Wednesday, February 25, 2009

जागतिक मंदी, महागाई आणि निवडणूक

आर्थिक मंदीच्या भीषण संकटापुढे अमेरिकेसारखे सामर्थ्यवान राष्ट्रदेखील हतबल ठरले आहे. आर्थिक मंदीच्या नावाखाली कामगारांचे खच्चीकरण करण्यासाठी पगार वेळेवर न देणे, पगारामध्ये कपात करणे, कामावरून काढण्याच्या धमक्या देणे असे सर्रास प्रकार सगळीकडेच सुरू आहेत. महागाई विरोधात मध्यंतरी देशातील विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठवला. संप, मोर्चे, धरणे, निदर्शने इ. विविध आंदोलकांद्वारे जनतेतील असंतोषाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. पण पुढे काय? सरकारने महागाई रोखण्यासाठी अनेक उपाय केल्याचे सांगितले जाते परंतु प्रत्यक्षात महागाई कमी झालेली नाही. उलट दिवसेंदिवस ती वाढतच आहे. गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. परंतु सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनीही याबाबत गांभीर्याने दखल घेतलेली नाही. हीच स्थिती कामगार क्षेत्राची झाली आहे. जागतिक मंदीच्या नावाखाली पुरता स्वैराचार माजला आहे.
जागतिक आर्थिक मंदीचा फटका भारतातही तीव्रपणे जाणवू लागला आहे. कामगार कपातीची जी आकडेवारी सरकारतर्फे घोषित केली जाते त्याहीपेक्षा प्रत्यक्षात त्याहून कितीतरी अधिक पटीने कर्मचाऱ्यांवर बेकारीचे संकट ओढवले आहे. काही मालक जागतिक आर्थिक मंदीचे कारण सांगून विनाकारण कामगार कपात करीत आहेत. काही ठिकाणी कामगारांना 2-3 महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. कामगारांचे खच्चीकरण करण्यासाठी पगार वेळेवर न देणे, पगारामध्ये कपात करणे, कामावरून काढण्याच्या धमक्या देणे असे सर्रास प्रकार सगळीकडेच सुरू आहेत. आर्थिक मंदीच्या भीषण संकटापुढे अमेरिकेसारखे सामर्थ्यवान राष्ट्रदेखील हतबल ठरले आहे. या भीषण संकटाची चाहूल भारताला लागल्यानंतरही या संकटाची म्हणावी तेवढी दखल सरकार घेत नाही. देशात बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, वीजभारनियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाण्यासाठी जनता तडफडत आहे. अशा अतिशय बिकट परिस्थितीतून जात असताना देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. इंधन दरवाढीचे निमित्त करून अनेक वेळा महागाई वाढते. मात्र दर कपातीनंतर महागाई पूर्वपदावर का येत नाही? किरकोळ व्यापारी, प्रवासी, वाहनधारक, टपरीवाले, हॉटेलवाले, भाजी-फळे आणि अन्न-धान्य विकणारे ताबडतोब चढ्या किंमतीत माल विकून जनतेची लूटमार करतात. वाहतूकदार ताबडतोब भाव वाढवतात. मात्र हेच वाहतूकदार, व्यापारी, रिक्षा-टॅक्सी, मालाची ने-आण करणारे वाहतूकदार इंधन दरात कपात झाली तरी महागाई दर कधीच कमी करत नाहीत. इंधन दरवाढीत पेट्रोल, डिझेलचे दर वाढतात. परंतु जी वाहने सीएनजीवर चालतात किंवा जी वाहने सीएनजीमध्ये परावर्तीत झाली आहेत ते सुद्धा चढ्या दराचीच अपेक्षा करतात. आरटीओ आणि आरटीए अधिकारी मग कशासाठी नेमलेले असतात? जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईशी निगडित असलेल्या डिझेलचे प्रतिलिटर दर 35 ते 36 रुपये लिटर असताना विमानाच्या इंधनाचे दर 28 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. विमानाच्या इंधनाचे दर 73 रुपयांवरून आठ वेळा कमी करून ते दर 28 रुपयांपर्यत खाली आणले तरीही विमान कंपन्या विमानाच्या तिकीटाचे दर कमी करीत नसल्याची खंत खुद्द केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत काल परवाच व्यक्त केली. यावरून सरकारवर विमान कंपन्यांचा दबाव असल्याचे स्पष्ट दिसते. वाहतूकदारही भिक घालीत नसल्याचे चित्र आहे.
महागाई विरोधात मध्यंतरी देशातील विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठवला. संप, मोर्चे, धरणे, निदर्शने इ. विविध आंदोलनांद्वारे जनतेतील असंतोषाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. पण पुढे काय? सरकारने महागाई रोखण्यासाठी अनेक उपाय केल्याचे सांगितले जाते परंतु प्रत्यक्षात महागाई कमी झालेली नाही. उलट दिवसेंदिवस ती वाढतच आहे. गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. परंतु सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनीही याबाबत गांभीर्याने दखल घेतलेली नाही. हीच स्थिती कामगार क्षेत्राची झाली आहे. जागतिक मंदीच्या नावाखाली पुरता स्वैराचार माजला आहे. आर्थिक मदीवर गांभिर्याने विचार व्हायला हवा होता. परंतु 26 नोव्हेंबर रोजी घडलेल्या हल्ल्यानंतर देशातील राजकीय नेत्यांनी महागाई आणि आर्थिक मंदीच्या संकटाकडे लक्षच दिलेले नाही. दहशतवादाची तीव्रताही आता कमी-कमी होत असून सर्वच राजकीय पक्षांना आता निवडणुकांचे डोहाळे लागलेले दिसतात. केवळ निवडणुका आणि त्यासंबंधीचे डावपेच याकडेच सर्वांची नजर आहे. जनतेचे सोयरसुतक कोणालाही दिसत नाही.
जागतिक मंदी, महागाई आणि बेकारीसारख्या भीषण संकटांची दखल सरकारने म्हणावी तेवढी घेतलेली नाही. विरोधकही तोंडात बोळे कोंबल्यासारखे चिडीचूप गप्प बसलेले दिसतात. त्यामुळे सध्या या भेडसावणाऱ्या समस्यांकडे केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून दुर्लक्ष केले तर निवडणुका तर सोडाच, होणाऱ्या निवडणुकांपर्यंतच या समस्या हाताबाहेर जाऊन मोठा हाहाकार माजेल, याची जाणीव कोणाला आहे काय?

No comments: