Thursday, October 1, 2009

लोकप्रतिनिधी आणि आम्ही

तिकीट वाटपात गोंधळ, श्रेष्ठींचे राजकारण, पक्षबदल, घराणेशाही आणि विधानसभा निवडणूका जाहीर होताच सर्वच पक्षांची उमेदवारी घोषित करताना झालेली दमछाक सर्वांनीच पाहिली. उमेदवारी मिळविण्यासाठी आपले नेते किती लाचार होतात हे ही या निमित्ताने दिसून आले. कॉंग्रेसमध्ये नाराजी, राष्ट्रवादीत असंतोष, शिवसेना-मनसेत फाटाफूट, भाजपमधून राजीनामे, तिसऱ्या आघाडीत फूट, कॉंग्रेसला रामराम, संताप, धुसफूस, विश्वासघात, पैसे खाऊन तिकिटांचे वाटप, सभा घ्यायला पैसे नाहीत म्हणून तिकिट नाकारले, पक्षश्रेष्ठांना तिलांजली देऊन अपक्ष म्हणून बंडखोरी- हे सर्व कशासाठी? कोणाचाच कोणावर विश्वास नाही. कोणावरही निष्ठा नाही ना आपल्या पक्षावर, ना आपल्या नेत्यांवर, तिकीट मिळेपर्यंत ज्यांचा आदरणीय म्हणून उल्लेख केला जातो तेच तिकीट दुसऱ्याला मिळाले की आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. दुसऱ्या पक्षात जाण्याच्या घोषणा करतात. तिकडेही काही नवीन नाही परंतु नव्याने येणाऱ्यांना आरतीने ओवळतात. तिकिट देतात. मग पुन्हा तिकडेही काही नवीन नाही परंतु नव्याने येणाऱ्यांना आरतीने ओवाळतात. तिकीट देतात. मग पुन्हा तिकडेही जुने निष्ठावंत बंड करणारच. सगळा प्रकार किळसवाणा.
जनतेची सेवा करण्याचे तोंडाने बोलायचे आणि मनाने सत्तेसाठी, तिकिटासाठी वरिष्ठांचे पाय चेपायचे असले घाणेरडे प्रकार घडत असतानाही आम्ही पांढरपेशे मतदार फक्त तमाशा पहाण्याचेच काम करतो. सालाबादप्रमाणे 40.45 टक्के मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार, बाकीची मंडळी सुट्टी मिळाली म्हणून पिकनिकला जाणार, थोडक्यात, पैसे वाटून मतदार विकत घेऊन पुढारी आमदार होतात. पैशाच्या बळावर सत्तेवर येतात. या सगळ्या प्रकाराला आपणच जबाबदार असतो, हे कटू सत्य आहे. परंतू ते स्विकारण्याचे धाडस मात्र कोणीही करत नाही. नंतर मात्र या नेत्यांच्या नावाने उगाचच फालतू चर्चा करण्यात दिवस घालवतो. आपला लोकप्रतिनिध कसा आहे, तो काय करतो, त्याच्याकडे नवनवीन गाड्या, बंगले कसे येतात हे उघड गुपित असले तरीही आम्ही डोळे झाकून त्यांनाच निवडून देतो.
विकास म्हणजे काय? शहर असो की गाव, सर्व लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे काम केले तर 5.10 वर्षात त्या भागाचा कायापालट नक्की होऊ शकतो. परंतु निवडून गेलेला कुठलाही लोकप्रतिनिधी नियोजनपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करीत नाही. स्वतःच्या पोटा-पाण्याची, पेटारे भरण्याची कामे करण्यातच ते मग्न असतात. हे पूर्वापार चालत आले आहे. विकास होण्यासाठी लोकप्रितिनिधी हा अभ्यासू आणि प्रामाणिक असावा लागतो. परंतु सध्याचे चित्र काय सांगते? प्रत्येकजण पैसा कमावण्यातच दंग आहे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारात सामिल होतात. त्यांच्याशी संगनमत करून विकासाच्या योजना कागदावरच रंगवून स्वतःचे स्वार्थ पहातात. अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार करतात. ज्यांनी निवडून दिले त्या मतदारांना "लुटण्याचे' साधन मानतात, प्रत्येक ठिकाणी काम करण्यासाठी हेच लोकप्रितिनिधी "दलाली' घेतात. संतत्प मतदारही त्यांच्याशी संबंध तोडतात. परंतु पुन्हा नव्याने येणारसुद्धा त्याच जातकुळीतला असतो. त्यामुळे थंड डोक्याच्या आणि निद्रिस्त जनतेचा गैरफायदा उठवत लोकप्रतिनधी मनमानी कारभार करतात. आम्हाला प्यायला पाणी नाही, रस्त्यांची सोय नाही, शिक्षणाच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे. वीजेची टंचाई भेडसावते आहे. रोजगार नाही, बेकारी वाढते आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे तरीही या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची हिम्मत आम्हाला होत नाही, अशाने आमचा विकास होणार कसा? त्यांना जाब विचारणारा कोणीही नाही म्हणूनच निवडणूकीचा तमाशा सर्वजण पहात आहेत. त्याची हवी ती मनमानी सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराने जागृत रहायला हवे. कोणत्याही आमिषाला, आश्वासनांना बळी न पडता, चांगल्या लोकप्रतिनिधीला मतदान करायला हवे एखाद्या विकासाच्या कामासाठी वारंवार त्या लोकप्रतिनिधींना भेटले पाहिजे. त्यांच्या डोक्यावर बसून प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन दबाव टाकून काम करून घेतले पाहिजे. ऐकत नसतील तर त्यांच्याविरोधात वृत्तपत्रांकडे धाव घेतली पाहिजे. कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपली समस्या आपणच सोडविली पाहिजे. अन्यथा आपण असेच खितपत पडून रहाणार! आपण नक्की काय करायचे हे ठरविण्याची वेळ आता आलेली आहे. निवडणूकीच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी दारोदार फिरत आहेत.
त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न तरी करा, यश नक्की मिळेल.

No comments: