Friday, June 25, 2010

जाहिरातीच्या युद्धात सर्वसामान्य बेजार!

निवडणुकीत उभा राहिलेला उमेदवार असो कि एखादी नवीन उत्पादक कंपनी असो, ते स्वत:ची प्रसिद्धी इतकी तिखटमीठ लावून करतात की सर्वसामान्य माणूस नेमके काय करावे या विवंचनेत पडतो. निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराची जाहिरातबाजी फळाला येवून तो आमदार वा खासदार बनतो. पेट्या-खोके देऊन मंत्री बनतो. अशा या जाहिरात युगाला आपण काय म्हणावे? प्रसिद्धी दिल्याशिवाय आता कुठलाच उद्योगधंदा तग धरू शकणार नाही असे म्हणायचे का? कोणत्याही शहरात किंवा रस्त्यावरून फेरफटका मारला तरी विविध प्रकारच्या जाहिराती, राजकारण्यांचे मोठ मोठाले बॅनर, विविध कंपन्यांच्या उत्तान व श्रृंगारीक होर्डींग्ज नजरेस पडतात. कितीही नाही म्हटले तरी आपली नजर त्या जाहिरातींवर खिळून राहतेच. उत्पादनाशी काडीचाही संबंध नसलेल्या उत्तान आणि अश्लिल मॉडेल वापरून जाहिरातीचे मोठे होर्डिंग कशासाठी लावतात? मागे काही संस्कृती रक्षकांनी असल्या उत्तान आणि अश्लिल जाहिराती काढून टाका म्हणून मागणी केली होती. परंतु सरकार दरबारी जाहिरात कंपनीवाल्यांचे वजन असल्याने त्यांचे कोणीही काहीही वाकडे करू शकले नाही. आज अशा जाहिराती सर्वत्र दिमाखात दर्शन देत उभ्या आहेत.

आजचे एकविसावे शतक जाहिरातबाजीचे आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. जिथे पहावे तिथे उत्पादनांच्या जाहिरातीच दिसतात. मोठ-मोठ्या इमारती कार्यालयांच्या भिंती आणि रस्ते भडक रंगात रंगविलेले दिसतात. दूरचित्रवाहिन्यांवरूनही जाहिरातींचा प्रचंड मारा विविध कंपन्यांकडून सातत्याने सुरू असल्याने ग्राहक राजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. आपल्या मालाला उघड प्रसिध्दी दिल्याने ग्राहक आकर्षित होऊन आपल्या उत्पादनाचा खप वाढेल आणि प्रचंड फायदा होईल असे कंपन्यांचे समीकरण असते. अनेकदा एखाद्या उत्पादनाची किंवा चित्रपटाची अफाट जाहिरात केली जाते. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांचा मोठा अपेक्षाभंग होतो. एखाद्या पदार्थाची हॉटेलवाले खमंग जाहिरात करतात. प्रत्यक्षात मात्र हॉटेलात जावून ते पदार्थ खाल्याशिवाय कळत नाही. परंतु या हॉटेलात गेल्याने हॉटेलवाल्यांचा मात्र फायदाच होतो. सर्वत्र जाहिरातींचाच जमाना असल्याने कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ग्राहकांना लुबाडण्याचे सारे प्रयत्न उत्पादक करीत असतात. जाहिरातीच्या या प्रचंड स्पर्धेमुळे वृत्तवाहिन्यांना त्याचा आयताच लाभ होतो. आज टिव्ही माध्यमाच्या विविध वाहिन्यांवरून निरनिराळ्या उत्पादनाच्या जाहिराती पाहून ग्राहकांनी काय घ्यावे काय नाही असा प्रश्न पडतो. सौंदर्यप्रसाधने, साबण, वॉशिंग पावडर, टुथपेस्ट आणि कफ सिरप सारख्या औषध कंपन्यांनी जाहिरातींद्वारे ग्राहकांना आकर्षित केले आहे. बॅंका, सिमेंट कंपन्या, आयुर्विमा आणि चित्रपट या सर्वच क्षेत्रांनी आज विविध वाहिन्यांवरून आपल्या खपासाठी, प्रसिध्दीसाठी नुसता धडाका लावला आहे. आताचे जाहिरातीचे युग आहे हे ठिक आहे परंतु या जाहिरातींना सुध्दा काही नियम, कायदेकानुन आहेत की नाहीत? ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी किती खोटे बोलायचे, किती प्रकारची आमिषे त्याला दाखवायची? याचा तरी विचार करायला हवा. याच्यावर कोणीतरी अंकुश ठेवायलाच हवा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रचंड अशी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. थांबला तो संपला असे म्हणत बाजारपेठेत नव्या फॅशनच्या व नवनविन मॉडेलच्या वस्तू उत्पादने येत आहेत. ज्यांच्या हाती पैसा आणि संपत्ती आहे त्यांना वस्तू खरेदी करणे म्हणजे काहीच वाटत नाही. नव श्रीमंतांची, धनदांडग्यांची ही खरेदी सर्वसामान्यांना परवडणारी नाही. बेसुमार वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे. कंपन्या जाहिरातीच्या या भडक व रंगीबेरंगी जाहिराती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात आणि हे पैसे ते ग्राहकांकडूनच वसूल करतात. म्हणूनच या कंपन्यांनी जाहिरात करून कितीही आपले उत्पादन चांगले असल्याचा आव आणला तरी सर्वसामान्यांना मात्र आपले मेटाकुटीचे जीवन जगताना नाकिनऊ आले आहे. कारण जाहिरातीचा खर्च भरून काढण्यासाठी उत्पादनाची किंमत वाढविल्याने जाहिरातीच्या युद्धात सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे.

No comments: