Monday, July 14, 2008

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।1।।
आईका जी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ।।2।।
कोणाही जिवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्र्वर - पुजनाचे ।।3।।
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दु:ख जीव भोग पावे ।।4।।

कोणतेही जात-पात, धर्म-वंश असे भेद न बाळगता वर्षानुर्षे लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीची वारी करतात. कितीतरी पिढ्या गेल्या, काळ बदलला, सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ, मूल्ये बदलली; परंतु तरीही विठ्ठलभक्तीचा हा झरा अव्याहतपणे वाहतो आहे. परंतु दुर्दैवाने विठोबा आणि पंढरीच्या वारीबद्दल आषाढ व कार्तिक महिना सोडला, तर फारशी जाणीव-जागरूकता कोठे दिसत नाही, याची खंत वाटते. दिवसेंदिवस जाती-पाती, धर्म-भेद वाढत चालल्याने लोकशिक्षणासाठी विठोबा आणि वारीसारखे अतिशय चांगले ज्ञानपीठ या देशभरात आणखी कोठेही सापडणार नाही. मराठी संस्कृती-परंपरा आणि जनतेच्या मनात विठोबाचे स्थान अढळ आहे. हे स्थान सर्व भारतातील आणि जगातील जनतेच्या मनात प्राप्त करून देण्याची गरज आहे. संस्कृतीचे यापेक्षा मोठे ग्लोबलायझेशन दुसरे कोणते असेल?
भक्त चांगदेवाने एकदा रूक्मिणीला प्रश्न केला की भगवंताचे मी नेहमी चार हात पाहिले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या पंढरीच्या विठोबाला दोनच हात कसे? यावर रूक्मिणी उत्तरली, "देवाचे उर्वरित दोन्ही हात, चोखोबाचे ढोरे ओढण्यात, एकनाथां घरी चंदन घासण्यात, जनाबाईचे दळण दळण्यात आणि गोरा कुंभाराची मडकी भाजण्यात गुंतल्यामुळे भगवंताला आता केवळ दोनच हात दिसताहेत' म्हणूनच पांडूरंगाचे दोन्ही हात कमरेवर आहेत. ज्याद्वारे भगवंत आपल्याला सांगतात की, "रे जीवा, तू भिऊ नकोस, भवसागर हा माझ्या हाताखालीच आहे. तेव्हा माझे स्मरण कर आणि तू तरून जा.' असे हे स्वयंप्रकाशी चैतन्यमयी ब्रहृमतत्त्वाचे सगुण-मानवी रूप म्हणजे विठोबा. म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात - तरी माझे निजरूप देखिजे। ते दृष्टी देवो तुज।।
आपल्या आईवडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाकडे प्रेमाने पाहत गेली अठ्ठावीस युगे, ते सावळे परब्रहम आदिमायेसह भक्त पुंडलिकानेच फेकलेल्या विटेवर आजही उभे आहे. विठ्ठल हा भक्तासाठी आसुसलेला प्रेमस्वरूप आहे. त्याला भेटण्याकरीता आजही वारकरी ज्ञानेश्वर-तुकाराम आदि संतांच्या पालखीसह विठ्ठलाच्या नामाचा गजर करीत पंढरीला जातात. तेथे पोहचलेल्या भक्ताला पांडुरंग असेच जणू सांगतोय की, "मी जसा अठ्ठावीस युगे या विटेवर उभा आहे त्याच प्रमाणे तुम्हीसुद्धा जीवनात असेच स्थिर रहा.'
आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि श्रीमंत वर्गातील देवस्थानांच्या कोलाहलात सामान्यांचा पांडुरंग हा नेहमीच अचंबित करणारा आहे. कित्येक शतके नित्यनेमाने वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलाचे नामस्मरण करीत पंढरपूरला जातो आहे. विठ्ठल हाच त्याचा सखा आहे. त्या पांडुरंगाचे हेच वैशिष्ट्य आहे की ज्याला पाहिजे तसा तो होतो. कुणाचा तो मायबाप असतो. कुणाचा मार्गदर्शक असतो. कुणाचा भाऊ असतो. म्हणूनच या पांडुरंगाला सर्व सुखाचे आगर असेही म्हटलेले आहे. या देवाला नवस करावा लागत नाही. या देवाच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. सामान्यातला सामान्य माणूसही त्याला भेटू शकतो. विठ्ठल हा भक्तीचा भुकेला देव आहे. तो भक्तांचीच वाट पहात तिथे वीटेवर उभा आहे. एकदा का आपण त्याच्याशी नातं जोडलं, त्याला शरण गेलो की मग तो सर्वस्वी आपला होतो. आपला सर्व भार वाहायला तो तयार असतो त्यामुळेच पांडुरंगाच्या रूपाने अवघ्या समाजाचं एकत्रिकरण होण्याची फार मोठी प्रक्रिया या महाराष्ट्रात तयार झाली आहे. महाराष्ट्राचं पुरोगामित्व हे या पांडुरंगाच्या भक्तीचं प्रतीक आहे. जो पांडुरंग जनीचं दळण दळायला आला, जो पांडुरंग सावता माळाच्या मळ्यात आला. जो पांडुरंग गोरा कुंभाराच्या मातीत प्रकटला. हे सगळे वेगवेगळ्या जातीचे संत आणि "दळिता कांडिता तुज गाईन अनंता' म्हणजे काम करताना जी ऊर्जा निर्माण व्हावी लागते ती पांडुरंगाच्या रूपाने मिळाली.
आमचं जात्यावरचं दळण असतं त्यातही पांडुरंग असतो. आमचं मोटेवरचं गाणं असतं त्यातही कुठेतरी पांडुरंग असतो. "तू ये रे बा विठ्ठला.' अशा या विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले लाखो वारकरी वारीच्या माध्यमातून दरवर्षी पंढरपूरला जातात. दरवर्षी त्यात भर पडते आहे. अशी ही सामाजिक शक्ती अधिकाधिक विधायकतेकडे कशा वळतील याचे चिंतन सर्व समाजाला पुढे नेणारे ठरेल. लक्षावधी लोक अनेक अडचणींना तोंड देत, कामधाम सोडून असे का जातात? त्यामधून काय साध्य होते? हे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना परंपरा आणि आधुनिकता या दोन्हीचे सामर्थ्य कळलेले नसते. लक्षावधींचा जनसमूह एक विशिष्ट प्रकारची वागणूक करतो, त्यावेळी ती त्याची जीवन जगण्याची रीत आहे असे समजायला हवे. उदाहरणच द्यायचे तर कोणाला आपल्याला लेखन करण्यात प्रचंड आवड वाटते. तर कोणासाठी ते गिर्यारोहण असेल, आणखी कोणाला संगीताची आवड असेल अथवा चित्रकलेचे संग्रहालय पहाण्यात ब्रहमानंद लाभत असेल. त्यासाठी प्रत्येक माणूस आपल्याकडील श्रम, वेळ, पैसा आपल्या कुवतीनुसार खर्च करतो. अशाप्रकारेच स्वेच्छेने हे वारकरी कोणताही स्वार्थ न ठेवता विठ्ठलाचे स्मरण करतात.
संत नामदेवांनी या संप्रदायाची सुरूवात केली. वारकरी संप्रदायात जात, धर्म, क्षुद्र आदी भेदाभेद मानत नाहीत. "वैष्णव ते जन । वैष्णवाचा धर्म ।। भेदाभेद भ्रम। अमंगळ ।।' ही वारकरी संप्रदायाची प्रतिज्ञा होती. आजही वारीतले सगळे वारकरी एकमेकाला "माऊली' म्हणून संबोधतात. जात-धर्म याचा विचार न करता समोरच्या माऊलीच्या पायावर नतमस्तक होतात. पण प्रत्यक्ष समाजात काय चालले आहे. चंद्रभागेच्या तिरावर उभा राहिलेला तोच हा समतासंगर गावोगावाच्या जातीपातीचे गड मात्र उद्‌ध्वस्त करू शकलेला नाही, हे एक कटू सत्य आहे. महाराष्ट्रात सामाजिक समतेचा प्रश्न हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. सावरकरांची सहभोजने, एक गाव एक पाणवठा चळवळ, साने गुरूजींचे उपोषण, संविधानातील तरतुदी, शासनाचे प्रयत्न या सर्वांमधूनही जाती-पाती, धर्म भेदभाव या मानसिकता बदलण्यात अद्यापही यश आलेले नाही. अन्यथा अजूनही जातवार वस्त्या दिसल्या नसत्या. भूकंपाने उद्‌ध्वस्त झालेले गाव पुन्हा बांधताना जातवार वस्त्यांचे आग्रह धरले गेले नसते. आंतरजातीय विवाहाला आजही ज्या प्रमाणात विरोध होतो तो या बाबतीतील सामाजिक चळवळींचे अपयश आणि जाती व्यवस्थेचे विष किती जालीम आहे याचेच दर्शन घडवतो. हे आव्हान बिकट असले तरीही ते स्विकारणे ही काळाची गरज आहे. अशावेळी सामाजिक समता वाढविण्यासाठी, जात, धर्म, क्षुद्र आदी भेदाभेद नष्ट करण्यासाठी एक चळवळ उभारण्याचे जर वारकरी सांप्रदायाने या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनावर घेतले तर एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राला ती सर्वात मोठी आणि आगळीवेगळी भेट ठरेल!

No comments: