Saturday, September 5, 2009

बाप्पा, तुम्ही एवढे तरी कराच!


नवसाला पावणाऱ्या बाप्पा,
तुम्ही एवढे तरी कराच!
उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येतील व स्वातंत्र्य लढ्यासाठी विचार-विनिमय करून योजना अखतील हा हेतू ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू केले. सामाजिक जाणिवेतून सर्वांनी एकत्र येऊन "सार्वजनिकरित्या' हा उत्सव साजरा करावा, जेणेकरून "सामाजिक बांधिलकी' जपली जाईल, हा यामागचा उद्देश होता. परंतु सद्यस्थिती पाहता सामाजिक बांधिलकी पूर्णपणे नष्ट झालेली दिसते आहे. गणेशोत्सव मंडळांमध्ये उंच मुर्त्या, देखावे, दाग-दागिने, रोषणाईवर मोठा खर्च केला जातो. ज्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी हा उत्सव सुरू केला, त्यांच्याकडून जबरदस्तीने वर्गणी (की खंडणी) वसूल केली जाते. समाजाने एकत्र यावे या मुळ उद्देशालाच हरताळ फासून आज लाखो भक्तगणांना तासन्‌तास रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत आहे. त्यातच "नवसाला पावणारा' असा नवीन "ट्रेंड' सर्वत्र गाजतो आहे. "हा नवसाला पावणारा गणपती, तो इच्छापूर्ती गणपती' अशी वर्गवारी करून भक्तांनीच चक्क गणपतीचेच भेद-भेव करून टाकले. गणपती मग तो "लालबाग'चा असो किंवा "गिरगाव'चा तो सर्वत्र एकच आहे. ईश्वर हा एकच आहे, हे सत्य स्वीकारून तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथूनच मनोभावे त्या ईश्वराला म्हणजे गणपतीला साकडे घातलेत तर कुठलाही "नवस' न करता तो "गणपती' सुद्धा तुम्हाला पावतो की नाही बघा! पण याचा सारासार विचार कोणीही करीत नाही. सर्वच भक्त देवाकडे काही ना काही मागायला येतात. या सर्वांनाच जर हा देव पावला असता तर एकही प्रश्न शिल्लक राहिला नसता. परंतु तसे होत नाही. लाखो भक्तगण गणपतीला साकडे घालतात. त्यातील हजारो भक्त "नवस' फेडण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे असतात.' त्यांना पाहून इतरांनाही आपण "नवस' करावा अशी इच्छा दाटून येते. त्यातूनच मग ही रांग दिवसेंदिवस वाढत जाते "गणपतीला नवस केला म्हणून मुलगा झाला,' असे सांगतात. पण या विज्ञानयुगातील सुज्ञ माणसाच्या बुद्धीला ही न पटणारी गोष्ट आहे. तरीही या नवसांचे स्तोम दिवसेंदिवस वाढतेच आहे.
प्रत्येकाच्या मनामध्ये "श्रद्धा' असावी, परंतु ती "अंधश्रद्धा' असू नये. या श्रद्धेची प्रदर्शन मांडण्याची व अवडंबर माजविण्याची कोणतीही गरज नाही. करायचीच असेल तर गणरायाची भक्तीभावाने पूजा करा. मनोभावे पूजा करून स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणा. स्वतः सुधारण्याची व दुसऱ्याला सुधरवण्याची शपथ घ्या. परंतु असे होताना कोठेही दिसत नाही. उत्सवांच्या नावाखाली हजारो-लाखो रुपयांच्या वर्गण्या उकळून, मोठाले सण साजरे करून मिरवणुकांमध्ये दारु पिऊन. ओंगाळवाणे नाचने, बिभत्स हावभाव करून गाणी वाजवणे, गणपतीच्या मंडपातच जुगाराचे डाव मांडणे, मुलींची छेड काढणे असे प्रकार या गणरायाच्या साक्षीनेच होतात. गणरायाच्या विसर्जनाप्रसंगी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमधून तर चढाओढ सुरू असते. ढोल, बॅन्जो मागे पडले आता डी. जे. च्या कर्णकर्कश आवाजात तर्रर्र झालेली पोरं अक्षरशः धुडगूस घालत असतात. मागच्या वर्षी काही मंडळांनी तर आपल्या पथकाकडे लक्ष वेधण्यासाठी डान्सबारच्या पोरींना नाचवले. अनेक ठिकाणी गर्दीचा आणि अंधाराचा फायदा उचलित काही टपोरी पोरं मुलींचा विनयभंग करतात, नाचता-नाचता चिमटे काढतात. यातूनच एखादी गळाला लागली तर प्रसंगी मिरवणूक सोडून थेट लॉजवर जातात. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ते रोखण्याची हिम्मत कोणाकडेच नाही. देवाच्या समक्ष असे गैरप्रकार होऊनही देव त्यांना दंड करू शकत नाही, तर तुम्ही आम्ही काय करणार?
आज राज्याला अनेक महाभयंकर प्रश्न भेडसावत आहेत. परंतु या प्रश्नांसाठी कोणीही कधीही एकत्र येताना दिसत नाही. ओंगळवाण्या प्रकारांसाठीच उत्सव मंडळे दिवस-रात्र राबताहेत. काळो रुपये पाण्यासारखे खर्च करताहेत. परंतु आपल्याच परिसरातील कुठलीही सुधारणा करण्याची सुुुबुद्धी त्यांना गणपती बाप्पा देत नाही. समाजात पापी माणसांची वाढ होत असूनही हीच पापी माणसं आज समाजात उजळ माथ्याने फिरताहेत. त्यांना हा देव बघून कसा घेत नाही? एवढा अन्याय, अत्याचार कसा काय माजला आहे? देव त्यासाठी काहीच करीत नाही. जे भक्तीभावाने, तासन्‌तास रांगेत उभे राहून दर्शन घेतात त्या भक्तावरच अन्याय होऊनही हा देव गप्प कसा? असा प्रश्न पडतो. ज्या देवांनी भक्तांचे रक्षण करायचे, त्या देवांनाच कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवावा लागतो. यावरून हेच स्पष्ट होते की जे देव स्वतःचेच संरक्षण करू शकत नाहीत ते इतरांचे संरक्षण कसे करणार?
"देव देवळात नाही, देव देव्हाऱ्यात नाही, देव आकाशात नाही तर प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे.' असे सर्वच संतांनी सांगितले आहे. "मानवसेवा हिच ईश्वरसेवा' हे ब्रीद वाक्यही सर्वांना पाठ आहे तरीही आम्ही अंधश्रद्धेच्या पगडीतून बाहेर पडत नाही.
"ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अराजकता माजेल त्या त्या वेळी मी जन्म घेईन' असे म्हणणारा देव अजून कुठल्या अराजकतेची वाट पहात आहे? या देशावर मुस्लिमांनी 800 वर्षे राज्य करून हिंदूंच्या देव-देवतांची विल्हेवाट लावली. उरली-सुरली इभ्रत इंग्रजांनी धुळीस मिळवली तरीही आमचे देव स्वस्थ कसे? कोल्हापूरच्या तुळजाभवानी मातेचा चोरीला गेलेला मुकुट, डहाणूच्या महालक्ष्मी मातेचे पळविलेले डोळे, शिर्डीच्या साईबाब संस्थानातील गाजलेला भ्रष्टाचार, तिरुपतीच्या पुजऱ्यांचा भ्रष्टाचार व अनेक तिर्थक्षेत्रांच्या स्थळी चालणारे अश्लील धंदे कशाचे द्योतक आहेत? सोरटीच्या सोमनाथाचे मंदिर तब्बल 17 वेळा लुटले तरी सोमनाथाने एकदाही प्रतिकार केला नाही . पाकिस्तानातील तर जवळजवळ 300 मंदिराच्या मुताऱ्या झाल्या तरीही आमचा देव मुस्लिमांवर कोपला नाही. भूकंपाच्यावेळी देवच जमिनीत गाडले गेले. त्यामुळे जे स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत ते भक्तांवर आलेल्या संकटाच्यावेळी हे देव काय रक्षण करणार? त्यामुळे देवावरचा विश्वास उडत चालला आहे. त्याचा गैरफायदा बुवा, बापू, साधू, महाराजांनी घेतला आहे. आपण देवाचे अवतार असल्याचे खोटे सांगून जनतेला आपल्या भजनी लावत आहेत. या ढोंगी महात्म्यांनाच आता देश संरक्षणासाठी अतिरेक्यांशी लढायला पाठवायला हवे.
हे सगळे किळसवाणे प्रकार पाहिल्यानंतर असे वाटते की देव आपला चमत्कार का दाखवित नाही? हल्ले करणाऱ्या अतिरेक्यांना मंदिरांचे विध्वंस करणाऱ्या मुस्लिमांना देवांच्या नावाने भोंदूगिरी करणाऱ्या बुवांना आणि देवाच्या शपथा खाणाऱ्या स्वार्थी, ढोंगी नेतेमंडळींना हे देव धडा का शिकवित नाहीत? त्यामुळे नवसाला पावणाऱ्या आणि इच्छापूर्वी गणरायाला हेच साकडे घालावे लागेल की, "हे गणराया, आमच्या देशातील सर्व अतिरेक्यांचा कायमचा बिमोड करून टाक, तुझ्या नावाने राजकारण करणाऱ्या स्वार्थी पुढऱ्यांना कायमचा धडा शिकव, पर्यावरण रक्षणासाठी सर्वांच्या मेंदूत काहीतरी प्रकाश पडू दे, सर्वांना समान न्याय मिळू दे, कोणावरही अन्याय होऊ नये, सर्वांना सुख-संपत्ती भरभरून दे आणि हा संपूर्ण देशच पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे "सोन्याचे अंडे देणारा', सुजलाम्‌ सुफलाम्‌ होऊ दे! तुझ्या भक्तीचे खोटे आव आणून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या कार्यकर्त्यांना धडा शिकव. तुझ्या मिरवणुकीत दारु पिऊन नाचणाऱ्यांची दारु सोडव, मंडपात पत्ते खेळणाऱ्या जुगाऱ्यांना अद्दल घडव आणि अश्लील, गैरप्रकार करणाऱ्यांचे काय करायचे ते बाप्पा तुम्हीच ठरवा!'

No comments: