Tuesday, October 28, 2008

...तीच खरी दिवाळी

दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके वाजवले नाहीत तर ती दिवाळी कसली असा प्रश्न काहीजण करतात. परंतु या फटाक्यांच्या आतिषबाजीत मात्र करोडो रूपयांचा चुराडा होत आहे. त्यामुळे जागतिक मंदी आली असली, व्यापारी हवालदील झाले असले, महागाईने सर्वांना त्रासले असले तरी आणि राज्यातील शेतकरी आत्महत्या करित असले तरीही त्याची पर्वा कोणालाच नाही. हेच यावरून दिसते
दिवाळीत रस्त्यांवर, गल्ल्यांमधून जेव्हा फटाक्यांचे जोरदार आवाज निघतात, तेव्हा त्यात आवाजापूर्वीचा कटू इतिहासही दडलेला असतो. आपण त्या कर्णकर्कश आणि जीवघेण्या आवाजालाच आपली संस्कृती बनविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे फटाके थांबत नाहीत, ध्वनीप्रदूषणही वाढते, अपघांतांमध्ये वाढ होते, त्यातून घडणारे मृत्यूही थांबत नाहीत. दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच राजस्थानातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन कोवळ्या 8 जीवांसह 30 जण ठार झाले. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील डीग या गावी घडलेली स्फोटाची ही घटना खूपच भयानक आणि भयावह होती. स्फोटाने संपूर्ण इमारतच जमीनदोस्त झाली. जेथे स्फोट झाला त्या गावात एक-दोन नव्हे तर तब्बल 13 फटाक्यांचे कारखाने असून ते सर्वच्या सर्व बेकायदेशीर आहेत. वर्षानुवर्षे चालणारे हे अवैध कारखाने माहित असूनही भ्रष्टाचाराचा रोग लागून आंधळा, मुका, बहिरा झालेला कायदा तेथपर्यंत पोहचू शकला नाही, हे आपले दुर्दैव. यापूर्वी सुद्धा बिहारमध्ये 32 आंध्रात 11, तामिळनाडूत 30, ओरिसात 7 व केरळात 5 बालमजुरांचे बळी फटाक्यांच्या कारखान्यांनी घेतले आहेत. त्यामुळे बालमजुरी संपवण्यात आपल्याला यश आलेले नाही हे जसे खरे आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत जेथे जेथे स्फोट झाले तेथे तेथे कायदा फितूर झाला होता किंवा कारखानदारांनी तो धाब्यावर तरी बसवला होता. तसेच आधुनिक काळातही कामाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. हेही तितकेच खरे असल्याचे स्पष्ट दिसते. त्याचबरोबर या दिपावलीच्या कालावधीत या फटाक्यांमुळे देशभरात कोट्यवधी रुपयांची हानी तर होतेच शिवाय लाखो मुले होरपळून, हजारो मुले मृत्यूमुखी पडत असल्याने हीच का आमची संस्कृती असा प्रश्न पडतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या बाल कल्याण आणि सुरक्षा विभागाने दिवाळीच्या तोंडावर दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की 15 वर्षांखालील मुलांचे अपघातीतील प्रमाण 70 टक्के आहे फटाक्यांमुळे दरवर्षी दीपावलीत दीड लाख मुले भाजतात, 7000 मुलांचा मृत्यू होतो, जवळजवळ 13 हजार मुले आंधळी होतात. 38 हजार मुले अपंग होतात. त्यामुळे हा अहवाल निश्चितच धक्कादायक आणि धोकादायक आहे. मुले फटाके उडवीत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची असते.
परंतु मुले पालकांना न जुमानता, पालकांची नजर चुकवून फटाके उडवतात आणि अशाप्रकारे भीषण अपघातांमधून बळी पडतात. दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके वाजवले नाहीत तर ती दिवाळी कसली असा प्रश्न काहीजण करतात. या फटाक्याच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे, अतिधूरामुळे मानवाप्रमाणेच पशुपक्षांनाही प्रचंड त्रास होतो. मंदीचा तडाखा बसलेला असूनही परंतु या फटाक्यांच्या आतिषबाजीत मात्र करोडो रूपयांचा चुराडा होत आहे. त्यामुळे जागतिक मंदी आली असली, व्यापारी हवालदील झाले असले, महागाईने सर्वांना त्रासले असले तरी आणि राज्यातील शेतकरी आत्महत्या करित असले तरीही त्याची पर्वा कोणालाच नाही. हेच यावरून दिसते. दिवाळीतच नव्हे तर आता कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी हजारो रुपयांचे फटाके उडवले जातात. दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा खर्च केवळ "आवाज' करण्यावर खर्च होतो. पण हाच वाया घालवलेला पैसा अन्य समाजोपयोगी कार्यासाठी वापरला गेला तर, समाजाचे किती कल्याण होईल? बेकार गिरणी कामगार, कर्जबाजारी शेतकरी, गरीब मुले, औषधालाही पैसे नसणारे व्यक्ती, पुलाखाली, रस्त्यावर रहाणारी रस्त्यांमध्ये कोणी तरी मदत करील या आशेवर आशाळभूतपणे पाहणारी दूर्दैवी बालके यांना मदत कोण करणार? सर्वांना आपल्या आनंदात सामावून घ्या. बघा तुमचा आनंद कसा द्वीगुणित होतो. याची जाणीव जेव्हा होईल, तीच खरी दिवाळी तोच खरा सुदिन!
दिवाळी मना-मनाची असते. ती साजरी करताना समाजातील उपेक्षितांचा भाग्यदीप आपल्याकडून उजळला गेला पाहिजे.

Sunday, October 19, 2008

"कोजागिरी' कि "मजागिरी'

आज कोजागिरी पौर्णिमा. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, वाल्मिकी पौर्णिमा अशी नावे आहेत. कोजागिरी किंवा कोजागिरी हे या पौर्णिमेचे सर्वज्ञात नाव. "को+जाग+री म्हणजे कोण जागे आहे.' या रात्री घर, मंदिर, उद्यान, रस्ते वगैरे ठिकाणी दिवे लावतात. लक्ष्मी व इंद्र देवाची चंद्राच्या साक्षीने पूजा करायची. नारळ फोडून पाणी व पोहे देवांना समर्पण करायचे आणि चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा. त्यासाठी रात्री जागरण करायचे. जागायचे त्यासाठी मग रात्रभर जागत असताना भजन, गाणी, भक्ती गीते म्हणायची, खेळायचे, आनंदाने नाचायचे. मग रात्री लक्ष्मी आपल्यावर कोण जागे आहे हे पाहून जो जागृत असेल त्यावर प्रसन्न होऊन त्यांना भरपूर अशीर्वाद, पैसा, संपत्ती देण्याचे वरदान देते अशी रूढ परंपरा आहे, असे हे मूळे कोजागरीव्रत.
कोजागिरी हा खरे पाहता कृषिकर्त्यांचा आनंदोत्सव आश्विनात पावसाळा संपलेला असतो. सर्वत्र वातावरण अगदी प्रसन्न असते. शेतातील पिके डौलाने फडफडत असतात. वेली फुलांनी बहरलेल्या. परसात, अंगणात दुधी, भोपळे, भेंडी, काकडी, चवळी, पेरू असा फळभार आलेला असतो. कारळी, शिराळी, पडवळ, घोसाळी यांनी मांडव सजलेले असतात. भातखाचरात हळव्या भाताचे पीक तयार झालेले. घरोघरी कसे संपन्न, भरलेले वातावरण असते. त्यातच नवान्न पौर्णिमा आल्याने प्रत्येक घराघरात लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी नव्या अन्नाची म्हणजे तांदळाची खिर बनविण्यात येते. देवीला प्रसाद दाखवून सर्वांना वाटण्यात येते. शेतात पिकलेल्या नव्या दाण्यांची खीर करून लक्ष्मीला नैवेद्य दाखवून मगच नवा दाणा खायला शेतकरी सुरुवात करतो. तत्पूर्वी तो नव्या दाण्याला अन्न म्हणून शिवप्रही नाही. ही सगळी मनोभावे, श्रद्धेपोटी केलेली पूजा आणि रात्रीचा आंनदोत्सव म्हणजेच "कोजागिरी पौर्णिमा' होय. शेतात धान्य पिकले आहे. तेव्हा कृषिराजा जागा रहा... सावध हो, जागते रहो, जागेल तोच मिळवेल, जो जागतो, जो कष्टतो, तोच धनधान्याचा मालक होतो असा संदेश देणारी ही कोजागिरी पौर्णिमा आहे.
पण आजच्या काळात कृषिपूजन हरवले जात आहे. मूळ व्रते, पूजा म्हणजे काय, त्याचा आज कोणालाच पत्ता नाही. मग त्यातूनच निर्माण होत आहे भ्रष्ट लोकाचार आणि त्यातूनच आज "कोजागिरी'ची झाली आहे "मजागिरी'. "कोजागिरी-नवान्न पौर्णिमा' म्हणजे काय हे शहरात अनुभवणे अशक्य. शहरांपासून फक्त दुधाची तहान ताकावर भागवली जाते. घरासमोर अंगणच नाही. आजूबाजूच्या मोठ-मोठ्या इमारतींमुळे चंद्र अनुभवता येत नाही. इमारतींमधून राहणारे मग टॅरेसचा आधार घेतात. कोजागिरी म्हणजे शहरी मुलांसाठी ऋेेश्र ोेप वरू! इमारतीच्या गच्चीवर सगळेजण जमणार, प्लास्टिकच्या पिशव्यांमधील दूध आणणार, गॅसवर गरम करणार, मसाला दूध करून लाऊड स्पिकर, डी.जे.च्या तालावर वेडे-वाकडे नाचत ते दूध पिणार.... यांची "मजागिरी' पौर्णिमा साजरी झाली. हे तर काहीच नाही. हल्ली नवीन फॅड तरुणाईच्या डोक्यात शिरला आहे. कित्येकजण चौपाटीवर जाऊन मजा करतात. काहीजण घराघरातून बळजबरीने वर्गणी काढून वडे, समोसे आणतात, पाव-भाजी खातात. त्याच्याही पलीकडे जाऊन नशापाणीसुद्धा करण्यात आजची तरुण मंडळी धन्यता मानताना दिसते. रात्रच जागवायची आहे ना... मग दारु प्यायची आणि डी.जे.च्या तालावर रात्र बेधुंद करायची. फक्त खाणे, पिणे, ऐश करणे हीच का आपली संस्कृती?
मुंबईतील युवा पिढी तर अशाप्रकारच्या संधीची वाटच पहात असतात. फे्रन्डशीप डे, व्हॅलेंटाईन डे, पिंक डे, जिन्स डे, गटारी, थर्टी फर्स्ट, गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सव. आणि आता कोजागिरी पौर्णिमासुद्धा या सणांचा आस्वाद घेण्याऐवजी युवा पिढी शरीरसुखात डुंबण्यातच धन्यता मानताना दिसते. हे आपल्या देशाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. तरुण-तरुणींना पबमध्ये जाणे, वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये रमणे, मित्र-मैत्रिणींचा सर्वप्रकाराने उपभोग घेण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही.
कोण होतास तू काय झालास तू,
अरे! वेड्या कसा वाया गेलास तू !!
अशी परिस्थिती आज सर्वत्र दिसत आहे. आधुनिकतेच्या नादात आम्ही डोळसपणा हरवून बसलो आहोत. आमची सारासार विवेकबुद्धी पुरती भ्रष्ट झाली आहे. भोग प्राप्तीला सर्वस्व मानून त्यांच्या प्राप्तीसाठी वाटेल ती कर्मे बिनदिक्कत आचरण्याचा कोडगेपणा आमच्यात आला आहे. सरकारतर्फे कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा प्रचार केला. परंतु मागे वळून पाहिले असता चित्र काय दिसते? कुणाचे कल्याण झाले? कुटुंबाचे, समाजाचे की देशाचे? दुर्दैवाने या कुटुंबांचे कल्याण केले, ना समाजाचे, ना देशाचे! परंतु तरुण मंडळींनी याचा चांगलाच गैरफायदा उचलला. लैंगिक संबंध कितीही जणांशी ठेवले तर काय बिघडते? ते सुरक्षित असले म्हणजे झाले! अशा प्रकारचे भयानक, भयावह मत महाविद्यालयातील युवापिढी व्यक्त करीत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या नवरात्रोत्सवात कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. त्याचबरोबर यादरम्यान कंडोम, आय पिल या गोळ्यांची विक्रीसुद्धा लाखो रुपयांची झाली. नवरात्रोत्सवानंतर पुढील दोन-तीन महिन्यात दरवर्षी गर्भपाताचे प्रमाण वाढलेले दिसायचे ते मात्र यावर्षी दिसणार नाही. लोकसंख्या दरवाढ रोखण्यासाठी सरकारतर्फे प्रचार यंत्रणेवर लाखो रुपये खर्च केले जातात. विवाहित जोडप्यांवर ज्यांचा काहीच परिणाम होत नसला प्रेमी युगुलांनी मात्र त्याचा पुरेपूर लाभ घेतला आहे. कंडोम आणि आयपिल गोळ्यांमुळे अनैतिक संबंधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळेच रेव्ह पार्ट्यांसारखी कृत्ये सहजपणे घडत आहेत. अफेअर्स असण्यातच अनेकांना भूषण वाटते आहे. हे लोण आता शहरांमधून ग्रामीण भागांपर्यंत पोहोचले आहे. लैंगिक विकृती पशुत्त्वाच्या स्तराला चालली असल्याचीही उदाहरणे घडून येत आहेत. खिळखिळ्या झालेल्या सर्व संस्कार यंत्रणाच भक्कम करणे हाच त्यावरील उपाय असू शकतो. प्रत्येक कुटुंबातील वरिष्ठांनी दक्ष राहून लक्ष दिले पाहिजे. यासाठी सध्याच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत. अन्यथा सगळीकडे स्वैराचार माजेल आणि माणसे व जनावरे यांच्यातील भेदच संपुष्टात येईल, त्याला जबाबदार कोण?

सुखासाठी गुलामी धोकादायक

कामगारांचे, शेतकऱ्यांचे शोषण असो, मरण असो किंवा पिळवणूक असो किंवा इतर कोणताही अन्याय असो. जो जळतो तोच कण्हतो. इतर सर्वजण मात्र आपण त्या गावचेच नाही अशा थाटात वावरत असतात, ही वस्तूस्थिती दुर्दैवी असली तरी सत्य आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळेच वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून बातम्या, लेख प्रसिद्ध झाले तरी अप्रत्यक्षरित्या परिणाम भोगणारा सामान्य वाचक मात्र अविचल आहे. जो काही थोडा स्वागत-निषेधाचा स्वर उमटत आहे तो केवळ वृत्तपत्रांच्या पांढऱ्या पानंाना काळे करण्यापुरताच म्हणता येईल.
सध्या जो-तो विरोधाच्या गोष्टी करताना दिसत आहे. अमेरिकेची विषारी "डाऊ' कंपनी संतभूमीतून हाकलण्यासाठी जोरदार वाद सुरू आहे. "डाऊ' ही कंपनी संतभूमीतूनच नव्हे तर या राज्यातून हद्दपार व्हायला हवी, यामध्ये काही वादच नाही. अशाप्रकारे विषाची चव घेण्याची गरजच काय? 1984 साली भोपाळमधील कारखान्यात झालेल्या विषगळतीने 25 हजार लोक मरण पावले हे उदाहरण समोर असताना "डाऊ' ला झालेला विरोध रास्तच आहे. परंतु गेल्या दोन-चार महिन्यातील वृत्तपत्रे चाळली असता प्रत्येक प्रकल्पात काही ना काही कारणास्तव "खो' घातल्याचे दिसून येते. अशाने राज्याची प्रगती होणार कशी? रायगड जिल्ह्यात आलेल्या 12 सेझ प्रकल्पांमुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतीसाठी एक कोपराही उरलेला नसल्याचे लक्षात येते. मुकेश अंबानीच्या महामुंबई सेझ प्रकल्पाविरोधात 22 गावातील शेतकऱ्यांनी मतदान केल्यावर आता अनिल अंबानींच्या औष्णिक वीज प्रकल्पाविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याचबरोबर 9 गाव संघर्ष समिती, 24 गाव सेझविरोधी संघर्ष समिती, आदिवासी हक्क संघर्ष समिती, टाटा सेझविरोधी संघर्ष समिती, अशा प्रकारच्या अनेक संघटना व संतभूमीतील वारकरी 10 ऑक्टोबरला मंत्रालयावर मुख्यमंत्र्यांविरोधात धडक देणार आहेत. इकडे मुंबईत मेट्रो रेल्वेचे यार्ड हटाव अभियान राबविले जात आहे. त्यासाठी जोरदार विरोध दर्शविला जात आहे. आश्चर्य म्हणजे या मेट्रो यार्डला सर्वपक्षियांनी विरोध केला असून त्यामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीसुद्धा सहभागी झाले आहेत. त्याला कारण ही तसेच ठरले आहे. ज्याप्रमाणे अनिल अंबानी यांनी वीज प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यापूर्वी कमीत कमी विस्थापितांचा पर्याय प्राधिकरणाला सादर करायला पाहिजे होता. तो पर्यायच सादर न करता सक्तीने जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात झाली. म्हणूनच तेथील शेतकरी रस्त्यावर उतरले. असाच प्रकार मुंबईत सुरू आहे. एमएमआरडीएच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी पूर्वपाहणी न करताच चारकोप ऐवजी कांदिवली, मालवणी भागात मीटचौकीजवळ स्वघोषित चारकोप स्थानक आणि बाजूच्या 15 हजार झोपडीधारकांच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरवून यार्ड (कारशेड) बांधण्याचे मनसूबे रचले आहेत. त्यांना पर्यायी जागा कशी देणार? कोठे देणार? एकूण किती झोपड्या विस्थापित होणार आहेत? याची काहीच माहिती एमएमआरडीएकडे नाही. त्यामुळे याच परिसरात दोन ठिकाणी मोकळे भूखंड असतानाही मुद्दामहून याच झोपड्यांवर बुलडोजर चढवण्याची कल्पना कोणाची? असा प्रश्न पडतो. अशा प्रशासकीय चुकांचे खापर अखेर मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर फोडले जाते, याला जबाबदार कोण? प्रशासनाच्या चुकांमुळे सर्वसामान्यांचे सुख हिरावून घेतले जात आहे. त्या प्रशासनात बदल कसा आणि कोण करणार? कामगारांचे, शेतकऱ्यांचे शोषण असो, मरण असो किंवा पिळवणूक असो किंवा इतर कोणताही अन्याय असो. जो जळतो तोच कण्हतो. इतर सर्वजण मात्र आपण त्या गावचेच नाही अशा थाटात वावरत असतात, ही वस्तूस्थिती दुर्दैवी असली तरी सत्य आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळेच वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून बातम्या, लेख प्रसिद्ध झाले तरी अप्रत्यक्षरित्या परिणाम भोगणारा सामान्य वाचक मात्र अविचल आहे. जो काही थोडा स्वागत-निषेधाचा स्वर उमटत आहे तो केवळ वृत्तपत्रांच्या पांढऱ्या पानांना काळे करण्यापुरताच म्हणता येईल.
आज आपल्या राज्याची काय परिस्थिती आहे? प्रशासकीय कामकाज कसे चालले आहे? जनतेला कसे वेठीस धरले जाते? आणि नेतेमंडळी कशी वागतात? हे कधीच न सुटणारे प्रश्न आहेत. समजा एखाद्याने उद्योगधंदा सुरु करायचे ठरवले तर अधिक पैसा कमवायचा आणि सुखाने जगायचे हा त्यामागचा उद्देश असतो. आपल्याकडील जमा, अधिक बॅंकेचे कर्ज काढून उद्योगधंदा सुरू करायचा. धंदा सुरू करण्याचे ठरवल्यापासून त्याची झोप उडून जाते. आपल्या भागातील झाडून सगळ्या बॅंकांची ना हरकत प्रमाणपत्र, निरनिराळ्या सरकारी खात्यांचे परवाने, त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र, बाजारपेठ मिळविण्यासाठी शोधाशोध, अशा अनेक कटकटींना सामोरे जावे लागते. एवढे सगळे अडथळे पार केल्यानंतर उद्योग भरभराटीला येतो न येतो तोच वेगळ्या समस्या उभ्या राहतात. कामगार मिळत नाहीत, आहेत ते संघटीत होतात, कामगारांची संघटना तयार होते, कामगारांच्या प्रमाणाबाहेर मागण्या वाढतात, मग संप, निदर्शने, उपोषणे, आंदोलने, कोर्ट-कचेरी सुरू होतात. त्यातच मग सरकारी अधिकारी विविध कायद्यांवर बोट ठेवून मालकाकडून "चिरीमिरी' घेऊन अक्षरश: लूटतात. मोठ्या उत्साहाने उद्योगधंद्यात उतरलेला तो उद्योजक अखेर "झक मारली आणि उद्योग उघडला' या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचतो. तात्पर्य काय तर भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्थेमुळे उद्योजक हा कधीच सुखी होऊ शकत नाही.
मुंबईतील चाकरमानी बघा. आपल्या आजूबाजूला काय चालले आहे हे बघण्याचीदेखील त्यांच्याकडे फुरसत नाही. सकाळी पळत-पळत गाडी पकडायची आणि कामाला जायचे. संध्याकाळी दगदगीने थकल्या भागल्या जिवाने पुन्हा पळत पळत गाडीत घुसायचे. मुसंडी मारता आलीच तर जागा पकडायची. बस्स! कशासाठी? तर चार घास सुखाने खाण्यासाठी. आज आपल्या देशाची अवस्था अशी बिकट झाली आहे.
थोडक्यात म्हणजे तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर अजिबात काही करू नका. सगळं सरकारच्या भरवशावर सोडून द्या. तुमच्याजवळ थोडाफार पैसा असेल तर बॅंकेत ठेवा आणि व्याज खाऊन मजेत जगा. पुन्हा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न उभा ठाकला तर इतरांना फुकाचे सल्ले देण्याचे काम करा. हे जर जमले तरच तुम्ही सुखाने जगू शकता, पण मेहरबानी करून कोणताही उद्योगधंदा करण्याच्या भानगडीत पडू नका. ज्या दिवशी हा विचार तुमच्या डोक्यात आला त्या दिवसापासून तुमचे सुखचैन संपले हे निश्चित समजा. अशा प्रकारचा अगतिकतेतून जन्माला आलेला हा विचारच आपल्या मानसिक गुलामगिरीला कारणीभूत ठरत आहे आणि "बंद डोळे, बंद कान, तरच मिळेल सुख समाधान' या वृत्तीने जगणाऱ्या सर्वसामान्य जनतेलाच यासाठी सर्वाधिक दोषी मानावे लागेल.

Tuesday, September 30, 2008

दहशतवाद : मुस्लिम आणि सतर्कता

आझमगड आणि मुजफ्फरपूर हे उत्तरप्रदेशातील दोन जिल्हे आयएसआयच्या रडारवर आहेत. तसेच वाराणसी, सहारणपूर, कानपूर जिल्ह्यांमध्ये सिमीने मोठ्या प्रमाणावर जाळे पसरवले असून आझमगडमध्ये देशी पिस्तुले, बंदुका, कट्टे निर्मितीचे बेकायदेशीर कारखाने आहेत. कुविख्यात अबू सालेम आझमगडमधला आहे. दिल्लीत 13 सप्टेंबरला झालेल्या 4 भीषण बॉम्बस्फोटांत 20 ठार तर 100 हून अधिक जखमी झाले. या बॉम्बस्फोटातील पाचही सूत्रधार आझमगडचेच आहेत. नुकतेच मुंबई पोलिसांनी पकडलेले अफजल मुतालिख उस्मानी, मोहम्मद सादिक शेख, मोहम्मद अरिफ शेख, मो. झकीर शेख, मो. अन्सार शेख या सर्वांचा आझमगडशी संबंध आहे. सादिक शेख हा इंडियन मुजाहिद्दीनचा एक संस्थापक आहे. 2000 पासून घडलेल्या 54 मोठ्या घटनांपैकी 45 घटनांमधील दहशतवादी हे उत्तर प्रदेशशी संबंधित आहेत. 93च्या मुंंबई बॉम्बस्फोटाचे सूत्रधार करीम तुंडा, अझीम अहंमद हे प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. लाल किल्ल्यावर हल्ला चढवणारे लष्कर-ए-तोयबाचे 2 अतिरेकी मारले गेले. ते सुद्धा फैजाबादचे होते. 25 सप्टेंबर 2002 रोजी अक्षरधाम मंदिरावर हल्ला चढवणाऱ्यांना शस्त्रसाठा पुरवला बरेलीच्या चांद खानने तर 29 जुलै 2003 रोजी मुंबईतील घाटकोपर येथे बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी पैसे व शस्त्रसाठा पुरवला कानपूरच्या शकील अहमदने. 13 मे 2008 रोजी जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे लखनौच्या शाबाज हुसैन व मथुराच्या हकिनुद्दिनचा हात होता. 25 जुलै अहमदाबादमधील बॉम्बस्फोटाचा सूत्रधार अबू बशीर हा सुद्धा आझमगडचा. सराईमीर येथील मदरशातील अबू बशीर हा विद्यार्थी. आझमगडमध्ये जवळपास 250 मदरशे आहेत. मात्र असे असतानाही राज्य सरकार व केंद्र सरकार कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. आईच्या निधनानंतर अबू सालेम आझमगडला आला असताना दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी लोकांनी रस्त्यावर उतरून खाकी वर्दीच्या गराड्यातून अबूला बाहेर काढण्याचे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. तर दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर मुस्लिमांना त्रास होता कामा नये असे मुख्यमंत्री मायावती यांनी पोलीस खात्याला बजावले होते. दहशतवाद्यांना शिक्षा द्या, पण आझमगडची बदनामी करू नका असा ढोल शबाना आझमी यांनी बडवला, आजवर झालेल्या सर्व बांग्लादेशींना भारताचे नागरिकत्त्व द्यावे अशी मागणी करण्यापर्यंतची मजल राम विलास पासवान यांची गेली. तर मुंबईतील राज ठाकरे यांच्या आंदोलनाला विरोध करताना आझमगडहून 20 हजार लोक मुंबईत आणू अशी धमकी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खा. अबू आझमी यांनी दिली होती.या संपूर्ण घटनांचा आणि नावांचा विचार केल्यास उत्तर प्रदेशातून (विशेषत: मुस्लिम) मुंबईत येणाऱ्यांपैकी बरेच जण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी खिळखिळी करण्यासाठीच येत असल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे या लोकांशी मुंबईकरांनी कसे वागायचे आणि त्यांना कसे वागवायचे याचा निर्णय सतर्कपणे घेतलाच पाहिजे.
मुंबईच्या कोणत्याही भागात गेलो तरी कोणी कोणाला ओळखत नाही, कोणी हटकत नाही. त्यामुळे बिहार उत्तर प्रदेशातील अनेक तडीपार गुंडांनी मुंबईत आश्रय घेतला आहे. त्यांच्या आश्रयाने आजही अनेकजण मुंबईत बिनबोभाटपणे येतच आहेत. मुंबईच्या निरनिराळ्या भागात राहत आहेत आणि देशद्रोही कामे बिनधास्तपणे करीत आहेत. गेल्या काही वर्षांतील देशभरातील हिंसाचारात पकडलेले बहुतेकजण मुस्लिम समाजातील तरुण आहेत. अनेक मुसलमान या देशाशी एकनिष्ठ असले तरी त्यांचे काही धर्मगुरु व नेते मंडळी स्वत:चे स्थान व वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांच्याच मुस्लिम तरुणांना सतत भडकवत असतात. खोटे-नाटे सांगून त्यांची दिशाभूल करतात, आपला समाज अशिक्षित व गरीबी, दारिद्रयात खितपत पडावा यासाठी प्रयत्नशील असतात. विविध कारणांनी मुस्लिम तरुणांची माथी भडकावून त्यांना हिंसाचार करण्यास भाग पाडायचे, वरून आमच्या धर्माचा हिंसाचारावर विश्वासच नाही, त्यामुळे मुसलमानांच्या हातून कधी हिंसाचार होणारच नाही अशा आरोळ्या ठोकायच्या. या आरोळ्या ठोकणारे वर उल्लेख केलेल्या सर्व घटनांमधील गुन्हेगार, आरोपी हे मुसलमानच आहेत, त्याचबरोबर खुद्द पाकिस्तानातील कराची येथील मेरिएट पंचरातांकित हॉटेल कोणी उडवले, त्यातील स्फोटात 100 माणसे मारली गेली, त्याला जबाबदार कोण, या प्रश्नांची उत्तरे देतील काय? देशभरातील प्रमुख शहरांमधून "सिमी, इंडियन मुजाहिद्दीन व लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी इस्लामिक संघटना बॉम्बस्फोट घडवून त्याची जबाबदारीही जाहिररित्या स्वीकारत आहेत. शंभर कडव्या इस्लामी तरुणांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण "तौकिरने' दिले. हेच तरुण आता देशभरात धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या दहशतवादी संघटना व आरोपी, गुन्हेगारांचा देशातील इस्लामिक संघटनांनीच जाहीर निषेध नोंदवून त्यांचा विरोध करायला हवा. देशातील सर्व मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांना उधळून लावण्यासाठी पोलिसांना सहाय्य केल्यास या दहशतवादावर नक्कीच अंकूश बसेल. आतापर्यंत पकडलेले सर्व दहशतवादी मुसलमान असल्याने राष्ट्रप्रेमी मुसलमानांनी कुठल्याही देशद्रोही शक्तींना थारा न देता त्यांची मिळालेली माहिती पोलिसांना द्यायला हवी.
त्याचबरोबर चीन, पाकिस्तान आणि बांग्लादेशाकडून देशाला धोका आहे. देशात सध्या सुमारे 5 कोटी घुसखोर रहात असून दररोज सुमारे 6 हजार घुसखोर भारतात प्रवेश करतात. असाममधील 11, पं. बंगालमधील 9, बिहारमधील 6 आणि झारखंडामधील3 जिल्हे बांग्लादेशीय घुसखोरांमुळे मुस्लिमबहुल झाले आहेत. बिहारमधील पसरलेल्या भीषण पुरसदृष्य परिस्थितीनंतर तेथील पुरग्रस्तांसह घुसखोर मुंबईत दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर येतही आहेत. परंतु विविध कारणास्तव, उत्सव, बंदोबस्तासाठी गुंतलेल्या पोलिसांना त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. भारत-पाकिस्तान, भारत-बांग्लादेश सीमेवर दहशतवाद्यांचे शेकडो प्रशिक्षण कॅम्पस आहेत. या कॅम्पसमधून प्रशिक्षण घेतलेले भारतात खुलेआम घुसखोरी करीत आहेत. या घुसखोरांच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे, खोट्या नोटा, मादक पदार्थांची तस्करी चालू आहे. त्यामुळे आतंकवाद, घुसखोरी, दहशतवाद संपवायचा असेल तर मुस्लिम संघटनांनीच पुढे येण्याची आज खरी गरज आहे. त्याचबरोबर दहशतवादाला आळा घालणे हे केवळ पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणेचेच काम आहे, असे नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने त्या दृष्टीने सावध राहणे आवश्यक आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी 5 दहशतवाद्यांना पकडून उधळून लावला. या 5 अतिरेक्यांना अटक केल्यामुळे मुंबईवरचे संकट तात्पुरते टळेल असले तरीही गाफील राहून चालणार नाही. मुंबई शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या धमाक्यावर उभी आहे. हा धमाका कोणत्याही क्षणी व कोठेही होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क रहाणे अत्यावश्यक आहे.

बेजबाबदार नेते आणि पोलीस

आज मुंबईत, कोणत्याही क्षणी बॉम्बचा धडाका होईल अशा भीतीने नागरिक कसे बसे जगत आहेत. त्यांना दिलासा वाटावा असे चित्र काही निर्माण होत नाही. बातम्या येतात त्या फक्त, विविध पातळींवर होणाऱ्या बैठकांच्या. अनेक अधिकारी कामापेक्षा या बैठकांना हजेरी लावण्यात अधिक वेळ जातो, अशी तक्रार करत आहेत. मग कधीतरी गृहमंत्र्यांनी रेल्वेमधून प्रवास करून सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रवाशांशी चर्चा केल्याच्या बातम्या आणि छायाचित्रे झळकतात. पण हे सर्वच उपाय तात्पूरते आणि प्रसिद्धीसाठी असतात. यातून नेमके काय साध्य होते हे कळत नाही.
गुप्तचर विभागाने देशविरोधी कारवायांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा असते. दोन वर्षांपूर्वी मुंबईत लोकलमध्ये स्फोट झाले, तेव्हा अशी माहिती मिळवण्यात पोलीस कमी पडले, अशी टीका झाली. त्याची म्हणे दखल घेऊन गृहमंत्र्यांनी, या विभागाकडे फक्त गुप्त माहिती मिळवण्याची जबाबदारी सोपवली जाईल, अशी तेव्हाच घोषणा केली. पण आजतागायत याची अंमलबजावणी करण्यास त्यांना वेळ मिळाला नाही. केवळ हेच एक उदाहरण नव्हे, तर ठाण्याच्या चेक नाक्यावर सीसी टीव्ही दोन महिने बंद आहेत याचीही फिकीर कोणाला नव्हती. सुरत, अहमदाबादमध्ये स्फोट झाले नसते तर आणखीही अनेक महिने हीच स्थिती राहिली असती. याबाबत संबंधित एकाही पोलिस अधिकाऱ्याला वर कळवावे असे का वाटले नाही, हा चिंतेचा विषय आहे.पोलिसांविषयी आणि दलाबाबत अशा अनेक बातम्या गेली काही वर्षे प्रसिद्ध होत आहेत. पूर्वी पोलीस गुन्हेगारांना पकडायचे, आता पोलीस अधिकारी तुरुंगात जाताना दिसतात. काही जामिनावर बाहेर असतात. कोणत्या अधिकाऱ्याकडे दोनपाचशे कोटींची संपती असल्याची चौकशी सुरू होते. कोणीतरी सुपारी घेऊन बिल्डरला गजाआड करून काही लाखांची मागणी करतो. कोणीतरी अनेकांशी भागीदारी करून कमाई करत असतो. आणखी एखादा एन्काऊंटर करण्याच्या धमक्या देऊन वसुली करत असतो. पण मुंबई पोलीस स्कॉटलंड यार्डच्या तोडीचे आहे अशा बढाया मात्र अधिकारी ते मंत्री असे सर्व मारत असतात, असे विदारक चित्र सध्या दिसते आहे.
ही स्थिती एका रात्रीत निर्माण झालेली नाही. गेली अनेक वर्षे ही प्रक्रिया सुरू आहे. पोलीस शिपायापासून वरपर्यंत आपल्या मजीर्तील लोकांची वर्णी लावण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासापायी हे घडते आहे. असे करताना मग संबंधिताची जात, त्याचा प्रांत अशा बाबींना फक्त महत्त्व दिले जाते आहे. मग एखाद्या लफड्यात असा अधिकारी किंवा पोलीस सापडला तर त्याला वाचवण्यासाठी मंत्री धडपड करतात. अशाही परिस्थितीत, काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके अधिकारी आणि कर्मचारी ताठपणेे काम करत असतात. पण दलाकडे ना धड अत्याधुनिक यंत्रणा, ना शस्त्रसामुग्री, ना जागतिक स्तरावर घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करणारी यंत्रणा.
अशातच कायदे कालबाह्य झाल्यामुळे खटले वर्षानुवर्षे रेंगाळतात, गुन्हेगार जामिनावर बाहेर राहतात, अशी तक्रार गृहमंत्री करतात. पण इतक्या वर्षांत कायदे बदलणे ज्यांच्या हाती असते, तेच ही भाषा कशी काय बोलू शकतात याचे आश्चर्य वाटते. एकीकडे कायदेमंडळांमध्ये चालणाऱ्या गोंधळामुळे काम पूर्ण होत नाही अशी तक्रार करायची आणि दुसरीकडे कायद्यातील त्रुटी कायम राहतात असा गळा काढायचा, हा दुट्टपीपणा आहे. मध्येच एखाद्या राजकारण्याला खूमखूमी येते ती लोकांनी जागरूक राहावे असा उपदेश करण्याची. इथे रोजच्या जगण्याची लढाई लढताना बहुतेकांना घाम फुटतो. अशा वेळी जागरूक राहायचे म्हणजे नेमके काय करायचे? अतिरेक्यांशी, गुन्हेगारांशी लढण्यासाठी पुरेसे पोलीस नेमायचे नाहीत, त्यांना शस्त्रे द्यायची नाहीत. आहेत त्या पोलिसांना नीट पगार आणि भत्ते द्यायचे नाहीत. सरकारी खात्यातील शिपाई आणि पोलीस शिपाई यांना एका पातळीवर जोखायचे आणि पोलीस शिपायाकडून अपेक्षा मात्र करायची अतिरेकी, गुन्हेगार यांच्याशी लढायची. अनेकजण व्हीआयपी आणि संशयास्पद वर्तमान असणाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊन फिरत असतात. त्यांच्यावर असली बिनकामाची जबाबदारी सोपवताना राज्यकर्त्यांनी विचार करायला हवा. पण पोलीस हे आपले गुलाम आहेत असे ठरवूनच राजकारणी वागत असतात आणि त्यांचे लांगुलचालन करणारे अधिकारीही मग खालच्या पोलिसांना तसेच वागवतात.
हे चित्र बदलायला हवे. सरकारी यंत्रणा आणि विशेषत: राजकीय नेतृत्व यांनी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी थोडा अधिक विचार करण्याची आणि योजना अंमलात आणण्याची गरज आहे. अतिरेक्यांना धडा शिकवू, गुन्हेगारांना अद्दल घडवू अशा फुकाच्या गर्जना करण्यापेक्षा, ते प्रत्यक्षात आणले तर लोक अधिक सुखाने श्वास घेऊ शकतील. नाहीतर मुंबई नेहमीप्रमाणे असुरक्षित राहील. अतिरेकी कोणत्याही क्षणी धमाका उडवतील. बळी जातील सामान्य माणसांचे. मग त्यांचे नातेवाईक असहायपणे मदतीसाठी सरकारदरबारी खेटे घालत राहतील. दरम्यान सत्ताधारी, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी भाषणे करतील. हे चित्र बदलण्याची सध्यातरी शक्यता नाही. कारण गुप्तचर विभाग असो की चेकनाक्यावरचे सीसी टीव्ही कॅमेरे असोत; त्यामुळे सरकारी ढिलाईची अशी असंख्य उदाहरणे सतत डोळ्यासमोर दिसतात. सरकार कोणाचेही आले तरी यात बदल होणार नाही, हेच खरे कटुसत्य आहे.

Sunday, September 14, 2008

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !

"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !' म्हणत लाखो मुंबईकरांनी आणि इतर सर्व ठिकाणच्या भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. बॉम्बस्फोटांपासून मोर्चे-आंदोलनांपर्यंत कायदा-सुव्यवस्थेतील गलथानाबद्दल वेळोवेळी पोलिसांवर आणि खुद्द गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर खापर फोडले गेले आहे. मात्र दिल्लीत बॉम्बस्फोट मालिका घडल्यानंतरही मुंबईसह महाराष्ट्रात हेच पोलीस आणि दस्तुरखुद्द "आबा' यांची यंदाचा गणेशोत्सव सुरळीतपणे पार पडल्याबद्दल पाठही थोपटायला हवी. तसे न करणे हे कृतघ्नपणा ठरेल. मुंबईत पोलिसांचेही बळ अपुरे असल्याचा त्यांचा बचाव एरवी फारसा पटण्यासारखा नसला किंवा एकविसाव्या शतकातही सामान्य माणसाला कुणाचे तरी हात ओले केल्याखेरीज कामच होत नसल्याचा अनुभव घ्यावा लागत असला, तरी गणेशोत्सवाच्या दोन आठवड्यांत पोलीस जे अथक परिश्रम घेतात, ते कोणत्याही स्वरूपाच्या "लाभा'साठी नव्हे, तर श्रींच्या कृपेने हे सामाजिक कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या कर्तव्यभावनेतूनच ते अहोरात्र राबतात. सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनीही हे भान ठेवायला हवे आणि त्याची योग्य ती पावती द्यायला हवी. आज सकाळी गुलालाने माखलेल्या रस्त्यांवरून आपापल्या कामावर जाणाऱ्यांना बहुधा 10 दिवसांनंतर प्रथमच मोकळा श्वास घेता येईल, एवढा अफाट गर्दीचा पूर पुऱ्या मुंबईतील रस्त्यांवर गेले दहा दिवस लोटला होता. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यांवर येऊनही वर्षानुवर्षे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडतो, हेही कौतुकास्पदच. खुद्द भाविक या प्रशंसेस पात्र ठरतातच, पण यंदाही हा उत्सव कोणतेही गालबोट न लागता पार पडला, याचे श्रेय कायदा-सुव्यवस्था राखणारे पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते यांना द्यायला हवे. यादी करायची तर बस-रेल्वे आदी वाहतुक यंत्रणेपासून अनेकांचा समावेश त्यात करता येईल. मुद्दा हा की, लाखोंच्या संख्येत माणसे एकत्र येतात, ते ठिकाण एखाद्या निवडणूक-सभेचे असो अथवा तीर्थक्षेत्र, तिथे खुट्ट झाले तरी चेंगराचेंगरी होऊ शकते आणि अनेकांचे जीव घेणारी दुर्घटना घडू शकते. कुतुबमिनारपासून कुंभमेळ्यापर्यंत अशी अनेक उदाहरणे त्यासाठी देता येतील. मुंबईतील लालबागचा राजा किंवा पुण्यातील फुले मंडई, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने उत्सवाच्या काळात प्रत्यक्ष तिथे जाणाऱ्यांना, असा क्षण केव्हाही येऊ शकतो, याची जाणीवही असते. किंबहुना महाभारतातील युद्धात कौरवांनी रचलेल्या चक्रव्यूहाची आठवण व्हावी, असे अरुंद गल्ली-बोळ आणि पाईप-दोरखंडांमधल्या रांगांतून पुढे सरकताना अनेकदा गुरमरून टाकणारा अनुभवही आलेला असतो. त्यातून तासनतास तिष्ठत-सरकत, दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर मोकळा श्वास घ्यायला मिळतो, तो क्षण पुनर्जन्मासारखाच भासतो. आज गणरायाला निरोप दिल्यानंतरचा दिवस लाखो भाविकांना, नोकरदारांना आणि पोलीस, स्वयंसेवी कार्यकर्त्यांना त्यापेक्षा वेगळी अनुभूती देणारा नसेल. याच दहा दिवसांत आणि एरवीही जरा कुठे वाहतुकीची कोंडी झाली, चोरी-मारी झाली तर पोलिसांच्या नावाने समाज बोटे मोडतो आणि मीडियाही टीकेचे आसूड उडवीत त्यात आपले हात धुऊन घेतो. गणेशोत्सवासारखे कसोटीचे दिवस निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर मात्र याच पोलिसांची आठवणही सहसा कुणाला राहात नाही.
पाकिटमारांपासून अफवा पिकवणाऱ्या समाजकंटक आणि दहशतवाद्यांपर्यंत सर्वच "संकटां'ना तोंड देत उत्सव पार पाडणे हे मंडळांच्या कार्यकर्त्यांच्याही आवाक्यापलीकडे जाऊ लागले आहे. लालबागचा राजा गिरणगावातील अगदी मध्यवर्ती भागात असतो. त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असून ती दिवसेंदिवस वाढतच आहे. पण त्यामुळे या परिसरातील रहिवासी, विविध संस्था-आस्थापनांचे कर्मचारी आणि व्यावसायिक यांना जी गैरसोय सहन करावी लागते, तिचीही दखल वेळीच घ्यायला हवी. हे फक्त लालबाग किंवा पुण्याच्या कसबा-शुक्रवार पेठेतीलच चित्र आहे, असे नाही. पण उत्सवाच्या वाढत्या प्रमाणामुळे गैरव्यवस्था वाढू लागली तर दैनंदिन व्यवहारांना खीळ बसेल आणि बेदिली माजेल. भाविकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करताना आणि दहा दिवसांत दोनशे चाळीस तासांहून अधिक काळ अखंड ध्वनिक्षेपण यंत्रणा वापरताना मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घशांचे तीनतेरा वाजतात, पिण्याच्या पाण्यापासून रुग्णांपचारापर्यंत हरतऱ्हेच्या सुविधा पुरविताना कार्यकर्त्यांचे रक्त आटते, हे खरे. तरीही गाव-गाडा चालू राहण्यासाठी परिसरातील इतरांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, अशा व्यवस्थेची खबरदारी घ्यायलाच हवी. अमुक गणपती नवसाला पावतो, या श्रद्धेपोटी असेल किंवा निव्वळ विरंगुळा म्हणून असेल, कारणे काहीही असली तरी उत्सवांचे स्वरूप काही वर्षांत बदलले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रस्त्यांना येणाऱ्या गर्दीचे पूर, बकालपणा, अनारोग्य हेही दरवर्षी वाढतच आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे, हे आव्हान बनले असून याचा विचार गांभीर्याने करायलाच हवा.

Wednesday, September 10, 2008

बधीर समाजात जागृती कशी होणार?

संपूर्ण देशात सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातच पशूलाही लाजवेल असे भयानक कृत्य माणसाच्या हातून वारंवार घडते आहे. नांदेड येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर दरोडेखोरांनी हल्ला चढवून तिचे दागिने तर लुटलेच शिवाय तिला मारहाण करीत फासावर लटकवून ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी दरोडेखोरांनी हा अघोरी मार्ग अवलंबला. नांदेडच्या ग्रामीण भागातील ही घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील काठोडा येथील दरोड्याची घटना कोठेवाडीप्रमाणेच राज्यभर गाजली. दरोडेखोरांनी विरोध करणाऱ्या एकाला ठार मारले तर अल्पवयीन मुली व महिलांना जबर मारहाण करुन त्यांच्यावर माणूसकीला काळिमा फासणारे अत्याचार केले. ही घृणास्पद आणि संतापजनक घटना घडल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी काठोड्याला धावती भेट देऊन पोलिसांना दरोडेखोर दिसताक्षणी गोळ्या घाला असे फर्मान सोडले होते. त्यातील एकही गोळी कुठे सुटलेली दिसत नाही. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडेखोरांचे राज्यभरात थैमान सुरुच आहे. परवा ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत परभणी शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर परभणी-पाथरी मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या दत्तात्रय कदम यांच्या आखाड्यावर दरोडेखोरांनी हल्ला चढवून कुंडलिक वाकळे, मुलगा त्र्यंबक, जावई मारोतराव गुहाडे, कुंडलिक यांची वयोवृद्ध सासु अनुसया व 4 मुलांना बळजबरीने एका खोलीत डांबले. आणि एकाच घरातील घरधनीण, तरुण विवाहीत मुलगी व सून अशा तिघांचीही अमानुषपणे विटंबना केली.
पाच दरोडेखोरांनी तिन्ही सवाष्ण महिलांवर त्या करुण आक्रोश करीत असताना बळजबरीने बलात्कार केला. यापैकी एका महिलेस तर या पाचही दरोडेखोरांच्या अत्याचाराला बळी पडावे लागले. हा घृणास्पद आणि लांछनास्पद प्रकार जवळजवळ दोन तास म्हणजे पहाटे तीनपर्यंत चालला. त्यांच्या या कृत्यावरुन ते विकृत आहेत हे सिद्ध होतेच शिवाय अंगावर काटा आणणारे असे कृत्य करताना त्यांना कायद्याची भिती अजिबात वाटलेली नाही. माणूसकीचा गळा घोटताना त्या दरोडेखोरांना काहीही वाटलेले नाही.
एकीकडे राज्यातील अशा घटनांमध्ये वाढ होत असतानाच दुसरीकडे मुंबईसारख्या महानगरातही एका महिलेला महिलेनेच जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. रस्त्यात चालताना धक्का लागल्याचे किरकोळ निमित्त होऊन हा प्रकार घडला, घाटकोपर (पश्चिम) येथील भटवाडी परिसरात शेजारी-शेजारी रहाणाऱ्या अनिता दत्ताराम शिवगण या 35 वर्षीय महिलेच्या शेजारी राहणाऱ्या आशा दिपक गायकवाड या 35 वर्षीय महिलेला चालत जात असताना धक्का लागला. त्यामुळे चिडलेल्या आशाने घरातून चाकू आणून अनिताच्या डोक्यावर वार केला. भररस्त्यात एका तरुणीने दुसरीवर चाकूने हल्ला केला. ते कमी पडले म्हणून की काय तिने घरातून रॉकेलचा डबा आणून त्या तरुणीला अक्षरश: पेटवून दिले. यात अनिता 90 टक्के भाजली असून ती अखेरच्या घटका मोजत आहे. क्षुल्लक कारणावरून महिलाही किती हिंस्त्र बनू शकते याचेच हे एक उदाहरण आहे. हिंदी चित्रपटांना लाजवेल अशी ही क्रूर घटना आहे. येथेही कायद्याचे भय दिसत नाही. शिवाय घाटकोपर सारख्या गजबजलेल्या भागात दिवसाउजेडी घडूनही एकानेही ही घटना रोखण्याचा प्रयत्न केला नाही की धाडस दाखवले नाही. हे त्या महिलेचे दुर्दैव. संवेदनहीन झालेल्या समाजाचे आणखी वेगळे चित्र काय असू शकते. देशाला सभ्यतेची शिकवण देणाऱ्या महाराष्ट्रात कायद्याचा धाक कुणाला उरलेला नाही हेच या घटना दाखवून देताता. स्त्रियांवर अत्याचार ही वाढती विकृती आहे. तिचे तात्काळ परिपत्य केलेच पाहिजे. बऱ्याचदा प्रतिष्ठा अभंग ठेवण्यासाठी दुर्दैवी भगिनींना स्वत:चे ओठ शिवून घ्यावे लागतात; मात्र त्यामुळे पोलिसांना जबाबदारीतून सुटता येणार नाही. तीन वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील गावकऱ्यांनी स्त्रियांवर हात टाकणाऱ्या दरोडेखोरांना चेचून मारून आत्मरक्षण केले. त्याचे अनुकरण व्हावे असे पोलिसांना वाटते कां?
आज समाजातील प्रत्येकजण डोळे असूनही आंधळ्याप्रमाणे वर्तन करतो आहे. दिवसाच्या रहाटगाड्यात माणसाने स्वत:ला इतके जुंपून घेतले आहे की, माणसामाणसातील संवाद हरवत चालला आहे. केवळ आपल्यापुरते पहायचे आणि बाजूला व्हायचे या वृत्तीने समाजाची दिवसेंदिवस अधोगतीच होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ज्या पातळीवरुन गांभीर्याने विचार करायला हवा त्या राजकीय व्यवस्थेने टोकाचा हीनपणा गाठला आहे. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध दाद मागणेदेखील मुश्किल झाले आहे. अपघातात किंवा दुर्घटनेत एखाद्याला मदत करताना देखील विचार करावा लागतो आहे. अशा स्थितीमुळे संपूर्ण समाज व्यवस्थेवरच मरगळ आली आहे. मुंबई, काठोडा, परभणी, बीड, नांदेडमधील झालेल्या दुर्दैवी परंतु माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांनी आमचेच नव्हेतर साऱ्या महाराष्ट्राचे डोळे पाणावले आहेत! पण बधीर झालेल्या समाजाला कोण समजवणार? झोपलेल्याला उठवू शकतो पण झोपेचे सोंग घेतलेल्या समाजाला कसे काय जागवणार? या साऱ्या गंभीर घटनांकडे कितपत गांभीर्याने पाहिले जाईल याची शंकाच आहे. शेवटी प्रशासन, राजकारणी हे त्या बधीर झालेल्या समाजाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून अशा प्रकरणात पुढाकार घेऊन हालचाली झाल्या नाहीत तरी त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही.

गणेशोत्सवाचे उद्दीष्ट आणि मंडळे

गण म्हणजे जमाव, संख्या, समुदाय, मेळा, समूह, शब्दकोशात पाहिले तर "गण' या शब्दाचे एकवीस प्रकारचे निरनिराळे अर्थ सापडतात. पण गणेश किंवा गणपती ही संकल्पना ज्या गणाशी रूढार्थाने संबंधित आहे ती "सकळ जनांचा ईश्वर किंवा अधिपती' या अर्थाने आहे. आज केवळ महाराष्ट्रातील दहा कोटी नव्हे तर त्याखेरीज पंचखंडांत विखुरलेल्या लक्षावधी मराठी माणसांच्या घराघरांत परवा गणरायाचे आगमन होत आहे. गणेश बुद्धीचा अधिष्ठाता म्हणूनच हिंदू धर्मात तब्बल 33 कोटी देव असले तरी गणेशाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या रुपाने सर्वत्र गणेशाचे आगमन होते, तेव्हा उत्साह ओसंडून वाहू लागतो, त्या उत्साहाला वयाचे बंधन नसते, लक्ष्मीचे परिमाण नसते आणि धर्माची मर्यादा नसते. साक्षात्‌ परमेश्वराचेच आगमन होणार म्हटल्यावर घरातल्या प्रत्येकजण अत्यंत आनंदात, उत्साहाता आपला खारीचा वाटा उचलत असतो. गणपतीच्या पूजेची तयारी, वस्त्रालंकारांची मांडणी, पुष्परचना व सजावट यामध्ये अहोरात्र खर्चा घातले जातात आणि आतुरतेने गणेशाच्या आगमनाची सर्वजण वाट पाहू लागतात. ती ओढ विलक्षण असते. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस पुण्या-मुंबईबरोबर सर्वत्र साजरा होणारा गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव बनले आहे. पण लंडनपासून नैरोबीपर्यंत आणि टोरांटो-सॅनहोजेपासून सिडनीपर्यंतच्या बृहन्ममहाराष्ट्र मंडळात ते ज्या उत्साहाने साजरे केले जातात, त्यावरूनही गणेशाचे विश्वव्यापकत्व समजू शकते. श्रीलंकेपासून इंडोनेशियापर्यंत शेकडो वर्षांच्या प्राचीन मंदिरांमध्येही गणेशाची विविध रूपे आढळतात. किंबहुना हे केवळ विशिष्ट भागाचे, धर्माचे, समाजाचे दैवत नसून उपखंडाबाहेरील "गणा' च्या अधिपत्याचे दीर्घकाळापासूनचे प्रतीक आहे, हेही त्यावरून स्पष्ट होते. पुण्या-मुंबईतील गणेशोत्सावात रस्त्यांना पुराचे स्वरुप येते. त्यात विशिष्ट धर्माची माणसे नसतात, तर भारत ज्या सर्वधर्मसमभावाचा, धर्मनिरपेक्षतेचा आदर राखतो त्याची साक्षच हा समुदाय देत असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व भेदभाव बाजूला ठेऊन एकत्र येणारा असा समुदाय हे साठ वर्षे अभंग राहिलेल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचेच प्रतीक आहे. अशा गणांचा हा अधिपती. दैवतांमध्येही बुद्धिदाता, विघ्नहर्ता म्हणून गणेशाचे स्थानमाहात्म्य आहे.
मंगलमूर्ती घरी आल्यावर त्याचे कौतुक घरातील प्रत्येकजण आपल्यापरीने करत असतो. गणपतीचे डोळे कसे सुंदर आहेत, हात कसे गोजिरवाणे आहेत आणि पूजा झाल्यावर मूर्तीस कसे विलक्षण तेज प्राप्त झाले आहे, याची सुरस कहाणी प्रत्येकजण ऐकवत असतो. पुढचे दीड-पाच-सात-दहा दिवस घराच्या चार भिंतींनाही जिवंतपणा येतो. तळहातावरच्या फोडाप्रमाणे त्या मंगलमूर्तीची "काळजी' प्रत्येकजण घेत असतो. विसर्जनापर्यंतचे दिवस वाऱ्याच्या मंद सुखद झुळुकेप्रमाणे निघून जातात. विसर्जनास मंडळी निघाली, की मात्र नकळत अश्रू ओघळू लागतात. जवळच्या विहीर-तलाव वा समुद्रकिनाऱ्यावर मूर्ती पाण्यात बुडवताना मग डोळ्यांच्याही कडा अश्रूंनी हळूच ओलसर होतात. गळा दाटून येतो. जड पावलांनी मंडळी घरी परततात. ती "पुनरागमना'च्या खात्रीनेच!
मातीतून तयार होणारी आणि पुन्हा मातीतच सामावणारी ती एक साधी मूर्ती जणू माणसाच्या क्षणभंगुर जीवनाचेच प्रतीक. मातीची दर्पोक्ती सार्थ ठरविणारी. भक्ती आणि प्रेमाचा विलक्षण संगम तिथे झालेला असतो. म्हणून मूर्तिपूजा योग्य की अयोग्य, परमेश्वर आहे की नाही हे वाद इथे गौण आहेत. माणसाच्या मनातला आंतरअग्नी फुलविण्याचे सामर्थ्य गणेशोत्सवात असल्याने तो सर्वव्यापी झाला आहे. धर्म, जात, वर्ण, पंथ आणि देशाच्या सीमा त्याने केव्हाच ओलांडल्या आहेत. माणसाच्या अस्तित्वाचा हा उत्सव आहे. त्याच्या सामाजिकतेचे आधुनिक रूप आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा हा सामाजिक आशय ओळखला व त्याला सार्वजनिक रूप दिले. जे कौटुंबिक मन आपल्या घरच्या गणपतीसाठी तन-मन-धन अर्पण करते, त्यास जर व्यापक स्वरूप दिले, तर जनमानसात आवश्यक असलेली एकी साधता येईल, हा त्यामागचा हेतू होता. एकातून अनेकापर्यंत पोहोचणारा उत्सवाचा हा आशय लोकमान्यांतल्या तत्त्वज्ञाने अचूक ओळखला. लोकमान्यांसमोर होते स्वातंत्र्यलढ्याचे उद्दिष्ट. ते काम अर्थातच सोपे नव्हते. त्या काळी संपर्काची साधनेसुद्धा अत्यंत मर्यादित होती. लोकांमधील संवाद दृढ करण्यास गणेशोत्सव मदत करू लागला.
छत्रपती शिवाजी आणि श्रीगणेश ही दोनच श्रद्धेय स्थाने समर्थ आहेत, हे ओळखून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव यांची परंपरा सुरू केली. पुढे अर्धशतकाच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आणि आपले धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र उदयाला आले. त्यानंतरही गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने, वाढत्या कलेने साजरा होत आहे.
आज इतक्या वर्षानंतरसुध्दा गणेशोत्सवाचे हे रूप बऱ्याच प्रमाणात अबाधित आहे, परंतु त्याच्या प्रकटीकरणात मात्र आता मुलभूत फरक पडलेला आहे. स्वातंत्र्य मिळवूनही ते लोकांमध्ये रुजवण्यास आपण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळेच निर्माण झालेला दहशतवाद हे त्या रोगट सामाजिकतेचेच रूप आहे. या आनंदोत्सवास आता भीतीचे व असुरक्षिततेचे गालबोट आहे. आजूबाजूच्या अत्यंत विमनस्क व दोलायमान परिस्थितीत गणेशाची मूर्ती हे आशा, आकांक्षा व अपेक्षांचे प्रतीक बनले आहे. अनंतु चतुर्दशीच्या दिवशी करोडोंच्या संख्येने जमणारा प्रवाह तेच दर्शवितो. खरे तर त्यास वारीचेच स्वरूप येते. आपल्या देशातील बहुसंख्य चाकरमान्यांचे, कष्टकरी जनतेचं आकर्षण असलेली महानगरी मुंबई आणि त्याच मुंबईतील अनंत चतुर्दशीची उत्स्फूर्त वारी यातच खोल अर्थ दडलेला आहे. कोणताही आनंद हा सामुहिकतेच्या पातळीवर गेला, आणि त्यास तात्त्विक अधिष्ठान नसेल, तर त्यास मर्यादा पडतात व अपप्रवृत्ती डोकावू लागतात. गणेशोत्सवाचे सध्या तेच झाले आहे. संपत्तीच्या हिडीस प्रदर्शनाबरोबरच जुगार, दारू, धिंगाणा या प्रवृत्तींनी त्यात प्रवेश केला आहे. भक्तीगीते, भजन, किर्तनाची जागा आता डी.जे. हिंग्लीश गाण्यांनी घेतली आहे. स्टेजवरुन अर्धनग्न मुली गणरायाच्या साक्षीने अश्लिल हावभाव करीत ऑर्केस्ट्रामधून नाचक आहेत. याचा अर्थ "उत्सव' वाईट आहे, असे नव्हे, परंतु तो भरकटला आहे एवढे मात्र खरे. वास्तविक उत्सवाच्या माध्यमाद्वारेच त्याला आळा घालता येऊ शकेल. पण अपवाद वगळता सगळीकडे उन्मादच आढळतो. मात्र आजही काही ठिकाणी उत्सवाद्वारे सामाजिक उद्दिष्ट जपणारी अनेक मंडळे कार्यरत आहेत.
ओंकाराचे नादब्रह्म माणसाच्या हृदयस्पंदनांना, पृथ्वीच्या वेगाला आणि विश्वाच्या आत्मगतीला सुरांचे कोंदणे देते. म्हणूनच तर्कातून तर्काच्या पलीकडे जाण्याची मानवी जाणिवेची क्षमता त्यास विज्ञानाचे अधिष्ठान देते. तो निर्माणकर्ता आहे, तो असा. त्याचे आधुनिक काळातील मूर्त रूप म्हणजे "संगणक'.त्याचे एकूण स्वरूपच श्रीगणेशाचे स्वरूप सांगते, हा योगायोग नसावा! म्हणूनच गणपती मनाचेच रूप आहे. त्यास आकार नाही, व्याख्येत बसविण्याइतके निश्चित स्वरूप नाही. तरी प्रचंड सामर्थ्य, वेग आणि अतिसूक्ष्मापासून महाकायतेपर्यंत असणारी मनाची अनंत जाणीव मूर्त करणारे असे हे गणेशाचे स्वरूप.
व्यासांनी सांगितलेले महाभारत गणेशाने लिहून काढले, असे मानले जाते. यातील ऐतिहासिकता-अनैतिहासिकता हा मुद्दा बाजूला ठेवला तरी पाटीवर "गमभन' गिरवण्यास सुरुवात करणाऱ्या बालवाडीतील मुलापासून परम संगणक बनविणाऱ्या तंत्रज्ञ-वैज्ञानिकांपर्यंत सर्व पातळ्यांवर बुद्धीचा संबंध जेथे जेथे येतो, तेथे-तेथे गणेशाला श्रद्धेय स्थान आहे, हे अमान्य करता येत नाही. त्या गणेशास व माणसाच्या अस्तित्वासाठी लो. टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवास प्रणाम!

मराठा समाजाची अवस्था

"मराठा' समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. स्वराज्यात भाषा कोणती असावी यावरील चर्चांना उत आले आहे. पालिकेत मराठी भाषा सक्तीची केली असता विरोधक तुटून पडताहेत. मुंबईत मराठी भाषेत पाट्या लटकवाव्या यावरून राजकारण सुरू आहे तर मुंबईचे मराठीपण पुसले जात असताना या मुंबईच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसने कृपाशंकर सिंग यांची नेमणूक करून हिंदी भाषिकांना डोक्यावर घेऊन नाचताना मराठी भाषिकांना मात्र तोंडघशी पाडल्याचे दिसते. "मराठा' आणि "मराठी' च्या राजकारणात राज्यातील नेतेमंडळींनी योग्य व ठोस भूमिका न घेतल्याने मराठी माणूस मुंबईतून केव्हाच हद्दपार झाला. उरलासुरला मराठी माणूसही संपेल की काय अशी अवस्था संपूर्ण मुंबईत निर्माण झालेली आहे.
ज्ञानेश्वरांनी 700 वर्षोंपूर्वी अमृतातेही पैजा जिंके अशी मराठीची विजय पताका फडकवली. त्यानंतर अनेक परकीय आक्रमणे होवूनही ही भाषा आणि हा समाज टिकला आहे. त्यामुळे तो आणखी हजार वर्षे टिकेल यात शंका नाही. मात्र , मराठी माणूस म्हटला की , फेटे , नऊवारी साड्‌या , तुतारी , लेझीम , तमाशा इतकेच जर कोणी डोळ्यापुढे ठेवले तर हा समाज संपल्यासारखा वाटेल. मराठी माणूसही बदलत्या काळानुसार आपले रूप , पेहराव , भाषा आणि विचार हे सारे काही बदलत आहे. मराठी समाजाला स्वीकारायचे तर या बदलत्या स्वरूपातच स्वीकारायला हवे. म्हणूनच मंगळागौरी सजल्या नाहीत , तमाशाचे फड रंगले नाहीत किंवा पुरण पोळ्या शिजल्या नाहीत. मराठी समाज संपला असे मानण्याचे काहीच कारण नाही. पायाला ठेच लागली तर आई गं असा उच्चार ज्याच्या तोंडून आभावितपणे निघतो असा एक माणूस हयात असेपर्यंत मराठी समाज टिकलेलाच आहे.
मराठी समाज म्हणजे नक्की काय ? महाराष्ठ्रात राहणारा तो मराठी माणूस का ? मराठी बोलणारा तो मराठी माणूस का ? काही वर्षांपूर्वी श्वास चित्रपटाला राष्ठ्रपतींचे सुवर्णकमळ मिळाले आणि एका समाजात आनंदाची लाट उसळली. हा समाज मराठी भाषिकांचा होता. अभिजीत सावंत इंडियन आयडॉलच्या अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा खर्च करून एसएमएसचा धडाका लावणारे आणि तो विजेता ठरल्यावर नोबेल पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करणारे मराठी भाषिकच होते. विंदांना ज्ञानपीठ मिळाला तेव्हा या समाजाला अतीव आनंद झाला. सचिन तेंडुलकरच्या 15 हजार धावा पूर्ण झाल्या तेव्हा हाच मराठी भाषिक आनंदातिशयाने वेडा झाला. प्रतिभा पाटील राष्ठ्रपती झाल्या तो त्यांच्या आनंदाचा परमोच्चबिंदू होता. 21 वर्षांपूर्वी स्मिता पाटीलचं अकाली निधन झालं तेव्हा हा समाज सुन्न झाला. मराठी माणूस समाज म्हणून वावरतो तो केवळ अशा आनंदाच्या आणि दु:खाच्या प्रसंगीच. एरवी हा समाज दुभंगलेला आणि शेकडो तुकडे झालेल्या काचेसारखा असतो. त्याला सांधणं आणि एकोप्याने वागायला लावणं ही गोष्ठ खूप कठीण किंवा अशक्यच. मराठी माणूस समाज म्हणून एकोप्याने राहत नाही , हा आरोप गेली अनेक वर्षं याच समाजातील राजकीय , सांस्कृतिक आणि सामाजिक नेते करत आले आहेत. तरीही हा समाज एक काही होत नाही.
आपापल्या भूमिकांवर ठाम असलेली माणसे एकत्र येऊ शकत नाहीत आणि अनेकदा त्यांच्यात विचारांची आणि त्यामुळे व्यक्तींची दुही आढळते. मराठी समाजात बौद्धिक कुवत अधिक असल्याने जो इतरांशी फटकून वागतो आणि तो ते करताना स्वकियांच्या बाबतीतही फारसा भेदभाव करत नाही. त्यामुळेच अनेकदा असे चित्र दिसते की , नोकरीत वा अन्यत्र अन्य समाजात त्या एका माणसाचा शिरकाव झाला की तो आपल्याच भाऊबंदांना तिथे आणतो. दुर्दैवाने मराठी माणसाच्या बाबतीत असे घडत नाही. अर्थात समाज म्हणून मराठी माणूस एकत्र आल्याचीही उदाहरणे आहेत. गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पक्षांतर्गत मतभेद आणि फुटाफूट यामुळे शिवसेना विकलांग अवस्थेत होती आणि या पक्षाची मुंबईतील सत्ता जाणार हे जणू अटळ होते. पण मुंबई कोणाची , हा सवाल ऐरणीवर आला आणि वातावरण बघता बघता पालटले. मराठी माणसाची एकजूट पुन्हा एकदा दिसून आली. याचे एक कारण आपली एकजूट कॉलनीपासून-ऑफिसपर्यंत आणि रेल्वे प्लॅटफॉर्मपासून-मॉलपर्यंत दाखवून देण्याची मराठी समाजाची मानसिक गरज. चित्रपट , संगीत , नाटक , क्रिकेट या आणि अशा अनेक कलांमध्ये मराठी माणूस पारंगत आहे. त्याचे हे प्रभुत्व वारंवार सिद्ध होत आले. शिवाय सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांच्या क्षेत्रातही मराठी नेत्यांनी देशाला नेतृत्त्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज , पेशवे , स्वातंत्र्य समरातील झाशीची राणी , तात्या टोपे हे योद्धे आणि राज्यकर्त्यांनी इतिहास घडविला शिवाय लोकमान्य टिळकांनी भारतीय असंतोषाचा पाया रचला. त्याच वेळी आगरकर , चिपळूणकर , नामदार गोखले आदिंनी समाजसुधारणाचा नवा मंत्र दिला. महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , धोंडो केशव कर्वे , प्रभुतिंनी समाज प्रबोधनाचा वसा घेतला या आणि अशा अनेक सुपुत्रांनी मराठी समाजाला अभिमानास्पद चेहरा मिळवून दिला. सचिन तेंडुलकर , सुनील गावस्कर , माधुरी दीक्षित , आशुतोष गोवारीकर यांनी आधुनिक महाराष्ठ्राची ओळख घडवली तर दिनेश केसकर यांच्या सारख्यांनी महाराष्ठ्राची ध्वजा सातासमुद्रापार नेली.
आता मराठा समाजाने काय करायला हवे , हे सांगण्याची गरज नाही. कारण या समाजात प्रचंड टॅलेंट आहे पण पुरेशी संधी नाही. लहानशी संधी मिळाली तरी त्याचे सोने करण्याची त्यासाठी अपार कष्ठ करण्याची तयारी आहे. पण मोठी गरज आहे ती मानसिकता बदलण्याची. पुढे गेलेल्यांनी आपण आता मूळ प्रवाहापासून वेगळे झाले आहोत आणि आपल्या भाईबंदांना आहे तिथेच राहू घावे , ही मानसिकता सोडली पाहिजे. तसेच, प्रगती केलेल्या , चांगले उत्पन्न् मिळवणा-या आपल्या भाऊबंदांच्या मागे उभे राहून त्यांच्या प्रगतीला जमेल तेवढा हातभार लावावा आणि अहंगंड सोडून आपली प्रगती करून घ्यावी , ही मानसिकता मागे असणारांनी बाळगणे आवश्यक आहे. खोटी प्रतिष्टा आणि स्वभावातील ताठरपणा सोडून प्रगत लोकांकडे अधिक डोळसपणे पाहिले तर मराठा समाज आहे त्या स्थितीतून लवकर बाहेर पडेल. आपल्या समाजाच्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालून जरा त्यांना सरळ करण्याची गरज आहे , आपण स्वत:च वैफल्यग्रस्त होऊन भरकटत जाण्याची नव्हे , हे आजची पिढी जितके लवकर ओळखेल तितके फायघाचे ठरणार आहे.
भलेही काही मराठा तरूण आयटी ,, सरकारी नोक-यांतील उच्च पदांवर असतील पण त्यांच्यापेक्षा कैकपटीने अधिक तरूण अंधारात चाचपडत आहेत हे नक्की. पश्चिम महाराष्ठ्रातील मराठा तरूण शेती वा अन्य संलंग्न व्यवसायात आहेत. त्यांचे काही भाऊबंद ज्यांची शेतीत मदतीसाठी गरज नाही ते शिकून मुंबई , पुणे येथे नोकरीत आहेत.कोकण आणि मराठवाड्‌यातील बहुतेक मराठा तरूण बीएड, डीएड करून ओपनची जागा निघाली तर शेती विकून वाट्टेल तेवढे पैसे देण्याची तयारी दाखवित आहेत. ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंत गावोगाव शाळा , कॉलेजांमध्ये मराठवाड्‌यातील तरुण आवर्जून आढळतात हे यामुळेच. ज्यांना हेही शक्य नाही आणि घरी परिस्थिती बिकट आहे ते मोठ्‌या शहरांमध्ये बहुसंख्येने हॉटेलमध्ये नोकरी करण्यात मग्न आहेत. शेती सोडावी तर चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही आणि गावात अथवा आजूबाजूला कमी प्रतिष्टा असलेली नोकरी करवत नाही. कारण सामाजिक प्रतिष्टा आड येते , असा विचार असतो. अडचणीच्या प्रसंगी आपल्या समाजाचे मदत करण्यासाठी कोणी वेळेवर पुढे येत नाही पण नाव ठेवण्यासाठी निमंत्रण देण्याची मुळीच गरज नाही , अशी स्थिती आहे. मराठा समाजातील बहुतेक घरी थोड्‌याफार फरकाने हेच वातावरण आहे. ही मराठा समाजाची दुर्दशा आपल्याच नेतेमंडळींनी करुन ठेवली आहे. आजचा तरुण शिकलेला आहे. या तरुण वर्गानेच आता ठाम विचार करून फक्त मराठा-मराठा करण्याऐवजी आपल्या समाजाचा पर्यायाने स्वत:चा आणि नंतर गावाचा, शहराचा विकास कसा होईल त्यासाठी कोणाला डोक्यावर उचलून धरायचे हे ठरवावे, अन्यथा समाजाची अधोगती होतच राहिल.

राज्यकर्तेच नवे दहशतवादी?

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवशी अमावस्या होती. मध्यरात्री बरोबर 12 च्या ठोक्याला केलेल्या भाषणात पंडीत नेहरुंनी नियतीशी केलेल्या कराराचा उल्लेख केला व सारे जग झोपलेले असताना आता भारत जागा झाला आहे, असे टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. त्याचबरोबर दारिद्रय, गलिच्छपणा, ओंगळपणा, उपासमारी, रोगराई वैगेरेचा आता नाश केला जाईल असे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद म्हणाले होते. परंतू आज काय परिस्थिती आहे....
"भारतीय सैनिक लढवय्ये आहेत. पण तेथील राजकीय नेते वाळलेल्या गवताच्या काडीसारखे आहेत. त्यांच्यात ताठरपणा बिलकूल नाही. भारताला आज स्वातंत्र्य दिले तर तिथे काही वर्षांनी हरामखोर व बदमाश सत्तेवर येतील', असे विन्स्टन चर्चिल म्हणाले होते. स्वातंत्र्याच्या 61 व्या वर्षांत त्यांच्या दुरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मागील साठ वर्षांचे सिंहावलोकन केल्यास देशाने अनेक गोष्टींमध्ये अगदी डोळ्यात भरणारी प्रगती केली असली तरी त्याचा फायदा देशात रहाणाऱ्या शेवटच्या घटकाला अजुनही मिळालेला नाही.
देशाला योग्य दिशा देऊन त्याला ठराविक उद्दिष्टांपर्यंत नेऊन ठेवणे हा सत्ताधाऱ्यांचा अजेंडा असायला हवा. मात्र दुर्दैवाने भेदभावाला खतपाणी घालून सत्तेची चूल कायम पेटती ठेवणे हा एकमेव कार्यक्रम आज राज्यकर्त्यांपुढे आहे. सत्ताधारी व विरोधक दोन्हीही एकाच माळेचे मणी असून त्यांच्या या दृष्टीकोनामुळेच देशाच्या अनेक भागात अराजकाचे वातावरण तयार झाले आहे. आपले राज्यकर्तेच याला कारणीभूत आहेत. कायदे करायचे नंतर एखाद्या धर्माच्या मतासाठी ते कायदे कचरा पेटीत फेकून द्यायचे, असे उद्योग राज्यकर्ते करीत असतात. त्याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे
61 वा स्वातंत्र्यदिन काश्मिरमध्ये दुर्दैवाने अत्यंत केविलवाण्या अवस्थेत साजरा झाला. हुरियत कॉन्फरन्सच्या हरताळ आणि बहिष्कारामुळे काश्मिर खोऱ्यातल्या बक्षी स्टेडियममध्ये झेंडावंदनाला सुरक्षा दलांशिवाय कोणी नव्हते. जम्मू अशांत आहे आणि गेल्या 60 वर्षात नव्हती त्याहून भयानक भारतविरोधी भावना काश्मिर खोऱ्यात सध्या भडकली आहे. काश्मिर खोऱ्यातले अस्तित्त्व टिकविण्यासाठी पीडीपीच्या नेत्या महबुबा मुफ्ती उघडपणे दहशतवादी फुटीर आंदोलनाच्या पाठीशी उभ्या आहेत तर जम्मूत भाजप व संघ परिवाराने काश्मिरची नाकेबंदी करून हिंसक आंदोलनाचा आधार घेतला आहे. यामध्ये भारताचे नुकसान होत असले तरी कोणालाही याचे भान नाही. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान असहायपणे म्हणाले, धार्मिक संघर्ष आणि विभाजनाचे राजकारण देशाला विनाशाकडे नेईल. वर्षानुवर्षे चाललेली अमरनाथची यात्रा सांप्रदायिक सौहार्दाचे आदर्श उदाहरण आहे. परस्परांचा विश्वास, संवाद आणि समजूतदारपणानेच यातून मार्ग काढावा लागेल, असे पंतप्रधान म्हणाले. मात्र आपल्या भाषणात सांत्वनवर शब्दांखेरीज कोणतेही ठोस आश्वासन ते देऊन शकले नाहीत. पूर्वी पंतप्रधान, राष्ट्रपती काय बोलतात याचे औत्सुक्य असायचे. भाषणावर चर्चा व्हायच्या. पण आता? नेहमीप्रमाणे स्वातंत्र्यदिन साजरा झाला. ध्वजारोहणानंतर पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले! परंतु कचऱ्यासारख्या टि.व्ही असूनही किती लोकांनी हे भाषण ऐकले? लागोपाठ सुट्या असल्याने बऱ्याच जणांनी पिकनिक काढल्या. श्रावण न पाळणाऱ्यांनी पार्ट्या झोडल्या. माळशेज घाट, आंबोली घाट पर्यटकांनी फुलून गेले. जे कुणी घरी होेते ते एकतर साखर झोपत होते किंवा गाण्याचे, सासू-सुनांच्या भांडणाचे, तोकड्या वस्त्रातील नट-नट्यांचे कार्यक्रम पहाण्यात मग्न होते. कसले समारंभ नि कसले भाषण कशाला वाया घालवा आपला वेळ? अशीच सर्वांची भावना! पंतप्रधान नेहमीप्रमाणेच रडगाणे गाणार! ते कशाला ऐकायचे? सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने काम करायला हवे, असे सांगून समृद्ध भारत घडवू या, असे आवाहन करणार! गेल्या 60 वर्षांतील तेच-तेच मुद्दे! आतंकवाद्यांना इशारा देणार! पण या आतंकवाद्यांना यांनीच माजवले. राज्यकर्तेच दहशतवादी बनले आहेत. त्यामुळेच तर यांच्यावर बुलेटप्रूफ काचेच्या चौकटीत उभे राहून भाषण करण्याची पाळी आली! "जम्मू-काश्मिर' प्रकरणी मतैक्य घडायला हवे हे खरे आहे. पण घडणार कधी? आजवर का घडले नाही? आज काश्मिर पेटले आहे ते कोणामुळे? कॉंग्रेसच्या दळभद्रीपणामुळे नाही का? अफजल गुरूची फाशी कशासाठी रोखली? याबाबत राज्यकर्त्यांनी आत्मपरिक्षण करावे? देशात सातत्याने वाढणारी महागाई व दहशतवाद हे आपल्या पुढील मोठे आव्हान असल्याचे पंतप्रधानांनी कबूल केले. पण त्यासाठी ठोस निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी का केली जात नाही? साधे घुसखोर आपण रोखू शकत नाही. उलट मतांच्या लाचारीसाठी या घुसखोरांनाच अधिकृत नागरिकत्त्व बहाल केले जात आहे.
घुसखोरांचे लोण एका भागापुरते मर्यादित नाही. देशाच्या पार दुसऱ्या टोकालाही या किडीने ग्रासले आहे. इतक्या वर्षात कुपोषणाचा प्रश्न सरकार सोडवू शकलेले नाही. माणसाला माणसाप्रमाणे जगता यावे यासाठी ज्या काही प्राथमिक मुलभूत सुविधा आहेत. त्या पूर्णपणे बहाल झालेल्या नाहीत. भूकबळी, उपासमार या गोष्टी देशातील अनेक भागांच्या पाचवीला पूजल्या गेल्या आहेत. दारिद्रयरेषेख ाहूनही परिस्थितीमुळे आलेले पारतंत्र्य स्वीकारणेच त्यांच्या नशिबी आले आहे. तरीही आम्ही 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरे करतो. या देशाचे नागरिक असल्याचे ऊर बडवून सांगतो. हाच का आपला "सुजलाम्‌-सुफलाम्‌' देश!