Tuesday, June 21, 2011

बुवाबाजीचा धंदा आणि समाजाला लागलेला रोग

भारतात बुवाबाजीचे आणि माताजींचे प्रमाण एवढे आहे की, पदवीधर, अनाडी, गरीब, श्रीमंत, राजकारणी, कलावंत सर्व त्यांच्या नादी लागलेले असतात, आणि त्यांच्यात आपले भले, शांतता, पैसा शोधत असतात. अनेक महाराज, बाबा, बापू, बुवा, साधू, आनंद, गुरू, योगी, बालयोगी, स्वामी राधा, दास, नाथ, नागनाथ, सखा, तारणहार, परमपूज्य, ह.भ.प., माता, आई, ताई, अम्मा, अम्माभगवान, अक्का, देवी अशी नावे लावून हा बुवाबाजीचा धंदा खोलतात. हा धंदा एवढा तेजीत चालतो की बस्स‍! फक्त थोडी चलाखी पाहिजे. आजकाल बुवा बाबांची संख्या वारेमाप वाढलीय. पूर्वीची बुवाबाजी अत्याधुनिक रूप घेऊन आलीय. बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, तांत्रिक हे शब्द बदलून स्वामी, महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये रूपांतरीत झालेले दिसतात. आजचे बाबा हुशार आहेत, उच्चशिक्षितही आहेत. समाजमनाचा दांडगा अभ्यास त्यांनी केलेला असतो. मानसशास्त्रही ते कोळून प्यालेले असतात. समाजाची नाडी त्यांनी ओळखलेली असते. म्हणूनच त्यांच्या सत्संगांना हजारो लाखोंच्या संख्येने गर्दी होते.

प्रत्यक्षात बुवा, बाबा काय करत असतात, याचा अभ्यास केला तर काय चित्र दिसते? या देशात संतांनी धर्माच्या माध्यमातून मानवतेचा व करुणेचा मार्ग सांगितला व कृतिशील आचरून दाखवला. माणसांना आपल्या भजनी लावणारे बुवा, बाबा, स्वामी, महाराज हे संत साहित्याचा वापर आपल्या सोईसाठी करतात; मात्र मुखातून संतांच्या शब्दांचा कोरडा उद्‌घोष करणारी ही मंडळी प्रत्यक्ष वर्तनात कमालीची मतलबी असतात असे दिसते.

साधुसंतांनी अनेकवार सांगितले आहे, की सिद्धी-चमत्कार यांच्या जाळ्‌यात जो अडकेल, त्याचे अध:पतन होईल. जो चमत्कार करून शिष्य गोळा करतो त्याचा संत वाङ्‌मयात धिक्कार आहे. चमत्कार करणा-या गुरूचे तोंड पाहू नये असे वारंवार सांगितले आहे. हातातून सोन्याच्या साखळ्‌या सहजपणे आणि अनेक वेळा निर्माण करणा-या सत्यसाईबाबांना अद्‌भूत शक्ती आहे असे क्षणभर मानू या. तरी असा प्रश्न विचारावाच लागेल, की कर्जबाजारी बनलेल्या भारतासाठी सत्यसाईबाबांनी काय केले? एखाद्या वर्षी पाऊस न पडल्याने प्रचंड दुष्काळ पडतो, तर कधी प्रचंड पावसाने महापूर येतो. कोणीही बाबाने दुष्काळात पाऊस पाडून वा पाऊस थांबवून महापूर रोखून दाखवलेला नाही. चमत्कार करण्याचे या मंडळीचे कथित सामर्थ्य त्यांनी कधीही समाजाच्या अगर देशाच्या कामासाठी वापरलेले आढळून येत नाही.

याचा अर्थ एवढाच की, असे सामर्थ्य मुळात अस्तित्वातच नसते आणि बाबा, बुवांच्याकडे तर ते नसतेच नसते. अशा व्यत्तींच्या नादी लागण्यात कोणाचाच फायदा नाही आणि ते धर्माचे आचरणही नाही.

माणसे धार्मिक प्रवृत्तीची असल्यामुळे बुवाबाजीच्या मागे लागतात हे खरे नाही. प्रत्येकाला काही ना काही लाभ हवा असतो. कुणाला नोकरी हवी असते, कुणाला बढती हवी असते, कुणी काळाबाजार करून अडकलेला असतो. बहुतेकांना विविध प्रकारची पापकृत्ये आपण करत आहोत याची टोचणी सद्‌सद्‌विवेकबुद्धीमुळे लागलेली असते. पाप करणे न सोडता, पापामुळे जो लाभ असेल तो लाभ न सोडता जर स्वत:च्याच विवेकबुद्धीच्या टोचणीतून मुक्त व्हावयाचे असेल तर बाबा, बुवा, स्वामी यांना शरण जाण्याइतका दुसरा सोपा मार्ग नाही. त्यातच बाबा चमत्काराने स्वत:च्या दैवी शत्तीचा करिश्मा दाखवत असेल किंवा उच्च आध्यात्मिक उद्‌घोष करत असेल तर तो अधिकच जवळचा वाटतो. नेमके याउलट नैतिक या अर्थाने धार्मिक प्रवृत्ती नसल्याने व बाबांचे भक्त बनल्यामुळे आपल्या भ्रष्टतेला संरक्षण मिळेल, अशी आशा वाटत असल्यामुळे लोक बुवाबाजीच्या मागे लागतात. भ्रष्ट मानसिकता बुवाबाजीच्या माध्यमातून पोसली जाते.

भगवी वस्त्रे घातली म्हणजे कुणी संत साधू होत नाही. गळ्यात तुळशीची माळ घालून मिरवणारे, मठ स्थापन करणारे हे भोंदू (साधू-संत) सर्वसामान्य जनतेची फसवणूक करीत आहेत, त्यांच्यापासून साधव रहा. बुवाबाजीचा बाजार मांडणा-या या साधू-संतांना मठ कशासाठी हवा? ऐश्वर्य कशासाठी हवे? परमेश्वराचे-श्रीहरीचे नामस्मरण करा, भक्ती करा, अशी प्रवचने झोडणा-या आणि संपत्तीत-ऐशआरामात लोळणा-या या ढोंगी बुवांचे परमेश्वराशी वाकडेच आहे, याचे भान ठेवा आणि ख-या नारायणाचा शोध स्वत:च घ्या, बाह्यरंगाला भुलू नका, असा उपदेश शाहीर अनंत फंदी यांनी केला आहे. संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, समर्थ रामदासांनीही समाजाला ढोंगी बुवांच्या नादाला लागू नका, फसू नका असे टाहो फोडून सांगितले. पण, बुवाबाजीचा भारतीय समाजाला लागलेला रोग काही बरा झाला नाही.

आध्यात्मिकतेचा दावा करणा-या या बुवा-बाबांचे आणि तत्सम संस्थांचे कारनामे मात्र अगदीच वेगळे वास्तव समोर आणतात. पैसा, पुढारी, प्रेस, गुंड यांच्या आधारे निर्माण केलेली 'आध्यात्मिक' दहशत एवढी असते की त्याबद्दल बोलणे-लिहिणेही अवघड. कृती तर दूरच. कोणाच्या आश्रमातील मुलांचे खून होतात. कुणाचे माजी शिष्य खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुरूच्या विरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल करतात. कुंडलिनी जागृत करून आध्यात्मिक उन्नती घडवून आणणा-या कुणा 'बाबा,बुवा,माताजीं'ना आव्हान दिले की त्यांचे भक्त आव्हान देणा-याला बेदम मारहाण करतात.

20 व्या-21 व्या शतकात सुशिक्षितांची संख्या वाढली. विज्ञान युगाने भौतिक सोयी-सुविधा वाढल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार झाला. पण, भारतीय समाजाचे मन मात्र 16 व्या-17 व्या शतकातच घोटाळत राहिल्याने, भारतात भगव्या वेशात जनतेची राजरोसपणे फसवणूक करणा-या, आपण स्वत:च परमेश्वर-भगवान आहोत, असे सांगणा-या भोंदू-लबाड साधूंचे पीक अमाप वाढले. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बुवाबाजीचा हा धंदा फोफावला. गेल्या काही वर्षात उपग्रह वाहिन्यांच्या प्रसारामुळे या भोंदूंचे महात्म्य अधिकच वाढले. काही बुवा तर उपग्रह वाहिन्यांवरून आपले दर्शन घेतले तरीही आपली कृपादृष्टी भगतावर राहील, असा प्रचार करायला लागले आहेत. बुवाबाजीचा हा धंदा अधिक बोकाळायला लाचखोर, काळेधंदेवाले आणि राजकारण्यांचाही कृतिशील हातभार लागला आहे. पंतप्रधानांपासून ते राज्यातल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सत्ताधिशांच्या रांगा काही बुवांच्या दारात लागल्याचे जनतेला पहायला मिळाले होते. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपर्थीचे श्री सत्य साईबाबा हे स्वत:ला साई बाबांचे अवतारच समजत असत. त्यांच्या कोट्यवधी भक्तांचाही श्री सत्य साई हे साक्षात परमेश्वरच असल्याचा अपार विश्वास होता. पण, हे सत्य साई शारीरिक व्याधीने पुट्टपर्थीच्याच रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावरही ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तज्ञांचे त्यांना वाचवायचे सारे उपाय थकले तेव्हा त्यांनीही, आता सत्य साईसाठी परमेश्वराची प्रार्थना करा, असा सल्ला त्यांच्या भक्तांना दिला होता. त्यांचे कोट्यवधी भक्तही आमच्या या देवाच्या अवताराला बरे कर, अशा सामूहिक प्रार्थना करीत होते. पण, जगातल्या माणसासह सर्व प्राणीमात्रांना मृत्यू अटळ आहे, हे सत्य मात्र खुद्द श्री सत्य साई आणि त्यांच्या भक्तांना मान्य नसावे. आपण इतकी वर्षे जगणार, असे योगी पुरुषही सांगत नाहीत. पण सत्य साई मात्र आपण इतकी वर्षे जगणार असे भक्तांना सांगत होते म्हणे!

शिर्डीचे साईबाबा कृतिशीलपणे संन्याशी-फकीर होते. ते द्वारकामाईत रहायचे. चार घरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत. त्यांच्या मालकीची काहीही संपत्ती नव्हती. अंगावरची वस्त्रे फाटकीच असत. डोक्याला कफनी आणि ठिगळांचा अंगरखा, उशाला मातीची वीट, खांद्याला झोळी एवढीच त्यांची मालमत्ता होती. त्यांनी कधीही कुणाकडे काहीही मागितले नाही. या विश्वाचा परमेश्वर ("सबका मालिक एक') एकच आहे आणि मानवता हाच खरा धर्म आहे, अशी शिकवण त्यांनी जीवनभर दिली. त्यांच्या दरबारात लहान-मोठा, श्रीमंत-गरीब असा काही भेदभाव नव्हता. मेघराजाप्रमाणे सर्वांवरच ते कृपेचा वर्षाव करीत राहिले. त्याच साईबाबांचा आपण अवतार आहोत, असे पुट्टपर्थीच्या श्री सत्य साईंनी स्वत:च जाहीर केले होते. आपल्या श्रीमंत आणि मर्जीतल्या भक्तांना ते हवेतून सोन्याच्या साखळ्या, मनगटी घट्याळे, किंमती वस्तू काढून द्यायचा चमत्कार करून दाखवित असत. त्यांनी हवेतून काढलेली घड्याळे नामांकित कंपन्यांची असत. या चमत्कारामुळे त्यांचा लौकिक देशात-विदेशातही वाढला. त्यांच्या दर्शनासाठी राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत रांगा लागायला लागल्या. लाखो भक्तांना दर्शन देणारे त्यांचे दर्शन सोहळे गाजायला लागले. या प्रतिपरमेश्वराचे गुणगाण गाणा-यांची संख्या वर्षोनुवर्षे वाढतच गेली. पण शेवटी काय झाले? रुग्णालयात कठीण यातना सहन करीत सर्वकाही येथेच सोडून गेले. मात्र गेल्यावरही त्यांच्या संपत्तीवरुन वाद सुरु आहेत. मठात चो-या होत आहेत.  त्यांच्या महानिर्वाणाच्यावेळी त्यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टची मालमत्ता पन्नास हजार ते सत्तर हजार कोटी रुपयांच्या वर असल्याचा अंदाजही व्यक्त झाला. रुग्णालये, मठ, मंदिरे, महाविद्यालये, विद्यापीठ असा प्रचंड विस्तार श्री साईंच्या ट्रस्टने केलेला होता. ते जिवंत होते तोपर्यंत पुट्टपर्थीत दररोज हजारो भक्तांची रीघ लागत असे. त्यांच्या महानिर्वाणानंतर ट्रस्टने त्यांचे वास्तव्य असलेल्या आश्रमातच, त्यांची समाधी बांधली. शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीला दर्शनासाठी झुंबड उडते तशीच प्रचंड गर्दी श्री सत्य साईंच्या समाधीच्या दर्शनासाठी होईल, हा विश्वस्तांचा अंदाज मात्र साफ धुळीला मिळाला. त्यांच्या निर्वाणानंतर पुट्टपर्थीचे महात्म्य संपले. गर्दी ओसरली आणि हे शहर ओसाड झाले. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या प्रशांती निलायममधील, त्यांच्या वास्तव्याची कुलूप ठोकलेली खोली अलिकडेच विश्वस्तांनी उघडली तेव्हा, तिथली अफाट संपत्ती पाहून उपस्थितांचे डोळे अक्षरश: पांढरे झाले. 98 किलो सोने, 300 किलो चांदी, अकरा कोटी रुपयांची रोकड, कोट्यवधी रुपयांची जड-जवाहिरे आणि रत्नांचा हा खजिना कुबेराला लाजवील असाच होता. पाच मोटारीतून ही संपत्ती बॅंकात ठेवण्यासाठी नेण्यात आली. केवळ स्पर्शाने अत्यंत दुर्धर आजार ब-या करणा-या, हवेतून वस्तू निर्माण करणा-या, विविध चमत्कार घडवणा-या, सत्य साईंनी ही संपत्ती कशासाठी आणि कुणासाठी जमवली? याचीच चर्चा सध्या रंगली आहे. गडगंज संपत्ती जमा करणा-या या कुबेर साधूला जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संपत्तीच्या मोहातून मुक्त होता आले नाही. विरक्ती, निर्मोहीपणा आणि संग्रहाचा त्याग हे साधूचे मुख्य लक्षण. पण, यातले काहीच सत्य साईंच्याकडे नसल्याचे त्यांनी जमवलेल्या व्यक्तिगत अफाट संपत्तीने जगासमोर आले. लोकांचे कोटकल्याण करणारे सत्य साई संपत्तीच्या मोहातून सुटलेले नव्हते. त्यांच्या खोलीत नामवंत कंपन्यांची घड्याळे, सोन्याच्या साखळ्या आणि अन्य वस्तूंचा खजिनाही सापडल्यामुळे, याच वस्तू ते हातचलाखीने भक्तांना देत असावेत, या शंकेला बळकटी येते.

यासाठी गाडगेबाबांसारखे चांगले उदाहरण शोधून सापडणार नाही. अंगठेबहाद्दर बाबांनी लाखो रुपये जमविले, खर्च केले. पै न् पै चा हिशोब चोख ठेवला. आयुष्यभर त्यांची स्वत:ची मालमत्ता होती ती फक्त अंगावरच्या चिंध्या, हातातली काठी आणि डोक्यावरचा खापराचा तुकडा. 'विनोबा' नावाचा बाबा बारा वर्ष अखंड भारत पायी चालत हिंडला. लाखो एकर जमीन त्याने नैतिक आवाहनातून मिळवली, वाटली. स्वत:ची मालमत्ता शून्य. गांधीबाबा उघड्या अंगानेच जगला. खवळलेल्या लक्षावधींच्या जनसमुदायात नि:शस्त्र घुसून त्यांच्याशी संवाद साधण्याची क्षमता त्याने दाखवली. कोट्यवधींची मालमत्ता जमवणारे, विश्वस्त निधी मुठीत ठेवणारे, विरोधकांना ठोकून काढण्याची चिथावणी देणारे, स्वत:साठी झेड दर्जाची सुरक्षा मागणारे अशा आध्यात्मिक(?) बाबांचा संयम, सदाचार, साधेपणा, अपरिग्रह, शुचिता, पावित्र्य या ख-या आध्यात्मिक कसोट्यांशी संबंध काय? याचा शोध घेतला तर या मंडळींचे वस्त्रहरण लवकर व स्पष्ट होऊ शकते. गेल्या काही वर्षात देशात मोठ्या साधूंनी मठांची स्थापना करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. साधूला पैसे कशाला हवेत? सर्वसंघ परित्याग केलेल्या बुवांना संपत्तीचे हे प्रदर्शन कशासाठी दाखवावे लागते? याचा विचार आता जनतेनेच करायला हवा.

No comments: