Tuesday, October 28, 2008

...तीच खरी दिवाळी

दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके वाजवले नाहीत तर ती दिवाळी कसली असा प्रश्न काहीजण करतात. परंतु या फटाक्यांच्या आतिषबाजीत मात्र करोडो रूपयांचा चुराडा होत आहे. त्यामुळे जागतिक मंदी आली असली, व्यापारी हवालदील झाले असले, महागाईने सर्वांना त्रासले असले तरी आणि राज्यातील शेतकरी आत्महत्या करित असले तरीही त्याची पर्वा कोणालाच नाही. हेच यावरून दिसते
दिवाळीत रस्त्यांवर, गल्ल्यांमधून जेव्हा फटाक्यांचे जोरदार आवाज निघतात, तेव्हा त्यात आवाजापूर्वीचा कटू इतिहासही दडलेला असतो. आपण त्या कर्णकर्कश आणि जीवघेण्या आवाजालाच आपली संस्कृती बनविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे फटाके थांबत नाहीत, ध्वनीप्रदूषणही वाढते, अपघांतांमध्ये वाढ होते, त्यातून घडणारे मृत्यूही थांबत नाहीत. दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच राजस्थानातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन कोवळ्या 8 जीवांसह 30 जण ठार झाले. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील डीग या गावी घडलेली स्फोटाची ही घटना खूपच भयानक आणि भयावह होती. स्फोटाने संपूर्ण इमारतच जमीनदोस्त झाली. जेथे स्फोट झाला त्या गावात एक-दोन नव्हे तर तब्बल 13 फटाक्यांचे कारखाने असून ते सर्वच्या सर्व बेकायदेशीर आहेत. वर्षानुवर्षे चालणारे हे अवैध कारखाने माहित असूनही भ्रष्टाचाराचा रोग लागून आंधळा, मुका, बहिरा झालेला कायदा तेथपर्यंत पोहचू शकला नाही, हे आपले दुर्दैव. यापूर्वी सुद्धा बिहारमध्ये 32 आंध्रात 11, तामिळनाडूत 30, ओरिसात 7 व केरळात 5 बालमजुरांचे बळी फटाक्यांच्या कारखान्यांनी घेतले आहेत. त्यामुळे बालमजुरी संपवण्यात आपल्याला यश आलेले नाही हे जसे खरे आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत जेथे जेथे स्फोट झाले तेथे तेथे कायदा फितूर झाला होता किंवा कारखानदारांनी तो धाब्यावर तरी बसवला होता. तसेच आधुनिक काळातही कामाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. हेही तितकेच खरे असल्याचे स्पष्ट दिसते. त्याचबरोबर या दिपावलीच्या कालावधीत या फटाक्यांमुळे देशभरात कोट्यवधी रुपयांची हानी तर होतेच शिवाय लाखो मुले होरपळून, हजारो मुले मृत्यूमुखी पडत असल्याने हीच का आमची संस्कृती असा प्रश्न पडतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या बाल कल्याण आणि सुरक्षा विभागाने दिवाळीच्या तोंडावर दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की 15 वर्षांखालील मुलांचे अपघातीतील प्रमाण 70 टक्के आहे फटाक्यांमुळे दरवर्षी दीपावलीत दीड लाख मुले भाजतात, 7000 मुलांचा मृत्यू होतो, जवळजवळ 13 हजार मुले आंधळी होतात. 38 हजार मुले अपंग होतात. त्यामुळे हा अहवाल निश्चितच धक्कादायक आणि धोकादायक आहे. मुले फटाके उडवीत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची असते.
परंतु मुले पालकांना न जुमानता, पालकांची नजर चुकवून फटाके उडवतात आणि अशाप्रकारे भीषण अपघातांमधून बळी पडतात. दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके वाजवले नाहीत तर ती दिवाळी कसली असा प्रश्न काहीजण करतात. या फटाक्याच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे, अतिधूरामुळे मानवाप्रमाणेच पशुपक्षांनाही प्रचंड त्रास होतो. मंदीचा तडाखा बसलेला असूनही परंतु या फटाक्यांच्या आतिषबाजीत मात्र करोडो रूपयांचा चुराडा होत आहे. त्यामुळे जागतिक मंदी आली असली, व्यापारी हवालदील झाले असले, महागाईने सर्वांना त्रासले असले तरी आणि राज्यातील शेतकरी आत्महत्या करित असले तरीही त्याची पर्वा कोणालाच नाही. हेच यावरून दिसते. दिवाळीतच नव्हे तर आता कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी हजारो रुपयांचे फटाके उडवले जातात. दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा खर्च केवळ "आवाज' करण्यावर खर्च होतो. पण हाच वाया घालवलेला पैसा अन्य समाजोपयोगी कार्यासाठी वापरला गेला तर, समाजाचे किती कल्याण होईल? बेकार गिरणी कामगार, कर्जबाजारी शेतकरी, गरीब मुले, औषधालाही पैसे नसणारे व्यक्ती, पुलाखाली, रस्त्यावर रहाणारी रस्त्यांमध्ये कोणी तरी मदत करील या आशेवर आशाळभूतपणे पाहणारी दूर्दैवी बालके यांना मदत कोण करणार? सर्वांना आपल्या आनंदात सामावून घ्या. बघा तुमचा आनंद कसा द्वीगुणित होतो. याची जाणीव जेव्हा होईल, तीच खरी दिवाळी तोच खरा सुदिन!
दिवाळी मना-मनाची असते. ती साजरी करताना समाजातील उपेक्षितांचा भाग्यदीप आपल्याकडून उजळला गेला पाहिजे.

No comments: