Friday, July 3, 2009

ऑनलाईन प्रवेशाला विरोध कोणाचा?

काळ जसा वेगाने वाढतो आहे त्याचप्रमाणे ज्ञानाचा वर्षावही त्याच वेगाने वाढतो आहे. संगणकीय भाषेत म्हणायचे झाले तर आजचे युग हे "व्हर्च्युअल युग' आहे. या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी जागतिक स्तरावर प्रगत होण्यासाठी आणि भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी राज्यात, विशेषत: मुंबईत 11 वी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंमलात आणली. महाविद्यालयांसमोर लागणाऱ्या लांबच लांब रांगा, ऍडमिशनमधील भ्रष्टाचार, ओळखीचा फायदा लाटणाऱ्यांना व दलालांवर अंकुश ठेवण्याच्या मुख्य उद्देशाने शिक्षण मंडळाने यंदा प्रथमच अकरावीच्या प्रवेशासाठी "ऑनलाईन' पद्धतीचा वापर केला.
सर्व राजकीय पक्ष आणि काही स्वयंसेवी संघटनांनी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मदत केंद्रे उभारून चौकाचौकात स्वत:चे फोटो असलेले मोठमोठाले होर्डिंग्ज लावले आहेत. परंतु सर्व्हर जाम झाल्याने व्यत्यय येत असल्याचे निदर्शनास येताच याच बहाद्दरांनी कशाचाही मागचा-पुढचा विचार न करता तोडफोडीला सुरुवात केली. या तोडफोडीमागे दलालांचे तर राजकारण नाही ना, याचाही यानिमित्ताने विचार व्हायला हवा.
नवे काही करताना अडचणी या येतातच. त्या अडचणींवर मात करण्याची खरी गरज असताना तोडफोड करणे ही अतिशय संतापजनक आणि खेदजनक बाब आहे. सर्व्हरवर ताण आल्याने यंत्रणा कोलमडली म्हणून संपूर्ण यंत्रणेलाच दोष देणे चुकीचे आहे. शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनच्या (एमकेसीएल) अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरळीत केली. व्यत्यय येऊनही मुंबईतील 2 लाख 63 हजार 707 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 19 हजार 801 विद्यार्थ्यांनी केवळ दोन दिवसांत अर्जांची नोंदणी केली. यावरून ऑनलाईन प्रवेश पद्धती कितीतरी पटीने चांगली असल्याचे सिद्ध होते. परंतु मुद्दामहून चालत्या गाडीला खीळ घालण्याचा हा डाव नक्की कोणाचा, याचाही तपास होणे अत्यावश्यक आहे.
त्याचबरोबर एकाचवेळी संगणकावर मोठा भार पडणार असल्याने हा भार घेण्याची क्षमता सर्व्हरमध्ये आहे की नाही, नवीन सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी तर नाहीत ना, याची चाचपणी एमकेसीएलने करणे आवश्यक होते. शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जातीने लक्ष दिल्यानंतर या सॉफ्टवेअरमध्ये 14 प्रकारच्या त्रुटी आढळल्या. युद्धपातळीवर प्रयत्न करून या त्रुटी तातडीने दूर करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षण मंडळ आणि एमकेसीएलचे अधिकारी गाफील राहिल्यामुळेच ही यंत्रणा डगमगली हेही निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे या गोंधळाची जबाबदारी एमकेसीएल, शिक्षण मंडळ व सरकार नाकारू शकणार नाही. मात्र या चुकीवर बोट ठेवून संपूर्ण यंत्रणाच चुकीची असल्याचा थयथयाट करणे योग्य नव्हे. आधुनिक जगात टिकण्यासाठी आपल्या शैक्षणिक धोरणातही आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. शिक्षणाची गंगा प्रवाही करून त्याला नवसंजीवनी देण्याची आज खरी गरज आहे. सरकारही त्यासाठी प्रयत्नशील आहे. 11 व्या पंचवार्षिक योजनेत (2007-12) शिक्षण क्षेत्रासाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. जी दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत पाचपट अधिक आहे. त्यामुळे या शैक्षणिक तरतुदीचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा. आजच्या संगणकीय स्पर्धात्मक युगात शैक्षणिक धोरणात आमुलाग्र बदल करायला हवेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया हा सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. भ्रष्टाचार, राजकीय दबाव, पैशाच्या बळापुढे गुणवंतांना डावलून कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, देणग्या उकळणे, दलालांकडून प्रवेश घेणे, यांसारखे गंभीर प्रकार या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे टाळता येणार असल्याने ही प्रक्रिया बारगळण्याऐवजी ती यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी प्रयत्न करायला हवेत. हे पहिलेच वर्ष असल्याने गोंधळ उडाला. परंतू 2-4 वर्षात या ऑनलाईन प्रवेशामुळे ऍडमिशन घेणे अत्यंत सुलभ होईल आणि तेच सर्वांच्या हिताचे असेल.

No comments: