करप्शन हा विचार झपाट्याने पसरला. वुई सपोर्ट अण्णा हजारे असे लिहिलेल्या गांधी टोप्या तरुणांनी स्वच्छेने घालून अण्णांच्या विचारांना बळकटी दिली. अनेक राजकीय पक्षांनीही अण्णांच्या आंदोलनाला अनाहूत सर्टिफिकेट दिले. कॉंग्रेस एकाकी पडू लागल्यावर केंद्र सरकार नरमले आणि जनलोकपाल विधेयकासाठी समिती व समितीत जनप्रतिनिधी घेण्याचे मान्य करावे लागले. सर्व मागण्या पदरात पडल्यानंतर अण्णांच्या देशव्यापी आंदोलनाची यशस्वी सांगता झाली होती. त्या काळात अण्णांच्या आंदोलनाची विविधांगी वृत्ते दाखवून आपला टीआरपी वाढवून घेण्याची संधी वृत्त वाहिन्यांना मिळाली. राष्ट्रीय पातळीवर अण्णा एके अण्णा हाच एक विषय होता. अण्णांचे आंदोलन संपल्यानंतर योगगुरू बाबा रामदेव यांनीही परदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी व तो पैसा राष्ट्रीय संपत्ती जाहीर करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत लढा देण्याची घोषणा केली. योगगुरू म्हणून बाबांचे नाव व काम मोठे आहे. सामान्य माणसापर्यंत योग आणि त्याचे महत्त्व बिंबवण्यात बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भलेही बाबांच्या योग शिबिरासाठी पैसे मोजावे लागत असतील तरीही योग प्रसारासाठी त्यांनी उचललेला विडा प्रशंसनीयच आहे. योगामुळे देशातच नव्हेतर विदेशातही बाबांची के्रझ आहे. अण्णांच्या आंदोलनाला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद पाहता बाबांनीही आंदोलन पुकारले असावे. अण्णांच्या तुलनेत आपली लोकप्रियता जास्त असल्याने आंदोलन कमालीचे यशस्वी होईल असा कयास बाबांचा असावा. अण्णांचे आंदोलन नियोजनपूर्वक नव्हते. आंदोलन सुरू झाल्यावर देश अण्णांच्या आंदोलनाशी जुळत गेला. रामदेव बाबांचे मात्र तसे नव्हते. रामदेव बाबांनी आंदोलनाचे पूर्ण नियोजन केले. अण्णांना महाराष्ट्रातून अधिक प्रतिसाद मिळाल्याचे पाहून बाबांनी महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात, तालुक्यात योेग शिबिरे घेतली. एव्हाना, बाबांच्या योग शिबिरांचे अनेक महिन्यांपासून नियोजन असते. काही महिने, वर्षांपूर्वी बाबांच्या शिबिराच्या तारखा ठरत असतात. यावेळी मात्र अचानक बाबांच्या शिबिरांचा योग सामान्यांना लाभला. योग शिकविण्याबरोबरच त्यांच्या प्रचाराचे साहित्य, दिल्लीतल्या आंदोलनाची माहिती शिबिरातच दिली गेली. दिल्लीला येणार असल्याबद्दलची सहमतीपत्रे भरून घेतली गेली. ज्या तुलनेत बाबांनी आंदोलनाची तयारी केली होती तेवढा प्रतिसाद मात्र त्यांना मिळाला नाही. अण्णांच्या आंदोलनाचा धसका सरकारने घेतला होता. अण्णांच्या तुलनेत जास्त लोकप्रिय असलेल्या बाबांच्या आंदोलनाबाबत सरकार धोका पत्करू इच्छित नव्हते. बाबांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यावर चार मंत्री व वरिष्ठ सचिवांनी त्यांचे स्वागत केले. बाबांच्या आंदोलनाआधीच सरकार किती हादरले आहे हे यावरुन दिसून आले. बाबांनी आंदोलनच करू नये असेही प्रयत्न करून झाले पण ते व्यर्थ ठरले. अखेर सरकार बाबांच्या मागण्या मान्य करण्याच्या तयारीत आहे असे चित्र निर्माण करण्यात आले. सर्वकाही सुरळीत असतांना मध्यरात्री बाबांचे आंदोलन चिरडण्यात आले. सशस्त्र पोलिसांनी आंदोलकांना हुसकावून लावले. बाबांना सलवार कमीज घालून जीव वाचवावा लागला. एखादे हाय प्रोफाईल आंदोलन सरकारने चिरडल्याचे देशातील अलीकडच्या काळातील हे एकमेव उदाहरण ठरावे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या बाबांचा सरकारने एवढा काय धसका घ्यावा की आंदोलनाचाच गळा घोटावा? ही एक पोलिस कारवाई होती, असे सरकारने म्हटले असले तरी एवढी मोठी कारवाई सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय होणे शक्यच नाही. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या कारवाईबद्दल असहमती दर्शवली असली तरी ती वरवरचीच वाटते. कारण बाबांचे आंदोलन चिरडल्याने काय संकेत जातील यापासून त्या अनभिज्ञ निश्‍चितच नसाव्यात. बाबांच्या व्यासपीठावर साध्वी ऋतंभरांची हजेरी कॉंग्रेसला खटकत असली तरी राजकीय पातळीवर त्याचे भांडवल करणे समजू शकते, पण सरकार म्हणून शांततापूर्ण सुरू असलेले आंदोलन पाशवी बळाचा वापर करून चिरडणे याचे समर्थन होऊच शकत नाही. बाबांचे आंदोलन संघ पुरस्कृत होते असा कॉंग्रेसचा आरोप आहे. राजकीय पक्षांची ही प्रवृत्तीच होत चालली आहे. देशात काहीही झाले तरी शरद पवारच जबाबदार अशी विरोधी पक्षांची काही वर्षापूर्वी भूमिका होती. कॉंग्रेसलाही जळी स्थळी भाजपा आणि संघच दिसतो. असे आरोपप्रत्यारोप करून मूळ प्रश्‍नावरून लक्ष विचलित करण्याचाच प्रयत्न असतो. एखाद्याने आंदोलन पुकारले, ते जनहिताचे असेल तर विविध विचारांचे लोक त्या व्यासपीठावर येऊ शकतात, त्यात वावगे काहीच नाही. पण अशा व्यासपीठाचा राजकीय वापर होऊ नये, आंदोलन राजकीयदृष्ट्या हायजॅक होऊ नये याची दक्षता संबंधित आंदोलकाने घेतली पाहिजे. बाबांचे आंदोलन चिरडल्यानंतर देशभरात संतापाची लाट येईल, जनक्षोभ पसरेल असे चित्र मात्र दिसले नाही. मुळात बाबांच्या आंदोलनाला अण्णांच्या आंदोलनाएवढी धार नव्हतीच. कदाचित सरकारने शांततेने घेतले असते तर आज जो गाजावाजा झाला तो झालाही नसता. पण सरकारचा आततायीपणा नडला. बाबा लोकप्रिय असूनही आंदोलनात प्रचंड जनशक्ती का दिसली नाही? याचाही विचार झाला पाहिजे. अण्णा आणि बाबा यांच्यात मोठा फरक आहे तो साधेपणाचा. कोणताही साधा माणूस कधीही अण्णांना भेटू शकतो. रामदेव बाबांच्या बाबतीत तसे नाही. मोठे सुरक्षा कवच भेदूनच बाबांची जवळून भेट होऊ शकते. अण्णा स्पष्टवक्ते आहेत, त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा अजिबात नाही. बाबांबाबत तसे ठासून सांगता येणार नाही. दोघांच्याही आर्थिक स्थितीमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. या सर्व बाबींमुळे अण्णा सर्वसामान्यांना जवळचे वाटतात. आपल्यातला कोणी आंदोलनासाठी जीवाची बाजी लावतो आहे, आपल्या प्रश्‍नासाठी लढतो आहे हा विचार सामान्यांना भावतो. उपोषण हे हत्यार आहे, त्याची स्टाईल होता कामा नये. एखाद्या शस्त्राचा वारंवार उपयोग केल्यास ते बोथट होण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणतेही शस्त्र उचलतांना शंभर वेळा विचार केला पाहिजे. अण्णांच्या मागे लोक गेले म्हणून नेहमीच ते कोणाच्याही बाजूने जात राहतील असा अर्थ कोणी काढू नये. कदाचित स्वतः अण्णांनीही पुढे एखादे आंदोलन पुकारले तर गेल्या वेळेसारखाच प्रतिसाद मिळेल याची हमी कोणी देऊ शकणार नाही.


बाबा रामदेव यांचे आंदोलन काय किंवा अण्णा हजारे नेतृत्व करीत असलेले बुद्धिवाद्यांचे आंदोलन काय, त्यांची पार्श्‍वभूमी भिन्न भिन्न असली तरी एकाच लक्ष्याकडे समांतर जाणार्‍या या चळवळी आहेत. निदान ते लक्ष्य गाठण्याची भाषा तरी त्या करीत आहेत. केंद्र सरकारची भीती वेगळीच आहे. या तापत चाललेल्या वातावरणाचा फायदा संधीसाठी टपून बसलेले विरोधक घेतील, याची त्यांना सर्वांत जास्त भीती आहे. यासाठी रामदेव बाबा आणि अण्णा हजारे यांच्यावर ही मंडळी तुटून पडली आहे.
नैतिकता, स्वच्छ चारित्र्य आणि देशभक्ती ही रामदेव बाबा आणि अण्णा हजारे यांची बलस्थाने असल्याने त्यांच्यावरच प्रहार करण्यासाठी सध्या रामदेव यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्ष करताना दिसतो आहे. अण्णा हजारे यांच्याबाबतीतही तेच घडू लागले आहे. अण्णांच्या लढ्यात साथ देण्याची बात करणार्‍यांना आता अण्णाही नकोसे झाले आहेत. शेवटी हे सारे भीतीपोटी आहे. देश जागतो आहे याचीच ही भीती आहे.

No comments: