Wednesday, February 2, 2011

घरकाम करणा-या असंघटित कामगारांचा वाली कोण?

मढ येथील एका घरी काम करणा-या 43 वर्षांच्या कुंदा शिंदे या महिलेवर दागिने चोरीचाआळ घेतला गेला आणि मालवणी पोलिस स्टेशनच्या मुनीर शेख या पोलिस निरीक्षकाने कुठलीही चौकशी न करता तिला आणि तिच्या 17 वर्षांच्या मुलीला अटक केली. दोघींना रात्रभर कोठडीत डांबून गुन्हा कबुल करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. या मानसिक धक्क्यातून न सावरलेल्या कुंदा शिंदे हिने कोठडीतच गळफास लावून घेतला. एका महिला कॉन्स्टेबलने हे बघितल्यामुळे कुंदा शिंदेला लगेच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. या घटनेला पुरते पंधरा दिवसही उलटले नाहीत तोच कुंदा शिंदेने जगाचा निरोप घेतला.
तिने आत्महत्येचे पाऊल उचलले याचे कारण आपली पूर्ण अप्रतिष्टा झाली आहे, ही गोष्ट तिला सहन झाली नसावी. पण घरकाम करणाऱ्या बायका, नोकर, रखवालदार अशा लोकांना आत्मप्रतिष्टा नसते, अशीच समाजातील धनदांडग्या, प्रतिष्टितांची समजूत आहे. त्यामुळे लहानशा चुकीसाठीही त्यांची मानहानी करणे, प्रसंगी मारहाण करणे इथवर अनेकांची मजल जाते. घरातल्या वस्तू गहाळ झाल्यावर सरसकट घरातल्या नोकरांना जबाबदार धरण्याचे प्रकार वाढले आहेत. अलीकडे ठाण्यातील एका राजकीय नेत्याच्या घरी चोरी झाल्यावर त्या घरातल्या मोलकरणीवरच आळ घालून तिला पोलिसांच्या ताब्यात दिले गेले. कालांतराने चोरी भलत्याच कुणीतरी केली असून ती महिला निष्पाप असल्याचे सिध्द झाले. अशावेळी त्या महिलेची तिच्यावर आळ घेणाऱ्यांनी माफी मागितल्याचे किंवा झालेल्या नाहक त्रासाबद्दल तिला भरपाई दिल्याचे ऐकिवात नाही. बऱ्याच उच्च मध्यमवर्गीय घरात अल्पवयीन मुली पूर्णवेळ घरकामासाठी ठेवलेल्या असतात. खेडयापाडयातून आलेल्या या गरिबांच्या मुली सुशिक्षित आणि सुप्रतिष्टितांच्या घरी अक्षरश: वेठबिगारासारख्या राबत असतात. शहरातले कामगारांचे रोजगार गेल्यावर त्यांच्या स्त्रिया मोठया प्रमाणावर घरकामासाठी बाहेर पडत आहेत. त्यांच्या वस्तीच्या जवळच उभ्या राहणाऱ्या मोठमोठया टॉवर्समध्ये त्यांना रोजगार मिळतोही, पण त्यांच्या श्रमाला प्रतिष्टा मात्र मिळत नाही. घरकाम करणाऱ्या लाखो महिला या असंघटित कामगारांच्या गटातच मोडतात. या असंघटितांचा वाली कोणीही नसतो. वरचा वर्ग त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण न होऊ देता केवळ त्यांची सेवा घेतो आणि गरज संपताच त्यांना दूर लोटता येण्याचा आपला मार्ग शाबूत ठेवतो. उपद्रवमूल्य शून्य असणाऱ्या या असंघटित सेवेकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याची पोलिसांचीच नव्हे तर कुणाचीच इच्छा नसते. आपले जगणे कवडीमोलाचे आहे हा अनुभव पदोपदी घेत ही माणसे जगण्याची धडपड करत राहतात, कारण प्रतिष्टितांच्या लेखी त्यांच्या मरणालाही किंमत नसते.

No comments: