Tuesday, December 30, 2008

नववर्षाचा संकल्प काय?

उद्या 31 डिसेंबर! नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण जय्यत तयारी करताना दिसत आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी, संकल्पासाठी अनेकांनी प्लॅनही आखले आहेत. महिन्याभरापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेक्यांच्या महाभयंकर हल्ल्याचा मुंबईकरांना काहीच सोयरसुतक दिसत नाही. या दहशतवादी हल्ल्यातून सर्वसामान्य मुंबईकर अद्यापही सावरलेले नाहीत. आजही मुंबईतील अनेक महत्त्वाची ठिकाणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यासाठीच पोलिसांच्या सुट्‌ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. डोळ्यात तेल घालून पोलीस काम करत आहेत. या अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांच्या आणि शहीद झालेल्या पोलिसांच्या कुुटुंबियांवरील दु:खाचे सावट अजूनही ओसरलेले नाही. या अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले शिपाई आणि नागरिक रुग्णालयांमधून आजही उपचार घेत आहेत. त्यांच्या जखमा आजही भळभळत आहेत आणि अशा दु:खद भयावह परिस्थितीत 31 डिसेंबरच्या पार्ट्या आणि नववर्षाचे स्वागत करणे म्हणजे त्यांच्या जखमांवर अक्षरश: मीठ चोळण्यासारखे आहे.
जागतिक मंदीने ग्रासलेले असतानाही आज सर्वत्र पाहिले असता सर्वांना 31 डिसेंबरचे वेध लागलेले दिसतात. नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली हॉटेल्स्‌, बार, पब्स्‌, समुद्रकिनारे, डिस्कोमध्ये रात्रभर धिंगाणा घातला जातो. हल्ली प्रत्येक इमारतीच्या टॅरेसवर आणि गल्ली-बोळातही मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला जात आहे. एका रात्रीत करोडोंचा चुराडा होतो. पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा भारतीय तरुणांवर वाढत आहे. या जल्लोषात तरुण-तरुणी मद्याच्या आहारी जाताहेत. याच संधीचा काहीजणांनी गैरफायदा उचलल्याने अनेकांचे कौमार्य भंग होताहेत. मद्याच्या धुंदीत व सिगारेटच्या धुरात रात्रभर नंगानाच चालतो. अश्लील अंगविक्षेप करत नृत्य केले जाते. मुलींना कपड्यांचे भान नसते. यातूनच मग बलात्काराच्या घटना घडतात.
मागच्या वर्षी अशाच एका पार्टीत 2 अनिवासी भारतीय मुलींचे भर रस्त्यात कपडे फाडले होते. त्याचवेळी एका पत्रकाराने ती दृश्ये कॅमेऱ्यात टिपल्याने हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला, नाहीतर असे प्रकार या भागात नेहमी घडत असतात. तरुणींची टिंगलटवाळी नेहमी सुरू असते. दारूच्या नशेत देहभान विसरलेले तरुण बेफाम गाड्या चालवतात. बहुतेक सर्व तरुणी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी तोकड्या कपड्यात फिरताना, विद्येचे धडे घेताना दिसतात. मिडी-मिनी ड्रेस, जीन्स्‌, टी-शर्ट, शॉर्टस्‌ अशा अतिशय तोकड्या वस्त्रामध्ये मुली आज प्रत्येक महाविद्यालयाच्या आवारात दिसतात. त्यामुळे आपला तरुणवर्ग या पाश्चिमात्यांच्या भोगवादाला बळी पडून स्वत:च आयुष्याची राखरांगोळी करून घेत आहे. क्षणिक सुखासाठी आपले भविष्य बरबाद करीत आहे. मुंबईतील एका संस्थेने केलेल्या पाहणीनुसार हल्लीच्या बहुसंख्य मुलींचे कौमार्य वयाच्या 16 व्या वर्षीच भंग झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढला आहे. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण केल्यामुळेच भारताच्या युवापिढीचा असा भयानक आणि भयावह ऱ्हास होत आहे. परंतु याची फिकीर कोणालाच दिसत नाही. आई-बापाचा कोणताही धाक नसल्याने तरुण पोरी कसेही कपडे घालतात. कोठेही, कोणासोबतही, पाहिजे त्या वेळी, अवेळी फिरतात. आपली पोरं किती मॉडर्न आहेत याचाच टेंभा पालक मिरवत असतात. नाक्यावरच्या स्टेजवर अर्धनग्न अवस्थेत अचकट-विचकट हावभाव करीत डिस्को-डिजेच्या तालावर आपली मुलगी डान्स करते हे बघत आई-बाप बघ्यांच्या गर्दीत उभे राहून टाळ्या वाजवत असतात. मात्र याच डान्सच्या सरावासाठी दोन-तीन महिन्यात प्रॉक्टिसच्या नावाखाली भलत्याच "भानगडी' होतात. स्वेच्छेने झालेल्या या "भानगडी' डान्सचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन-चार महिन्यांनी उघडकीस येतात. तेव्हा याच आई-बापांचे खाडकन डोळे उघडतात आणि आपल्या पोरीचे उपद्‌व्याप पाहून फक्त हात चोळत बसावे लागते. "झक मारली आणि थर्टी फर्स्टला परवानगी दिली', असे वाटते. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, याचा सारासार विचार करताना कोणीही दिसत नाही.
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती नववर्ष साजरे करणे कितपत योग्य आहे याचाही विचार तरुणांनी करायला हवा. भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीनुसार नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होते. पृथ्वीच्या निर्मितीचा दिवसही हाच आहे. त्यामुळे भारतीयांनी गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरे करायला हवे. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून 61 वर्षे झाल्यानंतरही आपल्याला त्या इंग्रजांच्या गुलामगिरीचा त्याग करावासा वाटत नाही. पूर्वी शाळा, महाविद्यालयांमध्ये हळदीकुंकू साजरे व्हायचे. मैदानी खेळांच्या स्पर्धा घेतल्या जात असत. समाजसुधारकांच्या, क्रांतीकारकांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या व्हायच्या. हल्ली मात्र व्हॅलेंटाईन डे, रोज डे, फ्रेंडशिप डे, लव्ह डे, रिबीन डे, सारी डे साजरे होतात. अशा "डे'मुळे आपली तरुण पिढी सर्वांदेखत बरबाद होत आहे परंतु याबद्दल कोणीही "ब्र'सुद्धा काढीत नसल्याने एक दिवस संपूर्ण देशच देशोधडीला लागेल आणि सर्वत्र स्वैराचार माजेल!
31 डिसेंबर साजरा करणाऱ्या मुंबईकरांना शिवरायांचा इतिहास आठवतो काय? 31 डिसेंबर 1663 च्या मध्यरात्री छ. शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर मावळे स्वराज्य फुलविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून शत्रूच्या मुलखावर झडप घालण्याची तयारी करीत होते. युद्धनिती ठरवत होते. हिंदुत्व, मराठी बाणा जागा करीत होते. शाहिस्तेखानाने केलेले स्वराज्याचे नुकसान भरून काढण्यासाठी महाराजांनी सुरतेवर छापा घालण्याचे ठरवले. मुगलांचे किल्ले, लष्करी ठाणी, अवघड वाटा, नद्या, डोंगर पार करून शत्रूवर मात करीत दीडशे कोस मुसंडी मारून सुरतेवर पोहचायचे होते. त्यासाठी दऱ्या-खोऱ्यातून मावळ्यांसह निघालेले महाराज त्रंबकेश्र्वराचे दर्शन घेऊन उतवडची खिंड ओलांडून जव्हारकर राजाच्या कोळवणात उतरले. 31 डिसेंबर 1663 या दिवशी जव्हारचा राजा विक्रमशहा यांनी महाराजांचे जव्हारकरांच्या शिरपामाळावर शाही स्वागत केले. या प्रसंगाची आठवण म्हणून जव्हारकरांनी येथे एक स्मारक उभारले आहे. तर अशाप्रकारे शिवकालात स्वराज्यासाठी मावळे रात्रीचा दिवस करून दौडत होते. शत्रूवर मात करण्यासाठी युद्धनिती ठरवत होते. पण आज आपण 31 डिसेंबरच्या रात्री काय करतो? तर शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मर्द मराठ्या मावळ्यांनी लढाया करून जिंकलेल्या गडावर जाऊन दारूच्या पार्ट्या झोडतो. रिकाम्या बाटल्या आणि कचरा तेथेच अस्त्याव्यस्त टाकून येतो. तरुण-तरुणी तर या गडाच्या तटबंदीच्या आडोशाला बसून नको ते बिभिस्त चाळे करीत असतात. काय म्हणावे? या दुर्दैवी परिस्थितीला जबाबदार कोण?
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला एक महिना उलटल्यानंतरही कुचकामी सरकार ठोस पुरावे मिळालेले असूनही पाकिस्तानवर कोणतीही कडक आणि कठोर कारवाई करताना दिसत नाही. पाकिस्तानने युद्धाची तयारी केलेली असताना आपले सरकार मात्र अजूनही जगाला पुरावे दाखविण्यात मग्न आहे. तेव्हा ही स्वार्थी मंडळी देशहितासाठी काही करतील अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे मूर्खपणा आहे. त्यासाठी आता तरुणांनीच पुढे यायला हवे. पाकिस्तान आपल्या देशात अतिरेकी घुसवून दहशत निर्माण करीत आहे, तर पाश्चात्य संस्कृती आपली भारतीय संस्कृतीच संपूर्ण नष्ट करू पाहते आहे. यासाठी पाश्चात्यांचे अनुकरण न करता देशासाठी प्राणपणाने लढायला हवे. त्यासाठी आज 31 डिसेंबर रोजी शिवछत्रपतींचा तेजस्वी शौर्य वारसा आजच्या नव्या पिढीने अंमलात आणण्याची हीच खरी वेळ आहे. मग आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणी हिंमत करेल का? चला, नववर्षाचा हाच संकल्प करू या!!

No comments: