Thursday, August 25, 2011

स्व-नेतृत्व दाखवा!

""३० ऑगस्टपर्यंत जनलोकपाल विधेयक संमत केले गेले नाही तर, न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे व्यापक जन आंदोलन देशात उभारले जाईल. देशात स्वयंप्रेरित उठाव होईल आणि सरकारला पाय उतार व्हावे लागेल"", असे सांगत अण्णा हजारेंनी आपले उपोषण चालूच ठेवलेले आहे. ""अण्णा जगले किंवा नाही, तरीही आंदोलनाची ही मशाल सतत पेटती ठेवा"", असे सांगून तरूणांनी लढा देण्यासाठी सज्ज व्हावे असेही आवाहन अण्णांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला हजारोंच्या संख्येने प्रतिसाद देत तरूणाई आज रस्त्यावर उतरताना दिसत आहे.

देशाची लोकसंख्या पाहता, दिल्ली अथवा इतर ठिकाणी गर्दी करणार्‍या तरूणाईने आज लक्ष वेधले असले तरी, मुंबई-ठाण्यातील तरूणाईनेही आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवले आहे. मुंबई-ठाण्यातील  तरूणाई मौजमजा करण्यातच दंग आहे, तारूण्य वाया घालवणे एवढेच त्यांचे ध्येय आहे, असे वाटत असतानाच तरूणाई एका जोषाने पुढे येते, हीच एक सध्याच्या आंदोलनाची जमेची बाजू म्हणावी लागेल. अण्णांनी आवाहन करताच मुंबई-ठाण्यातील  तरूण-तरूणी आपला बुलंद आवाज घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. ही बाब राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने आश्‍वासक आहे, असेच म्हणावे लागेल. म्हणूनच या तरूणाईचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत व्हायला हवे. तरीही अण्णा हजारेंच्या नावाने भाऊगर्दी करणार्‍या या तरूणाईत खरोखरच सद्य परिस्थितीचे गांभिर्य आहे काय? याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

मतदानाची वयोमर्यादा १८ वर्षांवर आणण्यात आली होती तेव्हा, देशातील तरूणाईवर अविश्‍वास दर्शवण्याचे काम बुजुर्गांनी केले होते. वय वाढले म्हणून राजकीय अक्कल येत नसते असे बोलून बुजुर्गांची खिल्ली उडवत तरूणाईचे समर्थनही त्या काळी झाले होते. आज पुन्हा एकदा तरूणाईचा उन्माद पाहून या तरूणाईत खरोखरच गांभिर्य आहे का? असा एक सूर, हवा असल्यास निराशावादी सूर म्हणण्यास हरकत नाही, यायला लागलेला आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर युवावर्ग सामील झाला आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाविषयी कुणाच्या मनात संशयाची पाल चुकचुकण्याचे कारण नाही. त्यांच्या आंदोलना विरोधी ओरड चाललेली आहे ती, प्रस्थापितांकडून. आपला भ्रष्टाचार आता उघड होईल अथवा यापुढे आपल्या भ्रष्टाचारास थारा नाही असे वाटल्यानेच आज सत्तास्थानी असलेले अण्णाविरोधी वातावरण तयार करीत आहेत. त्यांच्या विषयीचा अपप्रचार जनमानसात पसरवित आहेत. पण त्याचा काडीचाही असर झाल्याचे दिसत नाही. कारण अण्णांचे हे काही पहिलेच आंदोलन नव्हे. या आधी त्यांनी कित्येक आंदोलने केलेली आहेत, आणि त्यांना चांगला पाठिंबा मिळून ती यशस्वीही झालेली आहेत. म्हणूनच आजच्या या आंदोलनामुळे सरकारचे धाबे दणाणलेले आहेत. त्याही पेक्षा सरकार आणि सत्ताधारी घाबरलेले आहेत ते, अण्णाच्या एका हाकेने रस्त्यावर उतरणारी, जल्लोषाने पेटलेली तरूणाई पाहून, कारण हीच तरूणाई या भ्रष्टाचारी सत्ताधार्‍यांची भांडवली गुंतवणूक आहे. अण्णांनी याच गुंतवणूकीला हात घातलेला आहे. ही तरूणाई ३० ऑगस्टपर्यंत अशीच उन्मादाने भरलेली राहिली आणि ती चेतवण्यात अण्णा हजारे यशस्वी ठरले तर, अण्णा आणि आमच्या सारखे देशाचे भले इच्छिणारे नक्कीच देशाचे दुसरे स्वातंत्र्य पाहू शकतील.

आज अण्णा हजारे केवळ निमित्तमात्र झालेले आहेत. भ्रष्टाचाराने पिचलेली जनता, दडपशाही, महागाई, काळाबाजार, आतंकवाद, झुंडशाही यामुळे आतल्या आत खदखदणारी जनता या असंतोषातून मुक्त होऊ इच्छित होती. त्याला वाट करून दिली ती अण्णा हजारेंसारख्या ज्वालामुखीने! आज या ज्वालामुखातून तरूणाईच्या ज्वलंत लाव्हा उत्सर्जित होत आहे, तो भ्रष्टाचाराचा नरकासूर कायमचा नष्ट करण्यासाठी. हा लाव्हा आम्ही वाया जावू देता कामा नये. त्याला योग्य असे वळण देण्याची गरज आहे. म्हणूनच रस्त्यावर उतरलेल्या तरूणाईच्या स्वागताबरोबरच तीला दिशा देण्याचेही कर्तव्य आम्हा सर्वांचे आहे, ते एकट्या अण्णांचे नाही याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.

सध्या मुंबई-ठाण्यापुरताच विचार केला तर, मुंबई-ठाण्यातील  तरूणाई गेली तीन दशकं कुठे दृष्टीपंथातच येत नव्हती. शिवसेनेच्या अधुनमधून कानावर पडणार्‍या घोषणा आणि बावचळलेल्या हिंदूत्ववाद्यांच्या मिरवणुका सोडल्यास राज्यातीन जनतेने अन्यायाविरूद्ध, शोषणाविरूद्ध एकही मोर्चा हल्लीच्या काळात पाहिला नव्हता. जणू काही मुंबई-ठाण्यातील  तरूणाई गाढ निद्रीस्त झालेली आहे. विद्यार्थी सेना आपल्या अभ्यासात आणि करियरच्या भ्रामक स्वप्नात बुडून गेली की काय अशीच परिस्थिती निर्माण झालेली दिसत होती. पण आता अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई-ठाण्यातील  विद्यार्थी आणि युवावर्ग भरभरून रस्त्यावर उतरायला लागलेला आहे. ही फक्त तात्पुरती जल्लोषबाजी नव्हे, हा फक्त रस्त्यावर येऊन सादर करण्यासारखा तात्पुरता स्वरूपाचे रस्तानाट्य प्रयोग नव्हे. कारण असले प्रसंग हे परत परत येत नसतात. काही दशकानंतर अण्णा हजारेंसारखी एखादीच व्यक्ती सुरुंगाची वात पेटवायला पुढे सरसावत असते. अण्णा हजारेंची तुलना महात्मा गांधींशी जरी होऊ शकत नसली तरी गांधीजींनंतर जयप्रकाश नारायण आणि आता अण्णा हजारे जनतेसमोर आश्‍वासक मशाल घेऊन उभे ठाकले आहेत. या मशालीने देशातील ज्वलंत पलिते तापलेले आहेत, सुरुंग पेटलेले आहेत. या पलित्यांचे डाग भ्रष्टाचा-यांच्या ढुंगणावर कसे द्यायचे, हे सुरूंग अचूक ठिकाणी कसे पेरायचे जेणे करून समाजाच्या कल्याणासाठी त्यांचा वापर होईल, याचा विचार आताच करायला हवा.
आज देशातील तरूणाईचा वापर राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी चालवलेला आहे. या तरूणाईला आपले कार्यकर्ते म्हणून वापरायचे आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना या वयात आवश्यक असलेल्या सर्वच्या सर्व गोष्टी द्यायच्या हीच भ्रष्ट निती म्हणा अथवा कुटनिती म्हणा या भ्रष्टाचारी राजकीय धेंडांनी चालू ठेवलेली आहे. याचे कारण काय तर, आज  एकही नेतृत्व या तरूणाईसमोर कार्यक्रम ठेऊ शकलेले नाही. विधायक कार्यक्रम देऊ शकणारे जबरदस्त ताकदीचे विधायक नेतृत्व आज अस्तित्वात नाही असे नाईलाजाने म्हणावे लागते. जे नेतृत्व पुढे पुढे करताना दिसते ते प्रसिद्धीला हपापलेले आणि राजकीय अस्तित्वाची खुमखूमी असलेले सवंग नेतृत्व आहे. या नेतृत्वाकडून आजच्या तरूणाईला योग्य मार्गदर्शन मिळण्याची सुतराम शक्यता नाही. ही तरूणाई म्हणजे या राजकीय नेत्यांची पिळावलच आहे. भ्रष्टाचाराने कमावलेल्या नोटा या तरूणाईसमोर नाचवायच्या आणि त्यांच्या कडून आपल्यासाठी मतांचे गठ्ठे वळवायचे एवढेच काम या तरूणाईकडून करवून घेतले जात आहे. त्याच्या बदल्यात तात्पुरत्या सुख-चैनीची व्यवस्था या तथाकथित नेतृत्वाकडून व्यवस्थितपणे करण्यात येते.

अण्णा हजारेंच्या पायगुणाने का होईना, त्यांच्या हाकेने देशातील तरूणाई पेटून उठलेली आहे. त्यांच्यासाठी हे आंदोलन म्हणजे जल्लोषाने भरलेले स्नेहसंमेलनही असेल, त्यांच्यासाठी हा सर्व प्रकार म्हणजे एक इव्हेंटही असेल, पण तरूणाई घोषणा देत उठली हेच महत्वाचे आहे. तीला कशी पेटवायची, पेटवत ठेवायची याचा विचार थंड डोक्याने देशाच्या भवितव्याचा विचार करणार्‍यांनी करायला हवा. डोक्यावर ""मी अण्णा हजारे"" असे लिहिलेली गांधी टोपी घातली म्हणून कोणी अण्णा हजारे होऊ शकत नाही. अण्णा हजारे होण्यासाठी त्यागाची आवश्यकता असते. बिनापरवाना वाहने हाकून पोलिसांनी अडवल्याबरोबर त्यांच्या हातावर चिरिमीरी टाकून सुटका करून घेण्यात धन्यता मानणारे अण्णा हजारे होऊ शकत नाहीत. अण्णा हजारे होण्यासाठी प्रचंड आत्मबळ लागते. ते बळ तरूणाईने आधी आपल्या अंगी बाणवायला हवे. सर्व प्रथम आपण कोण आहे? याचे भान बाळगायला हवे. 

आमच्या देशाला एक गांधी, एक जयप्रकाश आणि एक अण्णा पुष्कळ झाले, आम्हाला अण्णा व्हायची गरज नाही. फक्त अण्णांनी जे विचार दिलेले आहेत ते समजून घेऊन स्व-नेतृत्व देशापुढे आणण्याची गरज आहे. त्याच दिशेने आपण पुढे जावूया! त्याच पंथाचा स्वीकार करूया!!

No comments: