Friday, May 22, 2009

उतू नका... मातू नका...

मनसेच्या घवघवीत यशाने मुंबई-ठाण्यातील सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात शिरलेली हवा नक्कीच निघाली असेल. मनसेला अनेक ठिकाणी निर्णायक बहुमत प्राप्त झाल्याने येत्या काळात मनसे फक्त सेना-भाजप युतीलाच नव्हे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही भारी पडण्याची शक्यता आहे.
लोकशाहीचा उदो उदो करणाऱ्या आपल्या भारत देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. परंतु देश आर्थिक संकटातून जात असतानाही या निवडणुकीकडे मात्र मतदारांनी गांभीर्याने पाहिले असे वाटत नाही. अर्थात निवडून आलेल्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन केले, तरीही या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक प्रश्र्न निर्माण झाले असून त्यांचे उत्तर शोधणे अत्यंत गरजेचे आहे.
कोणताही मुद्दा नसलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांना जबरदस्त फटका बसल्याचे दिसते. गुडघ्याला बाशिंग बांधून पंतप्रधानपदी विराजमान होण्याची स्वप्ने पाहणारे लालकृष्ण अडवाणी असोत अथवा शरद पवार, मायावती, मुलायमसिंग, नितीशकुमार, लालूप्रसाद किंवा जयललिता असो. मतदारांनी या सगळ्यांची मस्ती उतरवली असून निवडणूक निकालाने सर्वांचीच बोलती बंद करून टाकली आहे. महाराष्ट्र राज्याचाच विचार करायचा असे ठरवले तर कॉंग्रेसला 17 व राष्ट्रवादीला 8 अशा एकूण 25 जागा आघाडीला मिळाल्या आहेत. परंतु यापैकी मुंबईच्या 6 आणि पुणे, नाशिक या 2 मिळून 8 जागा फक्त आणि फक्त मनसे उमेदवारांमुळेच जिंकता आल्या. म्हणजे फक्त 17 जागांवरच आघाडीचे मर्यादित यश आहे. उर्वरित 31 जागांवर विरोधकांचे प्राबल्य जाणवते. त्यामुळे चार-पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर महाराष्ट्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादीने गाफील राहून चालणार नाही. मनसेच्या मेहेरबानीने निवडून आल्याचे स्पष्ट दिसत असूनही उत्तर भारतीय नेतेमंडळी "गिरे तो भी टांग उपर...' म्हणत विषारी गरळ ओकू लागले. कॉंग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी, "मुंबईत कॉंग्रेसला मिळालेले यश हे उत्तर भारतीयांनी दिलेले उत्तर आहे' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर बिहारी नेते संजय निरुपम यांनीही निवडून येताच सर्वप्रथम उत्तर भारतीयांचे आभार मानले. हे कशाचे द्योतक आहे. कॉंग्रेसवाल्यांना मराठी भाषिकांनी मते दिली नाहीत काय? याचा विचार गांभीर्याने करायला हवा. अन्यथा मनसे फॅक्टरमुळे आज कॉंग्रेसवाल्यांच्या डोक्यात शिरलेली विजयाची नशा उतरायला वेळ लागणार नाही.
मनसेच्या घवघवीत यशाने मुंबई-ठाण्यातील सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात शिरलेली हवा नक्कीच निघाली असेल. मनसेला अनेक ठिकाणी निर्णायक बहुमत प्राप्त झाल्याने येत्या काळात मनसे फक्त सेना-भाजप युतीलाच नव्हे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही भारी पडण्याची शक्यता आहे. मराठी बाणा व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या मनसेला मुंबई-ठाण्यातील मराठी माणसाने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मतदारांनी दिलेला हा कौल लक्षात घेऊन आघाडीच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. तसेच युतीच्या नेत्यांनीही आपले ढासळलेले बुरुज सर्वप्रथम भक्कम करावेत, अन्यथा मनसे फॅक्टरची किंमत येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मोजावी लागेल. निवडणुकीचा गदारोळ सुरू असताना देशभरातील सर्वसामान्य जनता महागाईने होरपळते आहे. तीव्र पाणीटंचाईने राज्यात हाहाकार माजला आहे. वीज भारनियमनाने ग्रामीण जनता त्रस्त आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली वाढ उरात धडकी भरवणारी आहे. मात्र सध्या सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष सरकार स्थापनेकडे आणि कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याकडे लागले आहे. वाढत्या महागाईमुळे जनतेला जगणे अवघड झालेले असताना सत्ताधाऱ्यांना मात्र त्याचे आकलन होत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आता लोकसभा निवडणुका संपल्या. पाच-सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक होईल. तत्पूर्वी राज्यातील निकाल, मतदारांची भूमिका आणि येत्या 5-6 महिन्यात उद्‌भवणारे प्रश्र्न आदींबाबत अभ्यासपूर्ण चर्चा व्हायला हवी. फक्त लोकसभेच्या निकालाने हुरळून जाण्यात काहीच अर्थ नाही. लोकसभेचे हे निकाल सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत, याचा आढावा सर्वांनी घ्यायला हवा. परंतु या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करतो कोण? आजच्या या परिस्थितीत सावध होणे अतिशय गरजेचे आहे. धोक्याची घंटा वाजते आहे. राज्यकर्ते सत्तेच्या नशेत दंग आहेत. जनता मात्र विविध समस्यांमध्ये होरपळते आहे. तिच्याकडे अधिक काळ दुर्लक्ष केल्यास सर्वत्र हाहाकार माजेल आणि जेव्हा नाकातोंडात पाणी जाईल तेव्हाच आम्हांला जाग येईल, परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला असेल.

No comments: