Tuesday, July 7, 2009

देवस्थान, दर्शन आणि भक्तांच्या भावना!

आज कुठलेही देवस्थान असू दे. भक्तांच्या भावनेला तिलांजली देऊन त्याठिकाणी अक्षरश: बाजार मांडल्याचे दिसून येते. पण बोलणार कोण? दर्शनासाठी पासची सोय, त्यामधून पैसे कमवायचे! अभिषेकासाठी पैसे द्यायचे! नारळ, हार-फुले वाहण्यासाठी भक्तगण उदार मनाने देवाच्या नावाने पैसे खर्च करतो. परंतु नारळ देवाला अर्पण होतच नाही. हार-फुले देवापर्यंत पोहचत नाहीत. बरं, निदान दर्शन तरी सुखाने घ्यावे तरीही तेथील सुरक्षारक्षक आणि बडवे मंडळी धक्काबुक्की करून भक्तांना अक्षरश: ढकलून मंदिरातून हाकलून बाहेर काढतात. यासाठीच भक्तमंडळी मंदिरामध्ये तासन्‌तास रांगेत उभी असतात काय? या मंदिरांमधील प्रशासनाला आणि उर्मट व्यवस्थापनाला जाब कोण विचारणार? देवाच्या नावाने चाललेला हा सावळागोंधळ कोण थांबवणार? भक्तांनीच याचा गंभीरपणे विचार करायला हवा अन्यथा विश्र्वस्तांचा मनमानी कारभार असाच सुरू राहिल्यास काही वर्षांनी या मंदिरामधून प्रत्येकालाच पैसे मोजून दर्शन घ्यावे लागेल आणि त्यावेळी "नाही खर्चिली कवडी-दमडी, विकत घेतला शाम' ऐवजी खरोखरच रुपये खर्च करून देव दर्शन घ्यावे लागले तर आश्र्चर्य वाटायला नको!
काही लोक दर्शनासाठी पायी चालत जातात. म्हणून आम्हीही जातो. पुढे हीच फॅशन बनते. काहीजण दर्शनासाठी जातात मात्र पैसे देऊन दर्शन घेतात. काहीजण हार-फुलांसाठी शे-पाचशे रुपये खर्च करतात. काहीजण विश्र्वस्तांच्या ओळखीने जातात. तर कसेही करून दर्शन घ्यायचेच या इर्षेला पेटलेले काही भाविक रांगेत मध्येच घुसतात. या भक्तांमध्ये हौसे, गवशे, नवशे असे प्रकार असतात. काहीजण फक्त एन्जॉय करायला म्हणून हल्ली मंदिरांमधून येतात. दोन दिवसांची सुट्टी आहे ना मग चला शिर्डीला, अशा भावनेतून दिवसेंदिवस धार्मिकस्थळांना भेटी देणाऱ्यांमध्ये वाढ होत आहे. परंतु धार्मिक स्थळांना भेटी देतेवेळी, देवाचे दर्शन घेतेवेळी आपले मन प्रसन्न असावे. दर्शनासाठी काय करावे, काय करू नये, दर्शन कसे घ्यावे याची कोणीही पर्वा करीत नाहीत. अशाने "मनी नाही भाव, देवा मला पाव' देव पावणार कसा?या देवदर्शनाने आपले कल्याण होईल, असे कोणीतरी सांगतो. मग त्या देवाकडे सर्वांचीच रांग लागते. आम्हाला नक्कल करायला फार आवडते आणि ही आवड पुरविण्यासाठी आम्ही आमची सारासार विवेकबुद्धी पूरती भ्रष्ट करून घेतो. आमचे आचार, विचार, आहार आणि विहार कसे असावे याची पूर्वजांनी मांडून दिलेली चौकट आम्ही मोडीत काढली आहे. वेदांसारख्या महान ग्रंथांचा वारसा लाभूनही या ठेव्याचा उपयोग करणे आम्हाला जमत नाही. उज्ज्वल ध्येय, त्याच्या प्राप्तीसाठी करावयाचा त्याग, त्यासाठी धारण करायची निष्ठा या मूल्यवान गोष्टींना फाटा देण्यात आम्हाला धन्यता वाटते. भोग प्राप्तीला सर्वस्व मानून त्यांच्या प्राप्तीसाठी वाट्टेल ती अनितीपूर्ण कर्मे बिनदिक्कत आचरण्याचा कोडगेपणा आमच्यात आला आहे. उच्च ध्येयासाठी झगडणाऱ्या त्यागी आणि सदाचरणी माणसांना आम्ही चक्क व्यवहारशून्य ठरवत आहोत आणि आमच्या भावनांचा व्यापार करून स्वत:च्या तुंबड्या भरण्याचा उद्योग करणाऱ्यांना विरोध न करता त्यांच्या चक्रव्युहात आपणहून शिरत जाणाऱ्या अभिमन्यूसारखे आम्ही वागतो आणि त्यांना अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचतो.
आज देशातील कोणत्याही धार्मिक स्थळांना भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. नुकतेच आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. शिर्डी, तिरुपती, सिद्धीविनायक अशासारख्या देवस्थानांसमोर तर दिवस-रात्र भक्तगण तासन्‌तास रांगेत उभे असतात.
बायका-मुलांसह आलेले भाविक, वृद्ध, अपंग, आजारी, लेकुरवाळ्या आणि गर्भवती महिला आदींना काय त्रास होत असेल याचा विचार कोणीही करीत नाही. दिवसेंदिवस गर्दी वाढत असताना शिर्डीसारख्या संस्थानात दर्शनाची वेळ कमी करण्यात आली. त्यामुळे भक्तांच्या संख्येत वाढ होत असताना दर्शनाच्या वेळेतही वाढ व्हायला हवी. दर्शनोत्सुक भाविकांची गर्दी लोटत असताना अगदी त्याच वेळी मंदिरांचे दरवाजे बंद ठेवणाऱ्या व्यवस्थेत बदल व्हायला हवा.
शिर्डीचे साई संस्थान असो की त्र्यंबकेश्र्वरचे शंकर मंदिर, प्रत्येक ठिकाणी दररोज दर्शन रांगांवरून वाद झालेला पहायला मिळतो. त्यात विशेष अतिथी (व्हीआयपी) पासेसमुळे आणि सेलेब्रिटीजच्या आगमनामुळे सामान्य भक्तांना तासन्‌तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. या रांगामधून जेव्हा दर्शनाची खरोखरची वेळ जवळ येते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक भक्तगणांच्या हातातील देवाला वाहायला आणलेली फुले खेचून घेऊन त्या भक्तांच्या समक्ष कचरा पेटीत टाकतात. शिर्डी येथील साई बाबांच्या पहाटेच्या काकड आरतीला तर भक्त गणांची शुद्ध फसवणूक केली जाते. आरती सुरू होण्यापूर्वी समाधी मंदिरात भक्तगणांना बसण्याची सोय आहे. त्यावेळी सर्वात पुढे बाबांना अर्पण केलेल्या 2-4 शाल-चादर अंथरल्या जातात. भक्तांनी आणलेली फुले त्या चादरीवर गोळा करतात. भक्तांना वाटते की ही सर्व हार-फुले बाबांच्या चरणी अर्पण केली जातील. परंतु काही अवधितच कचरापेट्या आणल्या जातात. आणि भक्तगणांच्या डोळ्यादेखत या चादरींमध्ये गोळा झालेली हार-फुले त्या कचरापेटीत उचलून टाकतात. भक्तांच्या भावनेला हा आकस्मिक मारलेला धक्का भक्तगण बाबांचीच इच्छा म्हणून सहन करतात. परंतु संस्थानचे कर्मचारी व फुल विक्रेत्यांनी मांडलेला हा भक्तांच्या भावनेचा बाजार कोण थांबवणार?
त्यामुळे हिंदू धर्मातील स्वत:च्या उच्च परंपरांना तिलांजली देऊन पवित्र मंदिरांमधून चाललेल्या हा गैरप्रकार थांबविण्यासाठी धर्माचा उदो उदो करणाऱ्या कोणीतरी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा "देखो देखी घेतला जोग। फुटले कपाळ लागला रोग।।' अशी भयावह अवस्था आमच्या वाट्याला येईल. चारित्र्य आणि नीतिमत्तेचे भांडार सामावलेले आमचे उन्नत वाड.मय आणि हिंदू संस्कार वाढविणारे आमचे पवित्र ग्रंथ वाचल्यासच आणि ते आचरणात आणल्यास या अमंगलाच्या अंधाऱ्या गर्तेतून आपण बाहेर पडू शकतो, अन्यथा पाश्चात्यांचे अंधानुकरण करता करता हिंदू संस्कृती लोप पावल्यास दोष कोणाला द्यायचा?

No comments: