Friday, July 2, 2010

रिमिक्स! चा धांगडधिंगा

भोर भये पनघट पे...मोहे नटखट श्याम सताये....हे सत्यम शिवम्‌ सुंदरम्‌ या चित्रपटातील झीनत अमान वर चित्रीत केलेलं गीत. त्या गाण्यातल्या आवाजातलं, नृत्यातलं आणि नायिकेच्या कुरूपतेतलं सौंदर्यही पहाताना एक वेगळंच सुख मिळत होतं. पण या गीताचं केलेलं रिमिक्स, त्या गाण्यावर नृत्य करणारी इशा कोपीकर आणि एकूणच चित्रीकरण पहाताना या आधुनिकतेला आम्ही स्विकारायचं की नाही? हा प्रश्न मनात निर्माण होतो.

आज रिमिक्सने घातलेला धुमाकूळ श्रवणीयही नाही की पहाण्याजोगाही नाही. अनेक नामवंत गायकांच्या मते रिमिक्स गाणं हे आम्हाला आव्हान असतं. ते आम्हाला स्विकारणं भाग आहे. पण पुढे त्या गाण्यावर होणाऱ्या चित्रीकरणाला आम्ही जबाबदार नसतो. पण तरिही जुन्या गाण्यांच रिमिक्स नेमकं कशासाठी केलं जातय हेच समजत नाही. बदलत्या काळाबरोबर या क्षेत्रातील तंत्र,यंत्र सारं काही बदललं. पण ही अशी गाणी पाहिली की याला आधुनिकता म्हणायचं का? जी कला इतरांसमोर पहाताना मान खाली घालावी लागते. एवढंच काय पण या गाण्यांवर ताल धरून शाळा-महाविद्यालयांमध्ये नाचणारी मुलं-मुली पाहिली की त्यांच अजबच वाटतं. नृत्य ही एक कला आहे. पण याचा बाजार मांडल्यासारखं वाटतं. बुगी-वुगी सारख्या नृत्याच्या कार्यक्रमात अनेक लहान मोठ्या मुला मुलींना सहभागी होता येतं. मात्र या वयाला शोभेल अशा गाण्यांवर नृत्य करणारी मुलं इथे अभावानेच पहायला मिळतात.

अर्थात दिलबर.... दिलबर...हां...दिलबर...दिलबर...होश ना खबर है...कैसा असर है... तुमसे मिलने के बाद दिलबर...या गाण्यावर तर शेफाली मन लावून, पुरेसे लटके झटके देत गाण्यावर नृत्य करत होती. नृत्य कसलं ते शरीराच्या इतरांना आकर्षक करण्याच्या चमत्कारिक हालचाली करत होती. तिला आणि तिच्या वयाला न शोभेल अशाच काहीशा या हालचाली आहेत. शेफालीचं वय होतं नऊ वर्षे आणि तिचं नृत्य होतं पंचवीस वर्षाच्या तरुणीला शोभणारं आणि विशेष म्हणजे तिच्या या नृत्याला तिच्या घरच्यांंनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली. नृत्य ही एक सौंदर्यपूर्ण कला आहे यात शंका नाही पण शेफाली ज्या काही शारीरिक हालचाली, उत्तेजक असे तिच्या वयाला न शोभणारे हावभाव करत होती, ते किती योग्य होतं? आणि तिच्या घरच्यांनी अशा गोष्टींना प्रोत्साहन द्यावं, हे किती योग्य? अर्थात या साऱ्या गोष्टींच भान प्रत्येक मुलांच्या पालकांनी ठेवणं गरजेचं आहे. एवढंच काय पण बुगु वुगी मेकर जावेद जाफरी यानेही इथे सहभागी होणाऱ्यांनी आपल्या वयाला शोभेल अशीच गाणी नृत्यासाठी निवडावी. तसेच आपल्या पालकांच्या संमत्तीशिवाय गाणं निवडू नये असेही सुचित केले होते.

आजकाल मोठ्यांच्या नृत्याची नकल करून शाबासकी मिळवायची, विविध स्पर्धात्मक कायर्र्क्रमात भाग घेऊन टॅलेन्ट सिद्ध करायचं फॅड चालवणे शिवाय रिमिक्सच्याा नावाखाली जो काही अश्लील हंगामा चाललाय, त्याची बीजं छोट्यांच्या मनात रुजू घातलीयत आणि आईवडील कौतुकाचं खतपाणी घालून या विषारी वृक्षाला जगवताहेत, असं काहीसं चित्र आज दिसतंय. रिमिक्सच्या नावावरही आज अनेक रिमिक्स गर्ल निर्माण झाल्यात. केवळ प्रसिध्दी आणि पैशाच्या हव्यासापायी पुढे येवून अशा अश्लिल चित्रीकरणास तयार होतात. पण यांच्या मातांनाही यांच्या या कलेचा अभिमानच असतो.

कोणतंही गाजलेलं गाणं घ्यायचं, त्यातल्या मूळ संगीताला हटवून धांगडधिंगा करणाऱ्या संगीताची जोड द्यायची, काहीही करायला तयार असलेल्या दोन-चार नव्या मुली घ्यायच्या आणि छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालायचा हा नवा ट्रेन्ड आहे. रिमिक्सचा हा हंगामा एखाद्या सत्‌प्रवृत्तीच्या माणसाची वृत्तीही चाळवेल आणि चळेल असाच असतो. हा तमाशा आपल्या घरातल्या मुला-मुलींच्या नजरेला पडतोच. त्यांचं वय लहान असल्यानं त्यांच्यावर अश्लील दृश्यापेक्षा ठेका धरायला लावणारं संगीत, त्या मॉडेलची केशभूषा, वेषभूषा हे सगळं ठसतं. अशा नृत्याचा समोरच्यांच्या मनावर काय परिणाम होतो हे कळण्याची समज, भावनिक कुवत त्यांच्यात नसते त्यामुळे तसेच लटके-झटके देऊन नृत्य करण्याचा प्रयत्न केला जातो. खरंतर इथंच सावध राहिलं पाहिजे.

मुला-मुलींना अशा नृत्याचं अनुकरण करण्यापासून रोखणं हे आपलच काम आहे. अशी चॅनल त्यांना बघू न देणं, चुकून पाहिलीच तर त्यांना अनुकरणापासून परावृत्त करायचं सोडून अगदी तीे शेफालीसारखी किंवा इशा कोप्पीकर सारखी नाचते ना! म्हणून कोैतुक करणं, हे हल्लीच्या मातांना अधिक आवडतं. मुलांच्या कलेला प्रोत्साहन द्या, कलेच्या नावाखाली होणाऱ्या अश्लितेला प्रोत्साहन देवू नका..

परवाच एका चॅनलवर दिल्लीच्या एका "बझार'मध्ये छोट्या छोट्या मुलांचा वापर ब्लू फिल्मस्‌च्या विक्रीसाठी केला जात असल्याचं दाखवलं. पेपरविक्रीच्या बहाण्यानं या मुलांना बसवलं जातं. अंगावरच्या कपड्यातून या सीडी लपवलेल्या असतात. माहितगार किंवा शोधक बी. एफ्‌. है क्या, असं विचारल्यावर मुलं या सीडी काढून देतात किंवा बाहेर फिरत असणाऱ्या मुलांकडूनही या सीडी खपवल्या जातात.

किती भयंकर आहे हे सगळं! ज्या वयात गोष्टी ऐकायच्या, खेळ खेळायचे, पुढच्या सगळ्या आयुष्याचा पाया भक्कम करायचा त्याच नकळत्या वयात तरुण वयातल्या भावनांची आवर्तनं उठू लागली आहेत. त्यांना तारुण्यातल्या सगळ्याच गोष्टींची जाणीव करून देणाऱ्या वाटा उपलब्ध करून दिल्या जाताहेत. छोट्यांच्या कोमल भावनांच्या जगातही आता "रिमिक्स' घुसलंय ते असं. भावनांची घातक सरमिसळ होतेय.

आपण कुठे कुठे पुरे पडणार आहोत असा प्रश्न सुजाण पालकांसमोर आ वासून उभा आहे. मला वाटतं, निदान आपल्या घरातल्यापुरती आपण या गुंत्याची उकल करायला लागूया. वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो, असं म्हणतात. मुलांच्या कोमल भावनांच्या जगात तारुण्याचं... वासनेचं "रिमिक्स' आताच घुसू नये म्हणून त्यांच्या मनाची मुळं साफसूफ करायला लागूया. नको ती बांडगुळं वेळीच कापून काढूया. एकदा मनाची योग्य मशागत झाली की, निरोगी बीजं रुजायला वेळ कुठे लागतो?

No comments: