Monday, March 23, 2009

नट-नट्यांना निवडून देणाऱ्या मतदारांनो दोष कोणाला द्यायचा?

खरोखर दु:ख झाल्यावर पोटातील आतडी जेव्हा पिळवटून निघतात तेव्हाच खरे अश्रू डोळ्यातून गळतात, यालाच रडणे म्हणतात. डोळ्यात ग्लिसरीनचे थेंब घालून नक्राश्रूंच्या जलधारा बरसवणे आणि कॅमेरासमोर आहे म्हणून छाती पिटण्याचा अभिनय करणे याला रडणे म्हणत नाहीत. पण या नाटकी अभिनयालाच मतदार भुलतात. राबणाऱ्यांनी राब-राब राबायचे, काबाडकष्ट करायचे आणि त्यांच्या जिवावर इतरांनी मजा मारायची हीच सरंजामशाही आज लोकशाहीचा बुरखा पांघरून जोमाने कार्यरत आहे. आम्ही फक्त पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून म्हणतो की,"भारत हा कृषीप्रधान देश आहे.' पण या देशातील शेतकऱ्यांची काय दैनावस्था आहे याचे खरे चित्र कोणीही मांडताना दिसत नाही. जी परिस्थिती शेतकऱ्यांची तीच सुशिक्षित बेरोजगारांची. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत हक्कांबरोबरच पाणी आणि शिक्षणाचीही सगळीकडे बोंबाबोंब आहे. सुशिक्षित बेकारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. बी.ए., एम.ए., एम कॉम., एलएल.बी., एम.एससी. सारख्या डिगऱ्यांच्या पुंगळ्या घेऊन लोक नोकऱ्यांसाठी वणवण भटकतात. पण नोकरी मिळत नाही. पाण्यासाठी राज्यातील जनतेला दाहीदिशा फिरावे लागते. मुंबईतही अनेक भागात भीषण पाणीटंचाई आहे. महागाई बरोबरच आर्थिक मंदीमुळे सर्वजण त्रस्त आहेत. अशा बिकट परिस्थितीवर ज्यांनी मात करावी ते आमचे राज्यकर्तेच बॉलीवूडच्या नट-नट्यांच्या तालावर नाचत आहेत. मुंबईत थारा न मिळालेले संजय दत्त, निवडणुकीसाठी परराज्यात गेले आहेत. तर इकडे उत्तर मुंबईत गोविंदाला मोठ्या भरवशाने जनतेने निवडून लोकसभेत पाठवले. परंतु "भरवशाच्या म्हशीला टोणगा' अशी मराठी म्हण आहे. तीचे सार्थक करीत गोविंदाने मतदारांच्या तोंडाला पाने पुसली. निवडून येण्यापूर्वी अनेक डायलॉगबाजी करणाऱ्या गोविंदाने खासदार झाल्यानंतरही आपला पेशा सोडला नाही. चित्रपटांमधून नाचणाऱ्या या नाच्याने सर्व मतदारांनाही अक्षरश: नाचवले. स्वत: चित्रपटांमधून काम करून पैसे कमावणाऱ्या गोविंदाने आपल्या मतदारांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे आता मते मागताना येथील जनतेला काय उत्तर द्यायचे, कसे बोलावे, कसे तोंड द्यायचे असे विविध प्रश्र्न कॉंग्रेसवाल्यांना पडले आहेत. त्यातच आता "माझा "गोविंदा' होणार नाही' अशी दर्पोक्ती करीत नगमा या सिनेअभिनेत्रीने आपणही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे मनसुबे रचले आहेत. मुंबईकर असलेल्या नगमाची आई मूळची कोकणची असून धर्माने ती मुस्लीम आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्याक असल्याचे सांगून कॉंग्रेससह मुस्लिमांनाही आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न ती आटोकाट करीत आहे. हे सुज्ञ मतदारांच्या लक्षात आले नाही तर नवल. स्वत:कडे कोणताही ठोस कार्यक्रम, उपक्रम नाही. एकीकडे कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे नगमा सांगते. तर दुसरीकडे तीच नगमा अल्पसंख्याक आहे असे सांगून तिकिटासाठी कॉंग्रेसकडे दावा करते. याला नाटक नाही तर आणखी काय म्हणायचे? असे बेगडी नाटक करणारे पुढे जनतेला नाचून दाखविण्यापलिकडे आणखी काय करणार? तेव्हा आता या नट-नट्यांच्या बेगडी नाटकांना मतदारांनी भुलून न जाता नीतिवान आणि अभ्यासू, कार्य करणाऱ्या उमेदवारालाच मतदान केले पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या व्यथा ज्याला कळतात असाच नेता असायला हवा. रेल्वेमंत्री रेल्वेतून आणि वाहतूक मंत्री बसमधून प्रवास करत नाहीत त्यांना सामान्य जनतेच्या समस्या कशा कळणार? जनतेशी नेहमी संवाद साधला तर निवडणूक काळात दौऱ्याचा तमाशा करण्याची, आश्र्वासनांची खैरात करीत फालतू अभिनय करण्याची आवश्यकता भासणार नाही. परंतु भारतीय जनता मूर्ख आहे. पैशाच्या बळावर आपण काहीही करू शकतो हे दाखवून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर या नैतिक, अनैतिक गोष्टींचा काडीचाही फरक पडत नाही. त्यामुळेच आर्थिक मंदीचे सावट असूनही कोणत्याही पक्षाच्या अजेंड्यावर जनतेच्या मुलभूत प्रश्र्नांचा विषय दिसत नाही. पक्षीय निवडणूक जाहिरनामे म्हणजे आश्र्वासनांची खैरात असेच म्हणता येईल. आर्थिक मंदीच्या या लाटेत सुमारे 20 दशलक्ष कामगार बेरोजगार होतील असा अंदाज आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेने व्यक्त केला आहे. खुद्द भारत सरकारनेच 5 लाख कामगारांचा रोजगार गेल्याचे संसदेत कबूल केले. म्हणजे नवीन रोजगार तर सोडाच पण आहे त्यांनाही रोजगार टिकवणे कठीण झाले आहे. अशातच खेडोपाड्यातील सुशिक्षित तरुणवर्ग रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत आहे. त्या शहरांमधून यापूर्वीच बेरोजगार नोकऱ्यांसाठी चपला झिजवत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत बेरोजगारीवर प्रभावी उपाययोजना मात्र कोणताही पक्ष सांगताना दिसत नाही. सुशिक्षितांचे हे हाल तर निरक्षरांचा वाली कोण? यासाठी आता तरुणांची मने शेती, पुरक व्यवसांयाकडे वळविली पाहिजेत. फळबाग लागवड योजनेप्रमाणे शेतीसाठीसुद्धा अनुदान योजना राबवल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वप्रथम मुबलक पाण्याची सोय व्हायला हवी. येथे केवळ घोषणा अपेक्षित नाही तर प्रत्यक्ष रोजगाराचे प्रतिबिंब दिसायला हवे. सांगायचे तात्पर्य हेच की आपण बहुतेक वेळ संदर्भहीन बोलण्यात, संदर्भहीन ऐकण्यात आणि निरर्थक वागण्यात खर्च करीत असतो. हेच जर योग्य निर्णय घेऊन योग्य दिशेने आपण कार्यान्वित झालो तर आपले राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. आपण दिवसातून 8-10 वेळा घर झाडून स्वच्छतेचा दिखावा करतो, परंतु धूळ का निर्माण होते याचा शोध घेऊन ते कारणच मुळासकट नाहीसे करण्याचा प्रयत्न कधी करीत नाही. प्रत्येक बाबतीत असेच होते आहे. नदीत गळ टाकून बसणाऱ्यांसारखी आपली अवस्था आहे. मासा गळाला लागला तर ठीक. नाहीतर आम्ही "ठेविले अनंते तैसेची राहू' म्हणत एकवेळ उपाशी रहायची तयारी ठेवतो. अशाने आमची प्रगती कशी होणार? ज्यादिवशी लोकांना आपण काय करतो आहोत, कोणाला आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडावे किंवा आपण नक्की काय केले पाहिजे हे कळेल त्याच दिवशी "मेरा भारत महान' हे अभिमानाने म्हणता येईल. अन्यथा "मेरा भारत महान... ठेवला अमेरिकेकडे गहाण...' अशी परिस्थिती आहे तीच कायम राहणार, मग दोष कोणाला देणार?

No comments: