Wednesday, May 11, 2011

दाऊद राहिला काय, पळाला काय, भारतीयांना काय?

अमेरिकेने ओसामा बिन लादेनला एबोटाबादमध्ये ठार केल्याने धास्तावलेल्या दाऊद इब्राहिमने पाकिस्तानमधील कराचीहून आपला मुक्काम सौदी अरेबियाकडे कसा हलवला, त्याची सुरस कहाणी गुप्तचर यंत्रणांच्या हाती आली आहे. दाऊद पाकमध्ये कराचीत कोठल्या वस्तीत राहातो, त्याच्यासोबत कोण कोण आहेत ही सगळी माहिती गेली अनेक वर्षे जगजाहीर असूनही भारत सरकार आपल्या ‘मोस्ट वॉंटेड’ डॉनच्या केसालाही धक्का लावू शकले नाही. त्यामुळे दाऊद पाकिस्तानात राहिला काय, पळाला काय, भारतीयांना त्यामुळे काही फरक पडत नाही, कारण मुळात मुंबईच्या गुन्हेगारी जगताच्या या एकेकाळच्या सम्राटाला जेरबंद करण्याची इच्छाशक्तीच आपल्या सरकारांनी वा नेत्यांनी कधी दाखवली नाही.

'दाऊदच्या मुसक्या आवळू' अशा गर्जना करणार्‍या गोपीनाथ मुंड्यांच्या भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात येऊनही त्यांना त्याच्यापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे आज अफजल गुरू आणि कसाबला का पोसता असे विचारण्याचा मुळात यांना अधिकार नाही. दाऊद सुखाने आयुष्य घालवतो आहे. हत्या, अपहरणे, खंडणी, असे नाना गुन्हेच त्याच्या गँगच्या नावावर आहेत आणि ९३ साली मुंबईला हादरवून गेलेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा तो एक प्रमुख सूत्रधार होता असा आरोप आहे. पाकिस्तानात अंकुरलेल्या दहशतवादाची पाळेमुळे भारतात रोवण्यासाठी ज्या हस्तकांचा वापर केला गेला, त्यामध्ये दाऊद इब्राहिम आणि त्याची टोळी यांची भूमिका महत्त्वाची होती. आज आपल्या देशामध्ये जी दहशतवादाची विषवल्ली फोफावली आहे, तिला सुरवातीच्या काळात खतपाणी घालण्यासाठी दाऊदने आपली सारी यंत्रणा, पैसा वापरला हे लक्षात घेतले पाहिजे. मुंबईचा डॉन म्हणून तर त्याने आपले बस्तान बसवले होतेच, पण देशद्रोही शक्तींचा म्होरक्या म्हणूनही त्याने आपल्या कारवाया येथे चालवल्या.

दाऊदला पकडण्याच्या केवळ घोषणा झाल्या. त्यासाठी इंटरपोलला साकडे घातले म्हणजे आपले कर्तव्य संपले अशा उदासीनतेतूनच दाऊद निर्धोक आयुष्य जगू शकला. दुबईतून त्याने पाकिस्तानात मुक्काम हलवला, पण भारताने कधी त्याबाबत पाकशी साधा निषेध नोंदवल्याचे ऐकिवात नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर कुठे चाके हलली आणि भारताला हव्या असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत दाऊदचेही नाव घातले गेले. बस्स, इतकेच. दाऊदला खरोखरच भारताच्या ताब्यात मिळवणे एवढे कठीण होते का? अमेरिका भले जागतिक दहशतवादाचा बीमोड करण्याच्या बाता करीत असेल, परंतु तो देश केवळ स्वतःचे हितसंबंध पाहतो. भारतात थैमान घातलेल्या दहशतवादी शक्तींशी त्यांचे काही देणेघेणे नाही. अफगाणिस्तानमध्ये सोविएतांविरुद्ध लढण्यासाठी लादेनसारख्या प्रवृत्तींना बळकट करण्याचे सत्कार्य अमेरिकाच तर करीत होती. बिन लादेनला थेट पाकिस्तानमध्ये कमांडो पाठवून ठार मारताना पाकिस्तान सरकारला विचारण्याचीदेखील गरज अमेरिकेला वाटली नाही. ‘द्रोण’ हल्ले तर अमेरिका बिनधास्त करीत आली आहे. भारत सरकार मात्र अशा धडक रणनीतीचा विचारही करू शकत नाही. पाकिस्तान हे एक अण्वस्त्रसज्ज राष्ट्र आहे हे कारण पुढे केले जात असले, तरी दहशतवादाचा खरोखर निःपात करायचा असेल, तर त्यासाठी आक्रमक नीतीच आवश्यक ठरते. दाऊद तर आता पळाला आता त्याला भारत  काय करणार?

No comments: