Friday, February 6, 2009

हे कसले राजकारण!

जनतेची स्मृती ही फार अल्प असते असे म्हणतात. मात्र काही घटना या न विसरण्यासारख्या असतात. अशा घटना स्मरणात ठेवूनच जनतेने निवडणूकीत मतदान केले पाहिजे. परंतु असे होत नाही येत्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे देशभरातच निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकारणी आश्वासनांची खैरात करतात आणि भारतीय जनता त्यांच्या आश्वासनांना भुलते. निवडणुका संपल्या की जनतेला वाऱ्यावर सोडून राजकारणांचे गल्लेभरू उद्योग नियमितपणे खुलेआम सुरू होतात ते थेट पुढच्या निवडणुकीपर्यंत...
भारत हा खेड्यापाड्यांचा देश आहे. आज स्वातंत्र्याला 62 वर्षे झाल्यानंतरही खेड्या-पाड्यात सुखसोयी म्हणजे काय ते माहिती नाही. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. परंतु मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातच आजही अनेक खेड्यांमधून वीज, रस्ते व पाण्याची सोय नाही. अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अन्न,वस्त्र, निवारा या मुलभूत गरजाही उपलब्ध करू शकलो नाही, हीच खरी शोकांतिका आहे. प्रत्येक पंचवार्षिक योजनेत कोट्यावधी रुपयांची तरतूद केली जाते, अनेक योजना आखल्या जातात, अब्जावधी रुपये खर्च केले जातात. परंतु कोठेही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. कागदोपत्री मात्र सुधारणा दाखवून हा सर्व पैसा नेतेमंडळीच हडप करतात.
खेडोपाड्यांचे सोडा, शहरांमधूनही बकाल अवस्थाच पहायला मिळते. सांडपाण्याची सोय नाही, गटारे तुंबलेली, नाल्यांमधून घाणीचे साम्राज्य, रस्ते डबघाईला आलेले, सुस्थितीतील रस्त्यांवर खोदून ठेवलेले, जीर्ण इमारती, कचऱ्याची दुर्गंधी अशा अनेक भीषण समस्या शहरवासियांना भेडसावत असतात. परंतु गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासन आणि डुकराची कातडी असलेल्या नेत्यांना या कशाचीही लाज वाटत नाही. लाज, लज्जा, अब्रू, शरम, चिंता, काळजी हे सर्वकाही या भ्रष्ट मंडळींनी भाजून खाल्ले आहे, अशांना वठणीवर आणणार कोण?
एकदा नारदमुनी पृथ्वीवर आले असता त्यांना एक गलेलठ्ठ डुक्कर घाणीत लोळताना दिसले. ईश्र्वरी अवताराचे महाभाग्य लाभलेल्या डुक्कर म्हणजे वराहाची ती अवस्था नारदाला पाहवली नाही. नारदमुनींनी त्याला स्वर्गात घेऊन जाण्याचे ठरवले. तसे वराहला सांगताच स्वर्गाच्या लालसेने तो स्वर्गात जायला तयार झाला. स्वर्गात गेल्यानंतर नारदमूनींनी वराहला स्वर्ग कसे वाटले असे विचारले. त्यावर आजूबाजूच्या अप्सरा, अमृताचे शुभ्र झरे, सृष्टीसौंदर्य पाहून वराह म्हणाला, "हा कसला स्वर्ग, इथे तर मला लोळायला एकही गटार नाही, चाखायला घाण नाही, त्यामुळे मी येथे क्षणभरही राहू शकत नाही, तुमचा स्वर्ग तुम्हाला लखलाभ होवो, मला माझ्या पृथ्वीवरील घाणीत लोळण्यातच खरे सुख मिळते.' वराहचे उत्तर ऐकून नारदांनी कपाळावर हात मारून घेतला असेल. ही एक काल्पनिक गोष्ट झाली.
परंतु आपल्या लोकशाहीतील जनप्रतिनिधींची अवस्था याहून वेगळी आहे, असे मला वाटत नाही. अर्थात सर्वच जनप्रतिनिधी तसे नसतीलही. परंतू मला सांगा की, असे कोणते क्षेत्र सुटले आहे की, ज्यात राजकारण्यांनी आणि प्रशासनाने घाण केली नाही? मिळेल तिथून पैसा ओरबाडायचा हाच त्यांचा एकमेव उद्योग. सहकार, शिक्षण, उद्योग, कृषी एवढेच नव्हे तर समाजसेवा आणि अध्यात्मासारखे क्षेत्रसुद्धा या राजकारण्यांच्या बाजारी अस्तित्वाने गटारे झाली आहेत. राजकारणी या घाणीतच येथेच्छ डुंबतात. ती घाण अंगावर मिरवण्यात धन्यता मानतात आणि वरून काही केलेच नाही अशा अविभार्वात खादीचे पांढरे शुभ्र कपडे घालून समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवतात. यात मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार अथवा जिल्हा परिषद, ग्रामपंचायत असो, बेमालूम लूटमार करणे हाच यांचा कार्यक्रम असतो. एखाद्या बाजारबसवीने नावापुरता कुंकवाचा टिळा लावून गावभर शेण खात फिरावे असा प्रकार या जनप्रतिनिधींकडून सुरू आहे. या लोकांनी कुंकवाचा टिळा तर जनकल्याणाचा, लोकसेवेचा लावला आहे. परंतु प्रत्यक्षात वृत्ती आणि कृती मात्र शेण खाण्याचीच आहे. सत्ता टिकवण्यासाठी किंवा सत्ता बळकावण्यासाठी हे सफेदपोश जनप्रतिनिधी कोणत्या स्तराला जाऊ शकतील याचे बीभत्स दर्शन आपल्याला रोजच घडत असते. ऐन निवडणुकीत एकमेकांची चुंबाचुंबी करणारे पुढची निवडणूक आली की, आपल्या जागा वाढवून घेण्यासाठी एकमेकांच्या विरोधातील भाषा करतात.
"युती-आघाडी' तोडून प्रतिस्पर्ध्यांशी जाहिरपणे हातमिळवणी करण्याची भाषा करतात. आणि शेवटी आपल्या मनासारख्या जागा मिळाल्या की, "युती-आघाडी' करतात. पदासाठी बंडखोरीची भाषा करतात. पुन्हा "मी नाही त्यातली...' म्हणत एकत्र नांदतात. स्वत:च्या स्वार्थापायी सर्वसामान्य जनतेला भुलवून त्यांना अक्षरश: नागवे करून राजकारणी मात्र आपल्या झोळ्या वारेमाप भरतात. हे सगळे कळून-सवरूनही आम जनता मात्र स्वस्थ बसलेली आहे. निवडणूका आल्या की हेच राजकारणी कोडगे बनून प्रत्येकांच्या दारात जाऊन हात जोडून मलाच मतदान करा अशी आर्जवे करतात. परंतु यांना आपल्या व्हरांड्यातून हाकलून लावणारा एकही "माय का लाल' आजपर्यंत कोठे पाहण्यात किंवा ऐकिवात नाही. आणि असेल तरी कसा? कारण हे राजकारणीच कुख्यात गुंड! यांना जाब विचारणार कोण?

No comments: