Sunday, October 19, 2008

"कोजागिरी' कि "मजागिरी'

आज कोजागिरी पौर्णिमा. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, वाल्मिकी पौर्णिमा अशी नावे आहेत. कोजागिरी किंवा कोजागिरी हे या पौर्णिमेचे सर्वज्ञात नाव. "को+जाग+री म्हणजे कोण जागे आहे.' या रात्री घर, मंदिर, उद्यान, रस्ते वगैरे ठिकाणी दिवे लावतात. लक्ष्मी व इंद्र देवाची चंद्राच्या साक्षीने पूजा करायची. नारळ फोडून पाणी व पोहे देवांना समर्पण करायचे आणि चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा. त्यासाठी रात्री जागरण करायचे. जागायचे त्यासाठी मग रात्रभर जागत असताना भजन, गाणी, भक्ती गीते म्हणायची, खेळायचे, आनंदाने नाचायचे. मग रात्री लक्ष्मी आपल्यावर कोण जागे आहे हे पाहून जो जागृत असेल त्यावर प्रसन्न होऊन त्यांना भरपूर अशीर्वाद, पैसा, संपत्ती देण्याचे वरदान देते अशी रूढ परंपरा आहे, असे हे मूळे कोजागरीव्रत.
कोजागिरी हा खरे पाहता कृषिकर्त्यांचा आनंदोत्सव आश्विनात पावसाळा संपलेला असतो. सर्वत्र वातावरण अगदी प्रसन्न असते. शेतातील पिके डौलाने फडफडत असतात. वेली फुलांनी बहरलेल्या. परसात, अंगणात दुधी, भोपळे, भेंडी, काकडी, चवळी, पेरू असा फळभार आलेला असतो. कारळी, शिराळी, पडवळ, घोसाळी यांनी मांडव सजलेले असतात. भातखाचरात हळव्या भाताचे पीक तयार झालेले. घरोघरी कसे संपन्न, भरलेले वातावरण असते. त्यातच नवान्न पौर्णिमा आल्याने प्रत्येक घराघरात लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी नव्या अन्नाची म्हणजे तांदळाची खिर बनविण्यात येते. देवीला प्रसाद दाखवून सर्वांना वाटण्यात येते. शेतात पिकलेल्या नव्या दाण्यांची खीर करून लक्ष्मीला नैवेद्य दाखवून मगच नवा दाणा खायला शेतकरी सुरुवात करतो. तत्पूर्वी तो नव्या दाण्याला अन्न म्हणून शिवप्रही नाही. ही सगळी मनोभावे, श्रद्धेपोटी केलेली पूजा आणि रात्रीचा आंनदोत्सव म्हणजेच "कोजागिरी पौर्णिमा' होय. शेतात धान्य पिकले आहे. तेव्हा कृषिराजा जागा रहा... सावध हो, जागते रहो, जागेल तोच मिळवेल, जो जागतो, जो कष्टतो, तोच धनधान्याचा मालक होतो असा संदेश देणारी ही कोजागिरी पौर्णिमा आहे.
पण आजच्या काळात कृषिपूजन हरवले जात आहे. मूळ व्रते, पूजा म्हणजे काय, त्याचा आज कोणालाच पत्ता नाही. मग त्यातूनच निर्माण होत आहे भ्रष्ट लोकाचार आणि त्यातूनच आज "कोजागिरी'ची झाली आहे "मजागिरी'. "कोजागिरी-नवान्न पौर्णिमा' म्हणजे काय हे शहरात अनुभवणे अशक्य. शहरांपासून फक्त दुधाची तहान ताकावर भागवली जाते. घरासमोर अंगणच नाही. आजूबाजूच्या मोठ-मोठ्या इमारतींमुळे चंद्र अनुभवता येत नाही. इमारतींमधून राहणारे मग टॅरेसचा आधार घेतात. कोजागिरी म्हणजे शहरी मुलांसाठी ऋेेश्र ोेप वरू! इमारतीच्या गच्चीवर सगळेजण जमणार, प्लास्टिकच्या पिशव्यांमधील दूध आणणार, गॅसवर गरम करणार, मसाला दूध करून लाऊड स्पिकर, डी.जे.च्या तालावर वेडे-वाकडे नाचत ते दूध पिणार.... यांची "मजागिरी' पौर्णिमा साजरी झाली. हे तर काहीच नाही. हल्ली नवीन फॅड तरुणाईच्या डोक्यात शिरला आहे. कित्येकजण चौपाटीवर जाऊन मजा करतात. काहीजण घराघरातून बळजबरीने वर्गणी काढून वडे, समोसे आणतात, पाव-भाजी खातात. त्याच्याही पलीकडे जाऊन नशापाणीसुद्धा करण्यात आजची तरुण मंडळी धन्यता मानताना दिसते. रात्रच जागवायची आहे ना... मग दारु प्यायची आणि डी.जे.च्या तालावर रात्र बेधुंद करायची. फक्त खाणे, पिणे, ऐश करणे हीच का आपली संस्कृती?
मुंबईतील युवा पिढी तर अशाप्रकारच्या संधीची वाटच पहात असतात. फे्रन्डशीप डे, व्हॅलेंटाईन डे, पिंक डे, जिन्स डे, गटारी, थर्टी फर्स्ट, गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सव. आणि आता कोजागिरी पौर्णिमासुद्धा या सणांचा आस्वाद घेण्याऐवजी युवा पिढी शरीरसुखात डुंबण्यातच धन्यता मानताना दिसते. हे आपल्या देशाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. तरुण-तरुणींना पबमध्ये जाणे, वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये रमणे, मित्र-मैत्रिणींचा सर्वप्रकाराने उपभोग घेण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही.
कोण होतास तू काय झालास तू,
अरे! वेड्या कसा वाया गेलास तू !!
अशी परिस्थिती आज सर्वत्र दिसत आहे. आधुनिकतेच्या नादात आम्ही डोळसपणा हरवून बसलो आहोत. आमची सारासार विवेकबुद्धी पुरती भ्रष्ट झाली आहे. भोग प्राप्तीला सर्वस्व मानून त्यांच्या प्राप्तीसाठी वाटेल ती कर्मे बिनदिक्कत आचरण्याचा कोडगेपणा आमच्यात आला आहे. सरकारतर्फे कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा प्रचार केला. परंतु मागे वळून पाहिले असता चित्र काय दिसते? कुणाचे कल्याण झाले? कुटुंबाचे, समाजाचे की देशाचे? दुर्दैवाने या कुटुंबांचे कल्याण केले, ना समाजाचे, ना देशाचे! परंतु तरुण मंडळींनी याचा चांगलाच गैरफायदा उचलला. लैंगिक संबंध कितीही जणांशी ठेवले तर काय बिघडते? ते सुरक्षित असले म्हणजे झाले! अशा प्रकारचे भयानक, भयावह मत महाविद्यालयातील युवापिढी व्यक्त करीत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या नवरात्रोत्सवात कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. त्याचबरोबर यादरम्यान कंडोम, आय पिल या गोळ्यांची विक्रीसुद्धा लाखो रुपयांची झाली. नवरात्रोत्सवानंतर पुढील दोन-तीन महिन्यात दरवर्षी गर्भपाताचे प्रमाण वाढलेले दिसायचे ते मात्र यावर्षी दिसणार नाही. लोकसंख्या दरवाढ रोखण्यासाठी सरकारतर्फे प्रचार यंत्रणेवर लाखो रुपये खर्च केले जातात. विवाहित जोडप्यांवर ज्यांचा काहीच परिणाम होत नसला प्रेमी युगुलांनी मात्र त्याचा पुरेपूर लाभ घेतला आहे. कंडोम आणि आयपिल गोळ्यांमुळे अनैतिक संबंधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळेच रेव्ह पार्ट्यांसारखी कृत्ये सहजपणे घडत आहेत. अफेअर्स असण्यातच अनेकांना भूषण वाटते आहे. हे लोण आता शहरांमधून ग्रामीण भागांपर्यंत पोहोचले आहे. लैंगिक विकृती पशुत्त्वाच्या स्तराला चालली असल्याचीही उदाहरणे घडून येत आहेत. खिळखिळ्या झालेल्या सर्व संस्कार यंत्रणाच भक्कम करणे हाच त्यावरील उपाय असू शकतो. प्रत्येक कुटुंबातील वरिष्ठांनी दक्ष राहून लक्ष दिले पाहिजे. यासाठी सध्याच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत. अन्यथा सगळीकडे स्वैराचार माजेल आणि माणसे व जनावरे यांच्यातील भेदच संपुष्टात येईल, त्याला जबाबदार कोण?

No comments: