Tuesday, August 4, 2009

समाजाच्या हितासाठी लढणारच

अन्यायाविरुद्ध खवळून उठायला हवे, जो निमूटपणे अन्याय सहन करतो, तो त्याच्या उभ्या आयुष्यात काहीही करू शकत नाही, म्हणूनच प्रत्येकाने अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठवायला हवा. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुम्हाला साथ देण्यासाठी दै. मुंबई मित्र सदैव तत्पर आहे. "आई भवानीचा' कृपाशिर्वाद श्री गणरायाची कृपा, अभिजीत राणे यांचा खंबीर पाठिंबा आणि वाचक हितचिंतकांच्या सदिच्छा असल्यामुळे असे कितीही हल्ले झाले तरी ते पचविण्याची ताकद आमच्यात आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद! शुक्रवारी माझ्यावर घरी जात असताना अचानकपणे चार अज्ञात इसमांनी भ्याड हल्ला केला. सर्व स्तरातून त्याचा निषेध होतो आहे. दूरध्वनीवरूनही असंख्य मान्यवरांनी मला धीर दिला, पुढे चालण्यासाठी योग्य सल्ला दिला, त्या सर्वांचे सर्वप्रथम मी मनःपूर्वक आभार मानतो. माझ्यावर हल्ला झाला कारण मी दै. मुंबई मित्रच्या माध्यमातून कोणाचीही मुलाहिजा न बाळगता परखडपणे अन्यायाविरोधात बिनधास्त लिहितो. फक्त लिहून स्वस्त बसत नाही तर संपादक अभिजीत राणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलने छेडतो. याचा धसका घेतलेल्या समाजकंटकांनी हा भ्याड हल्ला करून आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही बऱ्याचदा धमक्या दिल्या. परंतु यांच्या धमक्या आणि हल्ल्यांना आम्ही भीक घालणार नाही. आम्ही वृत्तपत्राच्या कार्यालयात बसून लेखणी चालवतो तेव्हा एक पत्रकार असतो, परंतु जेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलने करतो तेव्हा आम्ही अखिल भारतीय मराठा महासघ आणि अभिजीत राणे युथ फाऊंडेशनचे डॅशिंग कार्यकर्ते असतो. तेव्हा अशा या मर्द-मराठ्यांवर अशाप्रकारे पाठीत वार करण्याने आपल्या लेखणीत फरक पडणार नाही किंवा आंदोलनात आम्ही मागे पडणार नाही . समाजाच्या, जनतेच्या हितासाठी, उन्नतीसाठी, अन्याय-अत्याचाराविरोधात आम्ही यापुढेही असेच धडक आणि कडक आंदोलने करणारच. पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरतानाचा आम्ही तो निश्चिय केला आहे. त्यामुळे हल्ल्याची चिंता आम्ही कधीही करत नाही. सर्व प्रकारच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध स्वाभिमानाने लढणारा, गोर-गरीब व दिन-दलितांना मदत करणारा, रंजल्या-गांजल्या समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करतो. या विरोधात लिहिणे, सघर्ष करणे हे जमत नसेल त्याने या क्षेत्रातच येऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे. म्हणूनच दै. मुंबई मित्र, दै. वृत्त मित्रचे संपादक आणि अखिल भारतीय मराठा महासंघ, मुंबई शाखेचे अध्यक्ष अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेकदा आंदोलने केली. अन्याय, अत्याचार, महागाई, बेरोजगारी अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवर दै. मुंबई मित्र ने आवाज उठवला. कोणाचीही गय न करता सत्य परिस्थिती रोखठोकपणे मांडली. गिरणी कामगारांची बाजू ठामपणे उचलून धरली. विविध एसआरए योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणला. मुंबईतील मनपा रुग्णालयातील अनागोंदी कारभार, बेफिकीर कर्मचारी वर्ग आणि त्यांची लफडी पुराव्यासह उघडकीस आणली. जकातचोरी, वेश्या व्यवसाय, रेशनिंग घोटाळा, मतदार नोंदणी ओळखपत्र वाटपातील सावळागोंधळ, शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानातील मोठ्या प्रमाणावरील होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला. अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो रेल्वे यार्ड हटाव अभियान यशस्वी केले होते. नुकतेच 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील सावळ्यागोंधळाविरोधात "हल्ला बोल आंदोलन छेडले व ते यशस्वीसुद्धा केले. त्याचबरोबर गोरेगाव येथील आरे कॉलनीतील कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला. त्यांचे बंद केलेले पाणी पुन्हा सुरू केले. दूध डेरी बंद पाडण्याचा प्रशासनाचा डावही आम्ही हाणून पाडणार आहोत. मुंबईत बंदी असूनही सुरू असलेल्या "डान्स बार' विरोधातही आम्ही "मुंबई मित्र'च्या माध्यमातून जोरदार आवाज उठवला. हे सगळे कोणासाठी केले? याच्यात माझा स्वतःचा स्वार्थ काय? पैशाच्या जोरावर कायदा धाब्यावर बसवणाऱ्या समाजकंटकांना कोणीतरी वेसण घातलीच पाहिजे, ते काही सहज शक्य नाही. परंतु "अभिजीत राणे' सारखा ढाण्या वाघ माझ्या पाठीशी कायम असल्यामुळे कितीही धमक्या दिल्या आणि हल्ले झाले तरी न घाबरता आम्ही हा जनसामान्यांचा लढा अविरतपणे सुरूच ठेवणार, अगदी बेधडक-बिनधास्त मग काहीही होवो. गेली अनेक वर्षे पत्रकारिता करीत असताना मी कुणाला मुद्दामहून त्रास दिला किंवा कुणाला ब्लॅकमेल केले असे कधीही झालेले नाही, होणारही नाही. कधी कोणासाठी तडजोडीही केली नाही त्यामुळेच परवा हल्ला झाला आणि मला दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून अनेकांनी भरभरून प्रेम दिले. या प्रेमाने माझी ताकद आणखी वाढली आहे परंतु नुसत्या प्रेमाने काय साध्य होणार? आज दिशाहीन झालेल्या जनतेला जागृत करण्याची खरी गरज आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्वांनी उभे रहाणे आवश्यक आहे. अन्यायाविरुद्ध प्रत्येकाच्या मनामद्ये चीड निर्माण व्हायला हवी. अन्यायाविरुद्ध खवळून उठायला हवे. जी निमूटपणे अन्याय सहन करतो, तो त्याच्या उभ्या आयुष्यात काहीही करू शकत नाही, म्हणूनच प्रत्येकाने अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठवायला हवा. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुम्हाला साथ देण्यासाठी दै. मुंबई मित्र सदैव तत्पर आहे. "आई भवानीचा' कृपाशिर्वाद श्री गणरायाची कृपा, अभिजीत राणे यांचा खंबीर पाठिंबा आणि वाचक हितचिंतकांच्या सदिच्छा असल्यामुळे असे कितीही हल्ले झाले तरी ते पचविण्याची ताकद आमच्यात आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद!

No comments: