Friday, July 2, 2010

रस्त्यांमुळेच भारताचा विकास खुटंला!

भारत आजही दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत राष्ट्रांमध्ये का गणला जातो? केवळ नैसर्गिक साधनसंपत्ती जवळ असल्याने राष्ट्राची उन्नत्ती साधता येत नाही. तर ती साधण्यासाठी तेथील रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. आपल्याकडे आज रस्त्यांची जी दयनीय परिस्थिती आहे तीच परिस्थिती भारताच्या आर्थिकतेबाबत करता येईल. अमेरिका हे राष्ट्र सर्वच बाबतीत संपन्न आहे. का? तर तेथील रस्ते चांगले आहेत. म्हणजेच दळणवळणाच्या सुविधा चांगल्या आहेत. म्हणून ते राष्ट्र संपन्न आहे.
मुंबईतील, महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील रस्त्यांचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की देशाची प्रगती ही या खड्‌ड्यांमध्ये अडकली आहे. रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठी होणारी आर्थिक तुट कोणाच्याच लक्षात येत नाही असे नाही पण महाराष्ट्रातील जनतेला आता खड्ड्यातून प्रवास करताना लागणारा झटका अनुभवण्याची सवयच झाली आहे. तसं पाहिलं तर रस्ता हा फार महत्वाचा घटक नसला तरी अशाच अनेक बाबींचे महत्व दुर्लक्षित झाल्याने त्याचा एकत्रित परिणाम हा या राष्ट्रावर होतोय. राष्ट्राला विकासाकडे नेणाऱ्या सत्ताधारी मंडळींची दृष्टी सूक्ष्म असावी लागते. आतापर्यंत या सत्ताधाऱ्यांना हे खड्डे कसे दिसले नाहीत? की, दिसुनही आंधळ्याचं सोंग घेतलं जातंय. ही अशी सोंग करण्यापेक्षा राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलले असते तर आतापर्यंत आपले राष्ट्र विकसित देशांमध्ये गणले गेले असते. विकसित राष्ट्रांनी आपला पाया मजबुत केला. त्या राज्यकर्त्यांनी हेच सर्वोच्च ध्येय समोर ठेवले. म्हणूनच विपरित परिस्थितीवर मात करून त्यांंनी देशाचा विकास साधला. मात्र आज आम्हाला येथील रस्ते म्हणजे क्षुल्लक बाब वाटते. स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतरदेखील आम्ही काहीच शिकलो नाही. स्वप्न पाहिली, परंतु ती कशी साकारायची याचं ज्ञान नाही. ही स्वप्न साकार करणारे निघुन गेले. पण जे घडवू शकतात त्यांनाच आम्ही ओळखू शकलो नाही.

चीन सारखा मागासलेला देश प्रगतीपथावर पोहोचू शकतो, मग आम्ही का नाही? हा साधा विचार केला तर आपली चुक आपल्या लक्षात येईल. आज चीन सर्वच बाबतीत आपल्या पुढे आहे. का? तर त्यांनी आधी आपला पाया मजबुत केला. रस्ते, वीज आणि पाणी यासारख्या पायाभूत सुविधांचे जाळे देशभर निर्माण केले. मनुष्यबळाचा योग्य उपयोग करीत विकास साधला. अर्थात हे सारं काही अगदी सहज साध्य झाले नाही. पण आज अमेरिकेसारख्या देशाला आव्हान देणारा देश म्हणून चीनकडे पाहिले जाते. आम्ही रस्ते, वीज, पाणी या अभावी आमचा पायाच डळमळीत ठेवला. तोच मजबुत केला नाही आणि आम्ही आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न रंगवतोय. आमचे रस्ते हेच खरे आमचे दारिद्रय आहे. विजेचा तुटवडा आणि पाणी म्हणाल तर देशातील अर्ध्या अधिक जनतेची तहानही भागवू शकत नाही. पण तरीही आम्ही मुंबईचे शांघाय, कोकणचा कॅलिफोर्निया आणि देशाचे सिंगापुर करण्याची स्वप्न जनतेला दाखवतोय. कसले सिंगापुर आणि कसले शांघाय? अशी वल्गना करणाऱ्यांनी सिंगापुर हा सिंगापुर का आणि कसा झाला याचा थोडा अभ्यास करावा, म्हणजे मग डोळे उघडतील. पण तोपर्यंत जगाने अधिकाधिक प्रगती केलेली असेल. आपला देश सिंगापुर होईल तेव्हा अमेरिका, चीन या राष्ट्रांनी मंगळावर राज्य केलेले असेल. आपला देश संपन्न होता, या देशात सोन्याचा धूर निघत होता. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी या सूत्रांचे पालन होत असे. पण आज उत्तम नोकरी असली तरी सारं काही कनिष्ठच. जेथे नोकरी करायची त्या कारखान्यातुनच काळा धूर नाहीसा झाला तर सोन्याचा धुर निघणार कुठून. शेतकऱ्याची सरकारला गरज आहे पण त्याच्या सुखसोयींकडे मात्र सरकार दुर्लक्ष करते. जोपर्यंत सरकारची साथ शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत देशाचा विकास साधणं कठीण आहे. देश चालतो तो कराद्वारे मिळणाऱ्या पैशातून. शेतकरी-उद्योजक देशाचे पोशिंदे आहेत. पण त्याचा विचार सरकार किती करतोय. केवळ भरमसाठ कर लादून त्यांच्या माना त्यात अडकवून सरकार गप्प बसलंय. देशातील मोठमोठे उद्योजक आपापल्या परीने देशातील जनतेच्या सुख सुविधांचा विचार करत असले तरी आधी आपली तिजोरी कशी भरेल याकडेच त्यांचेही लक्ष लागलेले असते. म्हणूनच शेतकरी हा तुमच्या स्वप्नांचा आधारस्तंभ आहे, हे स्तंभ जोपर्यंत मजबुतीने उभे होत नाही तोपर्यंत भारताचे स्वप्न साकार होणार नाही. मुंबईचे शांघाय आणि देशाचे सिंगापुर, कॅलिफोर्निया करण्याची स्वप्न बाजुला ठेवा, शांत, स्वच्छ आणि सुखकर मुंबई मुंबईकरांना कशी अनुभवता येईल यावर लक्ष केंद्रीत करून मग राज्यातील गावांचा आणि त्यापाठोपाठ संपूर्ण देशाचा विकास साधायला हवा. त्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना गांभिर्याने प्रयत्न करायला हवेत. परंतू ते मात्र स्वत:च्या तुंबड्या भरण्यात मग्न आहेत. त्यांना जाब विचारणार कोण?

No comments: